देशात स्वराज्याच्या स्वातंत्र्याचे लढे सुरु होते, स्वदेशीच्या काळात ‘देशी बांगडयाच घालू’ म्हणून काही भगिनींनी शपथा घेतल्या. ‘सगळ्यांनी विणलेले गावटी लुगडेच वापरु’ अशा शपथा घेतल्या. लोकमान्य टिळकांमुळे महाराष्ट्रातील पांढररेशा स्त्रियांत थोडीफार जागृती आली. परंतु तात्पुरती. अजून हृदय हलले नव्हते. देशातील नवीन ध्येये स्त्रियांपर्यंत जाऊन पोचली नव्हती.
या सुमारास महात्माजी दक्षिण आफ्रिकेतून आले. दक्षिण आफ्रिकेतील हिंदी स्त्रियांनी नवीन इतिहास लिहिला होता. कडेवर मुले घेऊन हिंदी मायभगिनी त्या दूर देशात सत्याग्रहात सामील झाल्या होत्या, तुरुंगात गेल्या होत्या ; आणि त्यांनी बलिदानही केले होते. महात्माजी कस्तुरवांना म्हणाले, “तू तुरुंगात मेलीस तर जगदंबेप्रमाणे मी तुझी पूजा करीन !” भारतीय नारीचे तेज पुन्हा प्रकट होऊ लागले होते. देवी सरोजिनी, अॅनी बेझंट या इकडे व्याख्याने देत होत्या. सरोजिनींनी गोखल्यांच्या आज्ञेवरुन हिंदु-मुस्लिम ऐक्यार्थ दौरा काढला. गोखले त्यांना ‘हिंदचा बुलबुल’ असे म्हणत. सरोजिंनीनी इंग्रजीत अप्रतिम कविता लिहिलेल्या. यापूर्वी बंगालमधील तारुलता दत्त (तोरु दत्त) या तरुण मुलीने इंग्रजीत कविता लिहिल्या होत्या. तोरु अल्पवयात मरण पावली. तिला अनेक भाषा येत. फ्रेंच भाषेत ती पारंगत होती. ती जगती तर तिच्या प्रतिभेचा परिमल जगभर जाता. आणि पुढे सरोजिनी आली. अॅनी बेंझटबाईंनी नि टिळकांनी स्वराज्याची चळवळ सुरु केलेली. सरोजिनींनी त्यातही भाग घेतला. परंतु खेडयापाडयांत जाऊन जनतेची सेवा करणे, स्वयंसेवक होणे ही गोष्ट नवीन होती. आम जनतेत ही भावना अजून गेली नव्हती. स्त्रियांत तर नव्हतीच. परंतु महात्माजींनी हाक मारली. चंपारण्यातील शेतकर्यांचा प्रश्न सोडवायला ते गेले. परंतु महात्माजींचे सारे काम पायाशुद्ध. तेथील जनतेत त्यांना प्राण ओतायचा होता. त्यांनी स्वयंसेवक भगिनींचीही मागणी केली... ज्या शेतकरी मायबहिणींत जातील. आणि स्त्रिया पुढे आल्या.
श्रीमती अवंतिकाबाई गोखले त्या वेळेस बिहारमध्ये गेल्या. कस्तुरबांबरोबर काम करु लागल्या. अवंतिकाकबाईंनी गांधीजींचे पहिले चरित्र मराठीत लिहिले व लोकमान्यांनी त्याला प्रस्तावना लिहिली. असा हा आरंभ होता. राष्ट्राच्या जीवनात स्त्रियांनी समरस होण्याचा तो मंगल प्रारंभ होता. महात्माजींनी राष्ट्रव्यापक आंदोलनास सुरुवात केली. सत्याग्रह आला. असहकार आला. पिंकेटिंग आले. नेहरुंच्या, देशबंधूंच्या घराण्यांतील स्त्रिया जाडीभरडी खादी नेसून मिरवणुका काढू लागल्या. लाठीमार होऊ लागला. कलकत्याच्या विलायती मालावर निरोधन करायला वासंतीदेवी उभ्या राहिल्या. स्त्रियांचा आत्मा मुक्त झाला. हजारो वर्षांचे ग्रहण जणू सुटले. सतीचे तेज पुन्हा प्रकटले. अब्बास तय्यबजींच्या कुटुंबातील मंडळी, अल्ली बंधूंची माता बीअम्मा, अशा मुस्लिम भगिनींही सभांतून, सत्याग्रहांतून झळकू लागल्या.