अनादी अनंत काळापासून माणसाला अज्ञात प्रदेशाचं आकर्षण राहीलं आहे. नवीन भूमीचा शोध घ्यावा, त्यावर आपलं स्वामित्वं प्रस्थापीत करावं ही मानवाची आस अनादी-अनंत कालापासून चालत आलेली आहे. युरोपीयन आणि मुस्लीम आक्रमकांनी यालाच धर्मप्रसाराची आणि व्यापाराची जोड दिली आणि व्यापाराच्या माध्यमातून अनेक वसाहतींचं साम्राज्यं उभारलं.

इसवी सन पूर्वीपासूनच्या काळात युरोपीयन संस्कृतीतील अनेक विचारवंतांनी त्यांना अज्ञात असलेल्या प्रदेशांबद्द्लचे आपले सिध्दांत मांडले आहेत. प्राचीन ग्रीक विचारवंतांनी पृथ्वीच्या संतुलनाचा सिध्दांत मांडला आहे. या सिध्दांतानुसार, उत्तरेला असलेल्या जमीनीचा तोल साधण्यासाठी दक्षिणेलाही त्याच प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. मात्रं दक्षिणेला असलेला हा भूभाग अत्यंत थंड हवामानाचा आणि मानवी वास्तव्यास प्रतिकूल असा आहे असं त्या सिध्दांतात नमूद केलेलं आहे. ग्रीकांच्या एका सिध्दांतानुसार उत्तर आणि दक्षिण गोलार्धांच्या मध्ये तीव्र आगीचा धगधगणारा प्रदेश ( बेल्ट ऑफ फायर ) अस्तीत्वात होता ! युरोपच्या दक्षिणेला गेल्यावर वाढत जाणा-या तापमानाचा आधार या सिध्दांताला होता. मात्रं एकही युरोपीयन विषुववृत्त ओलांडून दक्षिणेला न गेल्याने या सिध्दांताला कोणताही प्रमाणित आधार नव्हता.

ग्रीक विचारवंतांच्या या प्राचीन सिध्दांताच्या आधाराने अ‍ॅरिस्टॉटलने नवीन सिध्दांत मांडला. त्याच्या मतानुसार पृत्थ्वीवरील जमीन आणि महासागर यांची निम्म्या प्रमाणात उत्तर-द्क्षिण अशी विभागणी झालेली आहे ! या सिध्दांताप्रमाणे, दक्षिणेतही मानवी वस्ती असलेले प्रदेश अस्तीत्वात आहेत आणि या प्रदेशांच्या मध्ये महासागर पसरलेले आहेत. 

इसवीसन १५० मध्ये टोलेमीने अ‍ॅरिस्टॉटलच्या सिध्दांताचा आणखीन विस्तार केला. तत्कालीन उपलब्ध माहीतीचा शास्त्रोक्त उपयोग करून टॉलेमीने जगाचा नकाशा तयार केला. यात त्याने अक्षांश आणि रेखांशांचा वापर करुन त्याला ज्ञात असलेली सर्व शहरं आणि पर्वतराजींचा निर्देश केला आहे. टॉलेमीने अटलांटीक महासागरातील कॅनरी बेटांना ० अंश रेखांश दिला आहे. पश्चिमेला कॅनरी बेटांपासून ते पूर्वेला चीन पर्यंत १८० अंश रेखांश आणि आर्क्टीक सर्कलमधील ८० अंश उत्तर अक्षांशापासून ते ईस्ट इंडीज आणि आफ्रीकेतील जास्तीत जास्त ज्ञात प्रदेशाचा त्याने आपल्या नकाशात समावेश केला आहे. अर्थात आपल्याला ज्ञात असलेल्या प्रदेशापेक्षा, किमान तीन ते चारपट अज्ञात प्रदेश पृत्थ्वीवर अस्तीत्वात आहे अशी टॉलेमीची पक्की खात्री होती !


टॉलेमीचा नकाशा

आपल्या 'जॉग्रॉफिया' या ग्रंथात टॉलेमीने 'टेरा ऑस्ट्रलिस इन्कॉग्नीटा' ( दक्षिणेतील अज्ञात प्रदेश ) वर तपशीलवार मतप्रदर्शन केलं आहे. प्राचीन ग्रीक सिध्दांत आणि अ‍ॅरिस्टॉटलच्या पृत्थ्वीच्या संतुलनाच्या संकल्पनेचा विस्तार म्हणजेच जॉग्रॉफियातील टेरा ऑस्ट्रलिस इन्कॉग्नीटा ! टॉलेमीच्या मतानुसार युरोपीयनांना अज्ञात असा भूप्रदेश दक्षिणेला निश्चीत होता, परंतु अ‍ॅरिस्टॉटलच्या सिध्दांतानुसार तिथे मानवी वस्ती नसून तो सर्व प्रदेश हिमच्छादीत होता ! या प्रदेशात मानवी वसाहतींची सुतराम शक्यता नव्हती.

सातव्या शतकात न्यूझीलंडजवळच्या कूक बेटांपैकी रार्टोंगा बेटाचा रहिवासी असलेल्या उई-ते-रानीगोरा या माओरी दर्यावर्दी नायकाने दक्षिण पॉलीनेशीयन समुद्रात जहाजांचा काफीला घेऊन केलेल्या सफरींचा उल्लेख आढळतो. अर्थात या सफरीचा लिखीत पुरावा कोणताही उपलब्ध नसला तरी पिढ्यानपिढ्या माओरी दंतकथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. या दंतकथेनुसार रानीगोरा दक्षिणेला अंटार्क्टीक सागरापर्यंत पोहोचला होता, परंतु प्रचंड मोठ्या हिमखंडांमुळे त्याला परत फिरण्याखेरीज उपाय राहीला नाही. 

१३ व्या शतकात पॉलीनेशियन जमातींनी ऑकलंड बेटांवर वसाहत उभारली. ऑकलंड बेटं न्यूझीलंडपासून सुमारे ४५० मैल दक्षिणेला ५० अंश दक्षिण अक्षवृताच्या प्रदेशात आहेत.

जागतिक सागरसफरींच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्वं असलेला द्रष्टा आहे तो एक पोर्तुगीज राजपुत्र !

हेनरी द नॅव्हीगेटर !

सागरसफरींचा आणि समुद्रमार्गाने व्यापार आणि साम्राज्यविस्ताराच्या संकल्पनेचा आद्य प्रणेता म्हणजे हेनरी द नॅव्हीगेटर. पोर्तुगालचा राजपुत्र असलेल्या हेनरीने साहसी दर्यावर्दींना वेगवेगळे प्रदेश शोधून काढण्यास आणि त्या प्रदेशात आपली सत्ता प्रस्थापित करण्यास उत्तेजन दिलं आणि सढळ हाताने मदतही केली. हेनरीच्या पूर्वीच्या काळात युरोपीयन प्रवास आफ्रीकेच्या वाळवंटापर्यंत पोहोचले होते, परंतु वाळवंट ओलांडून पलीकडे जाणं कोणालाही जमलं नव्हतं.

हेनरीच्या पाठींब्यावर आणि प्रोत्साहनावर पोर्तुगीज दर्यावर्द्यांनी आफ्रीकेच्या पश्चिम किना-याचा बराचसा भाग ओलांडला. अनेक बेटांवरील आफ्रीकन जमातींवर वर्चस्व प्रस्थापीत करुन त्यांचं पोर्तुगीज वसाहतींत रुपांतर केलं.

१४८८ पोर्तुगीज दर्यावर्दी बार्थेल्योमु डायझने आफ्रीकेच्या पश्चिम किना-यावरुन दक्षिणेकडे जात आफ्रीका खंडाचं टोक गाठलं ! दक्षिणेकडून येणा-या झंझावाती वा-यांना तोंड देत डायझने आफ्रीकेच्या शेवटच्या भूप्रदेशाला वळसा घातला आणि हिंदी महासागरात प्रवेश केला. १२ मार्च १४८८ रोजी डायझने बुशमन नदीच्या किना-यावर असलेल्या क्वाईहोक बंदरातून परतीची वाट पकडली. या परतीच्या प्रवासात डायझला आफ्रीकेचा शेवटच्या भूशीराचं प्रथम दर्शन झालं ! या प्रदेशातून वाट काढताना तोंड द्याव्या लागणा-या झंझावाती वा-यांवरुनच डायझने त्याला नाव दिलं..

केप ऑफ स्टॉर्म !

डायझने दिलेलं हे नाव पोर्तुगालचा राजा जॉन २ रा याने बदललं आणि नवीन नाव दिलं..

केप ऑफ गुड होप !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel