३० जानेवारी १८२० या दिवशी स्मिथ आणि एडवर्ड ब्रॅन्सफिल्ड यांनी अंटार्क्टीकाच्या उत्तरेकडील बेटांची प्रथम नोंद केली. ब्रॅन्सफिल्डच्या नोंदीनुसार त्याला दोन बर्फाच्छादीत शिखरं आढळून आली होती. दोनच दिवसांपूर्वी २८ जानेवारीला रशियन दर्यावर्दी वॉन बेलींग्सहौसनने याच भूभागाच्या पूर्व किना-याचं दर्शन घेतलं होतं. प्रिन्सेस मार्था बेटांपासून अवघ्या वीस मैलांपर्यंत पोहोचलेल्या बेलींग्सहौसनने ६९'२१'' अंश दक्षिण अक्षवृत्त आणि २'१४'' अंश पश्चिम रेखावृत्तावर आढळलेल्या बर्फाच्छादीत कड्यांची ( आईस शेल्फ ) नोंद केली.

१८२० च्या ऑक्टोबर महिन्यात अमेरिकन दर्यावर्दी नॅथन पामरने अंटार्क्टीकाच्या मुख्य भूभागावर असलेल्या प्रदेशाचा शोध लावला !

१८२३ मध्ये ब्रिटीश दर्यावर्दी जेम्स वॅडेलने दक्षिणेच्या सागरात प्रवेश केला. २० फ्रेब्रुवारी १८२३ रोजी वॅडेलने आपल्या जेन या जहाजातून ७४'१५'' अंश दक्षिण अक्षवृत्त गाठलं ! अंटार्क्टीकाच्या या सागराला अर्थातच नाव पडलं ते म्हणजे वॅडेल समुद्र !


१८३०-३३ च्या मोहीमेत ब्रिटीश दर्यावर्दी जॉन बिस्को याने उत्तर अंटार्क्टीकमधील भूभागाचा शोध लावला. ग्रॅहम लॅंड, बिस्को बेटं, क्वीन अ‍ॅडलेड बेटं या सर्वांचा त्याने ब्रिटीश साम्राज्यात समावेश करुन घेतला !

१८३९ मध्ये फ्रेंच मोहीमेतील ज्यूल्स ड्युमाँटने अंटार्क्टीकाच्या पश्चिम किना-यावर असलेल्या अ‍ॅडल लँडचा शोध लावला. अंटार्क्टीकाच्या पश्चिम किना-यापासून अवघ्या ४ मैलांवर असलेल्या बेटांवर त्याने पाय ठेवला.

१८४१ मध्ये ब्रिटीश दर्यावर्दी जेम्स रॉसने रॉस समुद्र आणि व्हिक्टोरिया लॅंडचा शोध लावला. अंटार्क्टीकाच्या मुख्य भूमीवर आढळलेल्या दोन ज्वालामुखीच्या पर्वतशिखरांचं त्याने आपल्या जहाजांवरुन माऊंट इरेबस आणि माऊंट टेरर असं नामकरण केलं. दक्षिणेच्या दिशेने बर्फाळ कड्यांच्या ( आईस शेल्फ ) त्याने सुमारे २५० मैल अंतर कापलं. या आईस शेल्फचं पुढे रॉस आईस शेल्फ असं नामकरण करण्यात आलं. रॉस बेटाच्या पूर्वेला असलेल्या स्नो हिल आणि सेमूर बेटांचाही त्याने शोध लावला. आपल्या मोहीमेत त्याने ७८'१०'' अंश दक्षिण अक्षवृत्तापर्यंत मजल मारली होती !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel