१८७८
"मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले
तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल."
पंढरपूरहून निघाल्यापासून बरेच दिवस झाले होते. श्री आता नर्मदेच्या किनार्‍याने जाऊ लागले. जाता जाता महेश्र्वर नावाच्या गावी आले. तेथे दोन मोठे मांत्रिक रहात होते. श्रींना पाहिल्याबरोबर यांच्याकडे मोठी मंत्रसिद्धी आहे असा त्या दोघांचा समजझाला व ते दोघेजण श्रींच्या मागे लागले. श्रींनी त्यांना स्पष्ट सांगितले, "मला मंत्रतंत्र काही येत नाही, मी फक्त रामनाम जाणतो. मी रामाचा दीनदास आहे." या गोष्टी मांत्रिकांना पटल्या नाहीत. ’आपल्या सिद्धी लपवून ठेवीत आहे ’ अशी त्यांची खात्री झाल्यावर ते श्रींना म्हणाले,"तुम्ही सरळपणे आम्हाला तुमची मंत्रसिद्धी विद्या द्या, नाहीतर आम्ही नागपाश टाकून तुम्हाला बांधून टाकू आणि तुम्ही फुकट प्राणाला मुकाल." श्री काही बोलले नाहीत. श्रींच्या मागे मागे फिरत ते एका डोंगरावर आले. त्यांनी मंत्र देण्याविषयी श्रींना पुन्हा विनंती केली. पण श्री काही बोलेनात, तेव्हा त्यांनी श्रींच्यावर नागपाश टाकला. एका क्षणात जिकडे तिकडे नागच उत्पन्न होऊन श्रींच्यावर फुत्कार टाकू लागले. श्री स्वस्थपणे नाम घेत उभे होते. पाच मिनिटांच्या अवकाशात सर्व नागांनी विळखे घालून त्यांना बांधून टाकले. आता तरी ते घाबरतील असे वाटून मांत्रिक श्रींना म्हणाले, "अजून तरी तुम्ही आपला मंत्र आम्हाला द्या म्हणजे हे नाग नाहीसे होतील. असे न कराल तर तुमचा प्राण जाईल." श्री म्हणाले, "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." मांत्रिकांनी श्रींच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही ब आपला पाश कायम ठेवला. श्री डोळे झाकून अशा स्थितीत स्वस्थ बसून राहिले. अशा स्थितीत तीन दिवस गेल्यावर श्रींनी पुन्हा त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण ते जेव्हा ऐकेनात तेव्हा श्री "जयजय रहुवीर समर्थ " असे मोठयाने म्हणत उठले आणि डोंगराच्या कडयावरून खाली उडी घेतली. त्याबरोबर सर्व नाग छिन्नविछिन्न होऊन मरून पडले व श्री मोकळे झाले. मांत्रिकांचे मंत्र बलहीन झाले. दोघांनी श्रींच्या जवळ येऊन त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रींनी त्यांना क्षमा करून दोघांना रामनाम दिले. दोघेजण मंत्राचा नाद सोडून भगवंताच्या मार्गाला लागले. त्यांपैकी एकाला तपश्र्चर्या करायला सांगून नर्मदा तटाकी बसविले व दुसर्‍याला बरोबर घेऊन श्री पुढे निघाले. याचे नाव सच्चिदानंद होते. त्याने अखंड रामनाम घेण्याचा अभ्यास सुरू केला. त्यात तो स्वतःला पूर्णपणे विसरून जाई. श्रींबरोबर फिरत फिरत उज्जैनला जाण्यासाठी ते दोघे बुदनी स्टेशनवर आले. गाडी येण्यास अवकाश असल्यामुळे स्टेशनजवळच्या धर्मशाळेत जाऊन बसले. काही वेळाने गाडी आली. श्री स्टेशनवर पोचण्याआधीच गाडीने निघण्याची शिटूटी दिली. बरोबरच्या सच्चिदानंदाला राग आला व तो बोलला, "अबे आहे लौंडी, मेरे सदूगरूको छोडकर कहा जा रही है ? जरासी ठहर " हे शब्द काढल्याबरोबर चालू झालेली गाडी एकदम थांबली. ड्रायव्हर, गार्ड वगैरे लोकांनी खूप खटपट केली, पण गाडी हालेना. इतक्यात श्री स्टेशनवर पोचले, त्यांच्या नजरेला हा प्रकार आला. तेव्हा लगेच ते सच्चिदानंदाला म्हणाले, "अरे, साधनाला आरंभ होऊन जरा कोठे सामर्थ्य साठायले लागले, तर लगेच खर्च करण्याची अवदसा तुला आठवली आणि ते सुद्धा क्षुल्लक गोष्टीसाठी ! आपण बैरागी लोक, आपल्याला जायची काय घाई आहे ! आपण उद्या गेलो असतो, पण तू आपली केवढी शक्ती खर्च केलीस ! तू येथूनच परत जा. बारा वर्षे एकांतात बसून भगवंताचे नाम घे. नंतर मला तोंड दाखव. जा, राम तुझे कल्याण करील." श्रींच्या पायावर डोके ठेवून तो तेथून निघून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel