मोरीचे गंभीर बोल इतरांच्या हृदयांत खोल गेले, झाडांवर पाखरेसुद्धा ऐकत होती. झाडांनीसुद्धा मनात बंड करायचे आणले होते. हे खाटकाप्रमाणे आपल्याला तोडतात. नवीन वाढ करत नाहीत. पाणी घालत नाहीत. आपणही यांना फळ-फूल देऊ नये. थोडेफार जवळ आहे ते पोटातच जिरुन जाऊ दे. आपण यांच्यासाठी मेघांना बोलवायचे नाही. आपले तरी काय अडले आहे? पण यात केवळ मानवांचा नाश नव्हता. त्यांचाही होता, सृष्टीचा होता. झाडांना मोरीचे शब्द पटले. आपले कर्तव्य आपण सोडता कामा नये. झाडांनी रात्री वा-याबरोबर आपले विचार परस्परांस कळवले. वा-याने सर्वांना एकमेकांची हृद्गते कळवली. तृणाकुरांनी वर येण्याची ठरवले. पाखरांनी गाण्याचे ठरवले. मधमाशांनी मधाची पोळी बांधायचे ठरवले. मानवाला करु दे पाप. आपण सारीजणे किडे-मुंग्या, तृण-वनस्पती, गायी-बैल सर्वांनी पवित्र काम सुरु ठेवावे. तू पाप करुन थकतोस की आम्ही पाप परिहार करुन थकतो ते पाहू या, असे सृष्टीने ठरवले. मोरी गायीचे ते उपनिषद् वा-याने सृष्टीभर नेले, सा-या मानवेतर सृष्टीला मोरी गाईचे प्रवचन धीर देते झाले.

मोरी आपला बळी केव्हा दिला जातो इकडे लक्ष देऊन होती. दिवसभर तर ती रानातच तप करी. रात्री, पहाटे एखादा शब्द तिच्या कानांवर यायचा. पहाटेची वेळ झाली होती. मोरी आपल्या गोठ्यातून आकाशाकडे पाहात होती. सप्तर्षीतील वसिष्ठ, अरुंधीत तिला दिसत होते. वसिष्ठ केवढा गोभक्त! हजारो-लाखो गायी विश्वामित्र त्याला देऊ लागला, तरी त्याने निर्लोभता! मोरीचे हृदय प्रेमाने भरुन ओथंबून आले. तिने वसिष्ठ ऋषीचे अश्रुजलाने तर्पण केले. मोरीचे अश्रू पाहून आकाशातूनही टप टप दवबिंदू अंगणातील निंबावर पडले. वसिष्ठांनी, अरुंधतीने मला पाहिले का? माझ्या आईचा आजीचा तारा तेथे असेल का? त्यांनी अश्रू ढाळले असतील? त्या पवित्र प्रातःकाळी मोरी गाय भक्तिमय झाली होती. कृष्ण भगवानाला ती मुकेपणाने आळवू लागली.

उठा उठा हो श्रीहरी
उठा मुरहर नरहरी।


तव सखी दुखःच्या सागरी
धावे सखया वेगेसी।।

किती विनवू मी कंसारी
धाव सखया झडकरी।

येतो सूर्य उदयावरी
तुही येई भेटावा ।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel