एके दिवशी गुरुदेव शिष्यांना काही सांगत होते. सायंप्रार्थना होऊन गेली होती. सारे छात्र मंडलाकार बसले होते. गुरुदेवांची गंगौघाप्रमाणे पवित्र, प्रशांत वाणी सुरू झाली. ते म्हणाले, “सामर्थ्याशिवाय सारे व्यर्थ. संसारात सामर्थ्य हवे. सामर्थ्याने सारे मिळते. सामर्थ्यवंताला सारे शोभते. सामर्थ्य म्हणजे सौंदर्य, बळाची उपासना करा. बळाने सारे चराचर चालते. बळाने ही पृथ्वी उभी आहे. पर्वत उभे आहेत. बळाने हे अनंत आकाश आधाराशिवाय वर पसरले आहे. चंद्रसूर्यांना, अगणित तारकांना आधार देत आहेत. बळामुळे सूर्य, चंद्र, तारे प्रकाशतात. बळाने वारा वाहतो, बळाने समुद्र उसळतो, बळाने नद्या वाहतात.”
तुम्ही आश्रमात आहात. बळ असेल तर तुम्ही उठाल, हिंडाल, फिराल. बळ असेल तर बराच वेळ बसाल, बळ असेल तर बराच वेळ चालाल. बळ असेल तर अध्ययन करता येईल, अनेक ठिकाणी जाऊन ज्ञान मिळवता येईल. बळ असेल तर पृथ्वी खणाल, तिला सस्यसंपन्न कराल. बळ असेल तर दुस-यांच्या उपयोगी पडाल. ही सारी पृथ्वी बलवंताची आहे. दुबळ्यांना ना मान, ना स्थान; ना विद्या ना ज्ञान. तुम्ही दुबळे नका होऊ. बलवंत व्हा. आश्रमातून परत जाल तेव्हा तेजस्वी शरीरे घेऊन जा. लाथ मारीन तेथे पाणी काढीन, अशी हिंमत घेऊन जा. पायाखाली धरित्री डळमळते आहे, अशा ऐटीने जा. दधीचीकडे बघा. कसे आहे वज्रासारखे शरीर. तो झाडाला उपटील, दगडाचे चूर्ण करील, सापाला गरगर फिरवून त्याचे मणके ढिले करील. त्याला वाघसिंहाचे भय नाही, भुताखेतांचे भय नाही, तो निर्भय आहे, तो मुक्त आहे. समजलेत ना ! शक्तीची उपासना करा. बलहीनाला ना संसार, ना परमार्थ. बलहीनाचे जिणे व्यर्थ आहे.”
प्रवचन संपले. दधीची आनंदला. त्याला मुले चिडवत असत. ‘माजला आहे नुसता’ असे म्हणत, परंतु आज गुरुदेवांनी एक प्रकारे त्याची बाजू मांडली होती.
“आता हसाल का मला ? आता तुम्हीही माझ्याप्रमाणे दूध प्याल, खेळाल, कुदाल, चढाल, डुंबाल.” दधीची म्हणाला.
“परंतु तुझ्याप्रमाणे ज्याला त्याला थपडा देणार नाही !” एकजण म्हणाला.
“ तुझ्याप्रमाणे नुसते खातचे बसणार नाही.” दुसरा म्हणाला.
“मनुष्य म्हणजे काही केवळ हेला होणं नव्हे. बैल होणं नव्हे.” तिसरा म्हणाला.
“बैल होणे का वाईट ? बैल किती उपयोगी ! बैलाची तर देवांना उपमा देतात. अग्नी कसा आहे ? तर ‘वृषभो रोरविती’ असे नाही का वर्णन ?” दधीचीने विचारले.
“बरेच लक्षात राहिले रे तुझ्या ?” कोणी हिणवीत म्हणाला.