स्कॉटकडे मोहीमेचं नेतृत्वं होतं. शॅकल्टन थर्ड ऑफीसर होता. ९ जानेवारी १९०२ ला ते केप आंद्रे इथे पोहोचले. बॉर्चग्रेवीन्कच्या शिल्लक असलेल्या सामग्रीचं निरीक्षण करुन त्यांनी दक्षिणेचा मार्ग पत्करला. केप क्रॉझीयरला मेसेज पॉईंटची उभारणा करुन त्यांनी पुन्हा दक्षिणेची दिशा पकडली आणि ३० जानेवारीला ते किंग एडवर्ड ७ लँडवर पोहोचले. जेम्स रॉसने या प्रदेशाचा ६० वर्षांपूर्वी वर्तवलेला अंदाज अचूक असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं !

४ फेब्रुवारीला स्कॉटने ग्रेट आईस बॅरीअरवर पदार्पण केलं. निरीक्षणासाठी खास आणलेल्या मोठ्या बलूनमधून स्कॉटने आकाशात ६०० फूट उंची गाठली ! दुस-या फेरीत शॅकल्टननेही आकाशसफर केली. दोघांच्याही दृष्टीस क्षितीजापर्यंत पसरलेला बॅरीअरचा बर्फाच्छादीत प्रदेश तेवढा दृष्टीस पडला !

८ फेब्रुवारीला त्यांनी परतून मॅकमुर्डो साऊंड मध्ये सोईस्कर ठिकाणी नांगर टाकला. साधनसामग्रीच्या सहाय्याने तिथे आटोपशीर झोपड्या उभारण्याचं काम सुरू झालं. स्कॉटने जहाजावरच मुक्काम करण्याचा निश्चय केला असला तरी झोपड्यांचा वापर सामान साठवण्यासाठी करण्याचा त्याचा विचार होता.

स्कॉटच्या तुकडीतील कोणालाही कुत्रे हाताळण्याचा आणि स्किईंगचा फारसा अनुभव नव्हता. सुरवातीचे काही दिवस कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यात अपयश आल्याने स्कॉटने स्लेजच्या मागे न लागता तुकडीतील सर्वांनी समप्रमाणात सामानाची वाहतूक करावी अशी सूचना केली. ११ मार्च रोजी केप क्रॉझीयरवरुन परतणा-या तुकडीला झंझावाती हिमवादळाचा ( ब्लिझर्ड ) सामना करावा लागला. या हिमवादळात दर्यावर्दी जॉर्ज व्हिन्सचा कड्यावरुन कोसळून मृत्यू झाला. व्हिन्सचा मृतदेह कधीच मिळाला नाही.

२ नोव्हेंबर १९०२ रोजी स्कॉट, शॅकल्टन आणि विल्सनने कुत्रे आणि सहाय्यक तुकड्यांसह दक्षिणेच्या दिशेने कूच केलं. ११ नोव्हेंबरला त्यांनी बॉर्चग्रेवीन्कचा ७८ अंश दक्षिण अक्षवृत्ताचा विक्रम मोडला. मात्रं त्यांची वाटचाल खूपच धीमेपणाने सुरु होती. बरोबर घेतलेल्या कुत्र्यांना पुरेसं खाणं न मिळाल्यामुळे ते दिवसेदिवस अशक्त होत होते. अखेर निरुपायाने विल्सनला सर्वात अशक्त कुत्र्याला मारुन त्याचं मांस इतर कुत्र्यांना खाऊ घालावं लागत होतं. ३० डिसेंबरला ते ८२'१७'' अंश दक्षिण अक्षवृत्तावर पोहोचले, परंतु पुढे जाणं अशक्यं झाल्याने त्यांनी परतीचा निर्णय घेतला. परतीच्या मार्गावर काही वेळा शॅकल्टनला स्लेजवरुन ओढून आणावं लागलं होतं. ३ फेब्रुवारी १९०३ ला ते आपल्या बोटीवर परतले.

न्यूझीलंडहून आवश्यक साधनसामग्रीसह आलेल्या मॉर्नींग या जहाजावरुन शॅकल्टन इंग्लंडला परतला. स्कॉटने आणखीन एक वर्ष अंटार्क्टीकामध्ये घालवण्याचा निर्णय घेतला होता. चुंबकीय दक्षिण धृवाच्या शोधात गेलेली स्कॉटची मोहीम तिथे पोहोचण्यात अयशस्वी झाली असली, तरीही त्यांना धृवीय पठाराचा शोध लागला होता. १० सप्टेंबर १९०४ रोजी स्कॉट लंडनला परतला.

स्कॉटच्या मोहीमेबरोबरच जर्मन, स्वीडीश आणि स्कॉटीश मोहीमाही अंटार्क्टीकावर होत्या, परंतु कोणालाही स्कॉटच्या ८२'१७'' अंश दक्षिणेच्या विक्रमापर्यंत पोहोचता आलं नाही. १९०३-१९०५ दरम्यानच्या फ्रेंच मोहीमेलाही ७४ अंश दक्षिणेपलीकडे मजल मारता आली नाही.

डिस्कव्हरी मोहीमेतून परत फिरावं लागल्याने एर्नेस्ट शॅकल्टन नाराज होता. डिस्कव्हरी मोहीमेचा वृत्तांत लिहीताना स्कॉटने शॅकल्टनच्या शारिरीक क्षमतेविषयी शंका उपस्थीत केली होती. यामुळे जिद्दीला पेटलेल्या शॅकल्टनने १९०७ मध्ये अंटार्क्टीकाच्या मोहीमेवर जाण्याची घोषणा केली !

डिस्कव्हरी मोहीमेप्रमाणेच मॅकमुर्डो साऊंड इथे मुक्काम करुन दक्षिण धृवाच्या दिशेने आणि चुंबकीय दक्षिण धृव गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची शॅकल्टनची योजना होती, परंतु या योजनेचा वास लागताच स्कॉटने त्यात पहिला खोडा घातला. मॅकमुर्डो साऊंडचा प्रदेश हा आपला स्वामित्वहक्काचा प्रदेश आहे आणि शॅकल्टनने त्यात प्रवेश करु नये असं स्कॉटने त्याला लिहीलेल्या पत्रात बजावलं. तसाच दावा त्याने रॉस बेट आणि व्हिक्टोरिया लँडवरही केला. वास्तवीक स्कॉटच्या या दमदाटीला काहीही व्यावहारीक अर्थ नव्हता. स्कॉट आणि विल्सनने आणलेल्या दडपणामुळे शॅकल्टनने मॅकमुर्डो साऊंडमध्ये न उतरण्याचं वरकरणी मान्यं केलं, तरीही प्रत्यक्षात मात्रं स्कॉटच्या सूचनेला त्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या !

निम्रॉड या जहाजाने ११ ऑगस्ट १९०७ रोजी लंडनचा किनारा सोडला. काही कामानिमीत्त मागे राहीलेल्या शॅकल्टनने काही दिवसांनी प्रस्थान केलं. १ जानेवारी १९०८ रोजी निम्रॉडने न्यूझीलंड सोडलं.

२३ जानेवारीला शॅकल्टन ग्रेट आईस बॅरीयरजवळ पोहोचला. परंतु डिस्कव्हरी मोहीमेत दिसलेली अंतर्भागाच्या दिशेने जाणारी पाण्याची चिंचोळी खाडी गायब झाली होती. शॅकल्टन किंग एडवर्ड ७ लॅंडकडे वळला, परंतु तिथे उतरणं त्याला अशक्यं झालं. आता दोनच मार्ग उरले होते. एक म्हणजे इंग्लंडला परतणं किंवा स्कॉटचा दबाव झुगारुन मॅकमुर्डो साऊंडकडे जाणं ! शॅकल्टनने दुसरा मार्ग पत्करला.

२९ जानेवारीला निम्रॉड मॅकमुर्डो साऊंडमध्ये पोहोचलं. परंतु डिस्कव्हरी मोहीमेतील पूर्वीच्या जागी जाण्याचा मार्ग गोठलेल्या बर्फामुळे बंद झाला होता. बर्फ वितळण्याची वाट पाहत ते तीन आठवडे तिथे थांबले, परंतु बर्फ वितळण्याची चिन्हं दिसेनात. अखेरिस ३ फेब्रुवारीला शॅकल्टनने केप रॉयड्स इथे उतरण्याचा निर्णय घेतला. सर्व सामान उतरवून आवश्यक त्या झोपड्या उभारण्यास २२ फेब्रुवारी उजाडला होता. मॅकमुर्डो साऊंड इथून २० मैलांवर होतं. समुद्रावर बर्फ गोठल्यावर त्यावरुन ग्रेट आईस बॅरीअर गाठण्याचा शॅकल्टनचा विचार होता.

शॅकल्टनच्या अपेक्षेप्रमाणे ग्रेट आईस बॅरीअर ( रॉस आईस शेल्फ ) वर जाण्यासाठी गोठलेल्या बर्फावरुन मार्ग नव्हता. उलट आता बर्फ वितळण्यास सुरवात झाल्याने मॅकमुर्डो साऊंडच्या दिशेने जाण्याचा मार्गच खुंटला होता ! निराश न होता, शॅकल्टनने माऊंट इरेबसवर चढाई करण्याचा निर्णय घेतला !


माऊंट इरेबस

डिस्कव्हरी मोहीमेत फ्रँक विल्ड आणि एर्नेस्ट जॉईस यांनी इरेबसचा पायथा गाठला होता, परंतु यावेळी त्यांचा या मोहीमेत समावेश नव्हता. या मोहीमेतील मुख्य गिर्यारोहक होते एजवर्थ डेव्हीड, डग्लस मॅसन आणि अ‍ॅलीस्टर मॅक्के ! एरिक मार्शल, जेमसन बॉईड अ‍ॅडम्स आणि फिलीप ब्रॉकेलहर्स्ट त्यांना सहाय्यक भूमीकेत होते. ५ मार्च रोजी तांने चढाईला सुरवात केली. ही मोहीम संपूर्णपणे यशस्वी झाली. इरेबस वरील जागृत असलेल्या ज्वालामुखीच्या क्रेटरपर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आलं. ११ मार्च रोजी ते केप रॉयड्सला परतले.

१९०८ च्या हिवाळ्यात सर्वजण दक्षिणेच्या मोहीमेच्या दृष्टीने तयारीत गुंतले होते. डिस्कव्हरी मोहीमेतील अनुभवावरुन शॅकल्टनने कुत्र्यांच्या सहाय्याने प्रवास करण्याऐवजी घोडे वापरण्याचा निर्णय घेतला होता. मात्रं ज्वालामुखीच्या उद्रेकातून उडणा-या राखेचा आणि वाळूचा प्रादुर्भाव झाल्याने हिवाळ्याअखेरीस चार घोडे मरण पावले होते ! केवळ चारच घोडे शिल्लक असल्याने शॅकल्टनने आपल्याबरोबर तीन सहका-यांना नेण्याचा निर्णय घेतला. मार्शल, अ‍ॅडम्स आणि विल्ड ! अनुभवी जॉईसला त्याच्या शारिरीक क्षमतेविषयी शंका निर्माण झाल्याने वगळण्यात आलं.

२९ ऑक्टोबर १९०८ ला दक्षिणेच्या प्रवासाला सुरवात झाली. शॅकल्टनने दक्षिण धृवापर्यंत पोहोचून परतीचा प्रवास सुमारे १७२० मैल ( २७७० कि.मी. ) असेल या हिशोबाने तीन महिन्यांची शिधासामग्री बरोबर घेतली होती. दिवसाला १८ मैलाची मजल मारण्याचा त्याचा इरादा होता, परंतु प्रतिकूल हवामान आणि घोड्यांचा हळू वेग, यामुळे त्यांची वाटचाल मंदावली. शॅकल्टनने असलेल्या सामग्रीच्या आधारे ११० दिवस मजल मारण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यासाठी दिवसाला फक्त १५ मैल अंतर कापणं शक्यं होणार होतं. ९ ते २१ नोव्हेंबरच्या दरम्यान त्यांनी चांगली प्रगती केली, परंतु चारपैकी एका घोड्याचा बळी गेला !

२६ नोव्हेंबरला त्यांनी ८२ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. डिस्कव्हरी मोहीमेत स्कॉटने प्रस्थापीत केलेला विक्रम मोडून त्यांनी आता अज्ञात भूभागात प्रवेश केला होता !

ग्रेट बॅरीअरचा पृष्ठभाग आता वाटचालीस कठीण होत चालला होता. जागोजागी बर्फात मध्येच पडलेली मोठी भगदाडं दृष्टीस पडत होती. उरलेल्या तीनपैकी आणखी दोन घोड्यांनी मान टाकली होती. पश्चिमची पर्वतराजी दक्षिणेकडे वळून त्यांचा मार्ग आडवून समोर उभी ठाकली होती. या पर्वतराजीवर चढाई करून शॅकल्टनने पलीकडे नजर टाकली आणि त्याला एक अद्भुत दृष्य दिसलं.

एकमेकांना समांतर असलेल्या दोन पर्वतरांगांच्या मध्ये पार क्षितीजापर्यंत॑ पसरलेलं ग्लेशीयर !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel