८० अंश अक्षवृत्ताकडे जाणारी वाट चुकून ते कपारींनी भरलेल्या धोकादायक प्रदेशात येऊन पोहोचले होते ! डेपो उभारणीच्या तिस-या मोहीमेवर असताना योहान्सनच्या तुकडीला कपारींच्या या भूलभुलैयाचा सर्वप्रथम ' शोध ' लागला होता !

त्या भीतीदायक प्रदेशापासून काही अंतरावर त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. दुस-या दिवशी सकाळी अ‍ॅमंडसेन, विस्टींग आणि हॅन्सन या प्रदेशातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याच्या कामगीरीवर निघाले. काही पावलं चालून जातात तोच पुढे असलेला विस्टींग अचानक दिसेनासा झाला !

आणखीन एका अंतहीन कपारीत विस्टींग छातीपर्यंतच्या बर्फात रुतला होता !

सुदैवाने तिघांनी एकमेकाला गिर्यारोहणात वापरण्यात येणा-या सुरक्षा दोराने बांधून घेतलं होतं. विस्टींग बाहेर आल्यावर सावधपणे तिघांनी पुढची वाट पकडली आणि काही वेळातच त्या कपारींच्या जाळ्यातून बाहेर पडण्यात ते यशस्वी झाले.

सर्व सामान स्लेजवर लादून त्यांनी पुढचा मार्ग पकडला. मात्रं कपारींच्या त्या जंजाळातून इतक्यात त्यांची सुटका होणार नव्हती ! काही अंतरावर पुन्हा कपारींचं जाळं त्यांच्या वाटेत आडवं आलं !

हॅन्सनने बेधडकपणे आपली स्लेज त्या कपारींवर घातली ! कशाचीही पर्वा न करता बिनदिक्कतपणे तो त्यातून मार्ग काढत होता. एका कपारीत त्याच्या स्लेजला असलेले तीन कुत्रे गडप झाले ! परंतु त्यांना वर खेचून घेऊन तो पुन्हा पुढे निघाला ! मात्रं दुस-या खेपेला त्याची पुनरावृत्ती झाल्यावर अ‍ॅमंडसेनने त्याला थांबवलं !

" आपण इथून मागे जाणार आहोत !" अ‍ॅमंडसेन अधिकारवाणीने उद्गारला, " या कपारींवरुन जाण्याऐवजी त्यांना वळसा घालून जाणं अधिक श्रेयस्कर आहे !"

धाडसी स्वभावाच्या हॅन्सनला माघार घेणं मंजूर नव्हतं, पण अ‍ॅमंडसेनच्या हुकुमापुढे त्याचं काही चाललं नाही. माघार घेऊन त्या प्रदेशाला वळसा घालून त्यांनी पुढचा मार्ग पकडला. कोणतीही अडचण न येता अखेर ते आपल्या कँपवर पोहोचण्यात यशस्वी झाले. ८० अंश दक्षिणेला असलेल्या डेपो पासून हा कँप २६ मैलांवर होता.

२३ ऑक्टोबरला अ‍ॅमंडसेनची तुकडी ८० अंश दक्षिण अक्षवृत्तावर उभारलेल्या डेपो कँपवर पोहोचली. सप्टेंबरमधील पहिल्या प्रयत्नाच्या वेळेस आपली बहुतेक सर्व सामग्री त्यांनी इथल्या डेपोमध्ये ठेवलेली होती. इथे पोहोचताच अ‍ॅमंडसेनने पुढील प्रवासाच्या तयारीने दोन दिवस थांबण्याचा निर्णय घेतला.

अ‍ॅमंडसेन ८० अंश दक्षिण अक्षवृत्तावर असताना स्कॉटच्या मोहीमेत काय सुरु होतं ?

२३ ऑक्टोबरला स्कॉटच्या मोहीमेतील मोटरस्लेजच्या तुकडीने केप इव्हान्सहून दक्षिणेच्या दिशेन कूच करण्यास सुरवात केली होती. मोटरस्लेजच्या या तुकडीत टेडी इव्हान्स, विल्यम लॅशी, बर्नार्ड डे आणि फ्रेड्रीक हूपर यांचा समावेश होता. मोटरस्लेजमधील काही तांत्रीक बिघाडांमुळे त्यांना जेमतेम काहीशे मीटर्सचीच मजल मारता आली. निरुपायाने सर्वजण केप इव्हान्सला परतले. डे आणि हूपरने सर्व तांत्रीक बिघाड दुरुस्त केले, परंतु दुस-या दिवसापर्यंत निघण्याचा बेत रहीत करण्यात आला होता.

२४ ऑक्टोबरच्या सकाळी मोटरस्लेजच्या तुकडीने केप इव्हान्स सोडलं आणि हट पॉईंटची दिशा धरली.

दक्षिण धृवावरील शर्यतीला सुरवात झाली होती !

२५ ऑक्टोबरच्या सकाळी अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने ८० अंश दक्षिणेचा आपला डेपो कँप सोडला आणि पुढची दिशा पकडली. दिवसाला सुमारे १५-१६ मैलांची मजल मारत २९ ऑक्टोबरच्या दुपारी त्यांनी ८१ अंश दक्षिण अक्षवृत्तावर असलेला दुसरा डेपो गाठला.

हॅन्सनच्या स्लेजला असलेल्या कुत्र्यांपैकी एक कुत्रा खूपच अशक्तं झाला होता. त्याला पुढे जाणं अशक्यं होणार होतं हे उघड होतं. निरुपायाने हॅन्सनने त्याला गोळी घातली. अ‍ॅमंडसेनने अशक्तं कुत्र्यांना मारुन त्यांचं मांस इतर कुत्र्यांना आणि वेळ पडलीच तर माणसांसाठी वापरण्याचा आधीच निर्णय घेतला होता.

मोटरस्लेजसह निघालेल्या स्कॉटच्या मोहीमेतील तुकडीची प्रगती अड्खळत सुरु होती. मात्रं स्कॉटच्या मते स्लेजमधील अनेक छोट्या-मोठ्या अडचणींनंतर त्याची प्रगती समाधानकारकच होती. २८ ऑक्टोबरला लॅशीची स्लेज सेफ्टी पॉईंटच्या कँपजवळ नादुरुस्त झाली होती. लॅशी आणि डे यांनी रात्रभर जागून मोटर दुरुस्त करण्यात यश मिळवलं खरं, परंतु हट पॉईंटपार गेलेल्या टेडी इव्हान्सला काही सामान विसरल्यामुळे परत येणं भाग पडलं होतं !

१ नोव्हेंबरच्या सकाळी स्कॉटच्या मोहीमेतील सोळाजणांनी केप इव्हान्स सोडलं आणि दक्षिणेचा मार्ग धरला !

४ नोव्हेंबरला स्कॉट आणि इतर सर्वजण एक टन डेपोच्या वाटेवर असताना, त्यांना वाटेत नादुरुस्त झालेली एक मोटरस्लेज आढळली !

लॅशीने स्कॉटसाठी चिठी ठेवली होती. डे च्या मोटरस्लेजचा दुसरा सिलेंडर पूर्णपणे तुटला होता. उपलब्ध असलेला एकमेव जास्तीचा सिलेंडर लॅशीच्या मोटरस्लेजला आधीच बसवण्यात आला होता. डे ची स्लेज तीन सिलेंडर्सवरही चालू शकत होती, परंतु त्यासाठी स्लेजचं इंजिन संपूर्णपणे उघडून परत बसवणं आवश्यक होतं. त्या भानगडीत न पडता त्यांनी सरळ स्लेज वाटेत सोडून दिली होती ! स्लेजवरील बरचंस सामान दुस-या स्लेजवर लादून त्यांनी पुढचा मार्ग पत्करला होता !

५ नोव्हेंबरला कॉर्नर कँपवरुन निघाल्यावर जेमतेम तीन मैल अंतरावर तिसरी मोटरस्लेज नादुरुस्त अवस्थेत आढळून आली ! इव्हान्सच्या चिठीतून मागच्या स्लेजप्रमाणेच या मोटरस्लेजचाही सिलेंडर तुटला होता ! इंजिन उत्तम अवस्थेत असलं तरीही सिलेंडरविना स्लेज पुढे जाणं अशक्यंच होतं. निरुपायाने शक्यं ते सामान घेऊन टेडी इव्हान्सच्या तुकडीने एक टन डेपोची वाट पकडली होती.

ज्या तीन मोटरस्लेजच्या यशाबद्द्ल स्कॉटला खात्री वाटत होती, त्या तीनही स्लेजचा केप इव्हान्सपासून ५० मैलांच्या आत निकाल लागला होता !

स्कॉटला आपली निराशा लपवता आली नाही. मोहीमेच्या एकंदर खर्चापैकी बराच पैसा त्या स्लेजवर खर्च झाला होता. आपल्या डायरीत त्याने नोंद केली,

" मोटरस्लेजवर मला खूप भरवसा होता. ग्रेट आईस बॅरीयरवर त्यांची प्रगती चांगली होईल अशी मला आशा होती."
६ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनने ८२ अंश अक्षवृत्तावर असलेला आपला कँप सोडला आणि दक्षिणेची वाट धरली. डेपो उभारणीच्या मोहीमेत इथपर्यंत मजल मारल्याने या प्रदेशाची त्यांना कल्पना होती, परंतु यापुढील प्रत्येक पाऊल अनोळखी प्रदेशात पडणार होतं ! दक्षिण धृवावर पोहोचून परत येताना साधनसामग्रीची तरतूद करण्याच्या हेतूने दर अक्षांशावर डेपो उभारण्याचा अ‍ॅमंडसेनने निर्णय घेतला होता.

१२ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनने ८४ अंश दक्षिण अक्षवृत्तावर कँप उभारला. कँपपासून दूर अंतरावर पूर्वेच्या दिशेने जाणा-या पर्वतराजीने त्यांचं लक्षं वेधून घेतलं.

ट्रान्सअंटार्क्टीक माऊंटन्स !

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिखराच्या माथ्याजवळ असलेला बर्फाचा थर सोड्ला, तर एकाही पर्वताच्या धारेवर बर्फाचा मागमूसही नव्हता ! या पर्वतशिखरांना वळसा घालून पुढे जाणं अशक्यंच होतं ! या पर्वतराजीतून चढाई करून माथ्यावरुन पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता !

ट्रान्सअंटार्क्टीक माऊंटन्स

१५ नोव्हेंबरला अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने ८५ अंश अक्षवृत्तावर कँप उभारला. समोरच उभ्या ठाकलेल्या पर्वतराजीवर चढाईसाठी योग्य मार्ग शोधून काढणं हे अत्यावश्यक होतं. या मार्गाने यापूर्वी कधीही कोणीही दक्षिण दिशेला गेलेलं नसल्याने चढाईसाठी सोईस्कर जागा पाहून तिथून माथा गाठण्याचा अ‍ॅमंडसेनचा बेत होता.


८५ अंश अक्षवृत्तावरील अ‍ॅमंडसेनच्या डेपो.

अ‍ॅमंडसेन ८५ अंश अक्षवृत्तावर असताना, १५ नोव्हेंबरला स्कॉटने ७९'२९'' वरील आपला एक टन डेपो गाठला !


स्कॉटचा एक टन डेपो

८५ अंश अक्षवृत्तावरील आपल्या कँपमध्ये अ‍ॅमंडसेनने आपल्या पुढील मोहीमेची योजना आखण्यास सुरवात केली. दक्षिण धृव गाठून पुन्हा कँपवर परतून येण्यासाठी ६८३ मैल अंतर काटावं लागणार होतं. या प्रवासासाठी दोन महिन्यांचा काळ लागणार होता. त्या दृष्टीने ६० दिवसांची अन्नसामग्री ३ स्लेजवर चढवण्यात आली. दक्षिण धृवावरुन परतल्यावर परतीच्या प्रवासासाठी ३० दिवसांची सामग्री कँपवरच ठेवण्यात आली.

फ्रामहेममधून निघताना त्यांच्याबरोबर असलेल्या ५२ कुत्र्यांपैकी आता ४२ शिल्लक होती. अर्थात या सर्व कुत्र्यांना दक्षिण धृवापर्यंत नेणं अशक्यं होतं. पर्वताचा माथा गाठल्यावर ४२ फक्त १८ कुत्रे धृवाच्या दिशेने जाणार होते ! उरलेल्या २४ कुत्र्यांची हत्या करुन त्यांचं मांस बरोबर घेण्यात येणार होतं. दक्षिणेला जाणा-या १८ कुत्र्यांना आणि गरज पडल्यास अ‍ॅमंडसेन आणि त्याच्या सहका-यांना या मांसाचा उपयोग होणार होता ! १८ कुत्र्यांपैकीही गरज भासेल त्याप्रमाणे ६ कुत्र्यांची हत्या करुन उरलेल्या १२ कुत्र्यांना परत आणण्याची अ‍ॅमंडसेनची योजना होती.

१६ नोव्हेंबरच्या सकाळी जालांड, हॅसल आणि अ‍ॅमंडसेन पर्वतावर चढाईचा मार्ग शोधण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यास निघाले. वाटेत आढळलेल्या सुमारे १००० फूट उंचीच्या शिखराचं त्यांनी माऊंट बेटी असं नामकरण केलं. माऊंट बेटी ओलांडल्यावर चढाई तीव्र होत चालली होती. मात्रं हा मार्गच पुढे वरील ग्लेशीयरकडे जाणारा आहे असं अ‍ॅमंड्सेनला आढळून आलं.

दुस-या दिवशी सकाळी अ‍ॅमंडसेनच्या तुकडीने पर्वतावर चढाईस प्रारंभ केला !

कँप सोडण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून अ‍ॅमंडसेनने आपला पुढचा बेत बारीक-सारीक तपशीलांसह एका कागदावर उतरवून काढला. दक्षिण धृव गाठण्याचा मार्ग आणि बरोबर घेतलेल्या अन्नासामग्रीची नोंद करण्यास तो विसरला नाही. एका बाटलीत घालून तो कागद त्याने आपल्या कँपमध्ये ठेवून दिला !

माऊंट बेटी ओलांडल्यावर तीव्र उतारावरुन चढाई करत त्यांनी ११ मैलाची मजल मारली. त्या अकरा मैलात त्यांनी ६०० मीटर उंची गाठली होती. पुढे जाण्याचा मार्ग शोधण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी एका दिशेने जालांड आणि दुस-या दिशेने हॅन्सन आणि विस्टींग पुढे निघाले. जालांडने शोधलेला मार्ग तीव्र चढाईचा होता आणि एका उंच कड्यापाशी जाऊन संपत होता ! अ‍ॅमंडसेनने हॅन्सन आणि विस्टींगच्या मार्गाने चढाई करण्याचा बेत केला.

हॅन्सन आणि विस्टींगने आदल्या दिवशी शोधलेल्या मार्गाने त्यांनी चढाईला सुरवात केली. वाटेत आढळलेल्या अनेक पर्वतशिखरांना अ‍ॅमंडसेनने माऊंट फ्रिट्झॉफ नॅन्सन, माऊंट डॉन पेड्रो क्रिस्तोफर्सन अशी नावं देण्याचा सपाटा लावला होता !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel