१८८३
"विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल.
हाती चौपदरी असता समाधान ही त्याची जहागीर."
इंदूरला श्रींचा बरेच दिवस मुक्काम झाला, त्यांची वाट पाहून गीताबाईंनी, दादोबा व गोपाळ नावाच्या त्यांच्या नातेवाईकांना श्रींना घेऊन येण्यासाठी इंदूरला पाठविले. ते आल्यावर श्रींनी त्यांचा मोठा आदरसत्कार करून काही दिवस ठेवून घेतले. दादोबांनी आईचा निरोप श्रींना सांगितल्यावर श्रींच्या डोळ्यांना पाणी आले, व आपण आता लवकर जाऊया म्हणून त्यांनी त्यांना आश्र्वासन दिले. पण तेथील आनंदामध्ये दादोबा लवकरच परत जाण्याचे विसरले. १०/१२ दिवसांनी श्रीच दादोबांना म्हणाले, "अरे, दादोबा, आपल्याला घरी परत जायचे ना ? आपण आता उद्याच निघू." श्री इंदूर सोडणार ही बातती पसरायला वेळ लागला नाही. लगेचच भेटायला येणार्‍या मंडळींची गर्दी उडाली. श्रींना जेवायलाही अवकाश राहिला नाही. म्हणून आणखी एक दिवस मुक्काम वाढला. जीजीबाई लगेच श्रींच्याकडे आली व म्हणाली, "महाराज, मला आपण तुकामाईंकडे नेण्याचे वचन दिले आहे, आपण एकदा येथून गेला की पुन्हा इकडे केव्ह याल नेम नाही, म्हणून मी आपल्या बरोबर येणार आहे." तिचे हे बोलणे ऐकून भैय्यासाहेब म्हणाले, " महाराज, मला देखील आपण घेऊन चला. श्रीतुकामाईंचे दर्शन मला करून द्या." श्रींनी दोघांनाही आपल्याबरोबर घेतले आणि सर्व मंडळींनी इंदूर सोडले. त्यानंतर जवळजवळ एक महिन्याने मुक्काम करीत करीत येहळेगावला पोचले. श्रींनी बरोबरच्या मंडळींना सक्त ताकीद दिली होती की, येहळेगावला असेपर्यंत कोणीही त्यांना ’ महाराज ’ म्हणायचे नाही आणि कोणीही त्यांच्या पाया पडायचे नाही. श्रीतुकामाईंना पाहिल्या बरोबर जीजीबाई, भैय्यासाहेब व श्रींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीतुकामाई जीजीबाईला म्हणाले,
" भली परीक्षा केलीस. पण फसली नाहीस ना ? त्याला मुंगळ्यासारखी चिकटून बैस, तुझे कल्याण होईल." भैय्यासाहेबांकडे वळून म्हणाले, " विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा, त्याची जहागीर तुला मिळेल. हाती चौपदरी असता समाधान ही त्याची जहागीर." याप्रमाणे जीजीबाई व भैय्यासाहेब यांना श्रीतुकामाईंच्या पायावर घातल्यानंतर श्री त्यांच्यासह गोंदवल्यास आले. आठ पंधरा दिवस तेथे राहिल्यावर ती मंडली परत गेली. श्री इंदूरमध्ये प्रथम प्रकट झाले खरे, तेथे गोंदवल्याबद्दल कोणासही काही ठाऊक नव्हेत. जेव्हा दादोबा आणि गोपाळ त्यांना परत घेऊन जाण्यास आले, त्यावेळी इंदूरच्या लोकांना गोंदवल्याची माहिती झाली. श्रींनी आपला बराचसा काळ पर्यटन करण्यामध्ये घालवला. बहुधा एकटयानेच ते संचार करीत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel