“थकवा आहे. मी इंजेक्शन देतो. बरे वाटेल. डोसही देईन, ते चार चार तासांनी घ्या. झोप लागली तर मात्र उठवू नका. विश्रांती हवी आहे. मेंदू थकला आहे.” डॉक्टर म्हणाले.
त्यांनी इंजेक्शन दिले नि ते गेले. त्यांच्या बरोबर गंगू गेली. ती औषध घेऊन आली.
“जयंता, आ कर” ती म्हणाली.
त्याने तोंड उघडले. तिने औषध दिले. तो पडून राहिला. सायंकाळची वेळ झाली. आई देवदर्शनास गेली होती. वडील अजून आले नव्हते. इतर भावंडे खेळायला गेली होती. घरी जयंता आणि गंगू दोघेच होते.
“गंगूताई, माझ्य़ा खिशात पैसे आहेत. तू इंजेक्शन घे. आणि आपल्या आईला अंगठीची हौस होती. तूच केव्हातरी म्हणाली होतीस. त्या अंगठीसाठीही मी पैसे जमवून ठेवले आहेत. तू तिला एक अंगठी घेऊन दे.”
त्याच्याने बोलवेना. तो दमला. डोळे मिटून पडून राहिला. आता सारी घरी आली होती. जयंता बरा आहे असेच सर्वांना वाटत होते. जेवणे झाली.
“तू थोडे दूध घे.” आई म्हणाली.
“दे, तुझ्या हाताने दे.” तो म्हणाला.
भावंडे निजली. वडील, आई नि गंगू बसून होती.
“तुम्ही निजा. मी त्याच्याजवळ बसतो. मग बारा वाजता मी गंगू तुला उठवीन.” वडील म्हणाले.
“आणि दोन वाजल्यावर गंगू तू मला उठव. मग मी बसेन” आई म्हणाली.
“तुम्ही सारे निजा. मला आता बरे वाटत आहे. खरेच बाबा, तुम्ही दिवसभर दमलेले. आणखी जागरण नको. निजा तुम्ही” जयंता म्हणाला.