....नाईल नदीच्या काठावर अभिजीत बसला होता. अॅंड्र्यूचा मृत्यू, प्रोफेसरांच अपहरण या आकस्मिक घटनांमूळे त्याला खूप मोठा धक्का बसला होता. त्याच जीवन अश्याप्रकारे बदलून जाईल याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. अॅंड्र्यूने अर्धवट सोडलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आता अभिजीत वर होती. पण तो हे सगळं कसं करणार होता? तो कॅप्टन गिनयू सारख्या ताकदवान व्हीलनचा सामना कसा करू शकणार होता? तो हे सगळं खरंच करू शकणार होता कि त्याचाही असाच अंत होणार होता? या सगळ्या प्रश्नांनी त्याच डोकं अक्षरशः पोखरून निघत होते. त्याला सुरूवात कुठून करावी तेच समजत नव्हते. त्याच्या कडे फक्त अॅंड्र्यूच ते 3 डायमेन्शनल पॉकेट होते. पण त्याला कुठून ना कुठून सुरुवात करावीच लागणार होती. त्याचाच तो विचार करत होता. अचानक त्याला काही आवाज ऐकू आले. त्याने वळून पाहिले. वजीर होरेमहेब आपल्या सशस्त्र सैनिकांसोबत कोणाला तरी शोधत होता.



"शोधा त्याला, इथेच कुठेतरी असेल तो."



वजीर होरेमहेब सैनिकांना आदेश देत होता. अभिजीतला समजायला वेळ लागला नाही कि हा शोध त्याच्यासाठीच चालू होता. अभिजीत चपळाईने तिथून उठला. ते सैनिक अजुन त्याच्यापासून लांब अंतरावर होते. जर तो पकडला गेला, तर त्याच्या सोबत काय होईल हे सांगणे कठीण होते. त्याला मृत्यूदंडही मिळू शकला असता. कॅप्टन गिनयूला त्याच्या कृत्यांची सजा दिल्याशिवाय त्याला मरायच नव्हतं. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. अचानक बाजूला त्याला एक छोटंसं पिरॅमिड दिसलं. त्या पिरॅमिड मध्ये एक माणूस घुसु शकेल एवढं भगदाड होतं. अभिजीत पटकन त्यात घुसला आणि एका कोपऱ्यात जाऊन बसून राहिला. काही वेळातच वजीर होरेमहेब आणि त्याचे सैनिक त्या ठिकाणी येऊन पोहोचले. त्यांनी ते छोटस पिरॅमिड सोडून संपूर्ण परिसर पिंजुन काढला. मात्र अभिजीत त्यांना कुठेच सापडला नाही. अचानक एका सैनिकाच लक्ष त्या छोट्या पिरॅमिड कडे गेल. तो सैनिक हळूहळू त्या पिरॅमिडच्या दिशेने सरकू लागला. तो सैनिक त्या पिरॅमिड जवळ येऊन पोहोचला. अभिजीत आपला श्वास रोखून गुपचुप त्या कोपऱ्यात बसला होता. तो सैनिक भगदाडाच्या आत बघणार इतक्यात त्या सैनिकाला मागून वजीर होरेमहेबचा आवाज आला. तो सगळ्या सैनिकांना तिथून निघण्याचा आदेश देत होता. हळूहळू ते सगळे तिथून गेल्यानंतर अभिजीतने सुटकेचा निःश्वास सोडला आणि तिथून बाहेर पडला. आता मात्र अभिजीतला वेळ वाया घालवून चालणार नव्हतं. तो आज वाचला म्हणून उद्याही वाचेल याची शक्यता नव्हती. केव्हा तरी तो पकडला जाईलच. त्याआधी त्याला अॅंड्र्यूने नेमून दिलेले काम पूर्ण करावे लागेल. पण त्याच्या कडे फक्त ते 3 डायमेन्शनल पॉकेट होते, ज्यात कोणते गॅजेट्स आहेत, त्यांचा उपयोग कसा करायचा याबद्दल त्याला काहीही माहिती नव्हती. अभिजीतने सहज त्या पॉकेट मध्ये हात घातला आणि जेव्हा त्याचा हात बाहेर आला तेव्हा त्याच्या कागद होता. त्याने तो कागद उलगडला. ते भलंमोठं मॅन्युअल होत. ज्यात त्या पॉकेट मध्ये कोणकोणते गॅजेट्स आहेत, ते कुठे आणि कसे वापरायचे याबद्दल संपूर्ण माहिती होती. या घटनेमुळे अभिजीतला अॅंड्र्यूने सांगितलेली एक गोष्ट आठवली, 


'आपल्याला जी वस्तु हवी असते ती या पॉकेट मध्ये हात घातल्या बरोबर लगेच मिळते.' 


अभिजीतने बाविसाव्या शतकातील हे पॉकेट बनवणाऱ्या शास्त्रज्ञांना मनोमन सलाम केला. आता त्याचे पुढील लक्ष्य होते, डेड सी स्क्रॉल्सचा शोध. पण त्याची सुरुवात कुठून करावी याबद्दल त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले होते. खूप विचार केल्यावर त्याला आठवले कि गिजा मध्ये तीन प्रमुख पिरॅमिड्स बांधले होते. पहीलं होतं, द ग्रेट पिरॅमिड ऑफ खुफू, दुसरं पिरॅमिड ऑफ खाफ्रे आणि तिसरं पिरॅमिड ऑफ मेनकाऊरे. त्यापैकी पिरॅमिड ऑफ खुफू मध्ये त्यांना काहीच सापडले नव्हते. आता पाळी होती पिरॅमिड ऑफ खाफ्रेची. अभिजीतने आपल्या खिशातून ते गोल डिव्हाईस काढलं. त्यात त्याने मॅप ओपन केला. पिरॅमिड ऑफ खाफ्रे पिरॅमिड ऑफ खुफू पासून जवळच होते. मॅपच्या निर्देशानुसार तो पिरॅमिड ऑफ खाफ्रेच्या दिशेने चालू लागला. 



                     काही वेळातच तो त्या ठिकाणी जाऊन पोहोचला होता. पिरॅमिड ऑफ खाफ्रे पिरॅमिड ऑफ खुफू पेक्षा थोडं छोटं होत. तसच ते कमी उंचीवर बांधलं होतं. अभिजीत पिरॅमिडच्या प्रवेशद्वारावर येऊन पोहोचला. प्रवेशद्वारावर कोणीही पहारेकरी तैनात नव्हता. तो हळूच आत गेला. या पिरॅमिड मध्येही मागच्या प्रमाणे चेंबर्स होते. अभिजीतने सर्वात आधी तो माहीतीचा कागद काढला. त्याने तो पूर्ण कागद वाचून काढला. त्यामुळे आता त्याला त्याच्या जवळील 3 डायमेन्शनल पॉकेट मधील सर्व गॅजेट्सची पूर्ण माहिती झाली होती. त्याने तो कागद खिशात ठेवला. आता त्याने आपल्या हातातील त्या गोल डिव्हाईस वर नजर टाकली. त्याच्यात पिरॅमिडचा पूर्ण नकाशा दिसत होता. त्यात दोन हिरवे ठिपके होते.  दोन हिरवे ठिपके? पण कस? अभिजीत विचारात पडला. कारण एक हिरवा ठिपका म्हणजे अभिजीत स्वत: होता. पण दुसऱ्या हिरव्या ठिपक्याचा अर्थ काय? अचानक अभिजीतच्या डोक्यात प्रकाश पडला. याचा अर्थ प्रोफेसरही याच पिरॅमिड मध्ये कुठेतरी आहेत. अभिजीतच्या जीवात जीव आला होता. आता लवकरात लवकर प्रोफेसरांना शोधायला हवं. असा विचार करून त्याने पुन्हा एकदा त्या नकाशावर नजर टाकली. त्यात एकही लाल ठिपका दिसत नव्हता. म्हणजेच या पिरॅमिड मध्ये एकही पहारेकरी तैनात नव्हता. यामुळे तो आपलं काम आरामात करू शकणार होता.  प्रोफेसरांच लोकेशन हे अभिजीतच्या लोकेशन पासून बरंच दूर होत. पण नकाशाच्या मदतीने तो आरामात त्यांच्यापर्यंत पोहोचु शकत होता.



                                इकडे स्पेस शिप मध्ये कॅप्टन गिनयू आणि स्पोपोविच बोलत बसले होते.



कॅप्टन गिनयू: स्पोपोविच, मला काही कामानिमित्त आपल्या ग्रहावर  जावं लागणार आहे. त्यामुळे मी परत येईपर्यंत येथील सर्व काम तुझ्या वर सोपवतो आहे. लक्षात ठेव, या पिरॅमिड्स मध्ये आपल्या प्लॅनचा सर्वात मोठा हिस्सा आहे. याच्या संरक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे. 



स्पोपोविच: तुम्ही काहीच चिंता करू नका कॅप्टन. मी जिवंत असेपर्यंत आपला प्लॅन कोणीच बिघडवू शकत नाही.



कॅप्टन: गुड, तीच आशा आहे तुझ्या कडून.



अचानक कॅप्टन गिनयूच लक्ष आपल्या स्पेस शिप मधील कॉम्प्युटर वर पडलं. ते कॉम्प्युटर इजिप्त मधील  पिरॅमिडशी जोडलेले होते. त्यामुळे पिरॅमिड मधील प्रत्येक चेंबरच फूटेज त्या कॉम्प्युटर वर दिसत होते. अशाच एका कॅमेऱ्यात कॅप्टन गिनयूला अभिजीत दिसला. तिकडे इशारा करून त्याने स्पोपोविचला विचारलं,



"तो अभिजीत तिथे काय करतोय रे?"



स्पोपोविचने त्या कॅमेऱ्यात बघितलं आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर भय दिसु लागल.



स्पोपोविच: काय? हा तिथे कसा पोहोचला?



कॅप्टन गिनयू: म्हणजे? काय म्हणायचंय तुला?



स्पोपोविच: कॅप्टन, याच पिरॅमिड ऑफ खाफ्रे मध्ये मी त्या म्हाताऱ्याला कैद करून ठेवले आहे.



कॅप्टन गिनयू: काय? अरे मी सांगितलं होतं ना तुला कि त्या म्हाताऱ्याला मारून टाक म्हणून.



स्पोपोविच: हो कॅप्टन, मी त्याला मारणारच होतो. पण अचानक तुमचं तातडीच बोलावणं आलं. म्हणून त्याला कैद करून ठेवले होते. पण तुम्ही चिंता करू नका. हा अभिजीत जरी त्या म्हाताऱ्यापर्यंत पोहोचला, तरी त्याला सोडवू शकणार नाही. कारण मी म्हाताऱ्या भोवती कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे.



कॅप्टन गिनयू: नाही स्पोपोविच नाही. तु या पृथ्वीवरील मानवांना दुर्लक्षित करू शकत नाहीस. त्यांच्या कडेही बुध्दी नावाचा प्रकार आहेच आणि त्या बुध्दीच्या बळावर ते कोणतीही लढाई जिंकू शकतात. तेव्हा आता तु जास्त उशीर करू नकोस. तिथे जा आणि त्या दोघांचाही खात्मा कर. म्हणजे आपल्या मार्गातील सगळे अडथळे दूर होतील. आपण आधीच त्या अॅंड्र्यूचा काटा काढला आहे.



स्पोपोविच: समजलं कॅप्टन, आता जातो आणि त्यांचं काम तमाम करतो.



असं म्हणून स्पोपोविच निघाला.



                                  इकडे अभिजीत या नकाशाच्या मदतीने त्या चेंबर जवळ येऊन पोहोचला होता, जिथे तो नकाशा प्रोफेसरांच लोकेशन दाखवत‌ होता. त्या चेंबरचा दरवाजा बंद होता. अभिजीतने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या दरवाज्याला कडी  कुलूप काहीच नव्हते. त्यामुळे अभिजीतला समजत नव्हते कि हा दरवाजा  कसा उघडायचा. अचानक त्याला काहीतरी आठवलं. त्याने  3 डायमेन्शनल पॉकेट मध्ये हात घातला आणि जेव्हा त्याने हात बाहेर काढला तेव्हा त्याच्या हातात एक बॉक्स होता. त्या बॉक्सचे झाकण उघडले. तेव्हा त्यात ४ गोळे होते. हे तेच गोळे होते ज्यांचा वापर अॅंड्र्यूने केला होता. अभिजीतने ते मॅन्युअल वाचल्यामुळे त्याला सुध्दा या सगळ्या गोष्टींची माहिती झाली होती. अभिजीतने त्या गोळ्याच्या खालचे बटन दाबले आणि तो गोळा त्या चेंबरच्या दरवाज्यासमोर ठेवून तो दूर कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. तो गोळा चमकायला लागला आणि काही क्षणातच एक कानफोडू आवाज झाला. त्या चेंबरच्या दरवाज्याचे चिथडे उडाले होते. अभिजीत हळूच त्या चेंबर मध्ये शिरला. अभिजीतने चारही बाजूंना आपली नजर फिरवली. त्या चेंबर मध्ये विशेष काहीच नव्हतं. अचानक कोपऱ्यात एक काचेची मोठी पेटी त्याला दिसली. तो त्या पेटीच्या आणखी जवळ आला आणि त्याच्या काळजात धस्स झालं. त्या पेटीत प्रोफेसर बेशुद्धावस्थेत पडलेले होते. अभिजीतने जोरजोरात पेटी बडवून प्रोफेसरांना आवाज दिला. पण त्याचा काही उपयोग नव्हता. अचानक एक आवाज ऐकू आला,



"जिवंत आहे तो म्हातारा अजुन."



अभिजीतने मागे वळून पाहिले. तो आवाज स्पोपोविचचा होता. तो त्या चेंबरच्या दरवाज्यातून आत आला. स्पोपोविचला पाहताच अभिजीतच्या तळपायाची आग मस्तकात गेली. 



अभिजीत: काय केले आहेस तु प्रोफेसरांसोबत?



स्पोपोविच: सांगितलं ना कि जिवंत आहे तो अजुन. हा पण लवकरच मरेल तो आणि त्याच्या सोबत तुही मरशील.



अभिजीतच्या संयमाचा बांध फुटला. त्याने स्पोपोविच वर झेप घेतली. पण स्पोपोविचने हाताच्या एका फटक्यात अभिजीतला दूर फेकल. स्पोपोविच अभिजीत पेक्षा कितीतरी पटीने जास्त ताकदवान होता. त्याच्या सोबत सरळ लढाईत आपण जिंकू शकत नाही. हे अभिजीतला समजून चुकले होते. 



स्पोपोविच: काय झालं? मला मारणार होतास ना तु? एकाच फटक्यात पडला? मुर्खा, माझ्यासमोर तु एका छोट्या किड्या समान आहेस. क्षणात तुला चिरडू शकतो मी. हाहाहा.



असं म्हणून स्पोपोविच हळूहळू अभिजीतच्या दिशेने चालू लागला. अभिजीतने आपल्या पॉकेट मध्ये हात घातला आणि लेजर गन बाहेर काढली. स्पोपोविच जागीच थबकला. आता हसण्याची पाळी अभिजीतची होती. त्याने लेजर गन स्पोपोविच वर रोखली.



अभिजीत: मी तुझ्याशी ताकदीने जिंकू शकत नाही म्हणून काय झालं. हे शस्त्र तर आहे ना माझ्याकडे. या लेजर गनने मारेल मी तुला.



अभिजीतच बोलणं ऐकून स्पोपोविच जोरजोरात हसायला लागला.



स्पोपोविच: असं. तु मला मारशील? बघ हं. पुन्हा एकदा विचार कर. जर मला थोडी सुध्दा इजा झाली, तर तुझा म्हातारा जीवानिशी जाईल.



अभिजीत: काय?



स्पोपोविचने एक वस्तू काढली. तीचा आकार लांब होता. आणि त्यावर विविध रंगांचे काही बटन होते. ती वस्तु अभिजीतच्या समोर धरत स्पोपोविच म्हणाला,



"ती काचेची पेटी आहे ना त्याच रिमोट कंट्रोल आहे हे. याच बटन दाबताच  त्या काचेच्या पेटीच्या आत करंट उतरत आणि त्या काचेच्या पेटीत जो कोणी असेल, त्याला जबरदस्त शॉक बसतो. ट्रेलर बघायचाय का?"



अस म्हणून स्पोपोविचने रिमोटवरील हिरव्या बटनावर बोट ठेवले, इतक्यात अभिजीत ओरडला,



"थांब, थांब. प्रोफेसरांना काही करू नकोस. हे घे."



असं म्हणून अभिजीतने हातातील लेजर गन खाली फेकली. स्पोपोविचने ती लेजर गन आपल्या ताब्यात घेतली आणि अभिजीत वर रोखली आणि म्हणाला,



"आता तुम्हा दोघांना मृत्यू पासून कोणीही वाचवू शकत नाही. त्या अॅंड्र्यूने माझ्या भावाला मारल होत. आता मी त्याचा बदला घेईल. सर्वात आधी तुझ्या डोळ्यांसमोर मी त्या म्हाताऱ्याला मारेल आणि मग तुझा खात्मा करेल. तेव्हाच माझा बदला पूर्ण होईल."



असं म्हणून स्पोपोविच प्रोफेसरांच्या दिशेने चालू लागला. अभिजीतला आता लवकरात लवकर काहीतरी करणं भाग सर्वात आधी स्पोपोविच कडून ते रिमोट कंट्रोल हस्तगत करण गरजेच होतं. त्याच्या डोक्यात विचारचक्र चालू झालं आणि अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने आपल्या पॉकेट मध्ये हात घातला आणि एक वस्तू बाहेर काढली. शॉक गन. अभिजीतने नेम धरून ती शॉक गन स्पोपोविचच्या दिशेने रोखली आणि चाप दाबला. तत्क्षणी विजेची एक रेषा निघाली आणि स्पोपोविचला लागली. त्याला जोराचा शॉक बसला. तो जिवाच्या आकांताने ओरडला. त्याच्या हातातील रिमोट आणि लेजर गन खाली पडली. अभिजीतने त्या दोन्ही वस्तू उचलल्या. स्पोपोविच वेदनेने विव्हळत जमिनीवर पडला होता. अभिजीत स्पोपोविचच्या जवळ आला आणि लेजर गनची नळी त्याच्या डोक्यावर ठेवून म्हणाला,



"आता बऱ्याबोलाने सांग. प्रोफेसरांना इथून बाहेर कसं काढायचं. नाहीतर जिवानिशी मरशील."



अभिजीतच्या या धमकीचा स्पोपोविच वर काहीच परिणाम झाला नाही. तो हसत म्हणाला,



"तु विचारलं आणि मी सांगितलं. इतका मुर्ख वाटलो का रे मी तुला. मी मरून जाईन. पण तुला सांगणार नाही. आता तो म्हातारा तिथेच राहील. हा. जर तुझ्यात दम असेल तर बाहेर काढून दाखव त्याला."



अभिजीतने त्या रिमोट कडे बघितले त्याच्यावर बरेच बटन होते. पण काचेची पेटी उघडायच बटन कुठे असेल याचा तो विचार करत होता. बराच वेळ तो त्या रिमोटच निरिक्षण करत राहिला. मात्र त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याची ही गोंधळाची स्थिती बघून स्पोपोविच आणखीन जोरात हसायला लागला.



स्पोपोविच: काय झालं? काही सुचत नाहीये का? आणि सुचणार तरी कसं? आमच्या महान कॅप्टन गिनयूंच इन्व्हेंशन आहे ते. असं कोण्याही येड्यागबाळ्याच काम नाही ते समजावून घेण. 



अभिजीत: जब घी सीधी उंगलीसे ना निकले तो उंगली टेढी करनी पडती है| और अगर टेढी उंगलीसे भी घी ना निकले तो घी का डब्बाही फोड दो|



स्पोपोविच: काय? काय म्हणालास?



अभिजीतने हसून स्पोपोविच कडे बघितलं. अभिजीतने हातातलं रिमोट खाली फेकल आणि आपला उजवा पाय त्या रिमोट वर पूर्ण ताकदीनिशी जोरात देऊन मारला. त्याच बरोबर रिमोटने तुकडे झाले आणि ती काचेची पेटी उघडली गेली. प्रोफेसर स्वतंत्र झाले होते. स्पोपोविच आ वासून सगळं बघत होता. त्यावेळी त्याला कॅप्टन गिनयूने सांगितलेली गोष्ट आठवली,



"तु या पृथ्वीवरील मानवांना दुर्लक्षित करू शकत नाहीस. त्यांच्या कडेही बुध्दी नावाचा प्रकार आहेच आणि त्या बुध्दीच्या बळावर ते कोणतीही लढाई जिंकू शकतात."



स्पोपोविचला कॅप्टन गिनयूच्या म्हणण्याचा खरा अर्थ आता कळला होता. अभिजीत स्पोपोविच जवळ येऊन उभा राहिला.



अभिजीत: माझं काम झालंय. तेव्हा आता तुझा जिवंत राहून काही फायदा नाही. हा पण एका गोष्टीची खंत नक्की असेल मला. तु तुझ्या डोळ्यांनी तुझ्या त्या कॅप्टन गिनयूच साम्राज्य उध्वस्त होतांना बघू शकणार नाहीस.



असं म्हणून अभिजीतने लेजर गन स्पोपोविचच्या डोक्याला लावली आणि चाप दाबला. लेजर गन मधून लेजर किरण निघून ते स्पोपोविचच्या डोक्याच्या आरपार झालं. स्पोपोविच गतप्राण झाला. अभिजीतने लेजर गन पॉकेट मध्ये ठेवली. आणि प्रोफेसरांजवळ पोहोचला. प्रोफेसरांनीही डोळे उघडले. अभिजीतने त्यांना मिठीच मारली. क्षणभर त्यांना काहीच समजत नव्हतं. अचानक त्यांच लक्ष स्पोपोविचच्या मृतदेहावर पडलं. त्यासरशी त्यांना एकेक गोष्ट आठवली. त्यांनी अभिजीतला बेशुद्ध पडतांना पाहील होतं. पण त्यानंतर मात्र त्यांना काही आठवत नव्हतं. त्यानंतरच घडलेल सगळं अभिजीतने त्यांना सांगितले. अॅंड्र्यूच्या मृत्यू बद्दल ऐकून प्रोफेसरांना दु:ख झालं. मात्र लगेच त्यांनी स्वत:ला सावरलं.



प्रोफेसर: आता ही वेळ दु:ख करत बसण्याची नाही अभिजीत. आपल्याला आणखी वेळ घालवून चालणार नाही. आता फक्त कॅप्टन गिनयूच नाही तर तुतनखामेनचे सैनिक सुध्दा आपल्या मागावर आहेत. तेव्हा आता लवकरात लवकर डेड सी स्क्रॉल्स शोधून कॅप्टन गिनयूचा प्लॅन आपल्याला हाणून पाडावा लागेल. नाहीतर अॅंड्र्यूच बलिदान व्यर्थ जाईल.



अभिजीत: तुम्ही बरोबर बोलत आहात प्रोफेसर.पण पहीले आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल.



असं अभिजीत प्रोफेसरांना घेऊन चेंबर मधून बाहेर पडला.



                

                                                                      क्रमशः


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel