शाळा कॉलेजात
असताना परिक्षा आली कि वादळ, भूकंप, दंगल
वगैरे काहीतरी होऊन परिक्षा पुढे
ढकलली जावी असं वाटायचं.
आता ही परिक्षा कधी एकदाची संपतिये असं
झालं असताना 'वॉशिंगटन बोर्ड ऑफ प्रोफेशनल
इंजीनियर्स' चं पत्र कि मी एक फॉर्म
भरायला विसरल्याने एप्रिल मध्ये परिक्षा देऊ
शकत नाही!
च्यायला पोपट!!
मी आऊच्या काऊला सांगुन ठेवलेलं
माझ्या परिक्षेबद्दल.
आता परत अभ्यास, परत टेन्शन, आणि ऐन
फुटबॉल सीझन च्या स्टार्टला परिक्षा!
त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे 'रिव्ह्यू
क्लास' आत्ता अटेंड करतोय
तो पुन्हा करावा लागणार नाही.
त्या रिव्ह्यू क्लासवरुन आठवलं - आयटमचं
भूत!
त्याचं झालं असं
कि या क्लाससाठी मला युनिव्हर्सिटी ऑफ
वॉशिंगटन मध्ये जावं लागतं.
पार्किंगच्या आणि ट्राफिकच्या (जागतिक)
प्रश्नाने बरीचशी जनता बसने येते. मला बसने
वगैरे जायचं म्हणजे लई वैताग येतो. मग
मी रेहमान ची गाणी वगैरे ऐकत १५
मिनिटांच्या रस्त्यावर तासभर काढुन
युनिव्हर्सिटीत पोचतो.
पहिल्याच दिवशी वर्गात गेलो तर - आयटम
पहिल्या बाकड्यावर बसलेली दिसली.
मी सवयीने शेवटच्या रांगेत गेलो.
आयटम म्हणजे - उंच, नाजुक, ब्राऊन ब्लॉन्ड
केस, नाजुक चष्मा वगैरे.
क्लासमध्ये आणखी पोरी नाहियेत असं नाही, पण
मास्तर शिकवत असताना ही हरणासारखी मान
पुढे ओढुन पाण्याच्या बाटलीतुन पाणी (अर्थात
नाजूकपणे) पिते आणि (मागच्या बाकावरुन) समोर
बघणाऱ्या अनेक माना मग आपसुक उजवीकडे
वळताना दिसतात.
आयटमचं पाणी पिणं, चष्मा नीट बसवणं, आसनं
बदलणं - हे अडीच तास अखंडपणे चालू असतं.
तर पहिल्याच दिवशी पार्किंग लॉटकडे चालत
जाताना कुणीतरी तिला विचारलं - तु कुठे
रहातेस?
ती म्हणे - रेडमंड.
च्यायला मी पण रेडमंडलाच चाललेलो.
ती बस स्टॉपकडे जाताना मी विचार
केला कि तिला विचारावं का कि मी सोडु का?
म्हणजे त्यामागचा (आणखी एक) उदात्त हेतू
म्हणजे - दोघं असल्यावर एच.ओ.व्ही. (हाय
ऑक्युपन्सी व्हेहीकल) लेन मध्ये
गाडी चालवता येईल आणि ट्राफिक आपसुकच
टळेल.
पण च्यायला (तेंडल्यासारखं) फुटवर्क
आणि टायमिंग - दोन्ही गंडलं.
बॉल गेल्यावर बॅट फिरली.
ती बस स्टॉपकडे चालत गेली.
पण तिचं भूत गाडीत येऊन बसलं!
म्हणजे झालं असं कि पार्किंग लॉटमधुन
गाडी काढुन कॅम्पस रोडवर संथपणे
जायला लागलो.
म्युजिक सिस्टिम वर 'तु हि रे....' सुरू झालं.
तेव्हा वाटलं, आयटम गाडीत असती तर मी ते
पटकन बंद करुन नॅशनल पब्लिक रेडिओ
किंवा तत्सम काहीतरी लावलं असतं.
मग ती म्हणाली असती - असु दे ना!
(या एका 'ना' ने पुरुषांच्या जगात
किती उलथापालथ होते हे पोरीबाळींना काय
कळणार....)
मग तिने मला गाण्याबद्दल विचारलं असतं.
मग मी तिला म्हणालो असतो - हा पिक्चर
वेगळाच. याला लव्ह स्टोरी, अ व्हायलंट लव्ह
स्टोरी, किंवा लव्ह ड्युरिंग रायट्स वगैरे कसलीच
विशेषणं फिट् होत नाहीत. आमच्याकडे ना,
एकतर हिंदु मुसलमान वगैरे लग्न चालत नाहीत.
खेडेगावामध्ये वगैरे तर नाहीच नाही. तर
पिक्चरची स्टोरी अशी कि -
तो, ती, निळंशार पालम्पुर, समुद्र, किल्ला....
किल्ला - हां....तर तिथे हे गाणं घडतं.
म्हणजे हा पिक्चर आला तेव्हा याच्यासारखं
काही आम्ही कधी पाहिलंच नव्हतं.
म्हणजे आमच्याकडे प्रेम वगैरे प्रकार
असतो आणि तो आमच्या पिक्चरमध्ये रापचिक
प्रकारे वगैरे दाखवतातही, पण हे म्हणजे अगदीच
'रॉ' होतं.
अगदी खरं वाटावं एवढं रॉ....
अजुन कशात काही नाही आणि व्याकुळ होऊन
हीरो रडतोय.
अजुन कशात काही नाही आणि सगळं काही सोडुन
हीरोईन जीव तोडुन पळत येतिए.
अजुन कशात काही नाही आणि जगातली शेवटचीच
असल्याप्रमाणे प्रत्येक लाट किनाऱ्यावर
आपटतेय....
अजुन कशात काही नाही आणि आम्ही चिंब भिजत
पिक्चर बघतोय....
मला त्या काळात तो हीरोने घातलेला पट्ट्या-
पट्ट्याचा टी-शर्ट घ्यायचा होता.
पुढे जाऊन त्याच्यासारखं 'जर्नालिजम' करावं
का असा विचार केल्याचंही आठवतंय.
हीरोचं नाव? अरविंद स्वामी.
ते सोड.
हिरोईन होती मनीषा कोईराला!
तिचे वडिल कि आजोबा नेपाळचे पंतप्रधान वगैरे
होते, पण ती ऍक्टिंग करायची.
का?
ते महत्वाचं नाहिये.
तर हिरोईन मनीषा होती.
असं म्हटल्यावर तुफान हळहळ
आणि गुदगुल्या वगैरे वगैरे
आम्हाला तेव्हाही व्हायच्या आणि आताही होतात!
कारण....
ते जाऊ दे.
पण या पिक्चरने तुफान कॉन्ट्रोव्हर्सी झालेली.
म्हणजे जनतेच्या धार्मिक भावना वगैरे
दुखावल्या.
नाही या गाण्याने नाही, पण दंगली, राजकारण,
राममंदीर वगैरे....
संगीत?
रेहमान. सवालच नाय....
साधना मावशीच्या घरी कुठल्याशा पूजेला व्हि.डि.ओ.
वर 'रोजा' नामक कुठलासा मद्रासी पिक्चर
लागलेला. खतरनाक स्टार्ट वगैरे झाल्यावर 'दिल
है छोटासा...' म्हणत
धबधब्या खालच्या लोखंडी शिडीवर उभं राहुन
आम्ही - बरसणारा रेहमान झेलायचा प्रयत्न
तेव्हा जो सुरू केला तो आजतागायत चालू
आहे....
हे पुढचं ऐक.
बोगद्यात जाता जाता हे गाणं सुरू होतं.
बोगद्यात अंधार.
आय नो - ते ऑबव्हिअस आहे, पण तरीही.
अंधार.
मागुन कुठुन आर्त - राजस्थानी वाटावेत असे
'जिनके सर हो इष्ककी छॉंव....' चे सूर
येईतो बोगद्यातुन बाहेर
पडता पडता जगण्याची टोटल उर्मी एकेक
ठेक्यात तोलत शाहरुख जे....
आई शपत - तुला कसा माहित शाहरुख?
हा....तोच.
पण तो पिक्चर 'वीर जारा' कि झारा होता.
अशा चुका होतात लोकांकडुन अधे मधे.
मी गाडी फास्ट तर चालवत नाहिये ना?
पण मला सवयीचा आहे रस्ता.
शिवाय स्पीड
लिमिटला गाडी चालवली कि मला मी आयुष्यातला वेळ
वाया घालवतोय असं वाटतं.
म्हणजे तो वाचवुन मी काही फार तीर
मारतो अशातला भाग नाही, पण वाटतं.
च्यामारी - 'जब पास है तो एहसास है तू'
चा अर्थ....
एवढ्या डीटेल मध्ये नको जाऊस.
आमच्या सारखा गुलजार 'फील' करायला शीक.
म्हणजे त्याचं असं कि - गुलजार गुलजार म्हणजे
काय चीज आहे, ते आम्हाला 'माया मेमसाब'
पाह्यल्यावर कळलं. म्हणजे एकतर पिक्चर
टॅक्स-फ्री, ते पण 'वेस्ट-एंड' ला, शिवाय त्यात
दीपा साहीचा एक बोल्ड सीन आहे वगैरे
आवश्यक माहिती काढून मी आणि योगेश
तो पहायला गेलेलो.
१५ ऑगस्ट १९९३ ला!
आता काय करणार....रहातं असलं
काही माझ्या लक्षात....
हो तर - बोल्ड सीन होताच, आणि तो कधी नव्हे
ते पिक्चरच्या कथानकासाठी आवश्यकही होता,
पण 'इस दिल मे बस कर देखो तो....यह शहर
बडा पुराना है' ने एवढं झपाटलं
कि त्या एका दिलापायी हजार शहरं बदलत
आम्ही अजुन भटकतोय....
तर सांगायचा मुद्दा असा कि गुलजार असा फील
करायचा असतो!
पण तो सगळ्यांनाच झेपत नाही.
खोटं कशाला बोला, कधी कधी मला पण झेपत
नाही.
नाही ग्रेस वगैरे एवढा अवघड नाहिये, पण एकंदर
अवघडच.
म्हणजे नाही कळला तरी अवघड आणि कळला तर
आणखीनच अवघड....
या गाण्यात
लडाखमधल्या कुठल्याशा तळ्याकाठी एका चादरीत
शाहरुख आणि मनीषा जे काही करतात - नाही ते
एवढं ऑबव्हिअस नाहिये, पण ते
हिंदी पिक्चरमध्ये न भूतो न भविष्यति आहे.
सतरंगी गात ते दोघे जे काही एक रूप, एक रंग
होतात आणि त्यावर शाहरुख एका सूफी धुनीत जे
पिसाळल्यासारखं नाचतो, ते लक्ष्मीनारायण
मध्ये अपर-स्टॉल्स मध्ये बसुन जेव्हा पाह्यलं
तेव्हा वाटलं कि आता या पिक्चरनंतर मणिरत्नम,
रेहमान, गुलजार, मनीषा, शाहरुख या सगळ्यांनीच
संन्यास घ्यावा....
कारण पर्फेक्शन कॅनॉट बी इम्प्रुव्हड्.....
बऱ्याच लोकांना हा पिक्चर
पटला नाही आणि मला त्यांना तो ग्रेट का आहे
ते कधीच समजावुन देता आलं नाही.
असो.
चार गाण्यात घरी - नॉट बॅड!
आठवड्यात दोन दिवस क्लास - आणि या दोन
दिवसांत क्लासवरुन येताना मी आणि आयटमचं
भूत.
आणि आमच्या गप्पा!
गम्मत आहे.
हे बरेच दिवस मनात घोळत होतं, पण
लिहायला जमलं नव्हतं.
भूत पण शिस्तीने फक्त क्लासवरुन येतानाच
गाडीत असायचं.
पण आज हे लिहायला घेतलं आणि क्लासवरुन
येताना आयटमचं भूत हरवलं.
किंवा यायला विसरलं.
आज आयटमने स्वत:ची गाडी आणलेली.
कदाचित ते तिच्याबरोबरच गेलं असेल.
भुताबरोबर
गप्पा मारताना कधी पडला नव्हता तो प्रश्न
पोस्ट लिहायला घेतल्यावर पडला.
प्रश्न म्हणजे असा कि जणु
काही अभ्या म्हणतोय कि मामा काय हे -
आता लग्न बिग्न झालंय तुझं!
मग मी पण विचारात पडलो.
च्यायला हो की!
मग असं भूत गाडीत येऊन बसलंच कसं?
मी त्याला बसु दिलंही कसं?
पण का कुणास ठाऊक, मला याबद्दल फारसं
गिल्टी वगैरे वाटत नाही.
भूत मी न विचारता आलं.
बसलं.
आणि आम्ही (खरं तर मी) रेहमानच्या गाण्यांवर
आठवणींना उजाळा दिला - हे खरं.
आठवणींना उजाळा तो पण कसला?
१५ ऑगस्ट १९९३ च्या त्या रात्रीचा?
कि 'बॉम्बे' पाह्यल्यावर पहिल्यांदा प्रकर्षाने
प्रेमात पडावंसं वाटलेलं - त्याचा?
काय माहित.
तसं आज मी भुताला मिस पण केलं नाही.
त्यात एक बबन रस्ता अडवुन स्पीड लिमिट मधे
गाडी चालवत होता. त्याला ओव्हरटेक करेपर्यंत
घर जवळ पण आलेलं.
तर
मी या भुताला अभ्याच्या त्या 'टुटा सितारा तो...'
च्या पोस्टमधल्या मित्राप्रमाणे मानतो.
कदाचित भुताला त्या तुटलेल्या सिताऱ्यात
इंटरेस्ट नसेलही, पण मी त्याला माझा इंटरेस्ट न
चुकता ऐकवतो.
या निमित्ताने मग ते भूत
मला आवडणाऱ्या गोष्टी मला का आवडतात ते
नव्याने आठवायला लावतं.
सवयीच्या आवडी मग फक्त सवय न
रहाता फक्त आवडी म्हणुन रहातात.
त्यांची उगमस्थळं आठवली कि कात
काढल्यासारखं 'नविन' वाटतं.
पुढे जाऊन जर्नालिजम कधी केलं नाही.
टी-शर्ट बद्दल तर सपशेल विसरुनच गेलो.
स्वत:च्याच शहरात अजुन भटकतोय
आणि सापडत नाहिये.
पण त्या बुरुजावरच्या लाटांचा ध्रोंकार अजुन ऐकु
येतोय.
तेव्हा लागलेली ओढ आणि ओल अजुन जाणवतेय.
आणि का कुणास ठाऊक -
बरं वाटतंय....

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel