१८७६
इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?"
दुसरे लग्न झाल्यावर, श्री गोंदवल्यास सहा महिने राहिले. तेवढया अवधीत त्यांचा धाकटा भाऊ अण्णा कालवश झाला. या दुःखा जोर कमी होत आहे तोच त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई ( जी खातवळला दिलेली होती ) वारली. अशा रीतीने थोडया काळामध्ये घरातील तीन माणसे मृत्युमुखी पडली. त्यामुळे गीताबाईंचा जीव अगदी पोळून निघाला. लिंगोपंतांच्या वंशापैकी श्रीच मोठे असे राहिले. त्यांच्या वडिलार्जित जमिनी पुष्कळ होत्या. श्रीच एकटे राहिले असे पाहून त्यांच्या भाऊबंदांनी जमिनीसंबंधी तंटा उपस्थित केला. बरीच बोलाचाली होऊन प्रकरण हातघाईवर येई. भाऊबंद श्रींना वाटेल त्या शिव्या देत, श्रीदेखील त्या सव्याज परत करीत. सगळे झाल्यावर श्री त्यांना चांदीचे ताट देऊन आपल्या शेजारी जेवायला बसवीत. लिंगोपंतांपासून श्रींच्या कुटुबीयांचे पंढरपूरला जाणे-येणे होते. तेथे भडगावकर नावाचे वैद्य होते. त्यांच्याकडे श्री वरचेवर जात. एकदा ते भडगावकरांच्या घरी आले, तेव्हा त्यांचा एकुलता एक मुलगा विषमज्वराने आजारी होता. श्री अहोरात्र त्या मुलाचे श्रींवर फार प्रेम होत, इतक्या तापातही त्याचे नामस्मरण चालू असे. तापाच्या विसाव्या दिवशी रात्री त्याचा जीव घाबरला. श्रींनी त्याच्या आईवडिलांना धीर दिला व नंतर स्वतः श्रींनी त्याला आपल्या मांडीवर घेतले व शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण होऊ दिले. श्रींनी आईबापांचे सांत्वन केले. पुढे आप्पासाहेब भडगावकरांनी श्रींना आपले सर्वस्व अर्पण केले. श्री नंतर गोंदवल्यास आले, त्यावेळी मोठा दुष्काळ पडला. सरकारने काही दुष्काळी कामे सुरू केली, पण त्यामुळे लोकांची उपासमार टळली नाही. श्रींनी आपल्या मालकीच्या शेतात दुष्काळी काम सुरू केले. एका शेतातली माती काढून दुसर्‍या शेतात नेऊन टाकायचे हे त्यांचे काम. त्यासाठी श्रींनी जवळजवळ दीडशे बैलगाडया कामावर लावल्या. काम करणार्‍या प्रत्येक माणसाला रोजएक मोठी भाकरी आणि भांडे भरून आमटी मिळायची. श्री पोटाला अन्न देतात हे कळल्यावर गोंदवल्यातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या खेडयापाडयांतीलही गरीब लोक कामाला येऊ लागले. श्रींनी त्याकरिता आपली कोठारे उघडी ठेवली होती. सुमारे दीड हजार लोक रोज अन्न घेऊन जात. गावचे काही लोक व घरची मंडळी मिळून इतक्या भाकरी भाजत असत. भाकर्‍या तयार झाल्यावर श्री आपल्या हाताने कामागारांना वाटीत असत. भाकरी देत असताना भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी हपापलेले जीव पाहून श्रींच्या डोळ्यांना अश्रुधारा लागत. त्यावेळचा औंधचा राजा एक दिवस गोंदवल्यावरून औंधला चालला होता. त्याने हा प्रचंड समुदाय पाहिला आणि आपली गाडी थांबवली. "इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" असे त्याने लोकांना विचारले. श्रींचे नाव कळल्यावर त्याने त्यांचे दर्शन घेतले व त्यांना धन्यावाद देऊन तो गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel