कृपाळू वरुणदेव, ते आधी विचार करू लागले. वरुण ही नीतीची देवाता. सकल विश्वाचे नियमन करणारी देवता. इंद्र ही युद्धदेवता. विश्वावर संकट आले तर इंद्राने निवारावे. वरुणाने पापपुण्याचा विचार करावा; परंतु जेथे सारे कर्मच लोपले तेथे पापपुण्याचा निवाडा तरी कोणता करावयाचा ? वरुणदेव महाराज इंद्रला भेटण्यासाठी निघाले.
इंद्राला कशाचे भान नव्हते. तो आपल्या विलासात दंग होता. इतर देवही तेच करत होते. वरुणदेव आले, परंतु त्यांचे स्वागत करायला कोणी नव्हते. वरुणदेव इंद्राच्या प्रासादाबाहेर येऊन उभे राहिले. इतक्यात काही अप्सरांना ती गोष्ट कळली. त्या घाबरल्या. त्यांनी इंद्राला वार्ता दिली. इंद्र लाजला. नंतर तो बाहेर आला.
“अभिवादनम्.” इंद्र म्हणाला.
“प्रात्यभिवादनम्.” वरुणदेव म्हणाले.
“आज का झाले आगमन ? मुखश्री अशांत का ? काही अशुभ वार्ता आहे की काय ? काही संकट आहे का ? माझे वज्र आहे. संकटांचा चुरा करीन, सांगा.”
“महाराज, जगाचे पापपुण्य पाहणे हे माझे कर्म; परंतु ते कसे पार पाडू ? सारे कर्ममात्र थांबले आहे. बाह्यकर्म थांबले तरी मनात वैचारिक वा वैकारिक कर्म- हे सूक्ष्म कर्म सुरूच असते. मनाचे व्यापार चालूच असतात. त्यांच्यावरूनही मी नियमन केले असते; परंतु विचार करण्याचीही शक्ती मानवी मनाला उरली नाही. माणसे जणू मढी बनली. ना हाताचे व्यापार, ना मनाचे. भूतलावर हाहाकार उडाला आहे. कहर उडाला आहे. पृथ्वी का मरणार? एक काडीही राहणार नाही, चिटपाखरूही उरणार नाही, असे दिसते. सारी उष्णताच संपली. सारे थंडगार झाले. सूर्य दिसत नाही. त्याच्या सहस्त्रावधी प्रकाशधेनू, कोठे गेल्या सा-या ? कोणीतरी असुर मातला असावा. त्याने हा विश्वसंहार मांडला असावा.”
इंद्रदेव, तुम्ही काय करीत होतात ? तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. मागे तुमच्या कानावर कोणीतरी गोष्ट घातली होती, परंतु तुम्ही लक्ष दिले नाही. खानापानात दंग राहिलात. भोग भोगीत राहिलात. परमेश्वर काय म्हणेल ? तुम्ही मुख्य कार्यवाह; परंतु तुम्हीच अदक्ष राहिलात. इंददेवी, बोलतो त्याची क्षमा करा. परंतु तुमच्याही कर्माकर्माचा न्याय माल करावा लागेल. तुम्ही स्वकर्तव्यात अळंटळं कराल तर तुमचेही शासन दुःखाने का होईना, परंतु मला करावे लागेल. विश्वात कोठे काय बिघडते, कोणते विघ्न येत आहे, कोणते संकट येत आहे, इकडे अहोरात्र तुमचे डोळे हवेत. तुम्हाला उगीच का देवेंद्र केले ? मोठे पद म्हणजे मोठी जबाबदारी; परंतु तुम्ही स्वस्थ व सुस्त राहिलात. आज गोष्ट या थराला आल्या. चराचर संपुष्टात आले. प्राणज्योती विझू पाहत आहेत. किती दिवस तुमच्याकडे येईन येईन म्हणत होतो; परंतु हिय्या होईना. आज धैर्य केले. म्हटले, सागावे जाऊन. कर्तव्य हे कठोर असते. देवांनाही कर्तव्यपराङ्गमुख होऊन चालणार नाही. देवांनीही ‘धृतव्रत’ असे राहिले पाहिजे. ऋतसत्याचे परिपालन त्यांनीही केले पाहिजे. इतरांरपेक्षा अधिक कसोशीने केले पाहिजे. आता तरी तुम्ही उठा. शत्रू शिरजोर झाला आहे. तो आहे कोठे, त्याचा तपास काढा. त्याचा नाश करा. त्याला शरण यायला लावा.