आपल्या आजूबाजूला पाहिले, ऐकले, अनुभवले तर जीवनाला कंटाळलेले अनेक आर्त स्वर ऐकू येतात. गांजलेले, त्रासलेले जीव दृष्टीस पडतात. आत्महत्येच्या अनेक घटनांची अनुभूती येते. आत्महत्येचे प्रकार तरी किती सांगावेत? पोलीसाची आत्महत्या, शेतकऱ्याची आत्महत्या, इंजिनिअरची आत्महत्या, विद्यार्थ्याची आत्महत्या, मातेची आत्महत्या, पित्याची आत्महत्या, व्यापाऱ्याची आत्महत्या... कुणी कर्जबाजारी झाले म्हणून, कणी नापास झाले म्हणून, तर कुणाला ताण असह्य झाला म्हणून...
जीवनाला कंटाळून आपले जीवनच संपविण्याचा निर्दयी व निष्ठूर निर्णय घेवून टाकला जातो! एका क्षणात सारे संपते. हातातल्या सोन्याची माती होते. डोक्यावर आभाळ कोसळते. पायाखालची जमीन फाटते. जीवनातला उजेड नाहीसा होतो. सगळीकडून अंधारुन येते. माणसाच्या वाट्याला आलेले प्रश्न, समस्या, अडचणी, संकटे यांची सरशी होते. माणूस हिंमत हरतो आणि जीवनही! अडचणी आणि संकटांतून आलेले गांजलेपण, गांगरलेपण आणि त्यामुळे नाडलेला, पीडलेला जीव, त्याला जीवनातले सौंदर्य दिसेनासे होते!
"आपल्या आयुष्यात संकटे येत नसतील तर आपण खुशाल समजावं की आपला जीवन जगण्याचा मार्ग चुकला आहे" असं स्वामी विवेकानंद म्हणत असत. त्याचा अर्थ इतकाच की सज्जनाच्या वाट्याला दुःख येणारच. दुःखालाही सज्जनाचीच संगत आवडते. म्हणूनच संकटांना टाळायचे नाही आणि कवटाळायचे तर मुळीच नाही! हे जीवन खूप सुंदर आहे. जीवनाचे हे सौंदर्य आपण शोधायला हवे, उपभोगायला हवे.जीवनात त्या अनेक आनंददायक अनुभवांनी आपण समृद्ध बनायला हवे. याच समृद्धीच्या जोरावर आयुष्यातल्या संकटांवर यशस्वीपणे मात करता येते. जीवन जगण्याची हीच रीत थोरा- मोठयांनी सांगीतली आहे. "महाजनो येन गतः स पंथा" या उक्तीप्रमाणे आपण चालत राहावं हेच खरं! छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेवून आपण आपला प्राण द्यावा, आपलं जीवन संपवावं अशी ईश्वराची इच्छा कधीच नसते. हे आपण समजून घ्यायला हवं.!
आपलं जीवन खरंच खूप सुंदर आहे हे आपण समजून घेणं ही सध्याची काळाची आणि कळीची गरज आहे. जीवन म्हणजे आपले कर्तृत्व, आपली जिद्द आणि नियती यांच्यामधील जुगलबंदी आहे! जीवन म्हणजे खळाळून वाहणारी नदी आहे. या नदीला सुख-दुःखाचे दोन किनारे असतात. आपण त्यांच्यामधून वाहणारा प्रवाह आहोत! नदीचा हा प्रवास मोठा गंमतीचा असतो. नदीला माघारी फिरता येत नाही. तिला केवळ पुढे जाणेच माहित असते.
भूतकाळाचे भूत गाडून टाकावे आणि वर्तमानाची कास धरावी. लढायला सज्ज व्हावे. आयुष्यातले आनंदाचे छोटे छोटे क्षण पकडावेत. त्यांचा मनसोक्त उपभोग घ्यावा. पुढे चालत रहावे. हे जीवन खूप सुंदर असल्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही!
सकाळचा सूर्योदय, संध्याकाळचा सूर्यास्त, पाखरांची किलबील, गोठ्यातल्या गाई गुरांचं हंबरणं, चंद्राचा नितळ प्रकाश, शांत आणि शीतल चांदणे, अंग गोठवणारी थंडी. घामेजणारा घामट उन्हाळा, हे सारं अनुभवायला हवं. त्यातच खरी मजा आहे. दारातली सुबक रांगोळी, देवधरात तेवणारी समई, दूर मंदीरात वाजणारी घंटा आपण एकदा अनुभवयालाच हवी. आपणास खात्री पटेल की, हे जीवन सुंदर आहे!
आई, वडिल, भाऊ, बहिण, आत्या, मामा, काका, मावशी यांचे प्रेमळ हात आपल्या पाठीवरुन फिरावेत यासाठी आपण काहीतरी करायला हवं. अडलेल्यांना सोडवा, पिडलेल्यांना मदत करा आणि तुम्हीच अनुभवा की हे जग किती सुंदरआहे!
आणखी एक महत्वाची गोष्ट - आपण जीवंत असतो तेव्हा आपल्या शरीरातील अब्जावधी पेशी त्यांचे ठरलेले काम अगदी इमाने इतबारे करीत असतात. एखादी व्यक्ती आत्महत्या करते तेव्हा तिच्यासाठी राबणाऱ्या या अब्जावधी पेशींनाच ती मारुन टाकते. केवढे हे क्रौर्य? आणि केवढा हा कृतघ्नपणा? युद्धात सारे सैनिक जीवाची बाजी लावून लढत असताना सेनापतीनेच युद्धभूमीवरुन पळून जावे, अगदी तसे! महाभारतातला अर्जुनही एका क्षणी याच निर्णयावर आला होता. त्यावेळी "गीता" उभी राहीली अन् अर्जून सावरला! ही गीता आपणही समजून घ्यायला हवी बरं का!
निराश होणे हेच मूळी पाप आहे. हे आजवर ज्यांना ज्यांना समजले त्यांनी या भूतलावर मोठे मोठे चमत्कार केले आहेत. तुम्हाला यशस्वी वाटणाऱ्या कोणालाही विचारा. तो तुम्हाला हेच सांगेल- "हे जीवन खूप सुंदर आहे!"
# लेखक #
श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क : ९७६६६६८२९५