टीव्हीवर राजेशचा एक प्रोग्राम टेलिकास्ट होत होता. त्याची शूटिंग आधीच झालेली होती आणि आता तो फक्त टेलिकास्ट होत होता आणि पब्लिक डिमांड मुळे हा शो आज बहुतेक सगळ्या प्रमुख प्रायव्हेट आणि दूरदर्शन चॅनल्स वर प्रसारित करण्यात येत होता. अमितजी सुद्धा आवडीने हा कार्यक्रम बघत होते.
"आजचा आपला विषय आहे भारतीय चित्रपटसृष्टीतील आणि टिव्ही क्षेत्रापुढील विविध आव्हाने. आज कधी नव्हे एवढी चित्रपटातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा होते आहे पण त्याचबरोबर विविध मार्गांनी चित्रपटांची सेन्सॉरशिप पण वाढली आहे!"
स्टेजवर साऊथ, मराठी, हिंदी तसेच इतर अनेक चित्रपट सृष्टीतील आघाडीचे तसेच नवखे प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर्स आणि काही सुपरस्टार हिरो हिरोईन बसलेले होते, आणि नेहमीप्रमाणेच ऑडीयंस मध्ये सामान्य सिनेप्रेमी माणसे, तसेच बॉलीवूड मधील पडद्यामागे काम करणारे कलाकार तसेच त्यांचे नातेवाईक व इतर मंडळी बसले होते.
एक निर्माता म्हणाला, "हे एक आव्हान आहेच. सिगारेट पिताना दाखवलं तर सिगारेट हानिकारक अशी सूचना दाखवा, दारुसाठी तेच! प्राणी असल्यास त्याच्या जीविताला हानी पोहोचवली नाही हे दाखवा, शिव्या चालत नाहीत, पण खून मारामारी, हे सगळं चालतं. प्राण्यांना हानी पोचवली तर चालत नाही पण येथे स्टंटमेन स्टंट सिन करताना बरेचदा मृत्यूमुखी पडतात त्याचे काही सोयरसुतक नाही!"
दुसरा एक निर्माता म्हणतो, "जितकी बंधनं जास्त होत गेली तेवढे जास्त स्वातंत्र्य चित्रपटात घेण्यात येऊ लागले. कुठल्यातरी आडमार्गाने चित्रपट सेन्सॉर कडून मंजूर करून घेणं किंवा ए चित्रपटाला यू ए सर्टिफिकेट लाच देऊन मिळवणं हे सुरु झालं. तसं पाहिलं तर ए आणि यू ए चित्रपटां मध्ये आता सीमारेषा नाहीशी झाली आहे किंवा पुसट झाली आहे. टीव्हीवर सुध्दा आता सेन्सॉर सर्टिफिकट बंधनकारक करण्यात येणार असल्याचे ऐकिवात आहे. अशाने आधीच हॉलिवूडशी स्पर्धा करण्यासाठी म्हणून खर्चिक झालेली भारतीय चित्रपटनिर्मिती अशा सेन्सॉरशिप मुळे धोक्यात आली आहे. सेन्सॉर बोर्ड कमी आहे की काय म्हणून आता विविध संघटना सुध्दा जाळपोळ करतात, धमकी देतात. बायोपिक काढला तर त्यांचे वंशज धमक्या देतात, पण एका अर्थाने बायोपिक काढताना निर्मात्यांनी भान ठेवलेच पाहिजे कारण तथाकथित व्यक्ती ज्याच्यावर बयोपिक निघतोय त्यांच्या बद्दल खरेच दाखवले गेले पाहिजे आणि शक्यतो वादग्रस्त भाग टाळला पाहिजे."
राजेश म्हणाला, "आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सेन्सॉर बोर्ड अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीजण सेन्सॉर बोर्डाची मुस्कटदाबी करत आहेत तेच कळेनासं झालंय. मुळात हे दोघे एकाच बाजूला आहेत की विरुद्ध बाजूला तेच समजत नाही!"
एक मराठी निर्माता म्हणाला, "तुझे म्हणजे अंशत: बरोबर आहे आणि त्यात भरीस भर म्हणून पायरसी वाढली आहे. आजकाल लोक चित्रपटाची पायरेटेड कॉपी मोबाईलवर, लॅपटॉपवर बघणे पसंत करतात, थिएटरमध्ये कुणी येत नाही!"
एक कसलेला अभिनय सम्राट तरुण अभिनेता म्हणाला, "पण मल्टिप्लेक्स थिएटरचे दर किती वाढले आहेत हो! त्यामुळे सामान्य माणूस जातच नाही चित्रपट बघायला, आणि आजकाल मनोरंजनासाठी घरी स्वस्तात कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत, पूर्वी असे नव्हते म्हणून थियटर मध्ये पिक्चर गोल्डन जुबिली साजरे करायचे. आजकालच्या पिढीला हे माहितीसुद्धा नाही!"
दुसरी एक अभिनेत्री म्हणाली, "पायरसी रोखू शकत नाही म्हणून मल्टिप्लेक्सला पहिल्या एक दोन आठवड्यात कमावून घ्यायला लागते म्हणून तिकिटांचे दर वाढवले आहेत असे म्हणायचे की मल्टिप्लेक्सचे दर जास्त असल्याने पायरसी वाढली आहे असे म्हणायचे? अंडे आधी की कोंबडे असा हा सवाल आहे!"
आणखी एक अभिनेता म्हणाला, "काहीही असले तरीही पायरसीचे समर्थन करता येणार नाही. उलट आजकाल दोन तीन आठवडे चित्रपट चालल्यानंतर दोन चार महिन्यांच्या आत टीव्हीवर येतोच ना! तरीही पायरसी चालूच आहे. ती रोखण्यासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी पण मुळात सर्वप्रथम कॉपी कधी आणि कुठे होते ते आपण शोधू शकत नाही मग शिक्षा नेमकी कुणाला करणार?"
राजेश म्हणाला, "हो, तो मोठा गहन प्रश्न आहे. बनावट सीडी विक्रेत्यांना अटक करून फारसे काही होणार नाही!"
राजेश पुढे सांगू लागला, "आजकाल चित्रपटसृष्टीच नाही तर लेखनक्षेत्रात सुध्दा पायरसी वाढली आहे, बनावट पुस्तके सर्रास रस्त्यांवर विकत मिळतात आणि त्यात भरीस भर म्हणून काही डायरेक्टर लोकं लेखकांच्या कथेची सर्रास चोरी करतात, पण असो तो विषय वेगळा आहे आणि या आधी चर्चिला गेला आहे!"
एक निर्माता म्हणाला, "मग कधीतरी बॉलीवूड मंदीतून सावरायला सेक्सचा आधार घेते असे आढळून येते. सेक्सवर आधारित कथा हा चित्रपट चालण्याचा हुकुमी एक्का मनाला जातो! यात इन्व्हेस्टमेंट कमी असते आणि रिटर्न्स बऱ्यापैकी मिळतात, निदान नुकसान होण्याची शक्यता कमी असते नाही का?"
प्रेक्षकांतला एकजण म्हणाला, "पण एकूणच समाजमनावर याचा परिणाम काय होतो याचा कुणीही निर्माता, लेखक, निर्देशक विचार करतांना दिसत नाही!
राजेश, "ते ही काही अंशी खरे आहे, पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे ही लक्षात घ्या. तर आपण एकूणच भारतीय चित्रपट सृष्टीसमोरील आव्हाने याबद्दल चर्चा करत होतो. चुकीची सेन्सॉरशिप किंवा वैयक्तिक आकसापोटी किंवा राजकीय हेतूने प्रेरित अशी लादली गेलेली सेन्सॉरशिप, पायरसी आणि अजून कोणती आव्हाने आहेत, सांगा बरे?"
दुसरा एक प्रेक्षक म्हणाला, "आजकाल टीव्हीवर एक ट्रेंड दिसतो. एखादी सिरीयल वर्षानुवर्षे चालते आणि मग अचानक काहीतरी कारण देऊन निर्माते ती अचानक बंद करतात. ही तर प्रेक्षकांची शुद्ध फसवणूक आहे. याची दाद कुठे मागता येईल का? वर्षानुवर्षे सिरीयल रोज रोज बघून अचानक मधूनच ती बंद केल्यास प्रेक्षकांनी आतापर्यंत सिरीयल बघायला दिलेल्या वेळ हा वाया गेल्यासारखा नाही का?"
राजेश म्हणाला, "हा मुद्दा बरोबर आहे. कुणी सिरीयल विरोधात तक्रार केली असेल आणि कोर्टाने तसा सिरीयल बंद करायचा आदेश दिला असेल तर तो भाग वेगळा पण निर्मात्यांच्या लहरीखातर सिरीयल बंद करणे हा मात्र अन्याय आहे. याबाबत कन्झुमर कोर्टात दाद मागता यायलाच हवी!"
प्रेक्षकांतला आणखी एकजण म्हणाला: "राजेश मला असे वाटते की कास्टींग काऊच हा आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मोठ्ठा कलंक मोठ्ठा डाग आहे, आजही ते चालते हे सत्य नाकारून चालणार नाही! आणि आपल्या मॅडम अॅकॅडमी आणि त्यासारख्या संस्थांमध्ये पण आजकाल भ्रष्टाचार वाढलाय असे ऐकिवात आहे, अभिनय शिकविणाऱ्या अशा प्रकारच्या अनेक संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढतोय असे नाही का वाटत?"
राजेश म्हणाला, "प्रत्येक क्षेत्रात बऱ्यावाईट गोष्टी असतातच, त्यामुळे आपण मिळून वाईट गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करू म्हणजे लोकांचे या क्षेत्राबद्दल गैरसमज दूर होतील. मी याबद्दल सुपरस्टार अमित श्रीवास्तव यांची मदत घेणार आहे. त्यांनीही या चर्चेत सहभागी होण्याबद्दल मी विनंती केली होती पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. कास्टींग काऊच बद्दल माझेकडे बॉलीवूड मधील काही तथाकथित प्रसिद्ध व्यक्तींविरोधात पुरावे सुध्दा आहेत, स्टिंग ऑपरेशनमध्ये ते अडकले आणि पुरावे हाती आले, योग्य वेळ आली की ते जगासमोर मी आणणार!"
हा कार्यक्रम टीव्हीवर बघत असताना राजेश त्याच्या छोट्याशा बाळाशी खेळत होता आणि पिकेचा संताप होत होता. त्याने राजेशला कॉल केला, "राजेश, विणा वाटवेने मला सांगितल्या प्रमाणे तुम्ही लोकं माझ्या वडिलांचे काळे कारनामे पब्लिक समोर आणणार नव्हता फक्त माझ्यासाठी, माझ्या विनंतीवरून! माझ्या कथा चोरून तुम्ही आमचा बदला घेतला, फिट्टम फाट झाले आता मला वाटते तुम्ही थांबावे, वडिलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, आमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे!"
राजेशने त्याला खोटा दिलासा दिला, "काळजी करू नको पिके, ते मी प्रोग्राम मध्ये सहज म्हणालो पण मी तसे करणार नाही! माझ्यावर विश्वास ठेव!"
राजेश मनात म्हणाला, "बेटा पिके, कथाचोरीचा गुन्हा तर तुझ्या बापाने केला आहेच पण, चित्रपटांत काम देण्याच्या आमिषाने फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केलेल्या मुलींबद्दल काय? केकेला एक्स्पोज केल्याशिवाय तक्रार दाखल करायला त्या पुढे येणार नाहीत. जरी त्या गोष्टीला अनेक वर्षे लोटली तरी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्यांनी स्वखुशीने केकेला शोषण करू दिले त्यांच्या बद्दल काय बोलणार? पण ज्यांच्या मनाविरुध्द शोषण केले होते त्यांचे काय?"
yyyy