या कथेचे लेखक श्री निमिष सोनार असून त्यांच्या परवानगीने हि कथा इथे टाकण्यात आली आहे. मूळ कथा तुम्ही http://www.maayboli.com/node/38292 इथे वाचू शकता.
दुपारचे
दोन वाजले. अक्षांश जरा जड
डोक्यानेच झोपेतून उठला. आई
ने त्याला म्हटले, "चल फ्रेश
हो. जेवून घे. " अक्षांश
कालची नाइट शिफ्ट करून
सकाळी सातला घरी आला होता.
त्याच्या अंगात काळा टी शर्ट
होता, त्यावर "व्हाय'रस'? टेक
ज्यूस! " असे लिहिलेले होते.
कॅब दाराशी सोडून गेल्यानंतर
झोपेच्या धुंदीतच
तो पायऱ्या चढून वर आला, बेल
वाजवताच त्याच्या आईने दार
उघडले आणि तो बेडवर
आडवा झाला होता.
आता दुपारी त्याला आपोआप जाग
आली होती. झोपेच्या धुंदीत
त्याला आईचे "फ्रेश, जेवण"
एवढेच ठळक आणि नीट ऐकू आले.
त्याने समोरच्या खिडकीतून
पाहिले असता जरा अंधारून
आल्याचे त्याला जाणवले.
खिडकीतून पूर्णपणे पलीकडचे
दिसत नव्हते कारण खिडकीसमोरच
एक मोठे झाड होते. आता फक्त
सहा तासांनंतर पुन्हा नाइट
शिफ्टला कंपनीत
त्याला नेण्यासाठी कॅब येणार
होती. तो कॉल सेंटर मध्ये
कामाला नव्हता तर टेक्निकल
सपोर्ट चे त्याचे काम होते.
नेटवर्किंग सपोर्ट. चोवीस तास
सातही दिवस सपोर्ट. म्हणून
शिफ्ट. पण, शेजारचे लोक शिफ्ट
ड्यूटी असली म्हणजे बहुतेक
कॉल सेंटर मध्ये काम असावे
असेच गृहीत धरत.
तसा तो सहसा त्यातला फरक
इतरांना समजावून
सांगण्याच्या फंदात
पडायचा नाही.... पण हे काय? आज
जरा डोके दुखतेय?
नेहमी पेक्षा जरा जास्तच. का?
अक्षांश फ्रेश होवून आला.
त्याने टीव्ही ऑन केला. आईने
किचनमध्ये जेवण गरम
करायला घेतले. तीवाही वर "माय
टीव्ही न्यूज" चॅनेल लागले
होते. म्हणायला ते न्यूज
चॅनेल होते पण त्यावर न्यूज
वगळता इतरच काहीबाही दाखवत
होते. " ये देखिये असली भूत.
भूतहा तसवीरें. अगर आप
भूतों पे विश्वास नही करते,
तो ये प्रोग्राम आपके लिये
है. अगर आप भूतों पे विश्वास
करते है तो भी यह ये
प्रोग्राम आपके लिये है.
देखिये कैसे एक घर में एक भूत
ने मचाया हडकंप.. देखते रहिये
ब्रेक के बाद! " "काय वात आणलाय
यांनी बाप रे. डोकं भेंगाळलंय
नुसतं. आई SSS", तो ओरडला,
"रिमोट कुठे आहे? " स्वयंपाक
घरात अन्न गरम करत
असताना आईचे लक्ष
किचनच्या खिडकी बाहेर
खालच्या बाजूला असणाऱ्या एका भाजीवाल्याकडे
गेलं. आईचे लक्ष नाही पाहून
अक्षांश ने स्वतःच रिमोट
शोधला आणि "फायदे की आवाज"
चॅनेल लावला. त्याने
गुंतवलेल्या शेअर्स चे भाव
खालच्या सरकणाऱ्या पट्टीवर
येईपर्यंत तो वाट पाहू लागला.
आई त्याचे समोर येऊन म्हणाली,
" अरे अक्षांश, ऐक. अन्न गरम
करून वाढून ठेवले आहे. खाऊन
घे. मी जरा भाजी घेऊन येते,
गाडीवाल्याकडून. दोन चार
दिवसांसाठी. आज
रात्रीसाठी डबा नेणारेस
की कॅंटीन मध्येच खाणार?
म्हणजे त्यानुसार
मी आतासाठी सुद्धा भाजी आणते...
" "आई... सरक बाजूला. माझा शेअर
सरपटत निघून जाईल...
मी रात्री जेवेन कॅंटीन
मध्येच किंवा बाहेर कुठेतरी!
" "बरं! " असे म्हणून आई
खाली निघून गेली. अक्षांश
किचनमधून ताट वाढून
टीव्ही समोर आणून जेवण करू
लागला. त्याने गुंतवणूक
केलेला शेअर आहे त्याच किमतीत
होता. आठशे रुपये! ना कमी,
ना जास्त. जेवताना सहज म्हणून
खिडकी कडे लक्ष गेले असता,
त्याला दिसले की पाऊस वेगाने
बरसायला लागला होता.
विजा चमकत होत्या. अचानक कोण
जाणे त्याची नजर झाडावर
खिळली. खिळूनच राहिली,
डोळ्यांच्या पापण्या न हलता!
त्याला दोन शून्य दिसले.
पुसटसे. अस्पष्टसे.
त्या शून्यांकडे तो शून्यात
हरवल्यासारखा बघत राहिला.
विजेच्या लखलखाटात ते दोन
शून्य स्पष्ट दिसायला लागले.
त्यापैकी एका शून्यांत एक
मानवी कवटी आपल्याच धुंदीत
हसत होती. दुसऱ्या शून्यात
आणखी एक कवटी होती.
तीच्या चेहऱ्यावर प्रथम
खिन्नता आणि विषाद व नंतर
कारुण्य, वैषम्य असे भाव
दाटायला लागले. विषाद
आणि खिन्नता जेव्हा त्या कवटीच्या चेहऱ्यावर
दिसली तेव्हा ती सगळ्यात
भेसूर कवटी वाटत होती. वीज
मावळली. नंतर लख्ख अंधार!
केवळ अंधार. पुन्हा वीज
कडाडल्यावर तेथे
कुरळ्या केसांचा एक अस्पष्ट
चेहरा आकार घ्यायला लागला.
समोर काय दिसतंय
आणि का दिसतंय असा विचार
अक्षांश च्या डोक्यात
यायच्या आधीच त्याचे विचार
थिजून गेले होते.... दृष्टी तर
थिजली होतीच. फक्त समोर
काहीतरी अमानवी दिसत होते,
याची जाणीव मनाच्या कोपऱ्यात
त्याला होत होती.
"त्सामिना मीना एह एह,
वक्का वका एह एह,
त्सामिना मीना झांगलेवा, धिस
टाइम फॉर आफ्रिका! "
असा रिंगटोन
त्याच्या मोबाइलमध्ये
वाजल्यावर त्याची ती नजर बंद
करून टाकणारी तंद्री भंग
पावली. "हॅलो! " अक्षांश
भेदरलेल्या अवस्थेत म्हणाला.
"हॅलो अक्स! अरे दचकलास की काय
माझ्या फोनने? झोपला होतास
का? " "नाही रे. काही नाही.
असंच आपलं! बोल तू! "
त्याला आलेल्या अनुभवाला मुद्दाम
विसरत तो म्हणाला. "मी म्हटलं
की येतोस का माझे घरी?
थोड्या गप्पा गाणी आणि थोडी रपेट
मारून येऊ या अफाट शहरात! आज
मला आज थोडे खासगी काम होते,
म्हणून सुटी घेतली होती पण
आता ते काम झाले
आणि मी फ्री आहे. मधुरा पण
फ्री आहे. ती सुद्धा येते आहे
कारण तीच्या रूम पार्टनर्स
दोन्ही सुद्धा बाहेरगावी गेल्यात!
" पलीकडून अभय बोलत होता. "हे
मनातलं बोललास. जेवण संपवून
मी निघालोच. " आता पावसाचा जोर
कमी झाला होता. जेवण आटोपून,
रेनकोट घालून, हेल्मेट घेऊन
आणि दरवाज्याला लॅच लावून
तो खाली निघाला. आई ने
भाजी घेतलेली दिसत
होती आणि ती कुणा शेजारच्या ओळखीच्या स्त्रीशी बोलत
घराच्या एका ओट्यावर
छताखाली बसली होती. बाइक
स्टार्ट करून त्याने
घराची चाबी आईकडे
फेकली आणि ओरडला, "आई,
मी जरा येतो अभयकडे जाऊन SSS
ही चाबी घे...! " चाबी आईजवळ
ओट्यावर पडली. आई त्याला ऐकू
जाईल अशा आवाजात म्हणाली, "
ठीक आहे. संध्याकाळी ये लवकर
घरी, सात साडेसात पर्यंत!! "
पावसाच्या धारा कापत फक्त
"घरी लवकर" एवढाच आवाज त्याचे
पर्यंत पोहोचला. (२) पाऊस
कमी असला तरी अंधारून आलेले
होते. आता तो शहराबाहेरील
निर्जन रस्त्यावर होता.
अक्षांशच्या बाइक चा वेग
जसजसा वाढत होता तसतसा बाइकच
वेगदर्शक काटा मात्र विरुद्ध
दिशेने फिरतोय असे लक्षात
आल्यावर तो हादरला आणि त्याने
त्या वेगदर्शकाच्या काचेत
पाहिले. तर तेव्हा मात्र
काटा योग्य दिशेनेच जात होता.
मग, आधी दिसले ते काय होते?
भास? आणि हे काय? आता मात्र
काचेत त्याने जे पाहिले
त्यामुळे त्याच्या तोंडातून
आरोळी सुद्धा निघू
शकली नाही इतका तो हादरला.
त्याचे हेल्मेट घातलेले
प्रतिबिंब त्याला दिसले खरे
पण हेल्मेट च्या आत
पिवळी कवटी होती... अचानक
अनुभवलेल्या या भयाने
तो सैरभैर झाला आणि त्याने
हेल्मेट काढून
बाजूच्या झुडुपांत फेकले.
त्याची बाइक थोडक्यात
पडता पडता वाचली आणि त्या अंधाऱ्या झुडुपांत
त्या हेल्मेट च्या आत मात्र
एक जळणारी पिवळी कवटी हसत
होती. आता पाऊस बंद झाला होता.
अभयचे घर अजून दोन किलोमीटर
होते. तो निघाला. हा भयप्रद
अनुभव त्याला मनापासून
हादरवून गेला. आता हे
नक्की मी अभयला सांगतो, असे
ठरवून
तो अभयच्या घरी पोहोचला.
मधुरा आलेली होती. तिने
काळी थ्री फोर्थ जीन्स
आणि लाल तंग टी शर्ट
घातलेला होता. अभयने जिन्स
आणि हिरवा टी शर्ट
घातला होता. ते कॉलेजपासूनचे
मित्र आणि बॅचलर्स. शिकले याच
शहरात, जॉबपण याच शहरात.
त्यामुळे वरचेवर भेटणे
व्हायचे. अभयच्या रूम मध्ये
नवीन गाणी ऐकत
त्या तिघांनी दुपार घालवली.
मग
त्यांनी संध्याकाळी हॉटेलमध्ये
जायचे ठरवले. "डिलक्स डिनर
डायजेस्ट" म्हणजे
थ्रीडी मध्ये
संध्याकाळी डिनरच्या वेळेस
दिवसातले दोन विचित्र अनुभव
अक्षांशने सांगितले. अभय: "हे
बघ मित्रा, आपण जिवंत
असताना मेलेल्या माणसांच्या गोष्टी कशाला करायच्या?
एंजॉय यार. ही मधुरा बघ.
मस्तपैकी आठवडाभर आपले काम
व्यवस्थित करते. पैसा कमावते.
नंतर त्या अंकेश बरोबर मस्त
एंजॉय पण करते. नंतर
ही सुद्धा जाणारेय यूएस ला.
लोक कुठल्या कुठे चाल्लेत. तू
आपला करत बसलास भूत भूत.... "
मधुरा : "अक्षांश, खरे
सांगायचे तर विज्ञानाकडे
या गोष्टीचं पण उत्तर आहे.
याला भास असे आपण म्हणतो.
मनात विचार जास्त झाले की असे
होते,
लोकसंख्या प्रमाणाबाहेर
वाढली की देशाचे जसे होते
तसे! मन एका मर्यादे पलीकडे
जास्त विचार सहन करू शकत
नाही. " अभय: "किंवा मनात एकाच
प्रकारचे विचार जास्त
गर्दी करू लागलेत
की सुद्धा असे भास होतात, जसे
एखाद्या देशात
हुकूमशाही पद्धतीच्या लोकांची संख्या जास्त
झाल्यावर देशाचे जसे होते
तसे, बरोबर ना मधुरा? "
मधुरा हसली. अक्षांश: " अरे पण,
माझ्या मनात तशा प्रकारचे
काही विचार नव्हतेच... खरं
सांगायचं तर, कोणत्याच
प्रकारचे विचार नव्हते
मनात!.. तरीही असे कसे होईल? "
मधुरा: "अशा वेळेस आपलं सुप्त
मन जागृत होतं
आणि आपल्या मुख्य मनाला विचार
पुरवतं! गॉट इट? आता चल
पार्टीची मजा खराब करू नको...
तिकडे बघ! " स्टेजवर आकर्षक
गायिका मादक स्वरात गाणे गात
होती.
तिघांची ती संध्याकाळची सोबत
त्यांनी मस्त मजेत घालवली.
नंतर थोडे डिजे वर थिरकून मग
एकमेकांना बाय बाय करून ते
तिघे आपापल्या घरी गेले.
रस्त्याने
येताना अक्षांशला जेथे
हेल्मेट फेकले होते
ती जागा आल्यावर तिकडे लक्ष
देण्यावाचून राहवले नाही.
तेथे हेल्मेट नव्हते. पण बाइक
थांबवून कुतूहल म्हणून
त्याने त्या झुडपांत पाहिले.
तेथे शांतता होती. हेल्मेट
कुठेच नव्हते.
तो पुन्हा रस्ता ओलांडून बाइक
कडे वळला तेथे एक आश्चर्य
त्याची वाट बघत होते.
बाइकच्या हॅण्डलला त्याचे
तेच येताना फेकून दिलेले
हेल्मेट लावलेले
त्याला दिसले. त्या निर्जन
ठिकाणी एखाद दुसरीच बाइक
जाता येताना दिसत होती. एक
बाइकस्वार अक्षांशपासून
थोड्या अंतरावर थांबला कारण
त्याला मोबाइलवर एक कॉल
आला होता. गाडी बाजूला लावून
तो मोबाइलवर बोलू लागला.
बोलता बोलता त्याचे लक्ष
अक्षांशकडे गेले. अक्षांशकडे
सहजपणे त्याचे लक्ष गेले
असता डोळ्यात आणि चेहऱ्यावर
विचित्र कुतूहलमिश्रित भाव
तरळले आणि त्याचे डोळे
विस्फारले. अक्षांश ने
अभयला कॉल केला आणि म्हटले,
"माझे आलेले अनुभव
मी सांगितल्यावर तुम्ही हसत
होतात? अरे
मी तुम्हाला सांगितले होते
ना त्या फेकून
दिलेल्या हेल्मेटबद्दल! ते
आता मला इथेच सापडले! पुन्हा!
या इथे... " आणि त्याचे वाक्य
अपूर्ण राहिले कारण ते
हेल्मेट आता तेथे नव्हते.
त्याच्या तोंडातून पुढे शब्द
फुटत नव्हता. त्याने मोबाईल
बंद केला. त्याचे मनात विचार
आला की आपण
त्या दुसऱ्या बाइकवरच्या माणसाला विचारूया की हेल्मेट
त्याने तरी जरूर
आपल्या गाडीवर पाहिले असेल.
पण तो बाइकवाला तेथे नव्हता.
बाइक चा आवाज सुद्धा न
येता आता येथे
उभा असलेला तो बाइक्सवर अचानक
कुठे गेला होता? ... त्याने
भेदरलेल्या अवस्थेत बाइक
सुरू केली आणि मागे वळून न
पाहता, वेगाने तो घरी पोहोचला.
आठ वाजणारच होते.
आलेल्या अनुभवाबद्दल
आता तरी आईला सांगायचे
नाही असे त्याने ठरवले.
आईशी जुजबी बोलून
तो रात्रपाळी साठी कॅब
च्या पिकअप पॉइंटकडे निघाला.
नाइट शिफ्ट करून झोपेत बाइक
चालवणे धोकेदायक असल्याने
त्याने कॅब
सेवा स्वीकारली होती.
कॅबमध्ये बसल्यावर
अभयचा मेसेज
होता त्याच्या सेलवर
आलेला त्याने पाहिला: "व्हॉटस
द मॅटर, ड्युड? ""
अभयला त्याने मेसेज पाठवून
दिला: "नथिंग सीरियस. जस्ट आय
वाज जोकिंग! " अभय ने लिहिले:
"गुड दॅट इट वॉज अ जोक!
रिलॅक्स अन डू वर्क! गुड
नाइट... " (३) "त्सामिना मीना एह
एह, वक्का वका एह एह,
त्सामिना मीना झांगलेवा, धिस
टाइम फॉर आफ्रिका! "
ऑफिसमध्ये त्याने नुकतेच
कॉंप्युटरवर लॉगीन केले होते
आणि तेवढ्यात डेस्कवर
ठेवलेला सेलफोन वाजला. "अरे
अक्षांश... मै नही आ राहा हूं
आज. थोडी तबियत ठीक नही है..! "
पलीकडून अभिषेक होता. " ठीक है
यार. चल फिर आराम कर. " "अरे
सिर्फ वो तीन टी़टी है मरे
नाम के, वो बस जरा रिझोल्व कर
देना. वैसे मैने मेल
डाला हुवा है युजर्स को! अगर
कॉल आता ही है तो युजर्स
को इंफोर्मेशन बता देना.
डेस्क्टॉप पे अभी न्यू करके
एक डॉक्युमेंट है... उसमे
लिखा हुवा है
की क्या इंफर्मेशन बतानी है.
मैने मॅनेजर को मेल डाल
दिया है की आज मै नही आ
पाऊंगा... चल बाय! " फोन कट!
अक्षांश मनात म्हणाला, "घ्या!
म्हणजे आज हा येणार नाही.
माझे काम डबल झाले. आणि येस...
रोस्टर नुसार या प्रोजेक्टचे
आम्हीच दोघे नाइटला होतो...
वेळेवर हा आजारी पडला म्हणजे
या युनिटमध्ये
आणि या बिल्डिंगच्या या सातव्या फ्लोअरवर
मी एकटाच... पूर्ण रात्र..!!
बोअर होणार! हम्म! माझे मेल
आता चेक करतो... पाहू
किती वर्क लोड आहे आज रात्री!
" तो मेल चेक करू लागला. दीड
वाजेपर्यंत हातातली सगळे
कामे त्याने आटोपली. सगळे कॉल
अॅड्रेस केले. आता नवीन एखादे
टीटी आले किंवा कस्टमरचा कॉल
आला तरच काम असणार होते
आणि दर अर्ध्या तासाने
करावयाची रूटीन चेक
अॅक्टिव्हिटी.
त्याला थोडी डुलकी लागायला लागली.
त्याने समोर भिंतीवर
लावलेल्या तीन
पैकी भारतातली वेळ
दाखवणाऱ्या घड्याळात पाहिले.
सगळे अंक इंग्रजीत होते.
रात्रीचे दोन चाळीस वाजले
होते. मिनिट काटा आठवर होता.
इतर दोन घड्याळे युके
आणि यूएस मधली वेळ दाखवत
होते. आठवर असलेला मिनिट
काटा गळून पडला. आठ
चा आकडा दोरखंडाने
बनलेला होता आणि त्याची आठ
बनवणारी गाठ सुटून आठ शून्य
बनले. शून्याच्या आत तोच
अस्पष्ट आणि कुरळे केस
असलेला चेहरा....
दुपारी झाडावर पाहिलेला....
त्यानंतर नऊ आणि सहा अंक
घड्याळाच्या मध्यभागी आले.
सहा जवळ नऊ आला आणि उलटा झाला.
आता सहा आणि नऊ
यांनी एकमेकांना आरशात
पाहिल्यासारखी स्थिती होती.....
नंतर सात अंक भूकंप
झाल्यासारखा हालू
लागला आणि एखाद्या सिंहाप्रमाणे
इकडे तिकडे येरझारा घालू
लागला..... ते पूर्ण घड्याळच
अस्वस्थ झाले होते.... तीन
वाजले! "टडींग" असा डेस्कटॉप
वर आवाज आला आणि त्याने
पाहिले चॅटिंग मध्ये
त्याचा यूएस मधला मित्र आवान
होता. "हे अक्स. यू फ्री? "
घड्याळात
पाहिलेल्या त्या भासाचा अर्थ
लावण्यापूर्वी त्याची तंद्री भंग
पावली. त्याने आवान ला टाईप
केले: "येस. एक मिनिटांत
येतो... " कॉफी व्हेंडींग मशीन
मधून त्याने गरमागरम
इलायची चहा चे बटण दाबले
आणि वाफाळता कप घेऊन डेस्क वर
आला. बरे झाले हा ऑनलाईन आहे.
यूएस मध्ये आता दिवस आहे.
आता चहा घेऊन झोपेवर पण
नियंत्रण ठेवता येईल
आणि याच्याशी बोलत बोलत
टाईमपास होईल. भास पण होणार
नाहीत!! आवान त्याचेसोबत
इंजिनियरिंगाला होता. मग नंतर
सात वर्षे त्यांची भेट
झाली नव्हती. तो लगेच यूएस
ला निघून गेला होता. तेथे
कसल्याशा फायनान्शियल फर्म
मध्ये जॉईन झाला होता. फेसबुक
वर भेट होत होती. अधून मधून.
त्या दोघांच्या आवडी निवडी,
वैचारिक पातळी सारखी होती.
अक्षांश:"बोल रे. कसे काय
चाल्लेय तिकडे? " आवान: "अक्स.
फसलोय रे. जाम फसलोय. "
अक्षांश:""का? काय झालं? "
आवान:"आमच्या फर्म चं दिवाळं
निघालं. इतर दुसरीकडे
नोकरी मिळेनाशी झाली आहे... "
अक्षांश:"अरे तिकडेच
माझा कझीन आरव असतो. बघ
तो काहीतरी मदत करू शकेल तर!
मी पत्ता देतो... " आवान: "
नाही रे! उशीर झालाय! "
अक्षांश:"" म्हणजे? " आवान:
"अरे! शेअर्स मध्ये गुंतवलेले
माझे सगळे पैसे बुडाले. यूएस
आणि इंडियन मार्केट मधले
सगळे! " अक्षांश: "हा यार. आपण
दोघांनी पैसे
गुंतवलेला तो शेअर वाढतच
नाहीये. कित्येक महीने झाले. "
आवान: "अरे मी खूप
धोका पत्करून त्यात पाच लाख
गुंतवले होते...! त्या वेळेस
फर्म डबघाईला जाणार असा अंदाज
बांधला जात होता. त्या वेळेस
मी तुला या शेअर मध्ये
किती रुपये गुंतवले ते
सांगितले नव्हते कारण तू
मला तसे करू दिले नसते...
तो शेअर पूर्वी सोळाशे
ला होता आता आठशेलाच झालाय!
सगळी कडे नुकसानच नुकसान.... "
अक्षांश:"असे? मी काय मदत करू
शकतो? शक्य ते मी करेन. त्याच
शेअर मध्ये मी पण गुंतवले पण,
त्या वेळेस आठशे च
होता आताही आठशेच! " आवान:
"मदत? आता उशीर झालाय! फक्त
एकच काम कर... " अक्षांश: "अरे
असे काय निगेटिव्ह बोलतोस?
आपण गोष्टी सावरू शकतो! "
आवान: "हाहा... शक्य नाही. फक्त
एकच काम कर, मी तुला एक ईमेल
केलंय. त्याची अॅटॅचमेंट फाइल
ओपन कर, प्रिंट कर आणि माझे
घरी दे. त्याचा पासवर्ड पण
मी मेलमध्ये पाठवलाय"
अक्षांश: "अरे पण इकडे ये
ना भारतात. येथे तुला जॉब
मिळेल. " आवान: "आता उशीर
झालाय... हे सगळे
मी घरी सांगितले नाही.
मी येथे एका संस्थेत पैसे पण
गुंतवले होते. तेही बुडाले.
घरी कोणत्या तोंडाने हे
सांगणार? कर्ज होते....
बँका मागे लागल्या होत्या!
तुला चॅटिंग वर
मिळवण्यासाठी मला किती आटापिटा करावा लागला माहितेय?
एवढं सोपं नाहीये ते!
आत्मा शरीरातून निघून
गेल्यावर
किंवा आत्मा स्वतः आपण
बळजबरीने बाहेर काढल्यावर मग
एखाद्या मित्राशी चॅटिंग
करून निरोप कळवणं एवढं सोपं
नाहीये.... सगळं उलटं झालं
होतं.... माझी गाडी वेगाने
चाललीय असं वाटत होतं मला. पण
प्रत्यक्षात तिचा वेग
कमी कमी होत जाऊन ती थांबली...
सगळे माझे निर्णय बूमरॅंग
झाले सात आकड्यासारखे...
मार्गच सापडत नव्हता.... आठ
आकड्यात अनंतपणे
गाडी चालवावी... तसे! फिरून
परत त्याच त्याच जागी....
अनंतपणे!!! " "म्ह... म्हणजे",
थरथरत्या हाताने अक्षांशने
टाईप केले, "तू तू जिवंत
नाहीस? " आवान: "नाही.
दोरखंडाची फार मदत
झाली मला आत्म्याला मुक्त
करण्यासाठी... चल बाय... सी यू
टुमारो असे मी म्हणत नाही...
मी गेले आठ तास झाले जग सोडून
गेलो आहे! त्या आधी मला खूप
प्रकर्षाने वाटत होते
की तुला हे सांगावे.... पण
अशा रसातळाला गेल्यावर
माणसाचा असा गोंधळ उडतो ना...
वेळेवर काही नीट सुचतच
नाही.... तुला कॉल
करता आता असता... पण, मनाचा फार
गोंधळ उडाला होता...
तुझा बदललेला नंबर माझेकडे
नव्हता... शेवटी वेळेवर जे
सुचले नाही ते वेळ निघून
गेल्यावर सुचले... पण
मी सांगतो... येथे हे फार
वेगळे जग आहे बाबा!! येथे
खिन्नता, विषाद, कारुण्य असे
खूप काही आहे.... आता माणसे
घाबरून जातात मला.
मी तुझ्याशी चॅटिंग
करताना कीबोर्ड आणि माऊस
आपोआप चालत असल्याने
शेजारचा माणूस बेधुद्ध पडला..
ते असूदे!
कधीतरी पुन्हा मी चॅटिंग करेन
तुझ्याशी... गरज पडेल तशी! बाय!
मी अजून काही जणांचा हिशेब
चुकता करून मग अवकाशात
जाणार... तुला एक सांगतो...
तो आठशे वाला शेअर
उद्या विकून टाक...
अकरा वाजेच्या आत... नाहीतर
बुडशील!!! " .... अन तो ऑफलाईन
झाला. हाच
तो कुरळ्या केसांचा अक्षांशचा मित्र!
सुन्न होवून अक्षांश विचार
करत राहिला. एखादा अणू
किंवा रेणू पॉझिटिव्ह
किंवा निगेटिव्ह चार्ज (धन
किंवा ऋण भार) धरतो... तसाच
तो कालपासून भ्रमभारित
झाला होता... पण
आता त्या भ्रमभारापासून
तो मुक्त झाला होता. जे काय
सगळे कालपासून तो अनुभवत
होता ते याच साठी....?! कालचे
बोलणे त्याला आठवले, ".....
अक्षांश, खरे सांगायचे तर
विज्ञानाकडे या गोष्टीचं पण
उत्तर आहे. याला भास असे आपण
म्हणतो. मनात विचार जास्त
झाले की असे होते,
लोकसंख्या प्रमाणाबाहेर
वाढली की देशाचे जसे होते
तसे! मन एका मर्यादे पलीकडे
जास्त विचार सहन करू शकत
नाही....... मनात एकाच प्रकारचे
विचार जास्त गर्दी करू लागलेत
की सुद्धा असे भास होतात, जसे
एखाद्या देशात
हुकूमशाही पद्धतीच्या लोकांची संख्या जास्त
झाल्यावर देशाचे जसे होते
तसे, बरोबर ना मधुरा?.... अरे
पण, माझा मनात तशा प्रकारचे
काही विचार नव्हतेच... खरं
सांगायचं तर, कोणत्याच
प्रकारचे विचार नव्हते
मनात!.. तरीही असे कसे होईल......
अशा वेळेस आपलं सुप्त मन
जागृत होतं आणि आपल्या मुख्य
मनाला विचार पुरवतं! गॉट इट?
आता चल
पार्टीचा मजा किरकिरा करू
नको... तिकडे बघ! " अक्षांश
मनात म्हणाला, "नाही मधुरा...
सुप्त
मनालासुद्धा कधीतरी कुणीतरी विचार
पुरवतो... ते विचार बाहेरून
कुठून तरी आपल्या मनात शिरतात
आणि त्यामुळे भ्रम होवू
शकतात... ते साधे विचार नसतात.
ते विशिष्ट ध्येयाने भारीत
विचार असतात... " .... त्याने
ईमेल चेक केला. नुकताच एक
ईमेल आला होता. सोबत अॅटॅच्ड
डॉक्युमेंट होती. ईमेलमध्ये
फाइलचा ओपन
करण्यासाठीचा पासवर्ड
लिहिला होता...8697" ...
शेजारी डेस्कवर त्याचे
हेल्मेट होते. ते शांत होते!!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel