“होय, बाळ.” ती त्याच्याजवळ बसून म्हणाली. तिने सर्वांना थोडेथोडे लोणचे वाढले. तेथे दोनचार हिरव्या मिरच्या होत्या. रामजीने कोठून तरी आणल्या होत्या.
“उठ, बाबू. जेव थोडे.” लक्ष्मी म्हणाली.
“तूच भरव.” तो म्हणाला.
लक्ष्मीने त्याला भरवले. नंतर उरलीसुरली भाकर खाऊन ती पुन्हा कामाला आली.
कांडण आटोपून, कण्या, धापट, थोडे तांदूळ घेऊन ती सायंकाळी घरी परत गेली. असे दिवस जात होते.
एके दिवशी लक्ष्मीबरोबर दुसरी एक बाई आली.
“लक्ष्मी, ही कोण ?” मी विचारले.
“हा नणंद. करंजणीस असते. आता दिवाळी आहे म्हणून माहेरी आली आहे. माघारपण नको करायला ?” लक्ष्मी म्हणाली.
“माघारपण का तू करणार ?” मी विचारले.
“हो, तिची आई नाही. मग मीच करायला हवं. राहील दोन दिवस नि जाईल. म्हणाली, मी पण येते दादांकडे दळायला. नको सांगितले. आलीस माघारपणाला तर विसावा घे म्हटले, तर ऐकेना.” लक्ष्मी कौतुकाने सांगत होती.
“तुझ्या नणंदेचे नाव काय ?”
“त्यांचे नाव चंद्रा.”
त्या दोघी दळत होत्या. मधून हसत होत्या. नणंदाभावजयांचे ते प्रेम पाहून मला आनंद वाटला. लक्ष्मी गरीब, घरी खायची पंचाईत, नवरा बेकार नि आळशी ; परंतु नणंदेला दोन दिवस माघारपणाला लक्ष्मीने आणले. त्या गरिबीतही ती कर्तव्यदक्ष होती, उदार होती, प्रेमळ होती.
मी विहिरीवर गेलो होतो. कपडे धूत होतो. तो लक्ष्मी आली. ती तेथे उभी होती.
“काय ग लक्ष्मी ?”