दूध काढल्यावर मोरीला सोडायचे. पण महाराने वासरु नेल्यावर सोडायचे ठरले. महार आला व त्याने फरफटत वासरु नेले. मोरीला सोडण्यात आले. अंगणात बाळ असेल, तो पाहीन... असे तिच्या मनात होते. ती धावत अंगणात आली. पण ते तिथे नव्हते. वासरु ठेवण्याची जागा ओळखली. आपल्या वासराच्या अंगाचा वास तिने ओळखला. ती जागा तिने चाटली, तेथे अश्रूंची धार सोडली. स्तनधार सोडली, रस्त्यात बाळाचा वास तिला येत होता. परंतु पुढे येईना. लोकांच्या जाण्यायेण्याने वास निघून गेला. बाळाला पाडण्यासाठी ती रानात भटकली. हंबरली, पण काही नाही. त्या टेकड्या तिला उत्तर देत. जणू ते पहाड, ते पाषाण तिच्या दुःखाची, तिच्या मातृहृदयाची टवाळी करत होते.
दिवसभर तिने काही खाल्ले नाही. परंतु इतक्यात तिच्या मनात विचार आला. रात्री धन्याला दूध नको का शिंपीभर द्यायला ? काही खाल्ले नाही तर दूध कसे येणार अंगावर ? काठ्या बसल्या तरी काठ्या खाऊन दूध निर्माण होत नाही. माझे सत्त्व जाऊल, औषधाला दूध दिलेच पाहिजे. धनी मारो किंवा कुरवाळो. इच्छा नसुनही ती काडी कुरतडू लागली. पोटचा गोळा गेला, त्याचे दुःख दूर सारुन ती काडी खाऊ लागली. सत्त्वशील थोर मोरी ! ज्या भारतवर्षात पशुपक्षीही सत्त्वशील व सत्यनिष्ठ झाले; हरणे, गाई. सत्यपूजक झाली; त्या भारतातील नरनारी पापात, स्वार्थात, लोभात, दंभात असल्याने मिंधेपणात लडबडलेली असावीत काय ? भारतमाते, आज तुझी अब्रू, तुझ्या नद्या, तुझ्या वृक्षवेली, तुझी गायगुरे, तुझी पाखरे थोडीफार राखत असतील तर असतील; तुझे मानवपुत्र तर अगदीच बहकलेले दिसतात.
मोरीपुढे रात्री चारा टाकण्यात येत नसे. “दिवसभर चांगली रानात चरुन येते; तिला कशाला चारा घातलास वामन ?” शामराव घसरा घालायचे. म्हशीपुढे चारा घालण्यात येई. मोरीचे तोंड पुरणार नाही तिथपर्य़ंत ती म्हैस म्हणायची, “घे हो बाई, माझ्यातला थोडा खा. तू शेजारी अगदी उपाशी. मला खाताना वाईट वाटतं.” परंतु मोरी खात नसे. जे अन्न आपल्यासाठी वाढलेले नाही ते ती कशी खाईल ? वाटेल त्याचे गिळंकृत करणारी, स्वाहा करणारी, -माणूस थोडीच ती होती ! ती पडली चार पायांची. दोन पायांच्या सर्वभक्षक नरदेवाची सर तिला कोठून येणार ?
रानात उन्हाळा असल्याने तिला पाणीही मिळत नसे. कोठे चिखलातले चोखून घेता आले तर तेवढेच घ्यावे. रानात चाराकाडीही नव्हती. अन्नाशिवाय तिची उपासमार होतच होती. आता पाण्याविना कंठशोष पडू लागला. दूध तिच्या स्तनातून आता थेंबभरही येत नसे. ‘माझ्या रक्ताच्या बिंदूबिंदूचे दूध करुन स्तनातून दे रे पाठवून.’ अशी गोपाळकृष्णाला मोरी प्रार्थना करी, परंतु गोपाळकृष्णाने ती ऐकली नाही, शामरावही आता मोरीखाली बसतनासे झाले.