मोरी गाय विकून शामराव घरी परत आले. आपल्या घराचे भाग्य, घराचे मंगल आपण विकून आलो हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. वामनने विचारले, “बाबा, गाय कुठं आहे ?”
“अरे विकली. विकतही कुणी घेईना. शेवटी घेतली बाबा एकानं पाच रुपायांत. घरी आणावी लागते की काय अशी मला भीती वाटत होती.” शामराव म्हणाले.
“बाबा, का हो विकली ? मला फार आवडत असे मोरी.” वामन म्हणाला.
“अरे, इथं ठेवून करायची काय ? उगीच अडगळ. भाकड गायीचा उपयोग काय ?”
अजून उन्हाळा संपला नव्हता. एक दिवस वामनला ताप आला. तो अंथरुणावर पडला. त्याचे लक्षण बरे दिसेना. शामरावांमी वैद्यांचे औषध सुरु केले होते. वामनची आई त्याच्याजवळ रात्रीची बसलेली असे. वामनचा ताप हटण्याचे चिन्ह दिसेना.
“तुम्ही वासरु मारलंत, मलाही मारा. मी जातो. रत्न्या, मी आलो थांब-” असे वामन वातात म्हणे. वामनचे शब्द ऐकून त्याची आई मनात चरके. घाबरे. पोरगा हाती लागत नाही असे तिला वाटे. “मोरी, कुठं आहे मोरी ! चार मो-ये, मला चार” असे वामन बोले.
“मोरी आणता येईल परत ? पोर एरवी काही वाचणार नाही.” वामनरावांना पत्नी म्हणाली.
“अग, कसायला दिलेली गाय का कुठं परत आणता येते ? आणि गाय आणून का पोरगा बरा होणार आहे ? काही तरी बडबडतोय झालं !” शामरावांनी आपल्या बुद्धीवादाने तिची समजूत काढली.
एक दिवस वामन इहलोक सोडून निघून गेला. त्याच्या आईच्या शोकाला पारावार राहिला नाही. मोरी गाय गेली म्हणूनच आपला वामन गेला... असे त्या माऊलीच्या मनात आले.
एक दिवस सारा गाव रात्री झोपला होता. उन्हाळा अती होत होता. शामराव अंगणात झोपले होते. त्यांची पत्नी आत झोपली होती. तिच्याजवळ छोटी रंगू कुशीत होती.