“मनात आणीन तर सारे लक्षात ठेवीन.” दधीची म्हणाला.
सारे छात्र झोपले. गुरुदेवांच्या बलोपासनेच्या प्रवचनामुळे दधीचीला ताम्रपटच मिळाल्यासारखा झाला होता. त्याने एखाद्या मुलाला एकदम वर उचलावे, एखाद्याला पाठीत गुद्दा द्यावा. कधी झाडांना आपल्या अंगाची धडक द्यावी. कधी बैलांची शिंगे धरून त्यांना हलू देऊ नेय, असे शक्तीचे प्रयोग त्याचे चालत.
त्या दिवशी पुन्हा सायंप्रार्थना झाली. सारे छात्र मंडलाकार बसलेले होते. गुरुदेव सांगत होते. छात्र लक्ष देऊन ऐकत होते. शांत वाणी स्रवत होती. अमृतवर्षाव जणू होत होता, “मुलांनो, बळाची उपासना करा, असे त्या दिवशी मी सांगितले. त्या बळाचेच आणखी विवरण मी करणार आहे. बळ नाना प्रकारचे आहे. आपण उत्तरोत्तर श्रेष्ठ बळाकडे गेले पाहिजे. शरीराचे हळ हे प्राथमिक बळ. ते पशूंजवळही असते. शरीराच्या बळापेक्षा बुद्धीचे बळ अधिक आहे. अर्थात बुद्धी शरीरातच असणार, म्हणून शरीरही बलवान पाहिजे. शरीराची उपेक्षा नका करू; परंतु शारीरशक्ती म्हणजेच सर्वस्व, असे नका मानू.”
आपणास अनेक पाय-या चढून वर जायचे आहे. शारीरबळ ही पहिली पायरी. परंतु सदैव का पहिल्या पायरीवरच राहावयाचे ? यासाठी ज्ञानाची दुसरी पायरीही चढा. ज्ञान मिळवा. बुद्धी प्रभावशाली करा. परंतु ज्ञानाच्या बलाचेही सारे संपले असे नाही. हृदयाचेही बळ आहे. हृदय शुद्ध राखणे, भावना निर्मळ ठेवणे हेही बळ आहे. प्रेम हीही एक शक्ती आहे. एखाद्या मुलाला तुम्ही मारून समजावू शकणार नाही, बुद्धीवादाने समजावू शकणार नाही. परंतु माता त्याच्या पाठीवर नुसता हात फिरवील व त्याला समजावू शकेल. एखादा घोडा चाबकाने ऐकणार नाही, परंतु प्रेमाने पाठ थोपटताच तोही प्रेमाने फुरफुटेल.
अंगबळ ही पहिली पायरी. ज्ञानबळ ही दुसरी पायरी. प्रेमाचे बळ ही तिसरी पायरी. परंतु मनोजयाचे बळ ही चौथी पायरी. ज्याने मन जिंकले नाही, त्याला ना शरीराचे बळ, ना ज्ञानाचे बळ, ना प्रेमाचे बळ. म्हणून मनावर जो स्वार व्हायला शिकला, तो जगावर स्वार होईल. मनाचा जो स्वीमी झाला तो त्रिभूवनाचा स्वामी होईल. एखाद्या मस्त घोड्याला दधीची वठणीवर आणील; परंतु मस्त मनाला वठणीवर आणील तोच खरा. त्या दिवशी दधीची दंड फुगवून बकुळ वृक्षाला ध़डका देत होता. परंतु दधीची ज्या दिवशी मनातील सारे वेग रोखू शकेल, त्याच दिवशी खरे बळ त्याने मिळविले, असे होईल.
बाळ दधीची, तू मला आवडतोस. त्या दुबळ्यांपेक्षा तुझ्याकडे पाहून प्रसन्न वाटते. परंतु पुढे जा. श्रेष्ठतर बळांची उपासना कर. व्याघ्रसिंहाचे हे शारीरिक बळ तेही थोर आहे; परंतु मानवाने या बळाहून अन्य बळ संपादन करावे. ज्ञानबळ, प्रेमबळ, मनोजयाचे बळ आणि शेवटी सा-या त्रिभुवनाशी एकरूप होण्याचे बळ. ज्याला आपपर नाही, सर्व स्थिरचरात एकच शक्ती भरलेली आहे, हे ओळखून त्या शक्तीशी जो एकरूप झाला, त्याच्या बळासमोर सारी बळे फिकी आहेत. इतर सारी बळे त्या परमैक्याच्या बळासमोर साष्टांग नमस्कार घालतील. मानवाचे हे परमध्येय, ही परम गती. हे मन्तव्य, हाच मोक्ष. या लहानशा शरीरात राहून सा-या विश्वाशी एकरूप होणे, ते अंतिम बळ. शेवटी त्या बळाची उपासना कर.”