'मामा' म्हटले की आपल्या आनंदाला पारावार राहात नाही; कारण मामा ही आपले सारे लाड पुरवणारी, साऱ्या इच्छा पूर्ण करणारी, आपल्याला प्रचंड जीव लावणारी अशी व्यक्ती असते. मामा आपल्याला अंगाखांद्यावर खेळवतो. कधी तो आपल्यासाठी घोडा होतो तर कधी गाडी होतो. आपल्याला सायकल शिकवणारा मामाच असतो. आपण मोठे झाल्यावर मोटरसायकलवर चक्कर मारता मारता ती चालवायला शिकवणाराही मामाच असतो!लहानपणापासून या मामाच्या नात्याची आपणास प्रचंड ओढ असते. मामा आला की आपल्याला हवं ते सगळं मिळणार असतं. त्यामूळं मामा आल्यावर आपणास इतरांची पर्वा करण्याची गरज राहात नाही. असा तुमचाही अनेकांचा अनुभव असेलच. मामाला आपल्या आयुष्यात हे स्थान कसं मिळालं? हे मामाचं नातं कसं निर्माण झालं? हे अभ्यासणं खूप रंजक ठरेल. अर्थात या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला मानवी इतिहास पडताळून पहावा लागेल.
मानवी इतिहासातील नोंदीनुसार आपल्याला असं दिसतं की, मानवी समाजात सुरुवातीला 'मातृसत्ताक' कुंटूब पध्दती अस्तित्वात होती. स्त्री हीच कुंटूबाची प्रमुख असे. तिला होणाऱ्या अपत्यांचा सांभाळ करण्याची मुख्य जबाबदारी पुरुषांकडे अर्थात त्या स्त्रीच्या भावांकडे सोपवलेली असे. ही जबाबदारी हे पुरुष अर्थात त्या स्त्रीचे भाऊ, त्या काळी अत्यंत प्रेमाने, आपुलकीने आणि जिव्हाळ्याने पार पाडीत असत. आईपेक्षाही अधिक प्रेम देणारी ही व्यक्ती होती. आपल्या समाजात भाषेचा विकास झाल्यावर, बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीला आपण 'मा' म्हणू लागलो. या 'मा' पेक्षा अधिक प्रेम करणारी, जीव लावणारी व्यक्ती म्हणून 'मा' + 'मा' = 'मामा' अशा अर्थानं आपण या व्यक्तिला 'मामा' हे नाव दिलं. अशा रितीनं मानवी इतिहासात 'मामा' या नात्याचा जन्म झाला!
खरं म्हणजे त्या काळी विवाहाची संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. स्त्री -पुरुषांच्या मुक्त शरिरसंबंधांचा तो काळ होता. एखाद्या पुरुषापासून स्त्रीला गर्भ राहिला तरी त्यावेळी पुरुषाला 'पितृत्व' दिलं जात नव्हतं. त्यामूळं त्या स्त्रीच्या पोटी जन्मणाऱ्या अपत्याशी पुरुषांचा कोणताही संबंध राहात नसे. अशी गर्भवती स्त्री आपल्या स्वतःच्या घरी या अपत्याला जन्म देई आणि त्या स्त्रीच्या घरातील पुरुषानं अर्थात तिच्या भावानं म्हणजेच 'मामा' नं या अपत्यांची देखभाल करायची, अशी पध्दत त्याकाळी रुढ होती. हा 'मामा' आपल्या बहिणीची सारी अपत्यं मोठया प्रेमानं सांभाळीत होता. त्यांना खाऊ घालणं, त्यांचं संरक्षण करणं ही मामाची मुख्य जबाबदारी होती. कारण त्याकाळी मामाची स्वतःची अपत्यं ही त्याच्या जवळ राहात नव्हती. पुरुषांना 'पितृत्व' मिळालेलं नसल्यामुळे 'आपलं अपत्य' ही भावना किंवा त्यांच्याप्रति प्रेम, स्नेहभाव किंवा जिव्हाळा अशी कोणतीही भावना पुरुषांमध्ये निर्माण होत नव्हती. त्यामूळे पुरुषाच्या मनात स्वाभाविकपणे निर्माण होणारे प्रेम त्याच्या बहिणीच्या अपत्यांनाच मिळत असे.
पुढं शेतीचा शोध लागला, मग काही काळानं नांगराचा शोध लागला. नांगराच्या शोधानं शेतीच्या मशागतीची पध्दत मोठ्या प्रमाणात बदलली. या बदलामुळे हळहळू शेतीमधील स्त्रियांचा सहभाग कमी होत गेला व पुरुषांचा शेतीतील सहभाग मोठया प्रमाणात वाढला. शेतीच्या उत्पादनात वाढ होऊ लागली. या वाढत्या उत्पादनाला कुणीतरी 'माझा वारस' असायला हवा असं पुरुषांना वाटू लागलं. या पुरुषांना आपला वारस ठरवता यावा यासाठी पुरुषाला 'पितृत्व' मिळणं गरजेचं होतं. या गरजेमधूनच काळाच्या प्रवाहात माणसाने विवाहाची संकल्पना स्वीकारली. ज्याला प्रचलित भाषेत आपण 'लग्न ' असं म्हणतो. विवाहामूळे स्त्री पुरुषांमधील मुक्त शरिरसंबंध हळूहळू कमी होत गेले आणि आता ते पूर्णपणे थांबले आहेत. आपल्या वैवाहिक जोडीदाराशी निष्ठा राखून केवळ आपल्या जोडीदाराशीच शरिरसंबंध ठेवण्याचे बंधन सर्वमान्य झाल्यामूळे पुरुषाला पितृत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
आता पुरुषाला 'आपलं अपत्य' कळू लागलं आणि साहजिकच त्याला आपल्या बहिणींच्या अपत्यांपेक्षा आपल्या स्वतःच्या अपत्याविषयी अधिक प्रेम वाटू लागलं. हा बदल अत्यंत स्वाभाविक असला तरी प्रचलित असलेल्या तत्कालीन स्त्रीप्रधान समाजव्यवस्थेसाठी तो मोठा धक्का होता. हा धक्का स्त्रियांना पचवता यावा, किंबहूना हा बदल स्त्रीप्रधान समाजव्यवस्थेकडून सहजपणे स्वीकारला जावा यासाठी पुरुषांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. याचाच एक भाग म्हणून पुरुषांनी चाणाक्षपणे आपलं स्वतंत्र अस्तित्व जोपासण्याचा प्रयत्न केला. घर, शेती, पशुधन यासारख्या मालमत्तेवर पुरुषांची मालकी जाणीवपूर्वक निर्माण केली आणि पाहाता पाहाता लाखो वर्षांची स्त्री प्रधान समाजव्यवस्था ही पुरुषप्रधान करुन टाकली. हजारो वर्षांनतरही ही नव्यानं निर्माण केलेली 'पुरुषप्रधान समाजव्यवस्था' अबाधितपणे टिकून राहावी यासाठी पुरुषांनी आपल्या सोईचे नियम बनवले. या नियमांना विविध ग्रंथांमधून चित्रित करुन आपल्या सोईने समाजव्यवस्था मार्गक्रमण करीत राहील हे पाहिलं. आपल्या लक्षात येईल की, म्हणूनच कोणत्याही ग्रंथात 'मामा' अस्तित्वात राहिला नाही! चूकून एखाद्या ग्रंथात मामाचा उल्लेख आलाच तर तो अत्यंत नकारात्मक अर्थानेच आला आहे. कंस मामा किंवा शकुनि मामाचे उदाहरण यासाठी पुरेसे ठरावे.
सध्याच्या काळात भाऊ- बहिणीचे नाते फारच रुक्ष झालं आहे. भाऊबीज आणि रक्षाबंधन या पलिकडे या नात्याचे अस्तित्व दिसेनासं झालं आहे. भावाकडून बहिणीची खूप मोठ्या प्रेमाची अपेक्षा असते. तिच्या मुलाबाळांचे लाड केले जावेत. त्यांना काय हवं - नको ते तिच्या भावानंच बघावं; आणि हे करताना प्रसंगी स्वतःच्या मुलां -बाळांकडं भावाचं थोडं दुर्लक्ष झालं तरी चालेल मात्र त्यानं बहिणीच्या मुला -बाळांचं हित बघीतलंच पाहिजे, हा आग्रह असतो. बदललेल्या परिप्रेक्षात तिचा भाऊ अर्थात तिच्या मुला बाळांचा 'मामा' मात्र असं काही करताना स्वतःच्या मुला-बाळांचा प्राधान्याने विचार करताना दिसतो. असा भाऊ किंवा 'मामा' मग 'नालायक' ठरवला जातो. म्हणूनच सध्या आपल्या आजूबाजूला 'चांगला' म्हणावा असा 'मामा' दिसत नाही! अर्थात यात सध्याच्या काळातील तुमच्या मामाचा खरंच कोणताही दोष नसतो. तुमच्यापैकी कुणी जेव्हा 'मामा' च्या भूमिकेत जाल तेव्हा तुम्हीही तसंच वागाल, जसं तुमचा 'मामा' वागला आहे! म्हणून मला वाटतं की, तुम्ही तुमच्या मामाला या बदललेल्या परिप्रेक्षातूनच पहायला हवं! तुमच्या मामाला तुम्ही समजून घ्यायला हवं! कदाचित 'माणूस' म्हणून स्त्री-पुरुष दोघांनाही समान समजलं जाईल आणि समाजात खऱ्या अर्थानं स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होईल तेव्हाच आपल्या आयुष्यात 'मामा' चं नातं पुन्हा आनंद निर्माण करु शकेल!
© अनिल उदावंत
(साहित्यिक)
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५