दधीचीने पत्नीचा हात सोडला. त्याने आता मागे पाहिले नाही. सरळ निघाला. पत्नी थरथरत उभी होती. तिचे डोळे आता भरून आले. तिने हात जोडले, तिने प्रार्थना केली. ती घरात आली. तिने चिमुकल्यांचे मुके घेतले. सर्वांत लहानाला कुशीत घेऊन ती पडली.
तपश्चर्येला योग्य असे स्थान दधीची बघत होता. साबरमतीचे पवित्र व प्रशान्त तीर त्याला आवडले. शुद्ध, स्वच्छ स्त्रोतवती साबरमती. वरच्या अनंत आकाशाचे स्वच्छ प्रतिबिंब तिच्यात पडलेले दिसे. आपल्या निर्मळ हृदयात परम सत्याचे प्रतिबिंब एक दिवस असेच पडेल, असे दधीचीस वाटले. साबरमतीच्या तीरावर उंच वृक्ष होते. माझे मनही असेच उंच होईल, देवाजवळ हितगुज करील. जवळ येतील त्यांना मी छाया देईन. जवळ असेल ते देईन. आधार देईन. या वृक्षाप्रमाणे होईन, असे दधीची मनात म्हणाला.
साबरमतीच्या तीरावरील वनात हिंस्त्र पशू नव्हते. सिंह, वाघ नव्हते. अस्वल-लांडगे नव्हते. त्या वनात खेळकर हरणे होती. कधी वनगाईंचे कळप दिसत. तसेच मोर, पिक, शुक, मैना हे पक्षीही होते. सुंदर गोड कलरव करणारे पक्षी. नदीची गुणगुण, पक्ष्यांचा कलरव, अलिंगणांचा गुंजराव, पानांचा मर्मरध्वनी-याशिवाय तेथे आवाज नव्हता. तपश्चर्येला अनुकूल जागा. मन शांत होण्यासाठी योग्य जागा.
दधीचीने तेथे लहानशी पर्णकुटी बांधली. त्याने तप आरंभिले. मोठ्या पहाटे तो उठे. आकाशातील सप्तर्षी आकाशगंगेत स्नाने करीत व दधीची साबरमतीत स्नान करी. स्नानानंतर दर्भासन घालून त्यावर तो बसे. तो वृत्ती स्थिर करी, वासना संयत करी, भ्रमंती करणा-या मनाला हृदयात निश्चल करू बघे.
दधीची प्रथम थोडी कंदमुळे खात असे; परंतु पुढे तेही त्याने सोडले. झाडावरचे फळ तो पाडीत नसे. पडलेले खात असे. काही दिवसांनी त्याने पर्णाशन आरंभिलेः परंतु पुढे पाने तोडून खाण्याचे त्याने बंद केले. पडलेली पानेच तो खाई. अशा रीतीने तो स्वाद जिंकून घेत होता. बाह्यारसाची रुची नाहीशी झाली. बाह्य रसांची आसक्ती कमी झाली. हृदयात रससागर उचंबळू लागला. ‘रसानां रसतमः’ असा परमानंद हृदयात भरू लागला. दधीचीला अत्यंत प्रसन्न असे वाटू लागले. वेग नाही. आवेग नाही. धडधड नाही, धडपड नाही. इच्छा नाही, काही नाही. चित्त निर्विषय व निर्विकार झाले. अपार शांती जीवनात आली. ती तोंडावर फुलली, डोळ्यांत शोभली.
दधीचीच्या जीवनात परंज्योती प्रकट झाली. आतील प्रकाश बाहेर आला. त्याचे शरीर जणू कर्पूराचे आहे की काय असे दिसे. कधी कधी त्या शरीरावर सुवर्णाची झाक मारी. ते शरीर सोन्याप्रमाणे सोज्ज्वल होते व फुलाप्रमाणे हलके होते. जणू जीवात्म्याला पांघरवलेली भक्तिप्रेमाची शुद्ध शुभ्र शाल. जणू जीवात्म्याला पांघरवलेला ज्ञानाचा झगझगीत पीतांबर. ते शरीर शरीर नव्हते. ते जणू चिदंबर होते. तो देह म्हणजे जणू एक रम्य सुवर्णमंदिर होते व त्या सुवर्णमंदिराच्या आवारात अमृत-सर निर्माण झाले.