१८९६
गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे."
आयुष्यात अनेक कष्ट सोसल्याने गीताबाई आता खूप थकल्या होत्या. श्री आईची अगदी मनापासून सेवा करीत. एके दिवशी रात्री श्री आईचे पाय चेपीत बसले असता ते तिला म्हणाले, "आई, तू आता म्हातारी झालीस, तुझी काही इच्छा असली तर सांग. मी खात्रीने ती पूर्ण करीत." हे ऐकून आईच्या डोळ्यांत पाणी आले आणि म्हणाली, "गणू, माझे आता काय राहिले आहे ? तुझे हे वागणे आणि लोकांचे तुझ्यावरचे प्रेम पाहून मन तृप्त झाले, माझा देह थकत चालला आहे, मनात येते की, एकदा काशीयात्रा घडावी, गंगास्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले म्हणजे देहाचे सार्थक होईल." आईचे हे बोलणे ऐकून श्री म्हणाले, "वा ! फारच उत्तम. मग उद्याच आपण निघायचे का ? तुला काशीयात्रा घडवण्याचे माझ्याकडे लागले." त्यावर आई म्हणाली, "अरे, पण आपण यात्रेला गेलो तर आपल्या घराकडे कोण पाहील ? घराचा वासादेखील कोणी इथे शिल्लक ठेवणार नाही." त्यावर श्री म्हणाले, "आई, त्याची तू काळजी करू नकोस, मी सर्व व्यवस्था करतो." आईला असे आश्वासन देऊन श्रींनी काशीयात्रेची सर्व तयारी केली. श्रींच्या पत्नीची बरोबर येण्याची इच्छा होती, पण आपण पुढे केव्हातरी खात्रीने जाऊ अशी तिची समजूत घालून त्यांनी तिला माहेरी धाडून दिले. गीताबाई काशीयात्रेस जाणार म्हणून प्रत्येकाला कौतुक वाटत होते. गावचे सर्व लोक निरोप देण्यास जमा झाले. शेवटी श्री आईला घेऊन रामरायाच्या दर्शनाला आले. रामाचा निरोप घेऊन दोघेजण बाहेर आले. तेव्हा गीताबाई म्हणाल्या, "घराकडे लक्ष असू द्या, बरं का, यात्रा संपवून मी लवकर परत येते." त्यावर श्री म्हणाले, "आई, तू तर थकली आहेस, कोणास ठाऊक काळ कसा येईल ? घराचा लोक कशाला ठेवतेस ? आपण त्याची वाट लावू " असे म्हणून श्रींनी चिंतुबुवांना बोलावून घेतले. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. चिंतुबुवांना मंत्र म्हणायला सांगून सर्वांच्या नावाने पाणी सोडले. ’जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तु पाहिजे ती घेऊन जावी ’, असे म्हणायचा अवकाश, पंधरा मिनिटांत घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले. त्यावर श्री आईला म्हणाले, "तुझे लक्ष अडकायला आता मागे काही शिल्लक राहिले नाही, चल आता." हे सर्व पाहून आई म्हणाली, "गणू, मला वाटळे होते की, तुला प्रापंचिक शहाणपण आले, पण नाही रे नाही, तू होतास तसाच बैरागी आहेस. कोणच्या वेळी काय करशील याचा नेम नाही." श्री आईला घेऊन प्रथन नाशिकला आहे, रामाचे दर्शन घेऊन पुढे प्रयागला गेले. तेथे आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातले व वेणीमाधवाच्या चरणी घालून अक्षयवट दाखविला. तिच्या हातून पुष्कळ दानधर्म करविला. तीन रात्री तेथे राहून सर्वजण काशीला आले. स्टेशनवर श्रींना उतरवून घेण्यास श्रींचा मसुरियादीन शिवमंगल नावाचा श्रीमंत पंडा आला होता. श्रींचा मुक्काम भोसल्यांच्या गंगामहालमध्ये एखाद्या संस्थानिकाप्रमाणे झाला. श्री आईला घेऊन तेथे महिनाभर राहिले. श्री स्वतः आईला गंगास्नानासाठी उचलून घेऊन जात व नंतर विश्वेश्वराच्या दर्शनाला नेत. वाटेतल्या सर्व भिकार्‍यांना ती दान देई. आईच्या हाताने वस्त्रे व पैसा किती दान दिला याला तर गणतीच नाही. श्री काशीस असताना श्रींना आत्मानंद सरस्वती यांच्यासारखे अनेक विद्वान, साधनी संन्यासी भेटायला येत. तसेच बाबू भट नावाचे द्शग्रंथी, हिंदी व संस्कृत भाषेचे जाणकार श्रींना भेटले. १२ वर्षे मौन धरून १३ कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण करणारे शांताश्रम स्वामी यांचाही श्रींशी खूप संबंध आला. काशीला महिनाभर राहून श्री गयेला गेले. तेथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला आली. तेथे आल्यावर गीताबाईंना खूप थकवा वाटू लागला. शक्ती क्षीण होऊ लागली. औषध घेण्य़ास तिने संमती दिली नाही. खाणे बंद होऊन त्या दुधावर राहू लागल्या. श्री त्यांच्याबरोबर सतत बसून सेवा करीत होते. शरयूमध्ये स्नान करून रामरायाचे दर्शन घेतले. श्रींनी तिला घाटावर गादी घालून बसविले व तिच्या हातून खूप दानधर्म करविला. "गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." असे श्री म्हणाले. आईने मनसोक्त दान केल्यावर श्रींनी रामरायाला नैवेद्य करून गावजेवण घातले. आईला विचारले, "तुझी आणखी काही इच्छा शिल्लक आहे का ?" आई म्हणाली, "मुळीच नाही. फक्त ’रामराम ’ म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे." दुसरे दिवशी श्रींच्या मांडीवर सकाळी गीताबाईनी शांतपणे ’रामराम ’ म्हणत देह ठेवला व आपल्या जीवाचे कल्याण करून घेतले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel