कधी कधी माणसाच्या जीवनात काही भयानक
आणि विचित्र घटना घडतात.
त्या घटनेचा प्रभाव माणसाच्या मनावर खोल
कुठेतरी पडतो. तो त्यातुन बाहेर
निघतोही पण,जी काळी शक्ती असते
ती त्याला पुन्हा स्वतःकडे ओढून घेते. असच
काही घडले होते ते माझी मैत्रीण
दिप्ती हिचा चुलतभाऊ चेतनसोबत.
त्याला जो अनुभव आला तो अनपेक्षित व
मानवी मनाला विचलित करणारा आहे.
ही कथा विस्तृत स्वरुपात न
सांगता महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत
त्या सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
चेतन , देवगड येथे शाळेत दहावीला शिकत होता.
एके दिवशी नेहमीप्रमाणे तो शाळेत
गेला.संध्याकाळचे ६.०० वाजले होते
तरी तो घरी आला नव्हता. सर्वत्र शोधाशोध
सुरु केल्यावर
घरातल्यांना तो हनुमानाच्या मंदिरासमोर बेशुद्ध
अवस्थेत सापडला.
त्याचा चेहरा काळवडंलेला होता आणि हातातून
रक्त वाहतहोते. त्याला ताबडतोब घरी आणले.
गावातील एका वैद्यालाबोलवून
औषधपाणी केल्यावर त्याला शुद्ध आली.
शुद्धीवरआल्यावर तो काहीच बोलत नव्हता.
त्याच्या डोळ्यात अनामिक भिती होती. चार-पाच
दिवसानंतरही त्याच्या प्रकृतीत
सुधारणा झाली नाही. उलट दिवसेंदिवस
त्याची प्रकृती खालावत चालली होती. घरातले
जबरदस्तीने त्याला खायला भरवत होते. आई व
आजीने त्याच्यासाठी पुजापाठ
केलेतरी काही होईना.
एक महिन्यानंतर दिप्तीच्या वडिलांनी हवापालट
म्हणून चेतनला मुबंईला आणले.
तिच्या वडिलांच्या जवळच्यामित्राने
एका नामांकित समोहंन तज्ञाचे नाव सुचवले.मग
चेतनला तिथे घेऊन गेल्यावर त्याच्यावर
उपचारकरण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्याने
उपचाराना प्रतिसाद दिला व हळूहळू प्रकृतीत
सुधारणा झाली. तज्ञांनी त्याच्या मनातील
भीती काढून टाकली. सर्वांनाप्रश्न
पडला होता की चेतनबरोबर असे काय घडले होते.
त्या प्रश्नांची उत्तर उपचारादरम्यान सापडली.
उपचाराच्यावेळी त्याने सांगितले की,
त्यादिवशी चेतन शाळा सुटल्यावर मित्रासोबत
मजामस्ती करत घरी येत होता. त्याचा मित्र
त्याच्या घराच्या वाटेने निघून गेला. गाणे
गुणगुणत तो जंगलातुन जाणा-या वाटेने घरी येत
होता की त्याला 'शुऽऽक शुऽऽक' असा हाक
मारल्याचा आवाज आला. त्याने मागेपुढे पाहिले
परंतु कोणीच दिसले नाही. मग आवाज
आला कुठून? थोड्या वेळाने 'अरे वर बघ जरा'
असे कोणीतरी बोलले. वर पाहिले तर तिथेच
जवळच असलेल्या चिँचेच्या झाडावर
म्हातारीबसली होती आणि ती चिँच खात होती.
तिला पाहून त्याला हसुच आले. तो तिला मजेत
म्हणाला,"ये म्हातारे चिँच चवीला कशी आहेत
गं?"
ती म्हणाली,"तुला हवी असतीलतर ये वर
आणि घे चव या आंबटगोड चिँचाची."
"नको मला लवकर घरी जायचे आहे. उशीर
झाला तर आई ओरडेल."
"मी तुझ्या आजीसारखीच आहे असे समज
आणि घे आस्वाद चिंचाचा."
आंबटगोड चिँच कोणाला आवडत
नाहीत,त्यालाही आवडत होती. तशी त्याला भुक
लागलीच होती. तो घरी जायच
विसरला आणि झाडावर चढून
त्या म्हातारीच्या शेजारी जाऊन बसला.
"घे बाळ खा पोटभरुन चिँच. तुला आवडत
असतीलच."
"हो आवडतात ना. आम्ही सर्व मित्र
शाळेच्या जवळ असलेल्या झाडावरुन चिंच तोडून
खातो. पण आज नाही खाल्ली."
"मग खा आता. घे लवकर."
तिच्या हातातुन त्याने चिँच
घेतली आणि तो खाऊ लागला. तो खाण्यात गुंग
होता की अचानक त्या म्हातारीने त्याचा हात
पकडला आणि ती जोरात चावू लागली.
आता ती खुपच विद्रुप दिसत होती. तिला पाहून
तो घाबरलाच. तिचे मोठे सुळ्यासारखे दात
त्याच्या हातात घुसले होते आणि ती त्याचे रक्त
पित होती. त्याला असंख्य वेदना होत
होत्या पण, तो काही करु शकत नव्हता कारण
तिने घट्ट् पकडून ठेवले होते. थोडेसे रक्त
पिल्यावर ती म्हणाली,"आज मला रक्त मिळाले.
चार-पाच महिन्यापुर्वी माझ्या नव-याने
मला मारुन ह्या झाडाखाली पुरले होते.
तेव्हापासुन माझा आत्मा अद्रुश्य रुपात
ह्या झाडावर असतो.मला रक्ताची गरज होती व
त्यासाठी शरीर हवे होते. एक म्हातारी येथुन
जात होती. तिला मारुन तिच्या शरीरात प्रवेश
घेतला. रोज तुला येथुन जाताना पाहते. आज
ठरवलेच तुला जाळ्यात फसवायचे व तु फसलास.
आता तुझी सुटका नाही.तुझे रक्त पिऊन
मी माझा आत्मा तृप्त करेन." येवढे म्हटल्यावर
तिने परत आपले सुळ्यासारखे दात
त्याच्या हातात घुसवले व रक्त पिऊ लागली.
चेतनला कळुन चुकले होते की आपण
फसलोय.येथुन सुटका करुन घेणे गरजेचे आहे.
त्याने जास्त विचार न
करता तिच्या हाताला जोरात हिसका दिला व
त्याने सरळ त्या झाडावरुन खाली उडी टाकली.
झाडावरुन पडल्यामुळे त्याला जबरदसत मार
बसला पण, त्याने
सारी शक्ती एकवटली आणि तो जिवांच्या आंकाताने
जी वाट दिसेल त्या वाटेने सैरावैरा पळत सुटला.
त्याच्या शरीरातील शक्ती संपत
चालली होती पण, पळत राहणे हाच एकमेव मार्ग
होता.
धडपडत तो हनुमानाच्या मंदिरासमोर आला.
'देवा मला वाचव. माझे रक्षण कर' हे
तो पुटपुटला आणि भोवळ येऊन तो तिथेच पडला.
प्रकृतीत सुधारणा झाल्यावर
दिप्तीच्या वडिलांनी चेतनला गावी न पाठवता,
स्वतःच्याच घरी ठेवण्याचे ठरवले.
त्याच्या शिक्षणाची जबाबदारी दिप्तीच्या वडिलांनीच
घेतली होती.
चेतन मुंबईला आल्यापासुन खुप महिने
त्याच्या आईवडिलांना भेटला नव्हता.
चेतनची दहावीची परिक्षा संपली होती ,तेव्हा सर्वांनी गावी जायचे
ठरवले.गावाला गेल्यावर चेतनला बघुन
त्याच्या आईवडिलांना आनंद झाला. त्याचे
आनंदाचे दिवस नियतीला बघवले नाहीत कारण
गावी गेल्यानतंर दहा-पधंरा दिवसांनी अचानक
त्याला स्वप्न पडू लागली. स्वप्नात
त्याला ती म्हातारी, तेच चिंचेचे झाड दिसायचे.
त्या स्वप्नांनी पुन्हा तो प्रसंग त्याला आठवला.
स्वप्नात ती म्हणायची की, 'मी येईन परत.
तेव्हा तु पळालास पण,आता नाही पळू देणार.'
तो खुपच कंटाळला होता.
त्या घटनेच्या आठवणींचा त्याला पुन्हा त्रास
होऊ लागला होता. तसे त्याने घरात
सर्वाँना बोलूनही दाखविले.
त्याच्या मागची साडेसाती त्याचा पिच्छा सोडत
नव्हती.
गावातील मित्रांना भेटायला जात आहे असे सांगून
तो एक दिवस घराबाहेर गेला परंतु चार -पाच
दिवस झाले तरी आलाच नाही. मग पोलिस
स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पुढे जे काही झाले
ते खुपच धक्कादायक व ह्रदयद्रावक होते.
पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली तेव्हा त्याचे
प्रेत गावातील एका नदीच्या पाण्यात
सापडले.त्याचे प्रेत शवविच्छेदनाला नेण्यात
आले. अखेर पोलिसांनी असा निष्कर्ष
काढला की त्याने आत्महत्या केली होती.
गावात सर्वत्र बोलले जात होते
की त्याला भुतांने झपाटले होते आणि भुतांनेच
त्याचे प्राण घेतले. आता चेतनने
आत्महत्या केली होती की त्या म्हातारीच्या भुतांनेच
त्याला मारले होते? त्याचे उत्तर गुढ रहस्यच
राहिले व ते चेतनबरोबरच गेले...