केप इव्हान्सच्या वाटेवर असलेल्या टेडी इव्हान्सच्या तुकडीलाही वादळाचा मुकाबला करावा लागत होता. सतत होणा-या बर्फवृष्टीमुळे आणि कधीही आडव्या येणा-या कपारींमुळे त्यांची वाटचाल मंदावत होती.
१४ जानेवारीला स्कॉटने ८९'२०'' अंश दक्षिण अक्षवृत्त गाठलं होतं. वातावरणात आलेला अनाकलनीय गारवा त्याला चिंतीत करत होता. मात्रं सर्वजण शारिरीकदृष्ट्या अत्यंत सक्षम असल्याचं तो स्वतःला पुन्हा पुन्हा बजावत होता !
टेडी इव्हान्स, लॅशी आणि क्रेनने बिअर्डमूर ग्लेशीयरच्या माथ्यावर असलेला डेपो गाठला ! त्यांच्याजवळील अन्नसामग्री संपत आली होती, त्यामुळे डेपो गाठताच त्यांना हायसं वाटलं ! लॅशीने स्कॉटच्या नावाने तिथे संदेश ठेवला आणि चार दिवस पुरेल इतकी सामग्री घेऊन त्यांनी पुढचा रस्ता सुधारला.
अॅमंडसेनने ८३ अंश दक्षिण अक्षवृत्तावरील आपला डेपो गाठला होता !
१५ जानेवारीला स्कॉटने ८९'३७'' अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. आपल्याप्रमाणेच अॅमंडसेनही बिअर्डमूर ग्लेशीयरवरुनच दक्षिण धृवाच्या मार्गावर येईल ही स्कॉटची कल्पना होती, त्यामुळे अद्यापही अॅमंडसेनची कोणतीही खूण न आढळून आल्याने स्कॉटला हायसं वाटलं होतं.
" इथून आता फक्त सत्तावीस मैल ! दोन दिवसात आम्ही दक्षिण धृव गाठणार हे निश्चित ! फक्त आमच्या आधी नॉर्वेजियन तिथे पोहोचले नसले की झालं !"
स्कॉटच्या दुर्दैवाने त्याच्यावर नेमकी हीच वेळ येणार होती !
अॅटकिन्सनच्या तुकडीने एक टन डेपो गाठला होता. वाटेतील प्रत्येक डेपोवर त्यांना मेयर्सकडून हालअपेष्टांचं वर्णन करणारे संदेश मिळत होते. परतीच्या वाटेवर मेयर्सला हिमवादळाने गाठलं होतं. त्याचा अन्नसाठाही मर्यादीतच होता. परत येणा-या तुकड्यांना आवश्यक साधनसामग्रीची केप इव्हान्सहून एक टन डेपोमध्ये आणण्याची कामगिरी स्कॉटने त्याच्यावर सोपवली होती, परंतु मेयर्सला ते अशक्यंच होतं !
मेयर्सची ही परिस्थिती असूनही एक टन डेपोवर साधनसामग्रीची रेलचेल पाहून अॅटकिन्सनला सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता ! चेरी-गॅराड म्हणतो,
" एक टन डेपोवर साधनसामग्री पूर्ण भरलेली पाहून आम्ही चकीतच झालो ! हूपरच्या चिठीवरुन त्याचा उलगडा झाला. २१ डिसेंबरला केप इव्हान्सला पोहोचलेल्या डे आणि हूपरकडून मेयर्सला परतण्यास उशीर होणार असल्याचं सिम्प्सनच्या ध्यानात आलं होतं. २६ डिसेंबरला डे, हूपर, नेल्सन आणि क्लिसॉल्ड यांनी केप इव्हान्सहून एक टन डेपोच्या दिशेने साधनसामग्री घेऊन प्रस्थान केलं होतं !"
१६ जानेवारीला फ्रामहेममध्ये असलेल्या थॉर्वल्ड निल्सनला व्हेल्सच्या उपसागरात आलेलं आणखीन एक जहाज दृष्टीस पडलं !
काईमान मारू !
जहाजावर जपानचा झेंडा फडकत होता. नोबू शिरासच्या जपानी अंटार्क्टीक मोहीमेची तुकडी त्या जहाजावर होती. फेब्रुवारीमध्ये आपल्या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्यावर त्यांनी ऑस्ट्रेलियाहून पुन्हा अंटार्क्टीका गाठलं होतं.
काईमान मारुवरील जपानी दर्यावर्दी - व्हेल्सच्या उपसागरात
निल्सन आणि प्रेस्टर्डने काईमान मारूला भेट दिली. जपानी मोहीमेत एकूण २७ माणसांचा समावेश होता. त्याखेरीज जहाजावर २६ कुत्रेही होते. निल्सन म्हणतो,
" त्यांच्या जहाजावर अनेक गोष्टी अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. स्वच्छता नावालाही नव्हती. त्यांचं लक्ष्यं दक्षिण धृवावर पोहोचणं हे नसून किंग एडवर्ड ७ लँड हे होतं. त्यांच्या मोडक्या-तोडक्या इंग्लीशमुळे जास्तं संवाद साधणं शक्यं नव्हतं !"
काईमान मारुने दुस-या दिवशी व्हेल्सच्या उपसागरातून दक्षिणेकडे प्रस्थान केलं. २६ जानेवारीला त्यांनी किंग एडवर्ड ७ लँडवर उतरण्यात यश मिळवलं. डिस्कव्हरी ( १९०२ ), निम्रॉड ( १९०८ ) आणि टेरा नोव्हा मोहीमेने तिथे उतरण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते.
अॅमंडसेनच्या तुकडीने ८२ अंश दक्षिण अक्षवृत्तावरील आपला डेपो गाठला होता ! अन्नसामग्रीची रेलचेल असल्याने त्यांनी जोरदार पार्टी केली ! स्लेजवरील वजन कमी करण्यासाठी अॅमंडसेनने कुत्र्यांचा आहार दुप्पट केला होता ! फ्रामहेममध्ये पोहोचण्याची त्याला घाई झाली होती ! स्कॉट अद्यापही दक्षिण धृवावर न पोहोचल्याची अॅमंडसेनला काहीच कल्पना नव्हती !
बिअर्डमूर ग्लेशीयरच्या वरच्या डेपोवरुन दोन दिवसांपूर्वी निघालेल्या लॅशी, क्रेन आणि इव्हान्सला आपला मार्ग थोडासा चुकल्याची शंका येत होती. मिडल ग्लेशीयर डेपोवर पोहोचल्यावर त्यांना अन्नसामग्री मिळू शकणार होती. मात्रं हवामान अद्याप पूर्णपणे अनुकूल नव्हतं !
८९'३७'' दक्षिण अक्षवृत्तावरुन निघालेल्या स्कॉटची तुकडी अतिशय उत्साहात होती. दुस-या दिवशी आपण दक्षिण धृवावर पोहोचणार याची त्यांना खात्री होती. दुपारी त्यांनी ८९'४२'' दक्षिण अक्षवृत्त गाठलं.
आघाडीवर असलेल्या बॉवर्सच्या तीक्ष्ण नजरेने दूरवर असलेला एक मार्कर टिपला होता. मात्रं तो मार्कर आहे हे मानण्यास त्याच्या मनाची तयारी नव्हती ! तो बर्फाच्या लाटेचा मध्येच आलेला उंचवटा असावा अशी त्याने स्वतःची समजूत करुन घेतली.
आणखीन अर्ध्या तासाने एक गडद काळा ठिपका बॉवर्सच्या दृष्टीस पडला !
झेंडा !
काही वेळातच स्कॉट आणि इतर सर्वजण त्या झेंड्यापाशी पोहोचले ! स्लेजच्या एका भागाला तो झेंडा लावण्यात आला होता. स्लेजच्या कित्येक खुणा आणि बर्फात अद्यापही टिकून असलेले कुत्र्याच्या पंजांचे ठसे त्यांना आढळून आले ! हा अॅमंडसेनचा १४ डिसेंबरचा कँप होता !
स्कॉटला वाटणारी भीती दुर्दैवाने खरी ठरली होती !
अॅमंडसेनने त्यांना चकवलं होतं !
नॉर्वेजियनांनी त्यांच्यापूर्वी दक्षिण धृव गाठला होता !
स्कॉटच्या तुकडीने तिथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांना प्रचंड निराशेने ग्रासलं होतं.
अॅमंडसेनचा झेंडा
" आम्ही अत्यंत निराश मनस्थितीत आहोत !" ओएट्सने आपल्या डायरीत नोंद केली, " स्कॉट अत्यंत निराश झाला असला तरी आपला पराभव त्याने मानाने स्वीकारला आहे ! अॅमंडसेन…. त्याचं डोकं फोडावं असा संताप आला आहे !"
" स्लेजच्या खुणा आणि कुत्र्यांच्या पंजांचे ठसे किती जुने आहेत याची काही कल्पना येत नाही !" विल्सन म्हणतो, " दोन-तीन आठवडे.... कदाचित त्यापेक्षाही जुन्या !"
" मला स्कॉटबद्दल फार वाईट वाटतं आहे !" बॉवर्स म्हणतो, " आपला पराभव त्याने खिलाडूपणाने स्वीकारला अहे !"
" ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती, दुर्दैवाने अखेरच्या क्षणी ती खरी ठरली !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " आमच्या आधी नॉर्वेजियन्स इथे येऊन गेले आहेत ! मला इथवर साथ देणा-या माझ्या सहका-यांविषयी मला वाईट वाटत आहे ! आता उद्या धृवावर पोहोचून लवकरात लवकर परत फिरणं एवढंच आमच्या हाती उरलं आहे ! परतीच्या वाटेवर आमची चांगलीच दमछाक होणार आहे ! अॅमंडसेनला नक्कीच कोणती तरी सोपी वाट सापडली असावी !"
दुस-या दिवशी स्कॉटने धृवाचा मार्ग प़कडला. अॅमंडसेनच्या स्लेजच्या खुणांच्या अनुरोधाने ते पुढे जात होते. स्लेजच्या खुणांवरून दोनच माणसं असावीत असा स्कॉटचा अंदाज होता. तीन मैलांवर अॅमंडसेनचा मार्ग पश्चिमेच्या दिशेने जातो आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला.
१७ जानेवारी १९१२ संध्याकाळी ६.०० वाजता कॅप्टन रॉबर्ट फॅल्कन स्कॉट दक्षिण धृवावर पोहोचला.
" दिवसभर अतिशय ढगाळ वातावरण होतं." विल्सन म्हणतो, " आम्हाला तिथे कोणताही मार्कर अथवा झेंडा आढळून आला नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे अॅमंडसेन धृवापासून तीन मैल दूरच असावा ! मात्रं दक्षिण धृवावर सर्वात प्रथम पोहोचल्याचा दावा तो निश्चितपणे करू शकतो यावर आमचं एकमत झालं ! त्याने या सगळ्या प्रकाराला शर्यतीचं स्वरुप आणलं आणि त्यात आम्हाला हरवलं ! परंतु आम्ही आमच्या मोहीमेचं लक्ष्यं गाठण्यात यशस्वी झालो आहोत !"
" या ठिकाणी पोहोचण्यासाठी घेतलेली मेहनत फळाला आली असली तरी नॉर्वेजियनांनी आमच्यावर मात केल्याचं शल्यं कायम राहील !" बॉवर्स म्हणतो, " पण आम्ही पारंपारीक ब्रिटीश पध्दतीने कोणत्याही प्राण्याच्या मदतीशिवाय स्वत:च्या पायांवर इथे पोहोचलो आहोत याचा मला अभिमान आहे !"
लॅरी ओएट्सला मात्रं स्लेज ओढत जाणं फारसं मंजूर नसावं. आपल्या डायरीत त्याने नोंद केली,
" आमच्या स्वतः स्लेज ओढत आणण्याच्या अट्टाहासापायीच आम्हाला इतका उशीर झाला आहे!"
' गिरे तो भी टांग उपर !' या ब्रिटीश मानसिकतेपुढे काय बोलणार ?
स्कॉटने मात्रं आपला पराभव प्रांजळपणे मान्य केला.
" दक्षिण धृव !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली. " गेल्या काही दिवसांतील खडतर प्रवासानंतरही सर्वप्रथम धृवावर पोहोचल्याचं श्रेय मिळू नये हे निराशाजनक होतं ! आता शक्य तितक्या लवकर परत जाऊन दक्षिण धृवावर पोहोचल्याची बातमी प्रथम सर्वांना देणं हेच आमच्या हाती शिल्लक आहे ! मात्रं त्यात कितपत यश येईल याची शंकाच आहे !"
अॅमंडसेन महिन्याभरापूर्वीच धृवावरुन परत फिरल्याची आणि झपाट्याने व्हेल्सच्या उपसागरात फ्रामहेमकडे जात असल्याची स्कॉटला कल्पना नव्हती.
१८ जानेवारीला सकाळी स्कॉटच्या तुकडीला आपण दक्षिण धृव पार करुन सुमारे तीन मैल पुढे आल्याचं ध्यानात आलं. त्यांनी इशान्येची वाट पकडली.
दोन मैल अंतरावर बॉवर्सच्या तीक्ष्ण नजरेला अॅमंडसेनचा तंबू दृष्टीस पडला !
पोलहेम !
तंबूत ठेवलेल्या कागदावरुन अॅमंडसेनच्या तुकडीतील पाचजणांची नावं स्कॉटला कळून आली.
रोनाल्ड अॅमंडसेन
ओलाव्ह ओलाव्हसन जालांड
हेल्मर हॅन्सन
स्वेर हॅसल
ऑस्कर विस्टींग
- १५ डिसेंबर १९११
पोलहेम इथे स्कॉट आणि इतर - १८ जानेवारी १९१२
अॅमंडसेनने दक्षिण धृवाच्या आपल्या प्रवासातील सर्व नोंदी फ्रामच्या बे ऑफ व्हेल्स इथल्या वास्तव्याला धरुन केल्या होत्या. त्याच्या कॅलेंडरनुसार तो १५ डिसेंबरला दक्षिण धृवावर पोलहेममध्ये पोहोचला असला, तरीही दक्षिण धृवाजवळ त्याने आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा ओलांडली होती. त्यामुळे स्कॉटच्या कॅलेंडरप्रमाणे अॅमंडसेन १६ डिसेंबरला दक्षिण धृवावर पोहोचला होता. आपल्या कॅलेंडरची त्याने तशी स्पष्ट नोंद करुन ठेवली होती.
" अॅमंडसेनचा तंबू उत्तम स्थितीत होता !" स्कॉटने आपलं मत नोंदवलं. " केवळ एकाच बांबूचा त्याला आधार आहे. वर नॉर्वेचा राष्ट्रध्वज फडकतो आहे !"
स्कॉटला नॉर्वेचा राजा ७ वा हकून याच्या नावाने लिहीलेलं अॅमंडसेनचं पत्रं मिळालं. स्कॉटला लिहीलेल्या चिठीत अॅमंडसेनने लिहीलं होतं,
" डियर कॅप्टन स्कॉट,
आमच्यानंतर सर्वप्रथम तुम्हीच इथे येऊन पोहोचाल अशी मला खात्री आहे. राजे हकून ७ वे यांच्या नावाने मी ठेवलेलं पत्रं त्यांना पोहोचवण्याची कृपया व्यवस्था करावी ! तंबूत ठेवलेल्या कोणत्याही सामग्रीचा तुम्हांला उपयोग असेल तर अवश्य करावा ! परतीच्या सुखरुप प्रवासासाठी शुभेच्छा !
रोनाल्ड अॅमंडसेन. "
विल्सनने तंबूतील सामग्रीची नोंद केली.
" अॅमंडसेनने ब-याच गोष्टी मागे ठेवल्या होत्या. रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेल्या स्लीपींग बॅग्ज आणि कपडे, मोजे, सेक्स्टंट, कृत्रीम क्षितीज, हिप्सोमीटर ( मी त्याचा स्पिरीटचा लँप घेतला आहे ) आणि इतर सामन !"
बॉवर्सने त्यातील रेनडीयरच्या कातड्यापासून बनवलेल मोजे उचलले. स्कॉटने आपण तिथे येऊन गेल्याची एका कागदावर नोंद करुन ठेवली.
कॅप्टन रॉबर्ट फॅल्कन स्कॉट
लेफ्टनंट लॉरेन्स ओएट्स
लेफ्टनंट हेनरी रॉबर्टसन बॉवर्स
एडवर्ड विल्सन
एडगर इव्हान्स
- १८ जानेवारी १९१२
सहा मैलांवर स्कॉटने एका बर्फाच्या उंचवट्यावर बांबूच्या आधाराने युनियन जॅक उभारला. बॉवर्सने अनेक फोटो काढले. कॅमे-याचं शटर रिलीज करण्यासाठी दोरीचा वापर करुन त्याने सर्वांचे एकत्रीत फोटो काढण्यात यश मिळवलं !
काही अंतरावर त्यांना अॅमंडसेनचा आणखीन एक झेंडा आढळला. सोबतच्या चिठीत नोंद होती,
" नॉर्वेजियन पोलहेम ८९'५९'' अंश दक्षिण अक्षवृत्तावर आहे - १५ डिसेंबर १९११, रोनाल्ड अॅमंडसेन. "
स्कॉटला आढळलेला तो झेंडा अॅमंडसेनने दक्षिण धृवाच्या चारही दिशांनी रोवलेल्या खुणेच्या झेंड्यांपैकी एक होता.
अॅमंडसेन महिनाभर आधी दक्षिण धृव गाठून परत फिरल्याची कल्पना आल्यावर स्कॉटची उरलीसुरली आशा धुळीस मिळाली.
विल्सन, बॉवर्स, इव्हान्स आणि स्कॉट, ऑएट्स ( खाली बसलेले ) - दक्षिण धृव - १८ जानेवारी १९१२
" नॉर्वेजियनांनी अतिशय पध्दतशीरपणे धृवावर मार्कींग केलं आहे !" स्कॉटने आपल्या डायरीत नोंद केली, " माझ्य अंदाजाप्रमाणे समुद्रसपाटीपासून दक्षिण धृव सुमारे ९५०० फूट उंचीवर आहे. नॉर्वेजियन १५ डिसेंबरला इथे पोहोचले असावे आणि १७ तारखेला परतले असावे. २२ डिसेंबर ही दक्षिण धृवावर पोहोचण्याची योग्य तारीख आहे असं मी मागेच लंडनमध्ये जाहीर केलं होतं. अॅमंडसेन त्यापूर्वीच इथून परतलेला आहे ! त्यांच्या अपेक्षेपेक्षा चांगलं हवामान मिळालं असावं असा माझा कयास आहे. आम्ही आता इथून परत निघत आहोत !"