“अरे, माझ्यासमोर जरा सौम्य रूर धर. तुझे जीवनकार्य करताना तुला पाहिजे असेल ते रूप घे.” प्रभू म्हणाला.
“कोणते माझे जीवनकार्य ?”
“वत्सा, तुझे काम या सर्व प्राणीमात्रांची परीक्षा घेण्याचे. या जगाला मी जी शिकवण दिली आहे, तिची त्यांना स्मृती आहे की नाही, हे पाहा. लोक यज्ञनिष्ठ आहेत की नाहीत ते पाहा. एकाही व्यक्तीच्या ठिकाणी हे यज्ञतत्त्व उत्कृष्टपणे बिंबले असले तरी पुरे ! ती एक व्यक्तीही विश्वाला तारील. जा !”
“तात, मी परीक्षा कशी घेऊ ? मी माझे काम कसे करू ? कोणती माझी साधने ? आधी माझे नाव काय, ते मला सांगा. त्या नावावरून माझ्या कर्माचा मला नीट बोध होईल. नावावरून कर्म सुचते, जीवनाची दिशा समजते. सांगा, मला कोणत्या नावाने संबोधणार ?”
“तुझे नाव वृत्र. समजलास ना ? त्या नावात सारे आहे. जा आता. आपल्या कार्याला लाग. तुझ्या हृदयात तुझ्या कर्माची प्रेरणा मी ठेविली आहे. ती अंतःप्रेरणा ओळख. मी आता आणखी काही सांगणार नाही. मी थोडी सूचना देत असतो. तीवरून सारे समजून घ्यावे.”
वृत्राला निरोप देऊन प्रभू पुन्हा मायेचा पीतांबर घेऊन चिन्मयाच्या पलंगावर पहुडला. वृत्र विचार करीत निघून गेला. तो एका डोंगराच्या शिखरावर बसला. तेथून तो सारे पाहात होता. पाहून विचार करीत होता. प्रभूने माझे नाव वृत्र ठेविले आहे. वृत्र म्हणजे आच्छादणारा, पांघरूण घालणारा. मी कोणाला आच्छादू. कोणाला पाघरूण घालू ? कोणाला पोटात घेऊ ? कोणाचा घोट घेऊ ? कोणाला गिळू ? काय माझे काम ? कोणता माझा स्वधर्म ? जगाची परीक्षा घ्यायची, कशी घेऊ ? माझा स्वधर्म कसा पार पाडू ? जगाची कसोटी कशी घेऊ ?
वृत्र विचार करीत करीत वर वर चालला. विश्वाला तो प्रदक्षिणा घालू लागला. सर्व चराचरीचे तो निरिक्षण करू लागला. या चराचरांची मुख्य नाडी कशात आहे, ते शोधू लागला. आजूबाजूच्या सृष्टीचे स्वरूप नीट समजून घेतल्याशिवाय आपले जीवितकार्य आपणांस नीट पार पाडता येत नसते, यासाठी वृत्र सारे न्याहाळीत होता.