९० डिग्री साऊथ

प्रकरण १७

अनादी अनंत काळापासून माणसाला अज्ञात प्रदेशाचं आकर्षण राहीलं आहे. नवीन भूमीचा शोध घ्यावा, त्यावर आपलं स्वामित्वं प्रस्थापीत करावं ही मानवाची आस अनादी-अनंत कालापासून चालत आलेली आहे. युरोपीयन आणि मुस्लीम आक्रमकांनी यालाच धर्मप्रसाराची आणि व्यापाराची जोड दिली आणि व्यापाराच्या माध्यमातून अनेक वसाहतींचं साम्राज्यं उभारलं.

प्रकरण १७

इव्हान्सच्या मृत्यूनंतर अवघ्या अर्ध्या तासात त्यांनी पुढचा मार्ग अनुसरला. इव्हान्स गेला होता, परंतु इतरांना पुढे जाणं आवश्यक होतं !

स्कॉटची तुकडी काही वेळातच आपल्या पुढील कँपवर पोहोचली. इथेच त्यांनी घोड्यांची हत्या केली होती. घोड्याचं मांस मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांनी भरपेट जेवण करुन विश्रांती घेतली. इथून पुढे मध्ये असलेल्या डेपोतील सामग्रीच्या सहाय्याने एक टन डेपो गाठणं त्यांना शक्य होणार होतं.

रॉस आईस शेल्फवर अर्धवट शुध्दीत असलेल्या टेडी इव्हान्ससह लॅशी आणि क्रेनची वाटचाल सुरु होती. मात्रं खराब हवामानामुळे त्यांची प्रगती खूपच हळू होती. त्यांच्याजवळ अन्नपदार्थांचा साठाही मर्यादीत प्रमाणात होता.

लॅशी आणि क्रेनने आपसात चर्चा केली आणि क्रेनने एकट्याने ३० मैलांवरील हट पॉईंट गाठून इव्हान्ससाठी मदत आणण्याचा निर्णय घेतला. थोडेफार खाद्यपदार्थ घेऊन क्रेन पुढे निघाला.

क्रेन गेल्यावर लॅशीनेही एक मैलावर असलेला कॉर्नर कँप गाठला. तिथे मिळालेले थोडेफार खाद्यपदार्थ घेऊन तो टेडी इव्हान्सजवळ परतला. परंतु तिथे मिळालेल्या डे च्या संदेशामुळे तो काळजीत पडला होता.

" कॉर्नर कँपपासून हट पॉईंटपर्यंतच्या मार्गावर अनेक मोठ्या कपारी असल्याचं डे च्या संदेशात लिहीलं होतं. क्रेनजवळ स्कीईंगचं साहित्य नव्हतं. इव्हान्सला स्लेजवर चढवल्यावर वजन नको म्ह्णून आम्ही स्कीईंगचं साहीत्य मागेच ठेवून दिलं होतं. पायी चालताना क्रेन कपारीत कोसळण्याची जास्त शक्यता होती. मला त्याची काळजी लागून राहीली होती !"
स्कॉटच्या तुकडीची प्रगती अतिशय मंदगतीने होत होती. वाळवंटी प्रदेशातून जात असल्याप्रमाणे स्लेज ओढण्यास त्यांना कष्ट पडत होते. दिवसभरात जेमतेम पाच मैलाची मजल त्यांना मारता आली होती. सध्यातरी खाणं-पिणं मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं, परंतु आपल्याला परतण्यास झालेला उशीर स्कॉटसाठी काळजीचं कारण ठरला होता.

लॅशीला क्रेनच्या काळजीने घेरलं होतं. त्याच्याजवळ मर्यादीत खाद्यपदार्थ उपलब्ध होते. मात्रं तेलाचा ब-यापैकी साठा असल्याने खाद्यपदार्थ संपल्यास गरम पाण्यावर भागवण्याचा त्याचा विचार होता. क्रेन हट पॉईंटला पोहोचण्यात यशस्वी झाला तर सगळेच प्रश्न मिटणार होते.

१९ जानेवारीला अ‍ॅटकिन्सन आणि डिमीट्री हट पॉईंटवरील डिस्कव्हरी हट मध्ये असताना एक माणूस धडपडत आत शिरला.

टॉम क्रेन !

वा-याशी मुकाबला करत आणि कपारी टाळून सावधपणे वाटचाल करत क्रेन अखेरिस हट पॉईंटला पोहोचला होता !

" टेडी इव्हान्सला स्कर्व्हीने ग्रासलं आहे डॉक्टर !"  क्रेन अ‍ॅटकिन्सला म्हणाला, " त्याला चालता येत नाही. तो स्लेजवर आहे ! त्याच्याबरोबर लॅशी आहे. कॉर्नर कँपच्या पुढे एक मैल !"

क्रेनकडून इव्हान्सची गंभीर अवस्था कळताच अ‍ॅटकिन्सन आणि डिमीट्री कुत्र्यांसह कॉर्नर कँपच्या दिशेने निघाले.

स्कॉटच्या तुकडीची प्रगती धीमेपणानेच सुरु होती. स्कीईंगचा वापर करूनही त्यांना वेगाने मार्गक्रमणा करता येत नव्हती. त्यातच स्लेज ओढण्याचा भार होताच. रात्री त्यांनी गेट वे पासून दहा मैलांवर असलेला आपला कँप गाठला. इथेच बिअर्डमूर ग्लेशीयरवर चढाई करण्यापूर्वी हिमवादळाने त्यांना चार दिवस अडकवून ठेवलं होतं. आपल्या प्रगतीबद्दल स्कॉट समाधानी नव्हता. आपली शारिरीक क्षमता कमी पडत असल्याचं त्याच्या ध्यानात आलं होतं.

कॉर्नर कँपच्या पुढे मैलभर अंतरावर असलेले लॅशी आणि टेडी इव्हान्स मदतीची वाट पाहत होते. लॅशी इव्हान्सला सतत धीर देत होता.

अचानक लॅशीच्या कानावर दूरवरुन भुंकत येणा-या कुत्र्यांचा आवाज आला !

लॅशीने तंबूतून बाहेर झेप घेतली. अ‍ॅटकिन्सन आणि डिमीट्रीला आलेले पाहून त्याच्या डोक्यावरचं ओझं एकदम उतरलं !

" थँक गॉड !" लॅशी म्हणतो, " डॉक्टर आणि डिमीट्रीला पाहून माझ्या मनावरचं दडपण एकदम नाहीसं झालं. आम्ही सुरक्षीत होतो. टेडीला मदत मिळणार होती !"
होबार्टच्या वाटेवर असलेल्या अ‍ॅमंडसेनने आपल्या जहाजावरील सर्वांना उद्देशून एक प्रश्न केला होता,

" उत्तर धृवावर येण्यासाठी कोण कोण तयार आहे ?"

अ‍ॅमंडसेनच्या प्रश्नाला आईस पायलट असलेल्या बेकचा अपवाद वगळता सर्वांनी ठाम नकार दिला होता. चिडलेल्या अ‍ॅमंडसेनने प्रत्येकाला एकेकटं गाठून त्यांची हजेरी घेतली ! पुन्हा तोच प्रश्न करताच सर्वांनी उत्तरेकडे जाण्याची तयारी दर्शवली. अपवाद फक्त जालांडचा ! त्याचा नकार कायमच होता !

स्कॉटपुढे आता वेगळीच समस्या उभी राहीली होती. धृवाच्या दिशेने जाताना लावलेले मार्कर शोधून काढण्यास त्यांना त्रास होत होता. कित्येकवेळा दोन मार्करच्या मधील प्रदेशात वाट चुकून ते भलत्याच दिशेला जात होते. मधूनच घोड्यांच्या बर्फात उमटलेल्या आणि अद्याप न मिटलेल्या खुणांवरुन त्यांना दिशेचा अंदाज येत होता. स्कॉटने आपल्या डायरीत चिंता व्यक्त केली होती,

" मार्करवरुन वाट शोधणं बरंच अवघड होत चाललं आहे. दिवसाला आठ मैलापेक्षा जास्तं अंतर कापणं आवश्यक आहे ! वाट चुकल्यामुळे वेगळ्याच दिशेन एक कँप ओलांडून आम्ही पुढे आलो आहोत, त्यामुळे तिथे असलेलं अन्न आता मिळू शकणार नाही. माझ्या अपेक्षेपेक्षा हा परतीचा प्रवास जास्तच त्रासदायक ठरतो आहे ! हिवाळ्याला सुरवात होण्यापूर्वी आम्ही एक टन डेपो गाठणं आवश्यक आहे !"
२२ जानेवारीला लॅशी आणि टेडी इव्हान्ससह अ‍ॅटकिन्सन आणि डिमीट्री हट पॉईंटला पोहोचले ! क्रेनला बरोबर घेऊन डिमीट्रीने केप इव्हान्सकडे कूच केलं. अ‍ॅटकिन्सनने त्यांच्याबरोबर सिम्प्सनला संदेश दिला होता.

डॉक्टर असल्याने टेडी इव्हान्सवर उपचार करण्यासाठी अ‍ॅटकिन्सनला हट पॉईंटला थांबणं भाग होतं. परतीच्या वाटेवर असलेल्या स्कॉटला गाठण्यासाठी डिमीट्रीबरोबर उत्कृष्ट नॅव्हीगेटर असलेल्या राईटला एक टन डेपोवर पाठवण्याची अ‍ॅटकिन्सनने सूचना केली होती.

अ‍ॅटकिन्सनचा संदेश मिळाल्यावर राईट आणि चेरी-गॅराड डिमीट्रीसह हट पॉईंटला परतले. सिम्प्सनने राईटला  स्कॉटला गाठण्यासाठी पाठवण्यास नकार दिला होता. सिम्प्सन स्वतः अंटार्क्टीकातून परत जाणार होता. हवामानाच्या अभ्यासाचं आणि संशोधनाचं काम त्याने राईटवर सोपवलं होतं. डिमीट्री बरोबर चेरी-गॅराडला पाठवण्याची सिम्प्सनने सूचना केली होती.

टेडी इव्हान्सबरोबर स्कॉटने अ‍ॅटकिन्सनसाठी कुत्र्यांसह ८२ आणि ८३ दक्षिण अक्षवृत्ताच्या मध्ये पोलर पार्टीची भेट घेण्याचा आदेश दिला होता. परंतु हा आदेश अमलात आला नाही !

याचा काय परिणाम होणार होता ?

चेरी-गॅराडला दृष्टीदोष होता. त्याची दूरची नजर अधू होती ! नॅव्हीगेशनचा आणि कुत्र्यांसह स्लेज हाकारण्याचा कोणताही अनुभव नव्हता ! आपल्या डायरीत त्याने प्रत्येक कँपची जागा आणि दिशादर्शक बारीक-सारीक गोष्टी संदर्भासाठी टिपून घेतल्या. स्कॉटच्या तुकडीच्या परतीचा अंदाज बांधून ती तारीखही त्याने डायरीत नोंदवली !

स्कॉटने आपला डेपो गाठला. इथे घोड्याचं मांस मुबलक प्रमाणात असल्याचं पाहून त्याला हायसं वाटलं. मात्रं इंधनाची कमतरता त्यांना जाणवत होती. दहा दिवस पुरेल इतकी सामग्री आणि घोड्याचं मांस त्या डेपोमध्ये होतं. इथे मेयर्स, अ‍ॅटकिन्सन आणि टेडी इव्हान्सने ठेवलेले संदेशही स्कॉटला मिळाले. टेडीच्या संदेशावरुन त्याला वाटचालीला बराच त्रास झाला असावा अशी स्कॉटला शंका आली.

अंटार्क्टीकवर हवामान आता थंडं होत चाललं होतं. बर्फातून सतत चालल्याने आणि तापमान उतरल्यामुळे आपले बूट सतत ओले राहत असल्याचं त्याच्या ध्यानात आलं होतं. मधूनच पाय गारठत होते. विल्सनला मध्येच स्नो ब्लाइंडनेसने ग्रासलं. मात्र सुदैवाने बर्फ बराच टणक असल्याने त्यांना वाटचाल करताना फारशी अडचण येत नव्हती.

" हवामान झपाट्याने थंड होत चाललं आहे !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " थंडी असह्य होण्यापूर्वी आम्हांला भराभर पुढे जाणं आवश्यक आहे !  घसरत्या तापमानाशी आणि मोसमाशी आमची जणू शर्यतच लागली आहे ! आमच्यापाशी तीनच दिवस पुरेल इतकं इंधन आहे ! पुढचा डेपो गाठण्यास निदान चार दिवस लागतील. तिथे पोहोचल्यावर आम्ही कदाचित सुरक्षीत असण्याची शक्यता आहे, परंतु मला शंका वाटते. कुत्र्यांची तुकडी आम्हाला कुठे भेटू शकेल ?"

डिमीट्री आणि चेरी-गॅराड हट पॉईंटवरुन एक टन डेपोकडे निघाले. त्यांच्याजवळ २४ दिवसांची सामग्री आणि २१ दिवस पुरेल इतकं कुत्र्यांचं खाद्य होतं. निघण्यापूर्वी अ‍ॅटकिन्सनने चेरीला सूचना दिली होती,

" लवकरात लवकर तू एक टन डेपो गाठ. स्कॉट पोहोचला नसला तर परिस्थिती पाहून काय करायचं आणि किती दिवसा वाट पाहायची हे तूच ठरव ! पुढील वर्षी स्लेजला लावण्यासाठी आपल्याला कुत्रे लागतील, त्यामुळे कुत्र्यांच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेऊ नका असा स्कॉटचा आदेश आहे. असंही परतीच्या वाटेवर स्कॉट कुत्र्यांवर अवलंबून नाही !"
टेडी इव्हान्सबरोबर स्कॉटने कुत्र्यांसह दक्षिणेला येण्यासा पाठवलेल्या आदेशाचं काय झालं होतं ?

एक टन डेपोवर कुत्र्यांच्या खाण्याचा साठाच करण्यात आलेला नव्हता !

डे, हूपर, नेल्सन आणि क्लिसॉल्ड एक टन डेपोवर गेले तेव्हा त्यांच्याबरोबर कुत्र्यांचं खाणं नव्हतं ! याचा अर्थ कुत्र्यांना पुढे नेण्यासाठी खाण्याची समस्या उभी राहणार होती !

 .... आणि स्कॉट कुत्र्यांच्या तुकडीच्या आशेवर होता !

रॉस आईस शेल्फवर तापमान -४० अंशांपर्यंत घसरलं होतं. रोज पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी बुटात पाय घालणं हे देखील जिकीरीचं होत होतं. अद्यापही मिडल ग्लेशीयर डेपोपासून ते २४ मैलांवर होते ! इंधनाचा तुटवडा आता चांगलाच जाणवत होता.

२९ फेब्रुवारीला मेयर्स, सिम्प्सन आणि स्कर्व्हीने ग्रस्त असलेला टेडी इव्हान्स यांच्यासह टेरा नोव्हाने केप इव्हान्सहून न्यूझीलंडला जाण्यासाठी नांगर उचलला. व्हिक्टर कँपबेलच्या शास्त्रीय संशोधन मोहीमेला घेण्यासाठी टेरा नोव्हाने इव्हान्स कोव्ह गाठलं, परंतु अनेकदा प्रयत्नं करुनही त्यांना किनारा गाठणं शक्यं होत नव्हतं ! कँपबेलची सहा जणांची तुकडी हिमवादळामुळे तेरा दिवसांपासून आपल्या तंबूत अडकून पडली होती !

डिमीट्री आणि चेरी-गॅराडने चार दिवसांत नव्वद मैल अंतर पार करुन ब्लफ डेपो गाठला होता. घोड्यांच्या तुलनेत बर्फावर सफाईने वावरण्याची कुत्र्यांची क्षमता चेरी-गॅराडच्या ध्यानात आली !

२ मार्चला स्कॉट मिडल बॅरीअर डेपोवर पोहोचला. खाद्यपदार्थांची काळजी नव्हती, परंतु इथेही इंधनाचा तुटवडा होता ! इंधनाच्या कॅनमध्ये अपेक्षेपेक्षा कमी इंधन पाहून स्कॉट निराश झाला. हे कमी होतं म्हणूनच की काय, ओएट्सच्या पायाचं दुखणं वाढीस लागलं होतं ! त्याच्या बोटांवर काळपट निळसर छटा दिसू लागल्या होत्या ! ही फ्रॉस्टबाईटची सुरवात असल्याची स्कॉटला कल्पना आली. रात्री घसरत जाणा-या तापमानाने आणि जोरदार वा-याने त्यांच्या हालात अधिकच भर घातली होती. स्लेज ओढताना त्यांना अपार कष्ट पडत होते.

३ मार्चला डिमीट्री आणि चेरी-गॅराडने एक टन डेपो गाठला. पोलर पार्टीचा तिथे मागमूस नव्हता. चेरीने २ दिवस वाट पाहून पुढची हालचाल करण्याचा निर्णय घेतला.

व्हिक्टर कँपबेलच्या तुकडीतील सहका-यांनी निवा-यासाठी इग्लू बांधण्यास सुरवात केली होती !

" आमच्यापाशी जेमतेम एक महिना पुरेल इतके खाद्यपदार्थ होते !" जॉर्ज लेव्हीक  म्हणतो, " ६ किंवा ७ मार्चपर्यंत जहाज येऊन पोहोचलं नाही तर त्यानंतर येणं अशक्यंच आहे ! संपूर्ण हिवाळा आम्ही इथे कसा घालवणार हा कठीण प्रश्न आहे !"

स्कॉटच्या तुकडीच्या हालांत दिवसेदिवस भर पडत होती.  आपल्या पुढच्या डेपोपासून ते अद्याप तीसेक  मैलांवर होते.  ओएट्सचा पाय चांगलाच सुजला होता. त्याल पावलागणिक वेदना होत्या. गरम अन्न मिळाल्यास त्याची परिस्थिती सुधारेल अशी विल्सनला खात्री होती, परंतु इंधनाचा प्रश्न उग्र बनत चालला होता. जेमतेम तीन दिवस पुरेल इतकंच इंधन त्यांच्यापाशी शिल्लक होतं. पुढच्या डेपोवरही इंधनाची कमतरता असली तर ? हा प्रश्न स्कॉटला भेडसावत होता !

" इतक्या कमी तापमानाची आम्हांला अपेक्षा नव्हती !" स्कॉटने डायरीत नमूद केलं.

एक टन डेपोमध्ये असलेल्या चेरी-गॅराडने तापमान -३७ अंश सेल्सीयसपर्यंत खाली उतरल्याची नोंद केली. चेरी-गॅराड नॅव्हीगेटर नव्हता. स्कॉटला भेटण्यासाठी आपण पुढे गेलो आणि स्कॉटशी चुकामूक झाली या भीतीने त्याला ग्रासलं होतं. एक टन डेपोवर कुत्र्यांचं खाद्य नसल्याने कुत्र्यांना घेऊन पुढे जायचं असल्यास किमान काही कुत्र्यांचा बळी देऊन त्यांचं मास इतर कुत्र्यांना खायला घालावं लागणार होतं. परंतु कुत्र्यांच्या बाबत कोणतीही रिस्क घेऊ नका असा स्कॉटचा आदेश असल्याचं अ‍ॅटकिन्सनने त्याला बजावलं होतं. चेरी-गॅराड कात्रीत सापडला होता. तो म्हणतो,

" मला स्कॉटला अन्नपदार्थांचा तुटवडा भासत असेल अशी जराही शंका आली नाही ! आणखीन दोन-तीन दिवसांत पोलर पार्टी येऊन पोहोचेल अशी माझी अपेक्षा होती !"
४ मार्चला फ्रामच्या डेकवर असलेल्या जालांडला दूरवर जमिन दिसली !

टास्मानिया !

दक्षिण धृव पादाक्रांत करुन अ‍ॅमंडसेन ऑस्ट्रेलियाच्या किना-याजवळ येऊन पोहोचला होता !

स्कॉटच्या नशिबात काय लिहीलं होतं ?