माणसाच्या तीन मूलभूत गरजा पूर्वापार आपण मानत आलो आहोत. अन्न वस्त्र आणि निवारा. जगतांना माणसाला जी विविध स्वप्न पडतात त्यात एक स्वप्न असतं, 'असावे घरकुल आपुले छान!, छोटंसं का होईना पण स्वतःचं घरकुल असावं असं प्रत्येकालाच वाटतं पण जीवनाच्या या भाऊगर्दीत आणि प्रचंड जीवघेण्या स्पर्धेच्या युगात किती जणांचं हे  स्वप्न साकार होतं ? आजही कितीतर जीव कुठेतरी झाडांच्या आडोशाला, एस टी स्टॅंडवर, मंदिराच्या आवारात, धर्मशाळेत, रेल्वे फलाटांवर, रिकाम्या मोठ्या पाईपांमध्ये, जागा मिळेल तिथे हे आपलं आयुष्य कंठत आहेत. विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर अशा पद्धतीने आजही जीवन जगणारी माणसं आहेत.

आमच्या लहानपणी आम्ही एक गाणं ऐकायचो ते असं, "उद्याच्या पोटाची काळजी कशाला ? आकाश पांघरू दगड उशाला, नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी!" 'वर आभाळ खाली धरती' अशा प्रकारचं घरकुल जगणारीही माणसं या पृथ्वीतलावर आजही  दिसतात. नटसम्राट नाटकातला अप्पासाहेब बेलवलकर जीवाच्या आकांताने टाहो फोडतो, "कुणी घर देता का घर!" तर दुसरीकडे 'जो जे वांछील तो ते लाहो' असं पसायदान मागणारा ज्ञानियांचा राजा म्हणतो,हे विश्वची माझे घर,ऐसी मती जयाची स्थिर,किंबहुना चराचर आपण की जाहला !"  

 चार काडक्या जमवून चुल बोळक्यांचा संसार चिमण्या कावळे सुद्धा मांडतात असं निर्धाराने बायकोला सांगून स्वतःचा घर संसार राष्ट्राच्या स्वातंत्र्यापुढे यःकश्चित मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर उदात्त ध्येय डोळ्यासमोर ठेवून जन्मठेपेची शिक्षा भोगतात आणि मृत्युंजय स्वातंत्र्यवीर ठरतात. तर दुसरीकडे समर्थ रामदास 'चिंता करतो विश्वाची' असं म्हणत आत्मकल्याणासाठी आणि राष्ट्रकल्याणासाठी घराचाच काय पण सगळ्या ऐहीकाचाच त्याग करतात. 'कि घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने, लब्धप्रकाश करी हा इतिहास माने'अशा तऱ्हेचा उर्ज:स्वल ध्येयवाद बाळगणाऱ्या माणसांची नव्हे नव्हे महामानवांची घरं तुमच्या आमच्या घरांपेक्षा कितीतरी विस्तीर्ण आणि व्यापक असतात. राष्ट्रसंत तुकडोजी म्हणतात, "सबके लिए खुला है, मंदिर यह हमारा" अशी त्या घरांची धारणा असते.

आधीच कपाळावर भरगच्च आठी,त्या तही मग आयहोलमधून पहायचं,नंतर मग फक्त तीस अंशातून दरवाजा उघडून 'साहेब घरात नाहीत' किंवा त्यापुढेही जाऊन 'अपॉइंटमेंट' घेतली होती का? अशा विविध सबबी पुढे करून जिवंत माणसाची दखलही न घेणारी घरंदारं महामानवांची नसतात किंवा असेही म्हणता येईल की, काळाच्या आणि दिशांच्या मर्यादा ओलांडून गेलेल्या परिणत प्रज्ञेच्या, या सगळ्या विश्वाचं आर्त काळजात उतरलेल्या महापुरुषांच्या घरांना दारंच नसतात. आणि असलीच तर ती सगळ्यांसाठी खुली असतात.

माणसांच्या वृत्तीनुसार त्यांच्या घरांच्या  कल्पना सापेक्ष असतात. चिमण्या घरटं बांधतात, कावळे घरटी बांधतात,सुगरण किती सुबक खोपा तयार करते. अशा वेळी तिला विचारावंसं वाटतं, "सुगरणी, सांग मला खोपा कसा केला? इंजीनियरचा डिप्लोमा गं तुला कुणी दिला ? उत्कृष्ट वास्तूशिल्पज्ञासारखी प्रतिभा ह्या सुगरण पक्ष्याला निसर्गाने बहाल केल्यासारखी वाटते.

गाईम्हशींना गोठा असतो,घोड्यांना तबेला असतो,वाघ सिहांना गुंफा असते आणि ऋषीमुनींना गुंफा असते. माणसांना घर असतात आणि देवतांना देवघरं असतात. किंवा देवघरं ही छोटी मंदिरं असतात आणि मंदिरं म्हणजे मोठी देवघरं असतात. मुंगीपासून माणसांपर्यंत सर्वानाच हवं असतं एक छोटंसं घरकुल. स्वतःचं घर असलं म्हणजे 'भाड्याचं घर आणि खाली कर'हि वंचना संपते. घरादारांच्या रचनांमध्येसुद्धा कालानुसार फरक दिसतो. मुंगी वारूळ असंच का बांधते आणि सुगरण खोपा असाच का विणते तर तिची  तशी गरज आणि आवड आहे म्हणून. हडप्पा संस्कृतीतीलं घरं कशी होती.इग्लू पिग्मी घरं अशीच का उभारतात,काही माणसं झोपडीत राहतात तर काही फार्म हाउस उभारतात. कोणाला फ्लॅट आवडतो तर कोणाला स्वतंत्र बंगला. कंपाऊंड, गेट, दरवाजे-खिडक्या, बाथ, किचन, फर्निचर.वीज यंत्रणा,झुंबरं,शो पीस,वॉलपीस याबाबत प्रत्येक घराची रचना वेगळी असते कारण काय तर गरज आणि आवड. आपण आर्किटेक्चरला सांगतो त्यानुसार काही संकल्पचित्र, मॉडेल्स आर्किटेक्चर आपल्याला सुचवतो. आपण निवडतो त्यातलं एक संकल्प चित्र.अमुकच एक संकल्पचित्र आपण का निवडलं तर ते आपल्याला आवडलं म्हणून.तात्पर्य काय तर निवड ही आवडीशी संबधित असते. दहा मुली दाखवल्यानंतर त्या दहांमधून अमुकच एक मुलगी बायको म्हणून का निवडली तर ती आवडली म्हणूनच ना !

चित्रकलेमध्ये रंगसंगती विचारात घेतात. चांगल्या साजेलशा शोभेल अशा कपड्यांसाठी ड्रेस डिझायनरचा सल्ला घेतात. केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा अशा वेगवेगळ्या प्रांतात वेगळे वेगळे सल्लागार असतात. त्याचप्रमाणे असलेल्या सामानाची मांडणी कशी करावी, कोणती रंगसंगती साधावी, याचा सल्ला इंटेरियर डेकोरेटर देतो.आता वास्तु कशाप्रकारे बांधली म्हणजे ती सुखाला, स्वास्थ्याला कारणीभूत होते याचा विचार करून  वास्तुशास्त्र नावाचे एक नवीन शास्त्र आता विकसित झाले आहे.

अभिजात संगीत, अभिजात चित्रकला, अभिजात वास्तुकला, अभिजात संस्कृत साहित्य,अभिजात शिल्पकला या सगळ्याच क्षेत्रात आणि प्रांतात भारतीय संस्कृती आघाडीवर होती,ह्याला इतिहास साक्षी आहे, पण आता सर्वच क्षेत्रात असं अभिजातपण किती शिल्लक आहे? अजिंठा-वेरूळ घारापुरी सारखी लेणी पुन्हा निर्माण झाली का?प्राचीन हेमाडपंती मंदिरांसारखं शिल्प पुन्हा निर्माण झाली का? लेण्यांमध्ये जे रंग आहेत तसेच रंग पुन्हा निर्माण करता आले का ?बालाजी मंदिर, कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिर या सारखी रचना, शिल्पाकृती पुन्हा निर्माण झाली का ? दीपराग गाऊन तानसेनासारखे कोणी दिवे प्रज्वलित केले का? दीपराग आळवल्यानंतर अंगाचा दाह असे तो शांत करण्यासाठी मेघमल्हार राग आळवला जात असे. संगीतातलं असं अभिजात सामर्थ्य आज कुठे लोप पावलं आहे ? प्राचीन वारशाचे डोळे दिपवून टाकणारे प्रचंड वैभव जर पाहिले तर प्रत्येकच क्षेत्रात आमची पीछेहाट झाली आहे.

भर्तृहरिचं नीतिशतक आणि वात्सायनाचं कामसूत्र किंवा कामशतक दोघांनीही शंभर सूत्रं सांगितली. एकाने मुल्यशिक्षणाची तर एकाने निरामय सुदृढ आणि संपन्न अशा कामजीवनाची सूत्रं सांगितली. पतंजली मुनींनी  योगसूत्रं सांगितली. आणि निरामय शरीर आणि आत्मविकासाचा पाया घातला. इस्ट इज वेस्ट आणि वेस्ट इज बेस्ट असं आता  आमच्याकडे काही मंडळींना वाटू लागलं आहे.आणि म्हणून कोणताही नवा विचार मांडला की टीकेचा पवित्रा घेतला जातो.ज्योतिष हे शास्त्र आहे की नाही? वास्तुशास्त्र हे शास्त्र की थोतांड ? मी नथुराम बोलतोय हे नाटक चालावं की बंद पाडावं ?अशा दोन्ही बाजूंनी टोकाची भूमिका घेणारे आपापली बाजू मांडत जातात. वैचारिक खळबळ किंवा फॅड निर्माण करतात. समाजातला जो सामान्य बहुजन समाज आहे त्याने ह्या दोन्ही बाजूंचा विचार करावा आणि स्वतःच्या  विचारसरणीला जो विचार पटेल तो स्वीकारावा.मुठभर लोकांनी त्यांच्या विशिष्ट मतांचा शिक्का का म्हणून मारावा?

यादृष्टीने विचार करता वास्तुशास्त्र म्हणून जो नवीन विचार मांडला जात आहे आहे तो ज्याला घर बांधायचं आहे त्याने स्वतःच स्वीकारायचा की नाकारायचा  हे ठरवावं.नवं ते सगळंच स्वीकारार्ह आणि जून ते सगळंच आक्षेपार्ह ही भूमिका चुकीची आहे. दोघांमधलं इष्ट ते  स्वीकारावं अनिष्ट ते नाकारावं. इष्टअनिष्टाचा मूल्यविवेक स्वतःच करावा.

वास्तुशास्त्र हे सौंदर्यशास्त्र आहे.घर चांगलं नीटनेटकं प्रसन्न असावं. सुबक असावं.वास्तू म्हणून आपण जो वेळ, पैसा, परिश्रम खर्च केला आहे तो सत्कारणी लागल्याचं समाधान मिळावं,यासाठी प्राचीन आणि नवीन अशा दोन्ही विचारांमधील सम्यक धागा पकडून वास्तुशास्त्राकडे सौंदर्यशास्त्र म्हणून पाहावं. आपणा सर्वांना लाभावं असं समाधान,थोडक्यात असावं घरकुल आपुलं छान!

लेखक:  भरत उपासनी   
ईमेल: br1957u@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel