१८७२
"वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात
दिवस घालवले तसेच नाशिकला माझे दिवस आनंदात गेले."
येहळेगाव सोडल्यावर श्री सरस्वतीला म्हणाले, "तुकामाईजवळ हे काय तू मागितलेस ! हे मागण्यामध्ये तू मोठी चूक केलीस, या जगातली कोणतीही वस्तू ते देऊ शकतील हे खरे, पण त्या वस्तूचा अशाश्वतपणा काढून ती कशी आपल्याला मिळेल ? त्यांच्या
कृपेने मुलगा होईल, पण तो अल्पायुषी होईल." सरस्वतीला देखील आता या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटले. पण आलेली संधी अशा रितीने गमावल्यामुळे आता इलाज नव्हता. मोठया काकुळतीने श्रींना ती म्हणाली, "माझ्या स्त्रीबुद्धीनें मला फसविले, त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते, पण आपण या देहाचे धनी आहात, त्याचे सार्थक करणे आपल्या हातात आहे, तो मार्ग मला दाखवा." हे सर्व ऐकून श्रींनी तिला योगदिक्षा देण्याचे ठरविले आणि तिला घेऊन नाशिकला आले. नाशिकला गंगेच्या काठी असणार्‍या एका मंदिरात दोघेजण उतरले. श्रींनी वडाचा चीक लावून तिच्या केसांच्या जटा वळल्या. हातातल्या बांगडया काढून तिथे तुळशीच्या माळा बांधल्या. गळ्यातील मंगळसूत्र काढून तेथे तुळशीची माळ घातली. कपाळाचे कुंकू काढून तेथे भस्म लावले. रंगीत लुगडयाच्या ऐवजी पांढरे पातळ नेसवले. तिच्या हातामधे रुद्राक्षाची माळ दिली व तिला पूर्ण जोगीण बनविलि. मंदिरामध्ये श्री ऐका कोपर्‍यात
बसत आणि ती समोरच्या कोपर्‍यात बसे. श्रींनी सरस्वतीला योगमार्गाचे रहस्य दाखविण्यास सुरुवात केली. तिला सिद्धासन घालण्यास शिकवले, श्र्वासबरोबर नाम कसे घ्यावे हा अभ्यास करवून घेतला. नंतर मानसपूजा शिकवून तिची धारणा द्दढ केली. श्रींनी तिला काही योगमुद्रा दाखविल्या - सांगितल्या आणि भगवंताचे ध्यान लावता येण्यापर्यंत तिची तयारी केली. हे साधण्यास तिला ६ महिने मनापासून अभ्यास करायला लागला. नाशिकमधील हा काळ त्यांनी फार आनंदात घालवला. सरस्वती म्हणे, "वनवासात पंचवटीत असताना, श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले. तसेच नाशिकला असताना माझे दिवस आनंदात गेले." श्री त्यावेळी भिक्षा मागून आणीत. परंतू काही वेळेला भिक्षेला जाणे झाले नाही म्हणजे दोघांनाही उपोषण घडे. सर्व तिने आनंदाने सोसले. श्रींच्याकडे अनेक लोक येत. त्यांना ते परमार्थाच्या गोष्टी सांगून नामाला लावीत. सरस्वतीची वृत्ती नामामध्ये तल्लीन होऊ लागली हे पाहिल्यावर तिला घरी परत पाठविण्याचे ठरवून श्रींनी तिची समजूत घातली. नाशिकमध्येच कृष्णाजी त्रिंबक या नावाचे श्रींचे शिष्य होते. त्यांच्यावर सरस्वतीला घरी पोचविण्याची जबाबदारी सोपविली. कृष्णाजीपंतांनी सरस्वतीला आपल्या घरी नेले. तेथे त्यांच्या पत्नीने तिला न्हायला घालून जटा सोडविल्या. हातात बांगडया, गळ्यात मंगळसूत्र घातले. साडी चोळी नेसवून तिला दोन दिवस घरी ठेवून घेतले. कॄष्णाजीपंतांनी तिला स्वतः नात्यापुत्याला तिच्या सख्या बहिणीकडे सोडले, तेथे तिचे आईवडिल तिला भेटण्यास व घरी घेऊन जाण्यास आले. त्यावेळी सरस्वती एवढी खूष होती. आईबापांना म्हणाली, "तुम्हाला कसे सांगू, तुमचे भाग्य थोर म्हणून तुम्हाला असा जावई मिळाला. त्यांनी माझे कल्याण केले आहे." नंतर सरस्वती सासु सासर्‍यांना भेटण्यास गोंदवल्यास गेली. श्रींची खुशाली सांगून श्री फार अलौकीक पुरुष आहेत याची साक्ष त्यांना पटवून दिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel