“नाथ, का अशी मुद्रा ? कोणते दुःख, कोणती वेदना ? माझा का काही अपराध आहे ? माझ्यावर रागावलात ? दुःख व क्रोध जवळजवळच राहतात. प्रेमळ क्रोधाचे दुःखात रूपांतर होते. त्या दिवशी तुम्ही सांगितलेले ते दिव्यांबर मी नेसल्ये नाही म्हणून रागावलात ? आज सकाळी तुम्ही आणलेली फुले मी केसात घातली नाहीत म्हणून का हा अबोला ? का बाळ जयंताची काही चूक झाली ? एकुलता एक मुलगा. केली असेल काही चूक. त्याला का मारलेत बिरलेत म्हणून आता त्याचे वाईट वाटते ? जयंता तसा गुणी आहे. एखाद्या वेळेस करतो व्रात्यपणा. त्या दिवशी ऐरावताचे दात धरून ओढीत होता. मी त्याला बोलल्ये; परंतु लगेच पोटाशी धरले. मुलाची जात. तुम्ही काहीच बोलत नाही. का नाही बोलत, का नाही माझ्याकडे बघत ?”
“काय सांग ? तू मला भूल पाडलीस. त्या अप्सरांनीही आम्हा देवांना लंपट केले. आम्ही निःसत्त्व झालो, कर्तव्यच्युत झालो. महान शत्रू उत्पन्न झाला आहे. तुमच्या विलासात आम्ही दंग राहिलो; परंतु उशाशी सर्प येऊन बसला. तुम्ही बायका अशाच पदच्युत करणा-या. गोड गोड बोलता व आम्हाला जाळ्यात पकडता. हिमालयाला हलवणारे आमचे हात, परंतु तुमचे कोमल हात दूर करता येत नाहीत. दृष्टीतील तेजाने जगाला भस्म करू शकणारे आमचे डोळे, परंतु तुमच्या दृष्टीसमोर ते मिटतात. तुम्ही जादुगारणी आहात. बुद्धीला भ्रंश पाडणा-या आहात. भ्रम पाडणा-या आहात. पुरे तुझे गोड बोलणे.”
“शेवटी आमच्या बायकांच्या डोक्यावरच तुम्ही खापर फोडायचे. चोराच्या उलट्या बोंबा ! तुम्ही आमच्याजवळ लाळ घोटीत येता, कुत्री होऊन येता, तर आम्ही काय करावे ? तुम्हाला का दूर लोटावे, दूर फेकावे ? कठोर होऊन तुम्हाला जवळ घेतले तरी तुम्ही रागावणार. तुम्ही जवळ आलात म्हणून तुम्हाला जवळ घेतले तरी तुम्ही रागावणार ! दुर्दैवी आहेत स्त्रिया झाले ! तुम्ही पुरुष मात्र निर्दोषी, होय ना ? सारे पाप आमच्या शिरी . आम्ही मोहमाया. तुम्ही मोह पाडीतच नसाल ? तुम्हाला वासनाच नसतील ? आम्हीच जणू तुम्हा पुरुषांच्या जिवनात विषयाचे विषकंद लावतो ! काय बोलता, तुम्ही लंपट झालात ? ते वरुणदेव नाही झाले ते ? आम्ही मोह पाडला; तुम्हाला का पडला ? तुमचा विवेक, कोठे चुलीत गेला ? तुम्ही का शेण खाल्लेत ? तुम्हालाच कर्तव्य शेपूट. सदैव वाकडे. आम्हाला का बोल ? आम्ही संयम आणू पाहतो; परंतु तुम्हाला कोठे हवा ?”
“दे, तूही शिव्याशाप दे. वरुणदेवांनी बोलून घेतले, आता तू बोल. तूही मार जोडे. हेच ना पत्नीचे काम ? पतीला धीर देण्याऐवजी त्याच्या जखमेवर मीठ चोळणे, हेच ना पत्नीचे काम ? पतीची, तो दुःखी असता, निर्भर्त्सना करणे हेच ना पत्नीचे काम ?”
“तुमची दुःखी मुद्रा पाहून मी धीरच देऊ पाहात होत्ये. प्रेमाने, मधुर शब्दांनी विचारपूस करीत होत्ये; परंतु तुम्ही एकदम सा-या स्त्रियांची नालस्ती सुरू केलीत. मी एक असेन वाईट; परंतु सा-या स्त्रियांना का लावता बोल ?”
“मी शोकमूढ झालो होतो. दुःखाने विवेक दुरावतो. मला भान नाही राहिले, म्हणून बोललो. शचीदेवी, क्षमा कर. तुझ्या मी पाया पडतो.”