९० डिग्री साऊथ

प्रकरण २०

अनादी अनंत काळापासून माणसाला अज्ञात प्रदेशाचं आकर्षण राहीलं आहे. नवीन भूमीचा शोध घ्यावा, त्यावर आपलं स्वामित्वं प्रस्थापीत करावं ही मानवाची आस अनादी-अनंत कालापासून चालत आलेली आहे. युरोपीयन आणि मुस्लीम आक्रमकांनी यालाच धर्मप्रसाराची आणि व्यापाराची जोड दिली आणि व्यापाराच्या माध्यमातून अनेक वसाहतींचं साम्राज्यं उभारलं.

प्रकरण २०

८ ऑक्टोबर १९१२ च्या पत्रात ती म्हणते,

" अंटार्क्टीकावरील पाँटींगने काढलेल्या फोटोंचा मी एक छोटेखानी शो ठेवला होता. लॉर्ड कर्झनपासून अनेकांनी त्याला हजेरी लावली होती. तुझ्या मोहीमेचे फोटो पाहून सर्वांना खूप आनंद झाला.

अ‍ॅमंडसेन दक्षिण धृवावर पोहोचल्याची बातमी एव्हाना तुला न्यूझीलंडमधून किंवा कदाचित धृवावरच मिळाली असेल. तुला काय वाटलं असेल याची मी कल्पनाही करु शकत नाही ! सुरवातीला त्याचा फार मोठा गाजावाजा झाला, परंतु आता मात्रं लोक त्याला फारसं महत्वं देईनासे झाले आहेत. विशेषतः तुझ्या मोहीमेत तू शास्त्रीय संशोधनाचं जे कार्य करत आहेस, ते लोकांच्या दृष्टीने अधिक महत्वाचं आहे !

त्याने तुला फसवून चकवलं असं बहुतेकांचं मत आहे. मी याकडे थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. त्याने त्याचा मार्ग पत्करला होता आणि त्याचं लक्ष्यं निवडलं होतं. सर्वप्रथम धृवावर पोहोचल्यावर त्याच प्रयत्नात असलेल्या इतरांचा त्याने एका शब्दानेही उल्लेख केलेला नाही, परंतु त्याने तुझ्या मार्गात आडकाठी न करता आपला वेगळा मार्ग निवडला होता हे मान्यं करावंच लागेल.

इंग्लंडमध्ये सर्वांना तुझ्याबद्दल किती अभिमान आहे याचा मला खूप आनंद आहे ! लवकर घरी परत ये ! मी आणि पीटर तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत !"
बिचारी कॅथलीन !  आपल्या पतीने सहा महिन्यांपूर्वीच रॉस आईस शेल्फवर शेवटचा श्वास घेतल्याची तिला काहीही कल्पना नव्हती !


कॅथलीन आणि पीटर स्कॉट

केप इव्हान्सला असताना अ‍ॅटकिन्सनने आपल्या सहका-यांसमोर दोन पर्याय ठेवले होते. दक्षिणेला स्कॉटचा शोध अथवा कँपबेलच्या तुकडीपर्यंत पोहोचणे. परंतु कँपबेलच्या तुकडीच्या शोधात जाण्यात एक मोठी अडचण होती ती म्हणजे पृष्ठभागावरील बर्फ अद्यापही पुरेसा टणक नव्हता. तसंच त्यांच्या शोधात केप आद्रेला गेलेल्या टेरा नोव्हाने त्यांना गाठल्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. सर्वानुमते पोलर पार्टीचा शोध घेण्याची योजना आखण्यात आली.

२९ ऑक्टोबरला अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीने कुत्रे आणि सात खेचरांसह केप इव्हान्सहून दक्षिणेची वाट पकडली. जुन्या मार्गानेच एक टन डेपो गाठून पुढे तपास करण्याचा त्यांचा बेत होता.

७ नोव्हेंबरला कँपबेलची तुकडी केप इव्हान्सला पोहोचली ! वाटेत हट पॉईंटला त्यांना अ‍ॅटकिन्सनचा पेनेलसाठी ठेवलेला संदेश मिळाला. खेचरं आणि कुत्र्यांसह पोलर पार्टीच्या शोधात दक्षिणेला जात असल्याचा त्यात उल्लेख होता. कॅंपबेल केप इव्हान्सला पोहोचला तेव्हा तिथे फक्त डेबनहॅम आणि आर्चर हे दोघेजणच हजर होते.


अ‍ॅबॉट, कँपबेल, डिकसन, प्रिस्टली, लेव्हीक आणि ब्राउनिंग - केप इव्हान्स, ७ नोव्हेंबर १९१३

तब्बल दहा महिन्यांनी ते सर्वजण केप इव्हान्सला परतले होते !

स्कॉट, विल्सन आणि बॉवर्सच्या शोधात असलेल्या अ‍ॅटकिन्सनच्या तुकडीने एक टन डेपो गाठला, परंतु स्कॉट  तिथे पोहोचल्याचं दर्शवणारा एकही पुरावा तिथे आढळला नाही. डेपोच्या परिसरात बारकाईने शोध घेऊनही त्यांची कोणतीही खूण न आढळल्यावर अ‍ॅटकिन्सनने आणखीन दक्षिणेला त्यांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

१२ नोव्हेंबरला अ‍ॅटकिन्सनची तुकडी दक्षिणेच्या मार्गावर होती. एक टन डेपोपासून सुमारे दहा मैलांवर आघाडीवर  असलेल्या राईटला बर्फाचा एक लहानसा ढिगारा दिसला. त्या बर्फातून बाहेर डोकावणा-या एका वस्तूने राईटची उत्सुकता चाळवली. सुरवातीला ते काय असावं याचा त्याला अंदाज येईना, परंतु जवळ जाऊन पाहिल्यावर त्याला आश्चर्याचा धक्का बसला.

तो तंबूच्या वरच्या टोकाचा भाग होता !

हिमवादळाने तंबूवर बर्फाचा थर जमा झालेला होता. तंबूचं दार कोणत्या दिशेला असावं याची राईटला कल्पना येत नव्हती. आपल्या सहका-यांचं लक्ष्यं वेधण्यासाठी राईटने त्यांना खुणा करण्यास सुरवात केली, परंतु त्याच्या खुणांचा त्याच्या सहका-यांना अर्थ लागत नव्हता.

" त्यांना मोठ्याने हाक मारुन तिथल्या शांत आणि पवित्रं वातावरणाचा भंग करण्याची माझं धैर्य झालं नाही !" राईट म्हणतो.

अ‍ॅटकिन्सन आणि चेरी-गॅराडला गाठून राईटने त्याला तंबूची माहीती दिली. चेरी-गॅराड म्हणतो,
" राईटने आम्हाला त्याला आढळलेल्या तंबूची माहीती दिली. गेल्या वर्षीच्या आमच्या एका मार्करच्या शेजारी आम्हाला केवळ बर्फाचा एक ढिगारा दिसत होता. राईटला तो तंबू असल्याची खात्री नक्की कोणत्या गोष्टीमुळे पटली होती हे मला कळेना ! आम्ही जवळ जाऊन पाहीलं तरीही बर्फाशिवाय आम्हाला काही दिसेना. आमच्यापैकी कोणीतरी ढिगा-या वरच्या भागात असलेला बर्फ बाजूला केला आणि तंबूच्या वरच्या भागात असलेली खिडकी आमच्या नजरेस पडली !"
" प्रत्येकाचा डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या !" विल्यमसन म्हणतो, " गेल्या आठ महिन्यांपासून या प्रसंगाला सामोरं जावं लागेल याचा अंदाज असूनही स्वतःवर नियंत्रण ठेवणं अशक्यं झालं होतं ! आमच्यासमोर असलेल्या तंबूत नक्की काय पाहण्यास मिळेल या कल्पनेनेच माझी छाती दडपली होती !"
अ‍ॅटकिन्सनने प्रत्येकाला आळीपाळीने तंबूच्या आत शिरुन पाहणी करण्याची सूचना केली.

" मी कितीतरी वेळ आत जाण्याचं टाळत होतो !" विल्यमसन म्हणतो, " आतलं दृष्यं मी पाहू शकणार नाही याची मला भीती वाटत होती. अखेर हिम्मत करुन मी आत गेलो आणि समोर जे दिसलं ते पाहून काही क्षणांत बाहेर आलो ! स्लिपींग बॅगमध्ये गोठलेल्या अवस्थेतील मृतदेहांपैकी एक कॅप्टन स्कॉट आहे हे माझ्या ध्यानात आलं. इतरांचे चेहरे पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही !"

कॅप्टन स्कॉट मध्ये होता. त्याच्या एका बाजूला बॉवर्स आणि दुस-या बाजूला विल्सन होता. विल्सनचं डोकं आणि छाती तंबूला आधार देणा-या खांबाला विळखा घातलेल्या अवस्थेत होती. विल्सन आणि बॉवर्स दोघंही पूर्णपणे स्लिपींग बॅगमध्ये बंदिस्त होते. रात्री झोपेतच मृत्यूने त्यांना गाठलं असावं ! स्कॉटच्या कमरेच्या वरचा भाग स्लिपींग बॅगच्या बाहेर होता. त्याच्या चेहरा वेदनेने पिळवटलेला होता. अखेरच्या क्षणी त्याला ब-याच यातना झाल्या असाव्यात ! अत्यंत कमी तापमानामुळे त्यांची त्वचा पिवळसर पडली होती आणि काचेप्रमाणे चकाकत होती. प्रचंड प्रमाणात फ्रॉस्टबाईटच्या खुणा त्यांच्या मृतदेहांवर दिसून येत होत्या.

अ‍ॅटकिन्सनने तंबूत आढळलेली सर्व कागदपत्रं ताब्यात घेतली. स्कॉट, विल्सन, बॉवर्स - तिघांच्याही डाय-या, स्कॉटने लिहीलेली पत्रं. बॉवर्स आणि विल्सनने केलेल्या शास्त्रीय निरिक्षणांच्या नोंदी यांचा त्यात समावेश होता. विल्सनच्या सूचनेवरुन जमा करण्यात आलेले शास्त्रीय नमुने अ‍ॅटकिन्सनने आपल्या कँपमध्ये नेले. हे काम आटपल्यावर स्कॉट, विल्सन आणि बॉवर्स यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली. स्कॉटच्या स्लेजच्या अवशेषांमध्ये ग्रान आणि विल्यमसनला योगायोगानेच नॉर्वेचा राजा ७ वा हकून याच्या नावाने अ‍ॅमंडसेनने लिहीलेलं पत्रं आणि स्कॉटच्या नावाने लिहीलेली चिठ्ठी सापडली होती !