इंग्रजी अमदानीत पाश्चात्य जगाशी, अर्वाचीन संस्कृतीशी भारताचा संबंध आला. चीन आणि हिंदुस्थान दोन प्राचीनतम राष्ट्रे. परंतु घरातच स्वयंतृप्त राहिल्यामुळे ज्ञानविज्ञानांत मागे राहिली. दीडदोन हजार वर्षांपूर्वी गोबीची वाळवंटे ओलांडून हिंदी पंडित चीनमध्ये बुद्ध धर्म घेऊन गेले. चिनी भाषा शिकून तिच्यात त्यांनी संस्कृत ग्रंथ अनुवादले. भारतीय तत्त्वज्ञ आणि भारतीय व्यापारी दशदिशांत जात होते. परंतु ती स्फूर्ती, ते साहस सारे लोपले आणि आपण घरकोंबडे बनलो. युरोप पुढारले. तो वास्को द गामा, अटलांटिका नि हिंदी महासागर ओलांडून येतो. तो कोलंबस तिकडे पॅसिफिक ओलांडतो. चालले जगभर युरोपचे धाडसी नावाडी. प्रचंड दर्यावर चिमुकली गलबते घेऊन जाताहेत.
हिंदूस्थानात युरोपियन लोक येऊ लागले. पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज आले. युरोपातील भांडणे घेऊन इकडे आले. त्या भांडणांत शेवटी इंग्रज विजयी झाले. हिंदुस्थानात ब्रिटीश सत्ता आली. नवसंस्कृतीशी भारतीय संस्कृतीचा संबंध आला. नवीन शिक्षणपद्धती आली. नवी विद्यापीठे स्थापन झाली. छापखाने सुरु झाले. १८४८ मध्ये पुण्याचा ज्ञानप्रकाश सुरु झाला. लोकहितवादी लिहू लागले. नवीन युग आले.
आपल्याकडे तर लहानपणीच लग्ने होत. परंतु मुलगे थोडेफार शिकू लागले. मुलीचे काय ? इंग्रजी शिकणे अवश्य, तरी अधर्मरुप वाटे. इंग्रजी शब्द घोकायला दूर जाऊन बसावे लागत असे. इंग्रजी शाळेतून आल्यावर बाहेर बसवून डोक्यावर पाणी ओतून मग घरात घेत, अशी स्थिती होती. अशा काळात पुण्यात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी अस्पृश्यांच्या मुलींसाठी छात्रालय काढले. अजून ब्राह्मणांच्या मुलीही शाळेत जाऊ लागल्या नव्हत्या तो ज्योतिबांची केवढी धडाडी ! शिक्षणाशिवाय मागासलेला समाज पुढे येणे कठीण आणि स्त्रिया सुशिक्षित होत नाहीत तोवर सारेच फोल.
त्या काळात एक नाव डोळ्यांसमोर ठसठशीतपणे उभे राहते. पंडिता रमाबाईंचे नाव. अनेक आपत्तींपासून त्या नि त्यांचे कुटुंब गेलेले. त्या संस्कृतमध्ये सुंदर बोलत. कलकत्त्यात त्यांनी संस्कृतमध्ये खूप भाषणे केली. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे, म्हणून कोण त्यांची तळमळ ! परंतु महाराष्ट्रात त्यांचा उपहास होऊ लागला. पंडिता रमाबाईंची अपार महत्त्वाकाक्षा. महाराष्ट्रीय भगिनींना ज्ञानदान देण्याची त्यांना केवढी तळमळ. परंतु स्वधर्मात राहून हे करता येईल असे त्यांना दिसेना ! कोण देणार पैसा, कोण देणार आधार? ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर पैसा मिळेल, सरकारी आधार मिळेल, असे त्यांना वाटले. परंतु तेथे हिंदी स्त्रिया येणार कशा ? ते त्यांच्या लक्षात आले नाही. शारदासदन संस्था त्यांनी स्थापिली. त्यांचा उपहास झाला. पंडिता रमाबाई अमेरिकेत गेल्या. तिकडे त्यांनी व्याख्याने दिली. परधर्मात जाऊन स्वकीयांची सेवा करणे कठीण होते. समाजात राहूनच सेवा करता येईल. समाजाचे शिव्याशाप खातच सेवा करीत राहिले पाहिजे. कोणावर रागवता, रुसता ? आपलेच ओठ नि आपलेच दात.