परमेश्वराने सर्व ब्रह्मांण्ड निर्मिले. स्वतःच्या संकल्पातून ही चराचर सृष्टी त्याने उत्पन्न केली. त्याला एकटे राहवेना. अनंत वस्तू निर्माण करून त्यांत रमावे, असे त्याच्या मनात आले. त्याने आकाश निर्मिले, काळ निर्मिला, सूर्य, चंद्र, तारे यांना निर्मिले, सप्तसागर, नाना सरोवरे, अनेक सरिता निर्मिल्या, अग्नी निर्मिला, वायू निर्मिला. अठरा लक्ष भार वनस्पती, चौ-याऐंशी लक्ष योनी निर्मिल्या. त्याने देव, दानव. मानव यांना निर्मिले.
सृष्टी निर्मिल्यावर परमेश्वर म्हणाला, विशेषतः मानवांना उद्देशून म्हणाला, “मी तुम्हा सर्वांना उत्पन्न केले आहे. आता उत्कृष्ट खेळ करून दाखवा. मला खेळ दाखवण्यापूर्वी आधी तुम्ही तो पुन्हा पुन्हा करून पाहा. आता खेळ चांगला वठेल, असे जेव्हा तुम्हाला वाटेल, तेव्हाच मला हाक मारा. मध्येच मला कोणी हाक मारू नका. काही अडचणी आल्या, काही संकटे आली, तरी मला नका हाक मारू. आधी तुम्ही प्रयत्न करा. सारेच उपाय हरले तर मी येईन, परंतु आधी येणार नाही. उठल्याबसल्या देवाचा धावा नका करू. मी तुम्हाला एक सार्वभौम उपाय सांगून ठेवतो. संकटनिवारणाची एक राजविद्या सांगून ठेवतो. त्या उपायाचा अवलंब कराल, तर सदैव विजयी व्हाल. त्या उपायामुळे आपत्तीचा परिहार होईल, विघ्ने नष्ट होतील. हा उपाय म्हणजे यज्ञ. यज्ञाने सर्व संकटाचा नाश होईल. यज्ञ हा तुमचा परमेश्वर, यज्ञ हा सखा, यज्ञ ही कामधेनु, यज्ञ हा कल्पवृक्ष, यज्ञ म्हणजे चिंतामणी, स्पर्शमणी. या यज्ञाची कास सोडू नका. यज्ञ म्हणजेच नारांना कसे जगावे, कसे वागावे, हे शिकविणारा नारायण. यज्ञ हा आमचा आधार, यज्ञ म्हणजे परमागती. यज्ञाने- महान यज्ञानेही- जेव्हा कार्यनिष्पत्ती होणार नाही, संकटे दूर होणार नाहीत, त्या वेळेस मला हाक मारा. माझी योगनिद्रा सोडून मी येईन. पांघरलेली मायेची शाल फेकून मी धावत येईन, परंतु यज्ञोपासना परिपूर्ण झालेली असेल तरच येईन. ध्यानात धरा. जा आता सारी. खेळ सुरू करा. प्रयोग सुरू करा. मांडा, मोडा, पडा, चढा, रडा, हसा. ज्या दिवशी खेळ मला दाखविण्याच्या लायकीचा झाला असे वाटेल, त्या दिवशी मला कळवा. तो प्रयोग मी पाहीन. खेळ चांगला करून दाखविला, तर मग दुसरा करायला देईन. जा आता.”
परमेश्वर चिन्मयाच्या पलंगावर पहुडला. मायांबर अंगावर घेऊन पडून राहिला. इकडे विश्वाचे चक्र सुरू झाले. विराट खेळ सुरू झाला. वारे वाहू लागले. सूर्य तळपू लागला. समुद्र नाचू लागला. तारे चमचम करू लागले. मेघ वर्षू लागले. तृणांकुरांनी पृथ्वी नटू लागली. वृक्ष-वनस्पती वाढू लागल्या. फुले फुलली. भुंगे गुंगु करू लागले. फळे डोलू लागली. पाखरे उडू लागली. किलबिल करू लागली. घोडे दौडू लागले. गायी हंबरू लागल्या. सिंह-वाघ गर्जू लागले. मानवही आपापली कामे करू लागले.