रात्री शामराव अंगणात एकदम जागे झाले, घाबरुन “अरे आग, आग; आपलं घर पेटलं. उठा धावा रे, आग, आग !” शामराव ओरडू लागले. पत्नी रंगूसह आली. आग विझवायला पाणी कोठे आहे ? विहीर दूर. घर तर शिलगत चालले. ज्वाला ध़डधडत चालल्या. आग भडकली. शामरावांना घरातील वस्तू काढता येईना. लोकांनी आग विझवायचा प्रयत्न केला. पण व्यर्थ. शामराव आपल्या डोळ्यांनी आपल्या घराची आग पाहत होते. सा-या वस्तूंचा, घरादाराचा होम झाला.
गावातील देवळात शामरावांनी संसार थाटला. पाऊस डोक्यावर आलेला. आता घर कसे बांधता येणार ? दोन-चार दागिने होते ते विकून खायला हवे होते. कसे तरी करुन ते दिवस कंठीत होते.
पाऊस सुरु झाला. लोकांचे पेरे झपाट्याने सुरु झाले. शामरावांच्याजवळ ना नांगर, ना बैल. लोकांजवळ मिंधेपणाने भीक मागावी लागे. देवळात थंडी फार वाजे. एक दिवस लहानग्या रंगूला बरे वाटेना. तिला ताप आला. कोवळी पोर तापाने भाजून निघाली. शामराव तरी काय करणार ? त्यांची पत्नी रडे. एक दिवस रंगूही निघून गेली. शामरावांच्या पत्नीच्या डोळ्यांची धार आता खळेना. एखादा सण आला की पोरांची आठवण यायची !
पावसाळा संपला. शामरावांनी झोपडे बांधले. देवळातला संसार एका शुभमुहुर्तावर घरात आला. परंतु आता कर्ज झाले होते. शामरावांच्या पत्नीने, सावित्रीबाईंनी नथही विकायला दिली. सावित्रीबाईंना स्वस्थ वाटत नसे. त्यांच्या जीवाला टोचणी –हुरहूर असे. गावात कोणी स्वयंसेवक येऊ लागला. तो सूत कातायला शिकवी. वेळ फुकट दवडू नका सांगे. त्याच्यापासून त्यांनी एक चरखा घेतला, त्या सूत कातू लागल्या. वेळ मिळताच सावित्रीबाई चरख्यावर बसत. त्यांना तो चरखा आधार वाटे.
दसरी-दिवाळी गेली. संक्रात गेली. शिमगा जवळ आला. कसा तरी संसार चालला होता. सावकरांचा ससेमिरा होता. शामराव विवंचनेत असत. पुन्हा देवळात जावे लागेल की काय?
एक दिवस शामराव घरी आले, तो सावित्रीबाई अंथरुणावर. त्यांना कधी ताप येई, कधी अती मस्तक दुखे. त्यांना करमेना.