गाय ही भारतवर्षाची मायमाउली, गायीने भारताला वाढवले; भारताला चढवले. वेदकालापासून ऋषीमुनींनी गायींची थोरवी ओळखली; तिचा महिमा वाढवला. तिची गीते त्यांनी गाइली. तिची सुरपति-नरपतींनी पूजा केली. परंतु आज स्थिती पालटली आहे. गायींची उपासमार होत असून म्हशींची पूजा होत आहे. सारे पारडे फिरले आहे. आज भारताला स्वत्व नाही. विचार नाही, सदाचार नाही, -म्हणूनच वैभव नाही.
शामराव कुलकर्णी अशा या भारतातल्या एका खेड्यात रहात. पूर्वी घरची स्थिती बरी होती, पण आता खालावली होती. त्यांना दोन मुले; वामन नि रंगू. सुशील पत्नी होती. पडवीत म्हैस होती. एक गाय होती, गायीचे नाव मोरी. तिच्या कपाळावर चांद होता. मोरी गाईची परंपरा मोठी उज्ज्वल. तिची पणजी प्रथम त्या घरी आली. शामरावांच्या आजोबांना ती आवडली. ती वेळेस दहा दहा शेर दूध देत असे. तिचे दहा बैल शामरावांच्या आजोबांच्या घरी राबत होते. तिची मुलगी तांबू मोरीची आई. तांबूवर शामरावांच्या वडिलांचे फार प्रेम असे. शामरावांची आई रोज सकाळी उठून तांबूची पूजा करायची. तांबू मेली तेव्हा शामरावांचे वडील रडले.
मोरीला ते दिवस आठवतात व रडू येते. ती मनाशी विचार करते. बरे झाले आई गेली ती. नाही तर जेथे भालप्रदेशावर मंगल हळदी-कुंकू लावले जात असे, त्याच कपाळावर तडाखे बसले असते. तू गेलीस आई, सुटलीस. पण ते दिवस मला आठवतात ग. तू आनंदाने ग. तू आनंदाने अंग चाटायचीस तेव्हा माझे अंग रोमांचित होई. एक दिवस मी पूजास्तव होईन. आईप्रमाणे कुटुंबाची सेवा करीन. आईची परंपरा सुरु ठेवीन असे माझ्या मनात येई. आई, तू मला मुकेपणाने चाटता चाटता किती शिकवत होतीस! तुझ्या हंबरण्यात किती गंभीर अर्थ असे! तुझ्या दुधातून तू धर्मामृत पाजीत होतीस. पण आज? कसे दिवस मी कंठू?- असे मनात येऊन मोरी रडे! तिचे अश्रू खाली भूमीवर पडत.
मोरीचे वासरु नुकतेच मेले होते. फार कडाक्याची थंडी पडली होती. ठिकठिकाणी पाण्याचे बर्फ झाले होते. पशू-पक्षी मरुन पडले होते. मोरीचे वासरु थंडीने कोप-यात काकडत होते. मोरी दूर बांधलेली. दावे बळकट. साधे असते तर ती ताड्कन तोडून आपल्या बाळाजवळ जाती. त्याला कुशीत ऊब देती, त्याला चाटती, परंतु तिला काही करता येत नव्हते. तिच्यादेखत त्या बाळाचे रक्त गोठून जात होते आणि काही करता येत नव्हते. अरेरे !