परंतु स्त्रियांचे शिक्षण असे वाढू लागले, तरी खरी दृष्टी त्याच्या पाठीमागे नव्हती. अजूनही नर्सिंगचा कोर्स घेतला तर लग्न व्हायला अडचणी येतील, असे आईबापांना वाटते, पालकांना वाटते. लग्नासाठी सारे, अशीच वृत्ती आहे. मुलांना शिकवताना त्याचे लग्न व्हायचे आहे ही भावना नसते. मुलींना शिकवताना ती असते. “न शिकेल तर लग्न कसे होईल ?” असे म्हणतात. लग्नासाठी शिकायचे. स्त्रियांनी का शिकावे ? कोण म्हणतील, “लग्न व्हायला अडचण येऊ नये म्हणून.” दुसरे म्हणतील, “हिशेब ठेवील, दुकानातून माल आणील. धोब्याला कपडे किती दिले वगैरे लिहून ठेवील.” आणखी कोणी म्हणतील, “पतीबरोबर वादविवाद करील. काव्यशास्त्रविनोद करील. कलात्मक व साहित्यिक आनंद उपभोगायला पतीला बाहेर नको जायला. आपली बायको भुक्कड, नुसती चूल फुंकणारी, असे त्याला नको वाटायला.” अशा या नाना दृष्टी असतात. परंतु यांतील एकही खरी नाही. स्त्रियांनी का शिकावे ? त्यांना आत्मा आहे म्हणून, त्या मानव आहेत म्हणून. शिक्षणाचा इतर काय उपयोग व्हायचा असेल तो होईल, परंतु स्वतःच्या विकासासाठी शिकायचे. देहाला भाकरी हवी तशी मनाला विचाराची भाकर हवी. स्त्रियांची मनोबुद्धी का उपाशी ठेवायची ? ही दुष्टी शिक्षण घेणार्या स्त्रियांत नव्हती, त्यांना शिक्षण देणार्यां मध्येही क्वचित असे.
इंग्रजी शिकलेल्यांची जशी एक स्वतंत्र जात झाली, तशीच सुशिक्षीत स्त्रियांचीही होऊ लागली. साहेबी पोषाख करावा, नटावे, मुरडावे, असे सुशिक्षित पुरुषांस वाटे, तसेच सुशिक्षित स्त्रियांना वाटे. सुशिक्षीत स्त्री-पुरुष परदेशी मालाच्या जिवंत जाहिराती असत ! स्वदेशी, परदेशी विचारच आमच्याजवळ नसे. देशी जनतेजवळ जणू संबंध राहिला नाही. आपल्याच कोट्यावधी बंधूंना तुच्छ मानणे हा आमच्या शिक्षणाचा परिणाम झाला. पुष्कळ वर्षापूर्वी एकदा एक मित्र मला म्हणाले, “मी आगगाडीतून प्रवास करताना टॉमीचा पोषाख करतो. डोक्यावर हॅट, हातात छडी, शॉर्ट खाकी पॅंट ; मग मला नेहमी जागा मिळे !” असे करण्यात सुशिक्षितांना प्रतिष्ठा वाटे. पुरुषांपेक्षा स्त्रियांत सजण्याची वृत्ती अधिकच असते. सुशिक्षित स्त्रियांचे समाज म्हणजे परदेशी मालाची प्रदर्शने वाटत !