अंटार्क्टीकावर हिवाळ्यात मुक्काम करण्यात आला असला, तरीही प्रवासाचं धाडस मात्रं कोणीही केलं नव्हतं. त्य दृष्टीने ही मोहीम अद्वितीयच होती. केप क्रॉझीयरपर्यंतचं ६० मैलांचं अंतर कापण्यास त्यांना तब्बल १९ दिवस लागले ! ५ जुलैला तापमान -६० डिग्री सेल्सीयस इतकं कमी झालं होतं ! अनेकदा दिवसभरात जेमतेम एक मैलाची मजल मारता येत होती ! मात्रं या सगळ्या परिस्थितीतही अखेर ते केप क्रॉझीयरवर पोहोचण्यात यशस्वी झाले !


केप क्रॉझीयर

बर्फापासून बनवलेल्या इग्लूमध्ये त्यांनी मुक्काम ठोकला ! एम्परर पेंग्वीनचं निवासस्थान शोधून अनेक अंडी गोळा करण्यात त्यांना यश आलं. मात्रं सुमारे ७० मैल वेगाने झालेल्या हिमवादळात त्यांचं इग्लू जमिनदोस्त झालं ! परतीच्या प्रवासत मुक्कामासाठी त्यांच्याजवळ असलेला एकुलता एक तंबूही वादळाने उडवून लावला, परंतु सुमारे अर्धा मैल अंतरावर तो परत मिळवण्यात त्यांना यश आलं. १ ऑगस्टला त्यांनी केप इव्हान्स गाठलं.

या सगळ्या मोहीमेचं फलीत होतं ते म्हणजे पेंग्वीनची तीन अंडी !
( ही अंडी प्रथम केसींग्टनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये आणि नंतर एडींबर्ग युनीव्हर्सीटीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आली. मात्रं विल्सनला अपेक्षीत असलेल्या संशोधनासाठी त्यांचा काही उपयोग झाला नाही !)

स्कॉट आणि अ‍ॅमंडसेन दोघांचीही दक्षिण धृव पादाक्रांत करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी पूर्ण झाली होती.

दोघांपैकी दक्षिण धृवावर प्रथम पोहोचण्यात कोण यशस्वी होणार होतं ?

दक्षिण धृवाच्या दिशेने मोहीमेची तयारी चालू असताना अ‍ॅमंडसेनला एका गोष्टीची सतत काळजी वाटत होती.

स्कॉटजवळ असलेल्या मोटरस्लेज !

जानेवारीच्या महिन्यात कँपबेलशी झालेल्या भेटीतून आणि चर्चेतून मोटरस्लेज उत्तम काम करत असल्याचं अ‍ॅमंडसेनला समजलं होतं. मोटरस्लेजने प्रवास करण्याचा स्कॉटच्या मोहीमेला फायदा होईल याचा त्याला अंदाज आला होता. त्यामुळे ऑगस्ट अखेरीस सूर्योदय होताच फ्रामहेममधून दक्षिण धृवाच्या दिशेने निघण्याचा त्याने निर्धार केला होता. अ‍ॅमंडसनच्या या बेताला योहान्सनने स्पष्टपणे विरोध केला. त्याच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये सूर्योदय झाला तरीही रॉस आईस शेल्फवरील थंडीचा कडाका असह्य असणार होता. सप्टेंबरच्या मध्यावर निघण्याची त्याने सूचना केली, परंतु स्कॉटपूर्वी दक्षिण धृव गाठण्यासाठी अधीर झालेल्या अ‍ॅमंडसेनने त्याची सूचना धुडकावून लावली.

२४ ऑगस्टला अंटार्क्टीकावर सूर्योदय झाला !

सात स्लेज सर्व सामानासहीत तयार करण्यात आल्या. परंतु योहान्सनचा थंडीच्या असह्यतेबद्दलचा अंदाच अचूक असल्याचं सर्वांच्या निदर्शनास आलं. पारा -५८ अंश सेल्सीयसपर्यंत खाली घसरला होता.

पंधरा दिवस उलटले !

८ सप्टेंबरला तापमान -२७ अंश सेल्सीयस होतं. तापमान आणखीन सुधारेपर्यंत वाट पाहण्याची अ‍ॅमंडसेनची तयारी नव्हती. अ‍ॅमंडसेन, हेल्मर हॅन्सन, ओलाव्ह जालँड, जॅल्मर योहान्सन, क्रिस्टन प्रेस्टर्ड, ऑस्कर विस्टींग, स्वेर हॅसल आणि स्टबर्ड यांनी फ्रामहेममधून दक्षिणेच्या दिशेने मार्गक्रमणा करण्यास सुरवात केली. अ‍ॅडॉल्फ लिंड्स्ट्रॉम एकटाच फ्रामहेममध्ये थांबला होता.

पहिल्या दिवशी त्यांनी अकरा मैलांचं अंतर काटलं. फ्रामहेमच्या बाहेर भर थंडीतील पहीलीच रात्र असल्याने सर्वांना थोडाफार त्रास होणं तसं अपेक्षीतच होतं. पुढ्च्या दोन दिवसांत -५८ अंश सेल्सीयस तापमानातही त्यांनी दिवसाला सरासरी १७-१८ मैलाची मजल मारली. १२ सप्टेंबरला मात्रं थंडीच्या असह्य कडाक्यामुळे जेमतेम ७ मैल अंतर पार केल्यावर अ‍ॅमंडसेनने थांबण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांनी बर्फापासून दोन इग्लू तयार केली.

पहाटेच्या सुमाराला एका विचीत्र आवाजाने अ‍ॅमंडसेनला जाग आली !

तो बर्फ खचण्याचा आवाज होता !

बर्फाने भरलेल्या ग्लेशीयरच्या अंतर्भागात हालचाली सुरू होत्या, त्यामुळे मधूनच एखादी कपार ( क्रिव्हाईस ) आSSS वासून उघडत होती आणि तिथला भूभाग त्या कपारीत गडप होत होता ! पुढील वाटचालीच्या दृष्टीने अर्थातच हा प्रकार कमालीचा धोकादायक ठरणार होता !

सावधपणे मार्गक्रमणा करत आणि थंडीशी मुकाबला करत १४ सप्टेंबरला सकाळी १०.१५ वाजता त्यांनी ८० अंश दक्षिण अक्षवृत्तावरील डेपो कँप गाठला !

एव्हाना अ‍ॅमंडसेनला योहान्सनने थंडीचा वर्तवलेला अंदाज अचूक असल्याची कल्पना आली होती. थंडीच्या तडाख्यापासून केसाळ कातडीच्या कपड्यांमुळे त्यांचं संरक्षण होत असलं, तरीही त्यांच्याबरोबर असलेल्या कुत्र्यांचे मात्र चांगलेच हाल झाले होते. सतत बर्फावरुन वावरत असल्याने अनेक कुत्र्यांच्या पायाला फ्रॉस्टबाईटने ग्रासालं होतं. सर्वांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने फ्रामहेमकडे परतण्याचा अ‍ॅमंडसेनने निर्णय घेतला.

योहान्सनने आपल्या डायरीत अ‍ॅमंडसेनच्या लवकर निघण्याच्या अट्टाहासावर जोरदार टीका केली. केवळ स्कॉटवर मात करण्याच्या ईर्ष्येपायी अ‍ॅमंडसेनने आपल्या माणसांचा आणि कुत्र्यांचा जीव धोक्यात घातल्याचं त्याने आपल्या डायरीत नमूद केलं.

१४ सप्टेंबरला जवळपास सर्व सामग्री ८० अंशावरील डेपोमध्ये ठेवून अ‍ॅमंडसेनने परतीचा मार्ग पत्करला. दुस-या दिवशी तापमान -५० अंश सेल्सीयसपर्यंत घसरलं. त्या दिवशी त्यांच्याजवळील अनेक कुत्रे असह्य थंडीपायी गोठून प्राणाला मुकले. रात्रीच्या मुक्कामात हॅन्सन आणि स्टबर्ड यांनी आपल्या टाचेतील संवेदना नष्ट होत असल्याची तक्रार केली !

१६ सप्टेंबरच्या सकाळी तापमान -४० अंश सेल्सीयसपर्यंत सुधारलं होतं ! फ्रामहेम अद्यापही सुमारे ४६ मैल अंतरावर होतं. परंतु वाटेत दुसरंच एक संकट त्यांची वाट पाहत उभं होतं.

ब्लिझर्ड !

ग्रेट आईस बॅरीयरवर वा-याचा वेग आता चांगलाच वाढला होता. मध्ये अजिबात न थांबता फ्रामहेम गाठण्याची अ‍ॅमंडसेनने आपल्या सहका-यांना सूचना केली. अ‍ॅमंडसेन मोहीमेचा प्रमुख असल्याने त्याने स्वत:वर कोणत्याही स्लेजची जबाबदारी घेतली नव्हती. मात्रं वादळाचा जोर वाढण्याची लक्षणं दिसताच त्याने विस्टींगच्या स्लेजवर उडी टाकली आणि इतरांना मागे ठेवून हॅन्सनच्या तु़कडीसह तो वेगाने फ्रामहेमच्या दिशेने निघाला !

अ‍ॅमंडसेन, विस्टींग आणि हॅन्सन सुमारे ४ वाजल्यानंतर फ्रामहेमवर पोहोचले. सहाच्या सुमाराला स्टबर्ड आणि जालांड आणि त्यांच्यापाठोपाठ काही वेळातच हॅसल येऊन पोहोचला.

क्रिस्टीन प्रेस्टर्ड आणि जॅल्मर योहान्सन कुठे होते ?

प्रेस्टनच्या स्लेजला असलेले कुत्रे एकामागोमाग एक बर्फात कोसळून पडत होते ! वादळाचा जोर त्यांना असह्य होत होता. भरीला क्रिस्टीनच्या टाचेला फ्रॉस्टबाईट झाल्याने त्यातील संवेदना नाहीशी होत चालली होती. त्याला एखादं पाऊलही टाकणं अशक्यं झालं होतं. त्यांच्याजवळ कोणतीही अन्नसामग्री आणि इंधन नव्हतं !

....आणि अद्याप फ्रामहेमवर पोहोचण्यासाठी ग्रेट आईस बॅरीयरचा उतार उतरणं आवश्यक होतं.

योहान्सनने उरलेल्या कुत्र्यांच्या साहाय्याने सावधपणे स्लेज चालवत ग्रेट आईस बॅरीयरचा उतार पार करण्यात यश मिळवलं ! सुमारे -६० अंश सेल्सीयस तापमानात आणि झंझावाती वादळाचा मुकाबला करत योहान्सन जवळपास बेशुध्दावस्थेतील प्रेस्टर्डसह फ्रामहेमला पोहोचला तेव्हा मध्यरात्रीचे साडेबारा वाजून गेले होते !

गेल्या सतरा तासांपासून योहान्सन वादळाशी मुकाबला करत होता. कोणत्याही अन्नपाण्याविना आणि अवघ्या काही कुत्र्यांच्या मदतीने प्रेस्टर्डला सुरक्षीत फ्रामहेममध्ये आणण्यात अखेरीस तो यशस्वी झाला होता !

दुस-या दिवशी सकाळी अ‍ॅमंडसेन आणि योहान्सनची जोरदार खडाजंगी झाली.

" तुम्हांला परत येण्यास इतका उशीर का लागला ?" अ‍ॅमंडसेनने विचारलं.
" उशीर ?" योहान्सनने खवळून विचारलं, " तू आणि इतर सर्वजण आम्हांला सोडून पुढे निघून आलात ! आमच्याकडे ना अन्न होतं ना बर्फ वितळवण्यासाठी इंधन. आम्हाला मदत करण्याऐवजी तुम्ही पुढे का निघून आलात ?"

योहान्सनच्या या सडेतोड प्रश्नामुळे अ‍ॅमंडसेनचं माथं भडकलं. त्याने दक्षिण धृवावर जाणा-या तुकडीतून योहान्सनची हकालपट्टी केली ! वर तुलनेने बराच अननुभवी असलेल्या प्रेस्टर्डच्या हाताखाली किंग एडवर्ड ७ लँडवरील संशोधन मोहीमेत भाग घेण्याचा त्याला आदेश दिला ! स्टबर्डचीही त्याच तुकडीत नेमणूक करण्यात आली ! दक्षिण धृवावर जाणा-या तुकडीत आता अ‍ॅमंडसेन, हॅन्सन, हॅसल, जालांड आणि विस्टींग हे पाचजणच शिल्लक राहीले होते !

अ‍ॅमंडसेनचा दक्षिण धृवाच्या दिशेने जाण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला असला, तरीही त्याने बरीचशी सामग्री ८० अंश दक्षिणेवरील डेपोत पोहोचवली होती. दरम्यान स्कॉटच्या काय हालचाली सुरु होत्या ?

१३ सप्टेंबरला स्कॉटने दक्षिण धृवाच्या मोहीमेची अंतिम योजना आपल्या सहका-यांपुढे मांडली.

१६ जणांच्या तुकडीने दोन मोटरस्लेज, घोडे आणि कुत्र्यांसह केप इव्हान्सहून निघून बिअर्डमूर ग्लेशीयरचा माथा गाठायचा. इथून कुत्रे केप इव्हान्सला परतणार होते. घोड्यांना गोळ्या घालून त्यांचं मांस बरोबर घेऊन चार माणसांच्या चार तुकड्यांनी शॅकल्टनच्या मार्गाने दक्षिण धृवाच्या दिशेने मार्गक्रमणा करावी. वाटेत विशीष्ट अक्षवृत्तांवरुन एकेक करुन तीन तुकड्यांनी केप इव्हान्सकडे परत यावं आणि एका तुकडीने दक्षिण धृव गाठावा अशी स्कॉटची योजना होती. धृवावर जाणा-या शेवटच्या गटात कोणाचा समावेश करावा याचा निर्णय संपूर्णपणे स्कॉटच्या आधीन होता.

दरम्यान अ‍ॅमंडसेनच्या फ्राम जहाजाने १७ एप्रिलला ब्युनॉस आयर्स गाठलं होतं. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत सुमारे तीन महीने दक्षिण अमेरिका आणि आफ्रीकेदरम्यान ओशनोग्राफीवरील संशोधन आटपून लेफ्टनंट थॉमस निल्सन ब्युनॉस आयर्सला परतला होता. पीटर क्रिस्तोफर्सनच्या भावाने पूर्वी कबूल केल्याप्रमाणे इंधन आणि अन्नसामग्रीची तजवीज केली होती. ५ ऑक्टोबरला फ्रामने ब्युनॉस आयर्स सोडलं आणि पुन्हा व्हेल्सच्या उपसागराच्या दिशेने कूच केलं.

पहिल्या प्रयत्नात थंडीच्या कडाक्यामुळे आणि ब्लिझर्डमुळे माघार घ्यावी लागलेली असली तरी अ‍ॅमंडसेनची दुस-या मोहीमेची तयारी सुरू होतीच ! दक्षिण धृव गाठण्यास अ‍ॅमंडसन अधीर झालेला असला, तरीही योहान्सनने पूर्वी केलेल्या सूचनेप्रमाणे ऑक्टोबरच्या मध्यावर वसंत ऋतूची चाहूल लागेपर्यंत वाट पाहण्याचा त्याने निर्णय घेतला होता. १५ ऑक्टोबरला अ‍ॅमंडसेनची निघण्याची तयारी झाली होती, परंतु खराब हवामानामुळे पुन्हा वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.

१९ ऑक्टोबरला अ‍ॅमंडसेन, हॅन्सन, विस्टींग, हॅसल आणि जालांड यांनी ४ स्लेज आणि ५२ कुत्र्यांसह फ्रामहेम सोडलं !

२० ऑक्टोबरला स्कॉटने मेअर्सला पुढील आदेश दिला :-

" फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पोलर पार्टीला ( दक्षिण धृवावर जाणारी तुकडी ) गाठण्याच्या दृष्टीने तू कुत्रे घेऊन केप इव्हान्सहून कूच कर ! अर्थात नेमकं कधी निघावं हे मधून परतणा-या लोकांनी दिलेली माहीती, कुत्र्यांचं एक टन डेपो कँपवर उपलब्धं असलेलं खाणं आणि कुत्र्यांची शारिरीक अवस्था यावर अवलंबून असेल. १ मार्चच्या सुमाराला ८२ किंवा ८२'३०'' दक्षिण अक्षवृत्तावर आम्हांला गाठण्याच्या दृष्टीने तू केप इव्हान्स सोड !"
फ्रामहेममधून निघालेल्या अ‍ॅमंडसेनच्या तुकडीला पहिल्याच दिवशी अंटार्क्टीकाची चुणूक मिळाली !

अ‍ॅमंडसेन आणि विस्टींग स्लेजवरुन वेगाने जात असताना अचानकपणे त्यांच्या स्लेजखाली असलेला बर्फ खचला ! स्लेजला असलेले तेरा कुत्रे आणि या दोघांसह स्लेज सुमारे उभीच्या उभी खाली घसरली !

बर्फाची कपार !

सुदैवाने दहा फूट अंतरावर स्लेजची घसरण थांबली ! समोर उघडलेला कपारीचा अक्राळविक्राळ जबडा पाहून सर्वांची छाती दडपली. अ‍ॅमंडसेन म्हणतो,

" एखादा इंचभर आम्ही डावीकडे सरकलो असतो तर आमची दक्षिण धृवाची मोहीम त्या कपारीच्या तळाशी संपली असती !"
सावधपणे त्या कपारीतून बाहेर पडून सर्वांनी पुढची वाट धरली.

दोन दिवसांत सुमारे तीस मैल अंतर कापलं होतं. सप्टेंबरमध्ये पहिला प्रयत्न फसलेला असला, तरीही ८० अंश दक्षिणेपर्यंतच्या सर्व मार्गावर मार्गदर्शक खूण म्हणून झेंडे लावण्याची अ‍ॅमंडसेनने खबरदारी घेतली होती. त्याचप्रमाणे विशीष्ट अंतरांवर बर्फाच्या सहाय्याने मार्गदर्शक उपकरणं उभारण्यासही तो विसरला नव्हता ! या सर्व खुणांचा वापर करुन लवकरात लवकर ८० अंश दक्षिणेवरील आपला कँप गाठण्याची त्याची योजना होती.

२१ ऑक्टोबरच्या सकाळी हवामान बिघडलं. कँप सोडून मार्गाला लागेपर्यंत वा-याचा जोर चांगलाच वाढला होता. एव्हाना बर्फवृष्टीस सुरवात झाली होती ! याचा न टाळण्यासारखा परिणाम एकच होता.

ब्लिझर्ड ! हिमवादळ !

हिमवादळाला आता सुरवात झाली. मात्रं फारशी पर्वा न करता सर्वांनी आपापल्या स्लेज पुढे हाकारण्यास सुरवात केली. मात्रं एव्हाना मुख्य मार्गावरुन आपण भरकटल्याची कोणालाच कल्पना आली नव्हती !

सर्वात पुढे हॅन्सन आणि हॅसल होते. त्यांच्यापाठोपाठ जालांड होता. शेवटच्या स्लेजवर विस्टींग आणि अ‍ॅमंडसेन होते. हिमवादळामुळे जेमतेम काही अंतरावरचा प्रदेशच नजरेच्या टप्प्यात येत होता. तशातच स्लेजखाली असलेला बर्फ भुसभुशीत होत चालल्याची भयावह जाणीव अ‍ॅमंडसेनला झाली ! अनेकदा त्यांच्या वाटेत लहान-सहान कपारी ( क्रिव्हाईस ) आल्या, परंतु कोणतीही कपार धोकादायक वाटत नव्हती.

अ‍ॅमंडसेनची नजर पुढेच असलेल्या जालांड आणि त्याच्या स्लेजवर होती. दृष्यमानता फारच कमी असल्याने त्याला जालांडची स्लेज जेमतेमच नजरेस पडत होती.

... आणि एका क्षणी जालांडची स्लेज पुढच्या बाजूने कलंडली आणि बर्फात घुसली !

जालांडने क्षणाचाही विलंब न करता बाजूला उडी टाकली होती. पाय रोवून त्याने बर्फात गडप होत चाललेल्या स्लेजला बाहेर उपसून काढण्याचा प्रयत्न करण्यास सुरवात केली. स्लेजला बांधलेले कुत्रेही आपले पंजे बर्फात खुपसून तिला खाली जाण्यापासून वाचवण्याचा निकराचा प्रयत्न करु लागले.

....परंतु कशाचाही उपयोग होत नव्हता ! इंचाइंचाने स्लेज खाली घसरतच होती !

एका भल्या मोठ्या कपारीने अनपेक्षीतपणे आSS वासला होता !

जालांडची स्लेज आणि त्याला जोडलेले तेरा कुत्रे कोणत्याही क्षणी त्या कपारीत गडप होण्याच्या मार्गावर होते !

" मी आणखीन काही क्षणही तिला रोखू शकत नाही !" जालांड जवळ येऊन पोहोचलेल्या विस्टींग आणि अ‍ॅमंडसेनला म्हणाला.

सुदैवाने पुढे असलेल्या हॅन्सन आणि हॅसलला काहीतरी गडबड झाल्याची कल्पना आली होती. मागे परतून ते जालांडच्या स्लेजपाशी येऊन पोहोचले होते. त्यांच्याजवळ असलेल्या दोराचं एक टोक त्यांनी स्लेजला बांधलं. दोराच्या दुस-या टोकाला सगळी ताकद पणाला लावून जालांड आणि अ‍ॅमंडसेनने अखेर स्लेजला कपारीत घसरण्यापासून रोखण्यात यश मिळवलं !

सर्वप्रथम कुत्र्यांना वर घेण्यात आलं. एव्हाना हॅसलने आपली स्लेज कपारीमधली फट जिथे सर्वात लहान होती त्या ठिकाणी पुलासारखी आडवी आणून उभी केली. दोराच्या सहाय्याने दोन्ही स्लेज एकमेकाला घट्ट बांधून टाकण्यात आल्या.

आता पुढील महत्त्वाचा प्रश्न होता तो कपारीच्या तोंडावर असलेली स्लेज पूर्णपणे वर काढण्याचा. परंतु त्यासाठी स्लेजवर असलेलं सर्व सामान मोकळं करून वर काढावं लागणार होतं ! त्यासाठी त्या कपारीत उतरावं लागणार होतं !

हे काम अंगावर घेतलं विस्टींगने. आपल्या देहाभोवती दोर गुंडाळून तो कपारीत उतरला ! स्लेजवर असलेलं सामान त्याने भराभर मोकळं करण्यास सुरवात केली. अ‍ॅमंडसेन आणि जालांडने पूर्वीप्रमाणेच स्लेजला दोराच्या सहाय्याने रोखून धरलं. हॅन्सन आणि हॅसलने विस्टींगने मोकळं केलेले सामानाचे गठ्ठे कपारीच्या तोंडावरुन वर ओढण्यास प्रारंभ केला.

" जरा जपून !" विस्टींगने कपारीतून सूचना केली, " तुम्ही ज्यावर उभे आहात तो बर्फाचा तुकडा कपारीत पुढे झुकलेला आहे आणि जेमतेम काही इंच जाड आहे !"

हॅसल आणि हॅन्सनने त्याच्या सूचनेकडे काणाडोळा केला. बेधडकपणे ते दोघं त्या बर्फावरून सामानाचे गठ्ठे वाहून आणत होते ! साक्षात मृत्यूशी त्यांचा लपंडाव सुरू होता ! सुदैवाने कोणतीही अडचण न येता सर्व सामान वर काढण्यात आलं.

" आपण फारच नशीबवान आहोत !" कपारीतून विस्टींगची कॉमेंट्री सुरूच होती, " या कपारीचा केवळ हाच भाग असा आहे जिथे बर्फाचा थर ब-यापैकी जाडसर आहे ! आपण स्लेज पूल बांधल्यासारखी आरपार टाकू शकलो ! आणखीन काही फूट डावीकडे असतो, तर कपारीच्या तळाशी आरामात पहुडलो असतो ! जेमतेम कागदाच्या जाडीइतकाच पृष्ठभाग आहे तिथे !"

सर्व सामानापाठोपाठ विस्टींगला वर ओढून घेण्यात आलं.

" वर आल्यावर आता कसं वाटतंय ?" अ‍ॅमंडसेनने त्याला प्रश्न केला.
" इथल्यापेक्षा खाली मस्तं उबदार वाटत होतं !" विस्टींग मिस्कीलपणे उद्गारला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel