आज रानात मोरीच्या पायात भला मोठा काटा घुसला होता. लंगडत लंगडत ती गोठ्यात आली. पण तिच्याकडे कोण लक्ष देणार ?  रोज लंगडत जाई, लंगडत येई. मोरीला वाटे –आपण मरावे, त्याच गोठ्यात मरायची तिची इच्छा होती. शामरावांना वाटत होते, मोरी गाभण राहिली असेल. परंतु तिची कास वाढती दिसेना. “गाय काही विणार नाही यंदा पावसात.” ते घरात म्हणत होते, “भाकड उनाड झाली. आता विकून टाकू या. बियालाही पैसे नाहीत. बैल दुस-याचे आणून पेरता येईल, पण बी तर हवं ? येतील दहा-पाच रुपये तेवढेच. ही आता काय कामाची ? म्हशीला थोडं जास्त खाणं दिलं तर जास्त दूध विकता तरी येईल.” मोरीच्या कानांवर हे बोलणे एखादे वेळेस पडे. “मला खायला घातलं तर मी नाही का दूध देणार ? माझ्या वासरांना नीट वागवल तर मी नाही का विणार ? माझी अब्रू आता झाकलेलीच राहू दे. आणखी उघड धिंडवडे नको व्हायला. झाली संसाराची शोभा ती पुरे. परंतु मला विकणार ? कुणाला ? खाटकाला विकणार ? या भारतात पूर्वी गायीकडे पाहण्याची थोर दृष्टी होती. त्यांनी मला देवता केलं होतं. माझ्या भावांना नंदी केलं होतं. भारतातील मानवबंधू आज हे विसरले असले तरी जागे होतील. पूर्वजांची पुण्याई पुन्हा चमकेल. आमचा भाग्यकाल येईल. पुन्हा आमच्या कासा भरभरुन येतील. आम्हांला प्रेम पाहिजे आहे. तुम्ही गरीब असाल तर प्रेमाचा चारा द्या, तरीही आमच्या कासेतून दुग्धधारा तडातड फुटतील.”

“नको रे देवा. मला कसायाला नको विकू. पण तोही काही वाईट नाही. रोज हे तिळतिळ मारतात. तो कसाब पुरवला. निदान त्याच्याजवळ दंभ तरी नाही. एकीकडे हे सारे दांभिक आम्हांला छळतात. ना देत पाणी, ना चारा. ना बघतात पायात काटा गेला, की डोळ्यांत काटा गेला. तोंडानं गोमाता म्हणून आम्हांला लाथा मारतात, खाटीक निदान प्रेम दाखवून सुरा काढीत नाही. खाटकाच्या हातचं मरणही थोरच आहे. परंतु नको. मला इथंच पडू दे. ही जागा. इथं माझ्या आई-आजी मेल्या. इथं आई मेली तेव्हा शामरावांचे वडील रडले. तीच जागा. पावित्र्यानं भरलेली. इथंच मला पडू दे देवा. मला नाही रे जगण्याची इच्छा ....छे ! मी कंटाळू ? कष्टास, हालास कंटाळू ? नाही बरं देवा. मी सत्त्वच्युत होणार नाही. तुझी इच्छा असेल तसं कर, गोपाळा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel