१८५६
"याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल."
कोल्हापूरहून घरी परत आल्यावर श्रींना गोंदवल्यास चैन पडेना. त्यांच्या वागण्यामध्ये फरक पडला. रात्रीच्या वेळी ते जास्त ध्यान करू लागले. तोंडाने सारखे रामाचे नामस्मरण चाललेले असे. जुने मित्र भेटले की, तेवढयापुरती थट्टा मस्करी होई, परंतु लगेचच श्री अंतर्मुख होऊन बसत. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा आपोआप घरी रमू लागेल " असा व्यवहारी सल्ला लिंगोपंतांनी रावजींना दिला. गीताबाईंनाही तो पसंत पडला. सर्वांनी मिळून श्रींचे लग्न करून टाकण्याचे निश्चित केले. श्रींना मुली सांगून येऊ लागल्या. गोंदवल्याहून ८/१० कोसांवर खातवळ म्हणून एक चांगले, सज्जन, श्रीमंत व लोकप्रिय गृहस्थ कुळकर्णी म्हणून होते. त्यांच्या कुटुंबाचे नाव भागिरथी. त्यांना एक सुंदर, समजूतदार व सुशील मुलगी होती. आपल्या या ८/९ वर्षांच्या मुलीला घेऊन संभाजीराव गोंदवल्यास पंतांच्याकडे आले. ते दोघे बोलत बसले असता श्री सहज तेथे आले. ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला. त्यांनी संभाजीपंतांना लग्नाचा लगेच होकार दिला. दोन्ही बाजूंनी तयारी होऊन लग्नाचे वैशिष्टय म्हणजे पंतांच्या हातचे हे शेवटचे कार्य आणि संभाजीरावांकडले हे पहिले कार्य असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी सज्जन व हौशी असल्याने गोंदवल्यास आठ दिवस जणू काही उत्सवच चालला होता. लग्न समारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरपूरला आले. त्यांची ही शेवटचीच वारी होती, याची त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी मनापासून पांडुरंगाची प्रार्थना केली व श्रींना कुटंबासह त्याच्या पायावर घातले. पंतांची प्रकृती हळूहळू क्षीण होत चालली होती. पण या लग्नानंतर मात्र ते जाण्याची भाषा बोलू लागले. त्यानंतर ३/४ महिन्यातच पंतांच्या पत्नीचे थोडासा ताप येऊन निधन झाले. आणि तिच्या नंतर चार महिन्यांनी पंतांनी देह ठेवला. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ वर्षांचे होते. श्रींच्या जीवनाच्या द्दष्टीने पंतांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्या वागण्याचा ठसा श्रींवर चांगल्या प्रकारे उमटला. ज्या आदर्श प्रपंचाचे वर्णन श्री नेहमी करीत; असा संसार पंतांचा होता हे निश्चित होय. अशा आदर्श संसारामध्ये अध्यात्मद्दष्टया अत्यंत निरोगी वातावरण असते. त्या वातावरणामध्ये श्रींची पहिली अकरा वर्षे गेली. प्रपंचात दक्षतेने व आपले वजन ठेवून वागणे, कोणाचे अंतःकरण न दुखवणे, भगवंताला कधी न विसरणे, पुष्कळ लोकांना जेवायला घालणे, पुष्कळ लोकांना पैसे देणे व ते परत न आले तरी खंत न बाळगणे इत्यादि अनेक गुण लिंगोपंतांपासून आनुवंशिकतेने श्रींच्या ठिकाणी आले आणि ते सगळे परमावधीला पोचले. आजोबा व आजी गेल्यानंतर रावजी प्रपंचामध्ये कामापुरते पहात, परंतु त्यांचे खरे लक्ष जपामध्ये असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel