सुदैवाने अॅव्हलाँच मुळे आलेला बर्फाचा लोंढा त्यांच्या तंबूच्या दिशेने न येता क्रिस्तोफर्सनच्या धारेवरुन विरुध्द दिशेने खाली झेपावला होता. अखेरीस २१ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता त्यांनी समुद्रसपाटीपासून १०९२० फूट उंचीवर अॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरच्या माथ्यावरील पठार गाठलं ! ८५'३६'' दक्षिण !
आता एक अत्यंत अप्रिय काम करण्याची वेळ येऊन ठेपली होती !
आतापर्यंत साथ दिलेल्या ४२ पैकी २४ इमानी कुत्र्यांची हत्या !
हत्या करण्यासाठी कुत्र्यांची निवड करण्याचं काम अॅमंडसनने स्लेज चालवणा-यांवर सोडलं होतं. प्रत्येकाने आपापल्या कुत्र्यांपैकी बळींची निवड केली. अॅमंडसेनने तंबूत शिरुन घाईने स्टोव्ह पेटवण्यास सुरवात केली. तो म्हणतो,
" स्टोव्हच्या आवाजात मला बंदू़कीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू येऊ नये अशी इच्छा होती. काही वेळातच पहीला आवाज माझ्या कानावर आल. मग एकामागोमाग एक असे चोवीस गोळ्यांचे आवाज आले ! आतापर्यंत आम्हांला साथ देणा-या इमानी प्राण्यांचे जीव घेणं नकोसं वाटत असलं, तरी दक्षिण धृव गाठण्यासाठी आमच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. रात्री आम्ही सर्वजण विमनस्क मनस्थीतीत होतो. आमच्या कुत्र्यांचा आम्हांला खूप लळा लागला होता !"
अर्थात काहीही झालं तरीही दक्षिण धृवावर पोहोचण्याचं उद्दीष्ट गाठण्याच्या त्यांच्या योजनेत कोणताही बदल होणार नव्हता !
कुत्र्याच्या मांसाचे योग्य प्रमाणात तुकडे कापून बरोबर घेण्याचं काम विस्टींगने सफाईदारपणे पार पाडलं. त्या जागेला त्यांनी यथार्थ नाव दिलं...
बुचर्स शॉप ! खाटीकखाना !
दरम्यान आपल्या एक टन डेपोमधून स्कॉटने १५ नोव्हेंबरच्या रात्रीच पुढे कूच केलं होतं. घोड्यांच्या सहाय्याने त्याची प्रगती सुरु होती. मात्रं बर्फावर पावलं टाकताना काही ठिकाणी घोड्यांना फार कष्टं पडत होते. एका घोड्याविषयी स्कॉटला विशेष काळजी वाटत होती. मात्रं तरीही त्याची आगेकूच सुरुच होती. अॅमंडसेनच्या तुकडीप्रमाणेच मांसासाठी घोड्यांची हत्या करण्याची स्कॉटची योजना होती.
२१ नोव्हेंबरला स्कॉटने ८०'३२'' अक्षवृत्तावर असलेला कँप गाठला. मोटरस्लेज पार्टी त्यांची वाट पाहत तिथे थांबली होती. इव्हान्स, लॅशी, डे आणि हूपर १५ नोव्हेंबरलाच तिथे पोहोचले होते. गेले सहा दिवस ते स्कॉट आणि इतरांची वाट पाहत तिथे थांबलेले होते. पूर्वी ठरलेल्या बेताप्रमाणे या कँपपासून मोटरस्लेज पार्टी परत फिरणार होती. मोटरस्लेज पार्टीबरोबरच कुत्रेही परत फिरणार होते. परतीच्या वाटेवर डेपो कँप्समध्ये साधनसामग्री भरुन ठेवण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग होणार होता.
आतापर्यंतच्या धीम्या प्रगतीने काळजीत पडलेल्या स्कॉटने आता आपला बेत बदलला आणि मोटरस्लेज पार्टी आणि कुत्रे पुढे नेण्याचा बेत केला. त्याच्या नवीन योजनेनुसार आता आणखीन तीन दिवस पुढे वाटचाल केल्यावर डे आणि हूपर केप इव्हान्सला परत फिरणार होते.
स्कॉट आणि इतरांनी पुढचा मार्ग पकडला. स्कॉटच्या घोड्यांपैकी एक अगदीच रोडावला होता. लवकरच कुत्र्यांना आणि माणसांना मांसासाठी त्याचा बळी जाणार हे उघड होतं. परंतु अॅटकिन्सन आणि ओएट्स काहीही झालं तरी शॅकल्टनने जिथे अन्नासाठी आपला पहिला घोडा मारला, त्या जागेपार त्याला घेऊन जाण्यावर ठाम होते ! शॅकल्टनवर मात करण्यासाठी तसं करणं त्यांना आवश्यंक वाटत होतं !
२३ नोव्हेंबरला स्कॉटने ८१ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. २४ नोव्हेंबरला पूर्वी ठरल्याप्रमाणे डे आणि हूपरने परतीची वाट पकडली. पूर्वीच्या बेतातील हा बदल स्कॉटने त्यांच्यामार्फत केप इव्हान्सला असलेल्या सिम्पसनला कळवण्याची व्यवस्था केली. परंतु ते दोघं परतण्यापूर्वी स्कॉटला आपल्या घोड्यांपैकी सर्वात दुबळ्या घोड्याला गोळी घालावी लागली !
२१ नोव्हेंबरला बुचर्स शॉपवर येऊन पोहोचलेल्या अॅमंडसेनच्या तुकडीची लवकरात लवकर पुढे निघण्याची इच्छा होती. आतापर्यंत साथ दिलेल्या २४ इमानी साथीदारांची हत्या करावी लागल्यामुळे कँपमध्ये एक प्रकारची खिन्नता पसरलेली होती. पुढे निघण्यासाठी सर्वांची तयारी पूर्ण झाली होती. कुत्र्यांच्या मांसाचे आवश्यक त्या प्रमाणात तुकडे करुन स्लेजवर लादण्यात आलेले होते. परंतु बुचर्स शॉपवर त्यांना आणखीन काही काळ थांबावं लागणार होतं ! २२ नोव्हेंबरच्या पहाटे हिमवादळाला सुरवात झाली !
हिमवादळाचा जोर लवकर ओसरण्याची चिन्हं दिसेनात ! निरुपायाने त्या दिवशी निघण्याचा बेत त्यांना रहित करावा लागला. पुढचे तीन दिवस वादळाचा जोर कायम होता. मात्रं आणखीन वाट पाहण्याची अॅमंडसेनची तयारी नव्हती. २५ नोव्हेंबरला भर वादळात आणि धुक्यात बुचर्स शॉप सोडून त्यांनी पुढचा मार्ग सुधरला !
दक्षिण दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. मात्रं धुक्यामुळे दृष्यमानता जेमतेम काही फूटच होती ! काही अंतर प्रवास केल्यावर पायाखालची वाट उताराला लागल्याचं अॅमंडसेनला जाणवलं. मात्रं तरीही न थांबता पुढे जाण्याचा त्याने निर्णय घेतला. २७ नोव्हेंबरला कँपवर थांबल्यावर अॅमंडसेनने समुद्रसपाटीपासूनची उंची तपासून पाहताच त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
९४७५ फूट !
अॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयर गाठल्यावर धृवीय पठारापर्यंत समुद्रसपाटीपासून उंची वाढत जाईल, किमानपक्षी कायम राहील अशी अॅमंडसेनची अपेक्षा होती. प्रत्यक्षात दोन दिवसात सुमारे १४४५ फूट खाली उतरल्यामुळे तो गोंधळात पडला होता. आणखीन पुढे जाण्याचा आपला बेत रहित करुन त्याने तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. ८६ अंश दक्षिण !
२८ नोव्हेंबरला अॅमंडसेनने पुढची वाट पकडली. अद्यापही धुकं पसरलेलं होतंच ! काही मिनीटांकरता धुक्याचा पडदा दूर झाल्यावर उजव्या हाताला सुमारे मैलभर अंतरावर दोन पर्वतशिखरं त्याच्या दृष्टीस पडली ! या शिखरांना हॅन्सनचं नाव देण्यात आलं. त्या पर्वतशिखरांच्या दिशेने जाणं अशक्यंच होतं. धुकं निवळेपर्यंत वाट पाहण्याची कल्पना अॅमंडसेनच्या मनाला चाटून गेली, परंतु किती वेळ थांबावं लागेल याचा काहीच अंदाज बांधता येईना. अखेरीस दक्षिणेच्या दिशेने पुढे जाण्याचा त्याने बेत केला.
काही अंतर गेल्यावर बर्फात लपलेल्या कपारी नजरेस पडताच अॅमंड्सेनला आपण ग्लेशीयरच्या मार्गावर असल्याची कल्पना आली. मात्रं धुक्यात कपारीत जाण्याची त्याची इच्छा नव्हती. वातावरण निवळेपर्यंत परतीच्या प्रवासासाठी सामग्रीचा डेपो उभारण्याचा त्याने निर्णय घेतला. ८६'२३'' अंश दक्षिण !
अॅमंडसेनला बुचर्स शॉपवर रोखून धरणा-या हिमवादळाचा शॅकल्टनच्या मार्गाने दक्षिणेकडे सरकणा-या स्कॉटच्या मोहीमेलाही प्रसाद मिळाला होता. मात्रं त्या परिसरात हिमवादळाची तीव्रता इतकी नसल्याने, स्कॉटवर वाटेत थांबण्याची वेळ अद्याप आलेली नव्हती. मात्रं बर्फावरुन मार्गक्रमणा करणं घोड्यांना कठीण होत असल्याचं त्याच्या ध्यानात आलेलं होतं. मात्रं त्या परिस्थितीतही उरलेल्या घोड्यांसह त्याची आगेकूच सुरुच होती. २८ नोव्हेंबरला स्कॉटने ८२ अंश दक्षिण अक्षवृत्तावरील आपला कँप गाठला.
बिअर्डमूर ग्लेशीयरपासून स्कॉटची तुकडी अद्याप ९० मैलांवर होती. त्या दिवशी स्कॉटने आपल्या दुस-या घोड्याला गोळी घातली. त्याच्याजवळ अद्यापही चार घोडे शिल्लक होते. त्या ठिकाणी हवेचा दाब अतिशय कमी असल्याचं बॉवर्सच्या ध्यानात आलं होतं. हा निश्चीतच हिमवादळाचा परिणाम होता.
२८ नोव्हेंबरला अॅमंडसेनने आपला ८६'२३'' अक्षवृत्तावरील डेपो सोडला आणि पुढची वाट धरली. वाटेत आढळलेल्या अनेक पर्वतशिखरांना अॅमंडसेनने आपल्या सहका-यांपैकी हॅन्सन, विस्टींग, हॅसल, जालांड, निल्सन यांची नावं दिली. ग्लेशीयरवरुन पुढील वाटचाल करणं मात्रं अधिकाधीक कठीण होत चाललं होतं. पृष्ठभागावरील बर्फाच्या पातळ आवरणाखाली दडलेल्या धडकी भरवणा-या कपारी टाळून सावधपणे त्यांची वाटचाल सुरु होती. मात्रं एका ठिकाणी कपारींचं असं काही उभं-आडवं जाळं पसरलेलं होतं, की पुढची वाटचाल अशक्यंच झाली होती ! अॅमंडसेन म्हणतो,
" त्या ठिकाणी असलेल्या कपारी इतक्या अक्राळविक्राळ होत्या, की आमच्यासारख्या कित्येक मोहीमांमधील माणसं आणि जनावरांचा त्यांत मागमूसही लागला नसता !"
कपारींच्या त्या जंजाळातून मार्ग शोधण्यासाठी अॅमंडसेन आणि हॅन्सन पाहणीच्या उद्देशाने पुढे निघाले. एक बर्फाचा पूल पार करुन त्यांनी एका लहानश्या धारेवर चढाई केली. या धारेवर चढाई करताना अॅमंडसेनने सहजच दोन्ही बाजूला नजर टाकली आणि तो हादरुन जागच्या जागी स्तब्ध झाला.
धारेच्या दोन्ही बाजूला भल्या मोठ्या कपारी आSS वासून उभ्या होत्या !
धारेवरुन चालताना एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर त्या कपारीत गच्छंती होणं अटळ होतं ! भरीत भर म्हणूत त्या धारेच्या माथ्यावरुन खाली उतरण्याच्या मार्गावर आणखीन एक भलीमोठी कपार स्वागताला हजर होती ! दक्षिणेकडे जाण्याचा तो एकमेव मार्ग असल्याने त्याच मार्गाने पुढे जाण्याला पर्याय नव्हता ! कपारींच्या या खतरनाक जाळ्याला अॅमंडसेनने यथार्थ नाव दिलं..
डेव्हील्स ग्लेशीयर गार्डन ! सैतानाचा बगीचा !
डेव्हील्स ग्लेशीयर गार्डन
परत येताना अॅमंडसेनचं एका विशीष्ट जागेने लक्षं वेधून घेतलं. सुमारे वीस फूट उंचीच्या एका लांबलचक बर्फाच्या धारेमध्ये सुमारे सहा फूट रुंदीचा भाग कापून काढल्यासासखा निघाला होता. एखाद्या भिंतीत दार करावं असं ते दृष्यं दिसत होतं. तिथून पलीकडे नजर टाकताच अथांग पसरलेलं ग्लेशीयर दृष्टीस पडत होतं. अॅमंडसेनने त्याला नाव दिलं हेल्स गेट ! अॅमंडसेन म्हणतो,
" दक्षिण धृवाकडे जाणारा आमचा मार्ग हा एखाद्या अद्भुतरम्य रहस्यमय कादंबरीप्रमाणे होता. पूर्वी कोणीही कधीच या मार्गाने दक्षिणेकडे गेलेलं नव्हतं, त्यामुळे रोज रात्री झोपताना पुढच्या वाटेवर काय वाढून ठेवलेलं आहे असा विचार आमच्या मनात येत असे !"
२९ नोव्हेंबरला अॅमंडसेनच्या तुकडीने सावधपणे मार्गक्रमणा करत हेल्स गेट मधून डेव्हील्स गार्डन मध्ये प्रवेश केला ! एकेक पाऊल सावधपणे टाकत आणि काळजीपूर्वक स्लेज हाकारत त्यांनी तो प्रदेश अखेरीस पार केला. मात्रं त्यासाठी त्यांना कित्येकदा वेडीवाकडी वळणं घ्यावी लागली होती. अॅमंडसेन म्हणतो,
" डेव्हील्स गार्डन पार केल्यावर आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला खरा, परंतु धृवावर पोहोचून याच मार्गाने फ्रामहेमवर परतायच्या कल्पनेनेच माझ्या पोटात गोळा आला होता !"
३० नोव्हेंबरला अॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरवरुन वाटचाल करता अॅमंडसेनची तुकडी बर्फाच्या टेकड्या आणि त्यांना लागूनच असलेल्या खोल द-या अश्या परिसरात येऊन पोहोचली. या प्रदेशातून मार्ग काढणं अतिशय जिकीरीचं होतं. कित्येकदा वेगवेगळ्या दिशांनी मार्ग काढण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ होत होते. अखेरीस एका टेकडीवरुन जाणारा बर्फाचा पूल त्यांना आढळला. एकावेळी जेमतेम एक स्लेज जाऊ शकेल इतक्याच रुंदीचा तो पूल होता ! दोन्ही बाजूला खोल द-या पसरलेल्या होत्या. अॅमंडसेन म्हणतो,
" एखाद्या सुरीच्या धारेवर चालावं अशी तिथून जाताना आमची अवस्था झाली होती. या पूलावरुन जाताना नायगारा धबधब्यावरुन दोरवरुन चालत जाणा-यांची आम्हांला आठवण होत होती ! आम्हांला कोणाला उंचीचं भय नव्हतं हे आमचं सुदैवंच !"
हा बर्फाचा पूल विरुध्द बाजूला एका भल्यामोठ्या दरीत उतरत होता ! या दरीच्या दोन्ही बाजूला बर्फाच्या भिंती होत्या ! या भिंतींवर चढून दक्षिणेकडे जाण्याची दिशा पकडण्याचे सर्व प्रयत्नं व्यर्थ ठरले होते ! दरीच्या तळाशी असलेल्या बर्फावरुनच वाटचाल करण्यापलीकडे त्यांच्यासमोर मार्ग उरला नव्हता. अर्थात या मार्गाने वाटचाल करताना अनेक कपारी त्यांच्या वाटेत आडव्या येत होत्याच !
बर्फाच्या त्या दरीतून वाटचाल करत ते पूर्व-पश्चिम पसरलेल्या पर्वताच्या धारेवर पोहोचले. पूर्वेच्या दिशेने सुमारे १०० फूट सरळसोट तुटलेला कडा होता ! पश्चिमेच्या दिशेने मात्रं उताराची तीव्रता बरीच कमी होती. सावधपणे उतरत अखेरीस ते ग्लेशीयरच्या मोकळ्या पृष्ठभागावर पोहोचले ! पुन्हा दक्षिणेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली !
काही वेळाने ते ग्लेशीयरच्या तिस-या भागात असलेल्या घुमटाकार टेकड्यांपाशी पोहोचले. या टेकड्यांच्या माथ्यावरुन पुढील प्रदेशाचं निरीक्षण केल्यावर तिथेही अनेक कपारी असल्याचं अॅमंडसेनला आढळलं. सुदैवाने या सर्व कपारी बर्फाने पूर्ण भरलेल्या असल्याने त्या ओलांडून पलीकडे जाणं सहज शक्यं होतं !
स्कॉटच्या तुकडीतील माणसांनी पूर्वी ठरल्याप्रमाणे स्लेज ओढून नेण्यास सुरवात केली होती. स्कॉटच्या योजनेनुसार बिअर्डमूर ग्लेशीयरच्या पायथ्यापर्यंत पोहोचल्यावर घोड्यांची हत्या करुन त्यांचं मांस बरोबर घेऊन माणसांनी स्लेज ओढत पुढची मजल मारायची होती. परंतु एकंदर प्रवासाचा अनुभव पाहता, बिअर्डमूर ग्लेशीयरच्या ब-याच आधी माणसांनी स्लेज ओढण्यास सुरवात केली होती ! १ डिसेंबरला स्कॉटने आपल्या तिस-या घोड्याला गोळी घातली. 'नोबी' या एकमेव घोड्याचा अपवाद वगळता इतर सर्व घोडेही आता थकल्याचं स्कॉटच्या ध्यानात आलं होतं.
अॅमंडसेनप्रमाणेच स्कॉटनेही आजूबाजूला आढळलेल्या अनेक पर्वतशिखरांना आपल्या हितचिंतकांची नावं देण्याचा सपाटा लावला होता. १९०३-०४ च्या डिस्कव्हरी मोहीमेत त्याने रॉस आईस शेल्फच्या पूर्वेला असलेल्या एका उत्तुंग पर्वतराजीला क्लेमंट्स मार्कहॅमचं नाव दिलं होतंच ! त्याच रांगेतील वेगळ्या एका पर्वताला त्याने माऊंट लाँगस्टाफचं नाव दिलं !
माऊंट क्लेमंट्स मार्कहॅम
१ डिसेंबरला स्कॉटने ८२'४७'' दक्षिण अक्षवृत्तावर डेपो कँप उभारला. त्या दिवशी रात्री पुढे मजल मारताना त्याने नोबी या घोड्याला बर्फापासून वाचवण्यासाठी खास बनवण्यात आलेले 'स्नो शूज' घालण्याची सूचना दिली. याचा योग्य तो परिणाम तत्काळ दिसून आला ! स्नो शूज घातल्याने नोबीची प्रगती झपाट्याने होत होती. स्कॉटने इतरही घोड्यांसाठी स्नो शूज बनवून घेतले होते, परंतु घोड्यांची जबाबदारी असलेल्या ओएट्सला त्या स्नो शूजबद्दल साशंकता होती, त्यामुळे त्याने ते स्नो शूज हट पॉईंटलाच ठेबले होते ! स्कॉट म्हणतो,
" स्नो शूज घातल्यावर नोबीची झालेली प्रगती पाहिल्यावर आम्हाला आमची चूक उमगली. हट पॉईंटपासूनच स्नो शूज घातले असते, तर घोड्यांची प्रगती मंदावली नसती !"
२ डिसेंबरला स्कॉटने ८३ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं. मात्रं वाटेत घोडे बर्फात सतत रुतत असल्याचं त्याच्या ध्यानात आलं होतं. डे आणि हूपर परतल्यावरही अद्याप स्कॉटच्या तुकडीत स्वतः स्कॉट, विल्सन, ओएट्स, कोहेन, बॉवर्स, क्रेन, चेरी-गॅराड, टेडी इव्हान्स, एडगर इव्हान्स, अॅटकिन्सन, राईट आणि लॅशी असे एकूण बाराजण होते. त्याखेरीज मेअर्स आणि डिमीट्री कुत्र्यांची तुकडी सांभाळत होते स्कॉटचा चौथा घोडा मांसासाठी गोळीला बळी पडला.
डेव्हील्स ग्लेशीयर गार्डनचा परिसर ओलांडून चांगल्या प्रदेशात पोहोचल्याचं अॅमंडसेनचं समाधान जेमतेम एक दिवस टिकलं ! १ डिसेंबरला पुढच्या प्रवासात त्याचं स्वागत केलं ते बर्फाच्या कपारींनी !
दुरुन पाहताना या कपारी बर्फाने भरलेल्या व अत्यंत निरुपद्रवी वाटत असत, परंतु जवळ पोहोचल्यावर त्यांचं फसवं रुप समोर येत असे. या कपारींत असलेला बर्फ गोठून टणक न बनता भुसभुशीतच राहीला होता. त्यामुळे त्यावरुन मार्ग काढणं हे महाकर्मकठीण होतं. स्लेजसह कपारीत उतरणं सोपं असलं, तरी दुस-या बाजूने बाहेर पडणं हे महाकर्मकठीण होतं ! त्यातच वा-याचा जोर आता वाढत होता. कपारींच्या त्या धोकादायक प्रदेशातून पार झाल्यावर अॅमंडसेनने डेपो कँप उभारण्याचा निर्णय घेतला. समुद्रसपाटीपासून ते ९७८० फूट उंचावर होते. ८६'४७'' दक्षिण !
४ डिसेंबरला अखेर एकदाचं दक्षिण धृवीय पठार आलं आणि पर्वतांचा आणि कपारींचा प्रदेश संपला म्हणून अॅमंडसेनच्या तुकडीला हायसं वाटतं आहे तोच एक पर्वताची धार दत्त म्हणून त्यांच्यासमोर उभी राहीली !
एक मोठी दरी पार करुन अॅमंडसेनने या पर्वतधारेचा पायथा गाठला. या पर्वतधारेत अनेक बर्फाळ टेकड्या आणि फसवे उंचवटे होते. ही धार पार करताना अतिशय सावधगिरी बाळगावी लागणार होती !
या पर्वतधारेचा परिसर अनेक धोकादायक आणि फसव्या कपारींनी भरलेला होता. अशाच एका कपारीवरुन जाताना विस्टींगची स्लेज भुसभुशीत बर्फात भस्सदिशी रुतली ! सुदैवाने हॅसलच्या मदतीने कोणतंही नुकसान न होता तो बाहेर पडण्यात यशस्वी झाला. हॅसल आणि विस्टींग स्लेज बाहेर काढत असताना जालांडने त्यांचे फोटो काढण्यात मग्नं होता !
या कपारींबद्दल एक धोकादायक गोष्ट म्हणजे या कपारींना असलेला बर्फाचा फसवा तळ ! बर्फाच्या वरच्या थरातून आत रुतल्यावर खाली असलेला दुसरा तळ आढळून येत असे. हा तळ टणक बर्फाचा असल्याने आपल्याला आधार मिळेल अशी सर्वांची कल्पना होती. मात्रं ही कल्पना साफ चुकीची असल्याचं लवकरच त्यांच्या ध्यानात आलं. अशाच एका कपारीवरुन जात असताना जालांडने बर्फाच्या वरच्या थरावरुन खाली सूर मारला ! खालच्या बर्फाचा आपल्याला आधार मिळेल ही त्याची अपेक्षा फोल ठरली आणि त्या थरात तो छातीपर्यंत आत रुतला ! प्रसंगावधान राखून स्लेजला असलेला एक दोर त्याने वेळीच पकडला, अन्यथा तो त्या अंतहीन कपारीच्या तळाशी विसावला असता.
कपारींत असलेल्या बर्फाच्या या दोन थरांमधील पोकळीमुळे त्या कपारींवरुन जाताना एक पो़कळ जमिनीवरुन चालल्यासारखा आवाज होत असे ! अॅमंडसेनने या प्रदेशाला यथार्थ नाव दिलं.
डेव्हील्स बॉलरुम ! सैतानाचं नृत्यागृह !
सावधपणे वाटचाल करत अखेरीस ते त्या धोकादायक प्रदेशातून बाहेर पडले. धोकादायक कपारींचा आणि टेकड्यांचा प्रदेश अखेर संपला होता ! अॅक्सेल हेइबर्ग ग्लेशीयरच्या दक्षिण टोकाला ते पोहोचले होते ! इथून पुढे बर्फाच्छादीत धृवीय पठार पसरलेलं होतं ! ८७ अंश दक्षिण !
स्कॉटच्या तुकडीची प्रगती धीम्यागतीने सुरुच होती. ३ आणि ४ डिसेंबरला स्कॉटच्या तुकडीला केवळ १३ मैलाची मजल मारता आली होती. स्कॉटच्या घोड्यांची प्रगती आता मंदावत होती. ४ डिसेंबरला स्कॉटने बिअर्डमूर ग्लेशीयरवर जाणा-या गेट-वे पासून सुमारे १० मैल अंतरावर मुक्काम ठोकला. वा-याचा जोर आता वाढत होता. त्या दिवशी रात्री चेरी-गॅराडच्या घोड्याचा बळी पडला. स्कॉट म्हणतो,
" आमच्या दक्षिण धृवाच्या मोहीमेतील पहिला टप्पा आम्ही गाठला होता. वायव्येला दूरवर दृष्टीपथात येणा-या जमिनीचा विचार करता, धृवाजवळील अक्षवृत्तावरील तो प्रदेश असावा ! अॅमंडसेनने नेमका तोच मार्ग धरला असला, तर त्याला दक्षिण धृव गाठण्यास जेमतेम शंभर-सव्वाशे मैल अंतर काटावं लागेल !"
बॉवर्सने आपल्या डायरीत नोंद केली,
" कदाचित अॅमंडसेन दक्षिण धृवावर पोहोचला असेल. पण तो पोहोचला नसेल अशी मला आशा आहे. त्याने स्कॉटला फसवलं आहे !"
दक्षिण धृवावर आपला एकाधिकार मानणा-या ब्रिटीश मानसिकतेचं हे नेमकं दर्शन !
स्कॉटला आलेली शंका खरी होती. अॅमंडसेन त्याच मार्गावर होता. ८७ अंश अक्षवृत्तावर दक्षिण धृवापासून तो केवळ २०९ मैलांवर होता !
५ डिसेंबरच्या सकाळी पुढे निघालेल्या अॅमंडसेनच्या तुकडीचं स्वागत केलं ते जोरदार वा-याने आणि त्याबरोबर उडणा-या बर्फाच्या पुंजक्यांनी. दृष्यमानता जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आलेली होती. मात्रं त्या परिस्थितीतही जवळपास आंधळेपणाने ते दक्षिणेच्या दिशेने जात होते ! त्यातच पठारावरील पृष्ठभाग सरळ सपाट असेल ही त्यांची अपेक्षा फोल ठरली. इथला पृष्ठभाग बर्फाच्या मोठाल्या लाटांपासून तयार झाला होता. त्यावरुन स्लेज हाकारणं हे अत्यंत जिकीरीचं काम होतं.
दुस-या दिवशीही वातावरणात काहीच फरक पडला नव्हता. वा-याचा जोर अद्यापही ओसरला नव्हता, त्यामुळे हिमकणांचा मारा होतच होता ! त्यातच समुद्रसपाटीपासून उंची वाढल्यामुळे मधूनच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. मात्रं या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत त्यांचा दक्षिणेकडे प्रवास सुरुच होता. ६ डिसेंबरला त्यांनी ८८ अंश दक्षिण अक्षवृत्त ओलांडलं ! ८८'९'' अक्षवृत्तावर त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. दर अक्षांशावर डेपो कॅंप उभारण्याच्या आपल्या बेताला यावेळेस अॅमंडसेनने बगल दिली. शॅकल्टनचा ८८'२३'' दक्षिण अक्षवृत्ताचा विक्रम मोडल्यावरच डेपो उभारण्याचा त्याचा बेत होता !
७ डिसेंबरच्या सकाळीही वा-याचा जोर कायम होता, परंतु दुपारी हवामान अकस्मात बदल झाला ! वा-याचा जोर ओसरला. हवामानाचा योग्य उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने अॅमंडसेनच्या तुकडीने सेक्स्टंटच्या सहाय्याने निरीक्षण करुन आणि गणिताच्या सहाय्याने काळजीपूर्वक आपलं नेमकं स्थान निश्चित केलं - ८८'१६'' दक्षिण !
शॅकल्टनच्या दक्षिण धृवावरील विक्रमापासून ते अवघ्या काही मैलांवर होते !