आणि ४२ चा ‘चले जाव’ लढा आला. भारतीय नारींनी बलिदान केले. तो अश्रूंचा नि रक्ताचा इतिहास आहे. चिमूरला कोण विसरेल ? चिमूरहूनही भीषण अत्याचार रामनंद जिल्ह्यात झाले. कोण विसरेल त्या गोष्टी ? स्त्रिया निर्भय झाल्या होत्या. पोलीस झडतीला आले तर “बघ मेल्या घरात आहे का ?” म्हणत. शेकडो स्त्रिया तुरुंगात होत्या. लहान मुली मिरवणुका काढीत. मामलेदाराने अडवले तर म्हणत, “चले जाव. तुमची सत्ता संपली.” नाशिकला एक गोरा सार्जंट रस्त्यावरुन जाऊ देत नव्हता. एक माळीण आली व “जा रे टोपडया” म्हणत निघून गेली. सार्जंट बघतच राहिला. आणि समाजवादी पक्षाच्या सरकारने सोडले. परंतु देवाघरी गेल्या. श्रद्धानंदांच्या त्या कन्या. त्यांचा त्याग, ज्वलंत वाणी, कोणी विसरेल ? असा हा देशभराचा इतिहास.

आणि तिकडे नेताजींच्या आझाद हिंद फौजेत मुली दाखल झाल्या. बंदुका घेऊन हिंडू लागल्या. कॅप्टन लक्ष्मीचे नाव कोणाला माहीत नाही ? २६ तास बाँब-वर्षाव होत असता त्या जखमी शिपायांची शुश्रूषा करीत राहिल्या. नेताजींनी अद्भुत केले.

आज देश स्वतंत्र आहे. आणि देवी सरोजिनी संयुक्त प्रांताच्या गव्हर्नर झाल्या. विजयालक्ष्मी वकील म्हणून गेल्या. हंसा मेहता जागतिक हक्कांच्या सनदेसाठी विचारविनिमयार्थ गेल्या. मध्य-प्रांतातील श्री. अनसूयाबाई काळे यांनी चिमूरबाबतीत केवढे कार्य केले ! सुचेता कृपलांनी नौखालीच्या आगीत गेल्या नि भगिनींना सोडवित्या झाल्या. मद्रासकडच्या सुब्बालक्ष्मी कोणाला माहीत नाहीत ? कमलाबाई चट्टोपाध्याय तर जगप्रसिद्ध ! कोठवरी नावे लिहायची ? आणि घटनासमितीत चमकणार्‍या चिरसेवक श्रीमती दुर्गाताई जोशी ! राजकीय दृष्ट्याच स्त्रिया पुढे येऊ लागल्या असे नाही, तर सामाजिक सेवेतही पुढे येऊ लागल्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel