२० ते ३० साल या काळात ठायी ठायी आश्रम निघाले. आश्रमवासीयांच्या पत्नीही त्यांत सामील झाल्या. अनेक भगिनींना सेवेची, साधेपणाची दीक्षा मिळाली. शिक्षणात संस्कृती येऊ लागली, लोकमान्य टिळक म्हणत, “जो दुस-याच्या सुख दुःखाचा विचार करु लागला, तो शिकला.” ते खरे शिक्षण स्त्रियांना मिळू लागले. आणि महात्माजींचा मिठाचा सत्याग्रह आला. भारतीय नारीही सरसावल्या. दारुच्या दुकानांवर, परदेशी मालावर निरोधन करायला त्या उभ्या राहिल्या. मिठाचा कायदा तोडू लागल्या. जंगलचे कायदे तोडू लागल्या. महर्षी कर्वे जगाची यात्रा करुन मुंबईस आले होते. पोलिसांच्या लाठयांना न भिता, स्त्रिया ‘नही रखनी नहीं रखनी, जालिम सरकार नही रखनी’ गाणे म्हणत बेकायदा मीठ करायला जात होत्या. अण्णा म्हणाले, “ते दृश्य पाहून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले !” स्त्रियांनी शिकावे असे अण्णांना का वाटे ? केव्हा त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटणार होते ? लहान संसार सो़डून त्या मोठया संसारातही पडतील तेव्हा. स्वतःचा संसार राष्ट्राच्या जीवनाशी, मानवजातीच्या जीवनाशी जोडतील तेव्हा. हिंदूस्थानभर स्त्रियांनी ३० नि ३२ साली अपूर्व तेज प्रकटविले. धारासना येथे उन्हात सरोजिनीदेवी सत्याग्रहात बसल्या होत्या. बोरसद येथे गु़डघे रक्तबंबाळ झाले तरी रस्त्यातून स्त्रिया उठल्या नाहीत. मुलींनी लाठीमार सहन करीत प्रभात फेर्या काढल्या. अनेक ठिकाणी मुलींनी झेंडे लावले. खेडयापाडयांपर्यंत ही चळवळ गेली. सत्याग्रहींचा सत्कार करण्यात येई. त्यात स्त्रियाही सामील होत. आरत्या ओवाळीत. तिकडे बोर्डोलीच्या लढयाच्या वेळेस सरदार म्हणायचे, “स्त्रियांनाही सभेला आणा. मग मी बोलेन. तुम्हांला पकडून नेले तर त्यांना लढावे लागेल.” देशभर शेकडो स्त्रिया तुरुंगात गेल्या. कलकत्त्याला स्त्रियांना मोटारीतून घालून पोलिसांनी रानात नेऊन सोडले. परंतु त्या भ्यायल्या नाहीत.
फैजपूर काँग्रेसच्या वेळेस महाराष्ट्रातून शेकडो भगिनी सेवादल सैनिक होऊन आल्या. पुण्याला त्या वेळेस त्यांचा उपहास करण्यात आला. खानदेशातील भगिनींनी गावोगाव काँग्रेस प्रचार केला. पायात न घालता प्रचार केला. गीताबाई झेंडावंदनास दहा मैल पायी जात. किती तरी भगिनी देशप्रेमाने पेटल्या होत्या. नवर्यांना पसंत पडेना. तेव्हा काडीमोडीही जातीच्या नियमाप्रमाणे झाल्या. परंतु भगिनींनी आत्मस्वातंत्र्य सांभाळले. पुढे काँग्रेसची मंत्रिमंडळे आली. स्त्रियांचे साक्षरतेचे वर्ग सुरु झाले. खानदेशातील खिरोदे गावी पाऊनशे बायका रात्री शिकायला जमत. दिवसा शेतात काम करीत. अमळनेरला एक ७० वर्षांची वृद्ध माता म्हणाली, “मला शिकायचे आहे.” राजेंद्रबाबू महाराष्ट्रात दौर्यावर होते. अमळनेर तालुक्यातील नांदेड गावी पुरुषांपेक्षा थोड्या अधिकच स्त्रिया असतील सभेला. शेकडो स्त्रिया. राजेंद्रबाबू म्हणाले, “असे दृश्य शहरांतही मी पाहिले नाही.” स्वातंत्र्याची चळवळ सत्याग्रह, आश्रम, अनेक गोष्टींमुळे. खालच्या थरापर्यंत जागृती गेली. हरिजन भगिनींतही त्यांच्या सत्याग्रहामुळे चैतन्य आले. नाशिकच्या राममंदिर सत्याग्रहात हरिजन भगिनी तुरुंगात आल्या ! महात्माजींच्या सभेला हजारो भगिनी जमायच्या. सामुदायिक प्रार्थना भगिनी चालवायच्या. स्वातंत्र्याच्या लढयाने ब्रिटीशांची गुलामगिरी जात होतीच; परंतु घरच्या गुलामगिरीचेही पाश तुटत होते.