१८९७
"राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा व इतरवेळी रामनामाचा जप करावा."
अयोध्येस आईच्या मृत्यूनंतर श्रींनी पुढील अभंग सहजस्फूर्तीने म्हटला
दया करी राम सीता । सांभाळावी माझी माता । दया करी शरयुबाई । मुक्त करी माझी आई । हनुमंता कृपा व्हावी । माझी माय पदा न्यावी । शिवरूपी बहूगामी । आईवर कृपा करा तुम्ही । लोळे देवांचे मी पायी । मुक्त करा माझी आई । आईचे दोष माझे माथी । एवढी ऐकावी विनंती । दास म्हणे रघुवीरा । माझी आई मुक्त करा ॥
बाराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करणार्‍या श्रींचे रामरायाच्या खालोखाल आपल्या आईवर प्रेम होते. आईच्या मृत्यूनंतर श्रींनी नामसप्ताह बसवला. १३ व्या दिवसपर्यंत असंख्य गरिबांना अन्नदान, शंभर गाई दान केल्या. शंभर वैदिकांना वस्त्रे, शंभर सुवासिनींना लुगडी व सर्व भिकार्‍यांना घोंगडी दान दिली.
अयोध्येहून श्री इंदूरला आले. तेथे काही दिवस भैय्यासाहेब मोडकांकडे राहून श्री त्यांना घेऊन नैमिष्यारण्यात गेले. तेथे अनेक योगी लोकांना भेटून पुढे श्री नर्मदा तटाकी फिरले. पुढे भैय्यासहेबांना खूप तहान लागली म्हणून श्री एका गुहेत शिरले. तेथे एका स्वच्छ पाण्याच्या झर्‍यावर पाणी पिऊन श्री गुहेत आणखी पुढे गेले. तेथे त्यांना एक ध्यानस्थ बसलेला योगी दिसला. त्याच्या जटा व दाढी जमिनीवर लोळत होती. श्री त्याच्यासमोर उभे राहिले, त्याने डोळे उघडून श्रींकडे पाहिले व विचारले, "रामावतार झाला का ?" त्यावर श्री म्हणाले, "राम व कृष्ण दोन्ही अवतार होऊन गेले. सध्या कलीला सुरुवात झाली आहे." हे ऐकून तो योगी एकदम निराश झाला. श्रींना त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला पूर्णतेला नेला. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रु आले. श्रींच्या चरणांना वंदन करून त्याने देह सोडला. श्रींनी त्याच्या देहावर संस्कार करून पुढे निघाले. ( त्यावर भैयासाहेबांनी विचारले, "महाराज, हा कोण होता, आपण त्याला काय केले ?" त्यावर श्री म्हणाले, "राम जन्माला येण्याच्या अगोदरपासून अनेक वर्षे हा तापसी समाधी लावून बसला होता. त्याच्या देहाचा अंतकाळ आला की तो प्राणापान कोंडून धरी आणि
तेवढी वेळ टाळून नेई. असे अनेक वेळा त्याने काळाला चुकवले. हेतू हा की रामाचे दर्शन घेऊन आपण मुक्त होऊ. ही इच्छा धरून तो योगसमाधीत बसला होता. पण रामावतार होऊन गेला, हा मात्र तसाच राहिला. त्याच्या भाग्याने तो आजचांगल्या गतीला गेला. रामाने त्याचे कल्याण केले. ) श्री इंदूर, हर्द्याला राहून नाशिकला आले. तेथे आईच्या नावाने गंगेवरच्या भिकार्‍यांना धान्य वाटले. नाशिकला काळाराम मंदिराच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर बसलेल्या संन्याशाला आपली जाणीव करून देऊन रामनामाचा अनुग्रह दिला. आपल्याबरोबर आठ दिवस ठेवून घेतला व नंतर काशीला पाठवून दिला. नाशिकहून श्री थेट गोंदवल्यास आले. गोंदवल्याहून निघताना श्रींबरोबर आई व खूप मंडळी होती. आता मंडळी होती पण आई मात्र नव्हती. प्रत्येकजण आईची आठवण काढून हळहळत होता. श्रींना शोभण्यासारखी ती माउली होती. लहानपणापासून श्रींवर तिचा जीव होता, म्हणून त्यांच्या सहवासात तिचा अंतकाळही झाला. तिच्या जन्माचे सार्थक झाले.
गोंदवल्यास आल्यावर थोडयाच दिवसांनी मोठी दुष्काळ पडला. श्रींनी यावेळीही दुष्काळी कामे काढून लोकांना खायला घातले. शेतात काम करणार्‍यांना एकवेळचे जेवण मिळे. म्हातार्‍यांना फुकट धान्य मिळे, तर मंदिरात बसून रामनामाचा १० हजार जप करणार्‍यांना एकवेळचे जेवण मिळू लागले. आटपाडीस राहणार्‍या आपल्या श्वशुरांना श्रींनी गोंदवल्यास आणले व त्यांच्याकडे रामाची पूजा सोपविली. गायींकरिता गोशाळा बांधली. विष्णुबुवा कुंभारे या शिवभक्ताला त्याच्या आधीच्या गुरूंचे स्मरण करून देऊन श्रींनी त्यांना शिवमंत्राचाच अनुग्रह दिला. राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा व इतरवेळी रामनामाचाच जप करावा म्हणून सांगितले. त्यांचे नामावरील प्रेम पाहून श्रींनी त्यांना दीक्षाधिकार दिला. पुढे वर्‍हाडातील शेंदुरणी येथे श्रींच्या नावे मठ बांधला आणि आमरण भगवंताच्या नामाचा प्रसार केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel