कधीतरी आपसूकच मन दूर दूर चालत जातं. हरवलेल्या मैत्रिणी शोधत. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दूर निघून गेलेल्या.. बालवयातल्या. जात धर्म यांच्या पलिकडच्या.... मैत्रीणी.

बालपणात शिरलं की आलम साहब आजोबांच्या वाड्यातच धावत जातं मन.. त्याशिवाय पर्याय च नसतो काही!

शुभ्र कपडे पायजामा व नेहेरु शर्ट. तोंडाने काहीतरी नामस्मरण. मागे बांधलेले हात. हातातली जपमाळ. त्याचा रेशमी गोंडा.सगळ्या वाड्यातल्या लहान मुलांवर लक्ष ठेवत इकडून तिकडे फेर्‍या मारणारे अब्बा....

कारखान्यात इस्ततः पसरलेल्या मोठाल्या लाकडाच्या ओंडक्यांवर आम्ही नदी की पहाड खेळत असू.कधी मोठ्या ओंडक्यांच्या मागे लपणा छपणी (हा बालपणीचा शब्द) तर कधी नुस्तंच ओंडक्यावर गप्पा मारत बसायचो. एक एक ओंडका सहा सात महिने पडून राहायचा. आणि त्या वर अक्षरशः जीव जडायचा.

अचानक एखाद्या दिवशी मग तो कापण्यासाठी उचलून आरीजवळ अर्धवट अवस्थेत दिसायचा किंवा त्याचं अनेक फळ्यांमधे रुपांतर झालेलं दिसायचं..त्याची जागा सूनी सुनी वाटायची अन् उगाच गलबलून यायचं..

वाड्याच्या कोपर्‍यात एका छोट्याश्या झोपडीत नागी राहायची. आरीवर लाकूड कापणार्या हानूची मुलगी. हानू वाड्यात सगळ्यांची मेहनतीची कामे करुन द्यायचा..नेहेमी हसतमूख. एक छिद्र पडलेली बनियान आणि लुंगी. लाकूड कापत असेल तर एक रबरी एप्रन त्याच्या गळ्यात अडकवलेलं असायचं आणि एक मोठा पॅक बंद चष्मा. त्याला पूर्ण कपडे घातलेला कधी कोणी पाहिलाच नाही.

बारिक डोळे , पसरट नाक मजबूत बांधा...याउलट त्याची बायको नाजूक गोरी , कुरळ्या पिंगट केसांची , पिंगट डोळ्यांची. ती दिवसभर काम करायची. तिला मराठी बोलता येत नव्हतं. घरमालकाकडे काम करुन थोडंबहूत हिंदी यायचं.ती फेंट कलरचे नऊवारी पण खूप छोटे छोटे पातळ नेसायची.नागीशी ती गोंडी भाषेतच बोलायची.

नागी....... अशी घोगर्या आवाजातली हाक ऐकली की ,'बता...ल' म्हणत नागी पळतच जायची.

आईची तिला खूप काळजी वाटायची कारण दिवसभर कामाने थकलेला हनू संध्याकाळी दारु प्यायचा आणि बायकोला खूप मारायचा. मग सकाळी ती काही कामानिमित्त वाड्यात आली की तिचा चेहरा सुजलेला, कधी डोळा काळा निळा पडलेला तर कधी तिच्या गोर्‍या चेहेऱ्यावर व्रण दिसायचे. आईसगट वाड्यतल्या इतर बायकाही हळहळायच्या. अन् ती काहीच न समजून किंवा समजूनही असेल कसंनूसं हसत राहायची.

"किती मारलं गं माय कडू भाड्यानं" या वाक्यानं मलाही हनूमामाचा राग..राग.. यायचा.

संध्याकाळी स्वैपाकाच्या वेळी आई मला माझ्या छोट्या भावाला कडेवर द्यायची. "ह्या ला जरा न्ह्या गं घंटाभर कूठतरी"

हे ऐकून ऐकून तो सुध्दा" मला जरा न्ह्या ये कूटतरी घंटाभर" असं म्हणून दोन्ही हात पसरायचा वर्षा दिड वर्षाच्या छोट्या भावाला कडेवर घेऊन मग मी लाकडांवर नागीसोबत खेळायला जायचे. त्याला घेउन खेळता यायचं नाही.  मग आम्ही गप्पा मारत त्याला संध्याकाळी आकाशात उडत परतणारे पोपट, कावळे, बगळे दाखवत बसायचो. वाड्याच्या मागेच मस्जिद होती. बहुधा पाच साडेपाचला अल्लाहू अकबर अल्ला... अशी आजान व्हायची.

त्यावेळी मी नागी, छोटा रेणू तर कधी कधी वाड्यातली इतर मराठी लहान मुलं आब्बाच्या घरात नमाज पडणार्‍या अम्मी संजिदा, नाहेदा बाजी आणि घरातली इतर नोकर मंडळी कडे कितीतरी वेळ कुतूहलाने बघत बसायचो. त्याआधी नळावर अम्मी वजू करायची ते बघायचो... आणि वेळ कसा जायचा ते कळायचंच नाही. त्यांना ते सगळं करताना बघणं हा एक सोहळा च होता. सरळ नाकाची , मोठ्या सुंदर डोळ्यांची गोरी अम्मी आणि त्यांच्या सुंदर पोरी कपाळापट्टी झाकून कानामागे सारलेली ओढणी अंगाभोवती गुंडाळून घ्यायच्या आणि डोळे मिटून, दोन्ही तळवे वर धरायच्या तेव्हा आम्हाला ही तस्संच करुन अल्लाकडे दुवा मागावीशी वाटायची. मग इकडे आमच्या अड्ड्यावर येऊन आम्ही ते करुन घ्यायचो.अगदी मनोभावे.नागी जवळपास माझ्या च वयाची पण खूप थोराड वाटायची.तिची आई गोरी असूनही नागी मात्र गोरी नव्हती. तिचं नाक थोराड आणि बसकं होतं. ओठ बाबरे होते.आणि केस कुरळे. ती त्या दोघांपेक्षाही खूपच वेगळी दिसायची. तिला रेणूला सांभाळायला खूप आवडायचं त्याला घेउन माझाही हात अवघडून जायचा.

मी तिला त्या बदल्यात आईने खिशात दिलेले काजू, भाजके शेंगदाणे, षटकोनी खारे बिस्किट द्यायचे. नागी अजूनच खूश व्हायची. शाळेची वेळ सोडून सकाळ संध्याकाळ सुट्टीचा दिवस मी नागी फरजाना, शमीम, निर्मला लाकडांमधे हुंदडत राहायचो.

लाकूड कापताना बघत तासंतास तिथे उभे राहायचो.अब्बाशी डिल करण्यासाठी बरीच लोकं येत राहायची. मग अब्बा आम्हाला 'अगे अम्मा चलो अंदर जाओ गे...'म्हणत ऑफिसात शिरायचे आणि आम्ही थेट त्यांच्या घरात. तिथे कधी बायका पान खात बसलेल्या असायच्या तर कधी तखत पोशावर बसून जेवत. मग आम्ही दुसर्‍या दरवाजातून धूम ठोकायचो. नवीन घर बांधाल्यावर त्या धावपळीत,  उत्साहात इकडे राहायला आल्यावर काही दिवसात नागी कूठे , कशी हरवली कळलं नाही. त्यानंतर कधी कधी स्टेशन च्या रस्त्यावर अब्बाच्या वाड्यासोरुन जातांना ती भेटायची. मग आम्ही गप्पा करताना अम्मी चष्म्यातून बघत आवाज द्यायची..

'कोन है गे. ..?

काशिराम की बेटी की.....? सारिखा..?

अई इधर आ गे मा....कितनी बडी हो गयी गे....

मग मी अम्मीकडे नी नागी घराकडे धूम ठोकायची...

आता वाड्यात णा अम्मी आहे ना अब्बा ना नागी....

त्या लाकडाच्या ओंडक्याच्या रिकाम्या जागेसारखं सूनं सूनं सगळं.

गावी गेल्यावर कधीतरी तिकडून जातांना  तसंच गलगलबलून येतं. . अजूनही...

कुठे असेल नागी...?

लेखिका: सारिका उबाळे (परळकर), अमरावती

मोबाईल: 9423649202

ईमेल: sarikaubale077@gmail.com

(लेखिका कवयित्री आणि समुपदेशक आहेत)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel