फिल्म इंडस्ट्रतील सर्वात प्रतिष्ठेचा आणि सर्वात जुना अवार्ड "मॅडम फिल्म मॅक्सीमा" (MFM) अवार्ड मिळवणे आजही फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी अतिशय सन्मानाचे वाटत असे. मॅडम अवार्ड हे मॅडम अकादमी तर्फे चालवले जात. पूर्वी "फिल्म मॅक्सीमा" मासिकातर्फे चालवत येणारा हा अवार्ड नंतर मॅडम अकादमीने स्पॉन्सर करायला सुरुवात केली होती. या अवार्डसाठी सगळेच आधीपासून तयारीला लागले होते. गेल्या काही वर्षांपासून या अवार्डमध्ये टेलिव्हिजन अवार्ड सुध्दा सामील करण्यात आल्याने जवळपास सर्वच कलाकार या फंक्शनला यायचे. यात मराठी चित्रपट आणि सिरियलचे पण अवार्ड सामील होते.
हा अवार्ड शो वगळता इतरही अनेक संस्था अवार्ड द्यायच्या. असे एकूण जवळपास सोळा ते सतरा वेगवेगळ्या प्रकारचे अवार्ड दरवर्षी दिले जायचे. पण कलाकारांसाठी मॅडम फिल्म मॅक्सीमा हा अवार्ड खूप प्रतिष्ठेचा होता. हॉलीवूडच्या "गोल्डन वर्ल्ड अवार्ड"च्या तोडीचा हा अवार्ड मानला जात होता.
माया माथूरला या वर्षी आश्चर्यकाररीत्या "बेस्ट फीमेल लीड इन कॉमिक रोल" साठी नॉमिनेशन मिळाले होते आणि तिला स्पर्धेला फक्त आणखी एक नटी होती पण मायाच जवळपास तो अवार्ड पटकावणार हे जवळपास निश्चित झाले होते. आपले जुळे मुलं आणि डॉक्टर पती यांच्यासमवेत ती अवार्ड फंक्शनला आली होती. अजूनपर्यंत तिने तिला मिळालेल्या धमकीबद्दल नवऱ्याकडे अवाक्षर सुध्दा काढले नव्हते कारण झालाच तर चित्रपट केल्याचा तिला फायदाच झाला होता पण आताशा काही दिवसांपूर्वी कातील खान तिच्याशी अकारण जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता आणि ते तिला खटकत होते. पण सूरज सोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्याने तिने सूरजला त्याबद्दल तक्रार केली नव्हती. आणि इतक्या उशिरा नवऱ्याला सांगितले तर तो ओरडणार अशा विवंचनेत ती होती. पण चेहऱ्यावर दाखवू शकत नव्हती.
राजेश सुध्दा सुनंदा, त्याची आई आणि त्याच्या मुलासह तेथे उपस्थित होता. सारंग, पिके, वीणा आणि राजेशच्या टीम मधील मंडळी तेथे उपस्थित होती. राजेशचे फिल्मी करियर एकदम सुरळीत सुरू होते. त्याचा कथाचोर सापडला होता त्याला अमितजींच्या मदतीने अटकही झाली होती, त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत राजेशला एक वेगळेच "वलय" प्राप्त झाले होते. त्याचेकडे सगळे लोक आदराने बघत होते. अख्ख्या इंडस्ट्रीतील लेखकांचा त्याला पाठिंबा मिळाला होता. त्याचे पर्सनल लाईफसुध्दा रुळावर आले होते.
पिके आणि वीणा आता रिलेशनशिप मध्ये होते. त्याचे मतपरिवर्तन झाले असले आणि कोर्टात त्याने वडिलांविरोधात साक्ष दिली असल्याने त्याला सगळीकडे सहानुभूती मिळाली असली तरीही मनाच्या कोपऱ्यात एके ठिकाणी त्याला राजेशाबद्दल अढी होतीच. पार्टीत तो जरी सगळ्यांत मिसळत असल्याचे वाटत होते तरीही ते फक्त वरवरचे होते. मनातून त्याला या पार्टीत बिलकूल स्वारस्य नव्हते. त्याचे वडील तुरुंगात होते आणि आई मुंबईतच वडिलांपासून वेगळी रहात होती. केकेला अटक झाल्यानंतर मात्र तिचा फोन त्याला आला होता. त्याची विचारपूस तिने केली होती. आई वडिलांचे वेगळे राहण्यामागचे कारण होते "मिनालिका रेड्डी" ही नटी! तिचे केके सोबत अफेअर होते.
आता वीणा त्याचसोबत त्याच्या घरी राहायला लागली होती. दोघांनी लग्न करायचे ठरवले होते. पिके बराच वेळ एका खुर्चीवर बसून शून्य मनाने समोर स्टेजवर काय चालले आहे ते बघत होता. त्याच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन आकाराला येत होता. आपल्या त्या प्लॅनवर त्याच्या गालावर हास्याची लहर उमटली.
अमितजी आजच्या अवार्ड फंक्शन मध्ये राजेशची भेट एका व्यक्तीशी घालून देणार होते ज्यामुळे राजेशला हॉलीवूडच्या चित्रपटासाठी लेखनाची संधी मिळणार होती कारण आजच्या फंक्शनला त्या भव्य हॉलीवूड चित्रपटाची टीम येणार होती.
सध्या राजेशच्या मनात अजून एक कथा घोळत होती. फिल्म इंडस्ट्री मध्ये घडणाऱ्या घटनांवर त्याला एक कथा लिहून त्यावर चित्रपट बनवायचा आणि त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याला स्वतः करायचे होतें. त्यात तो त्याची स्वतःची कथा चोरीची कहाणी आणि इतर काही पात्रांच्या कथा मांडणार होता. थोडे सत्य आणि थोडे काल्पनिक असे मिश्रण त्याच्या कथेत असणार होते. त्याचा प्लॉट त्याच्या मनात तयार होता आणि थोडे थोडे लिखाण त्याने सुरू सुध्दा केले होते पण त्या आधी हॉलीवूडची संधी त्याला घ्यायची होती...
या वर्षी बॉलीवूड मध्ये बॉलीवूडच्याच पार्श्वूमीवर चित्रपट बनला होता: "रांगिला राजन". त्या अनुषंगाने राजेश आणि त्याच्या टीम मध्ये सहज चर्चा चालली होती.
राजेश म्हणाला, "एक मात्र नक्की! इतर विविध क्षेत्रातील घडामोडींवर काल्पनिक कथा लिहून आपण बॉलीवूडवाले त्यात खूप ड्रामा भरतो. काही वास्तववादी चित्रपट सोडले तर अशा नाट्यपूर्ण चित्रपटात जसे दाखवतात तशा घटना त्या त्या क्षेत्रातील लोकांच्या जीवनात कधी खरोखर घडत नाहीत, पण पडद्यावर ते नाट्य आपल्याला बघायला आवडते, नाही का? आणि कथानक पूर्ण काल्पनिक असेल तर त्या क्षेत्रातील फारसे कुणी ऑब्जेक्शन घेत नाहीत. कारण त्यांनीही तो पडद्यावरचा ड्रामा मनातून आवडत असतोच!"
"बरोबर आहे राजेश, त्यामुळेच तर ते चित्रपट चालतात कारण त्यात मसाला असतो, ड्रामा असतो, सगळं लार्जर दॅन लाईफ असतं. जे खऱ्या जीवनात त्या त्या क्षेत्रात कधी घडू शकत नाही."
"मग फिल्मी क्षेत्रावर जर असे अनेक मसालेदार, नाट्यपूर्ण घडामोडी असलेले चित्रपट बनवले तर काय बिघडले? आणि कुणी लेखकाने चित्रपट सृष्टीवर अशी नाट्यपूर्ण कथा लिहिली तर काय बिघडलं? मी तर लिहिणार आहे! माझ्यासोबत घडलेल्या कथाचोरी बद्दल मी एक चित्रपटाची कथा लिहिणार! स्वत: प्रोड्यूस करणार!!"
ही चर्चा मन लावून आणि कान टवकारून बाजूला गप्पा उभा असलेला संदीप पटेल हा निर्माता बऱ्याच वेळेपासून ऐकत होता. तो "हिरेश रासिलीया" या प्रसिद्ध संगीतकाराशी बोलत होता. हा संगीतकार नंतर गायला सुद्धा लागला होता पण त्याचे "गाणे" फारसे लोकांनी पसंत केले नाही तरीही तो गातच सुटला होता. नंतर त्याही पुढे जाऊन त्याने अक्षरश: अभिनय करायला सुरुवात केली, जे लोकांना त्याच्या आवाजापेक्षाही जास्त असह्य होऊ लागले पण त्याने प्रयत्न करणे काही सोडले नव्हते. प्रत्येक अवार्ड शो मध्ये हा संगीतकार आवर्जून डायरेक्टर, प्रोड्युसर तसेच कास्टिंग डायरेक्टर वगैरे मंडळीना भेटत राहायचा जेणेकरून कुणीतरी त्याला "अभिनय" करायला देईल! गाणे आणि अभिनय या हट्टापायी त्याच्यातला संगीतकार मात्र कुठेतरी हरवत चालला होता पण त्याला त्याचेशी काही घेणे देणे नव्हते!
इकडे राजेश आणि टीममध्ये गप्पा चालूच होत्या.
"मुळीच काहीच नाही बिघडलं. लिही बिनधास्त राजेश. लिहित रहा, लिखाण एन्जॉय करत रहा! आम्ही सर्व तुझ्या कायम पाठीशी आहोत."
"धन्यवाद माय डियर टीम!" राजेश म्हणाला.
आणि मग त्यांनी आपापले ग्लास उंचावत चीयर्स केले.
हा चियर्सचा जल्लोष बघून संदीप पटेल हिरेशला एक्स्क्यूज मी करून त्या टीमजवळ आला आणि राजेशला म्हणाला,
"राजेश, आप बडे लेखक हो, पत्रकार हो, बडे बडे लोगों मी उठना बसना है आपका! अच्छी बात है! लेकीन सर जी, फिल्म इंडस्ट्री में रहके फिल्म इंडस्ट्री के ही बारे में या फिर इंडस्ट्री के लोगों के बारे में भला बुरा लिखना नाही चाहिये राजेस बाबू!"
राजेश म्हणाला, "क्यो? आपको ऐसा क्यों लागता है?"
संदीप म्हणाला, "देखो राजेस भाई! ये बात तो ऐसी हो गयी ना की पानी में रहके मछली से बैर! पहले ही आपने केके सुमन जैसी हस्ती से पंगा ले लिया है, तो क्यो बार बार अपनीही घरकी मछली से पंगा लेना? है ना? क्युं भाई सारंग सोमैय्या जी ? सही कहां न मैने?"
सारंग म्हणाला, "छोडो ना मोटा भाई! आप पार्टी एन्जॉय करो! राजेस भाई देख लेंगे क्या करना है! क्युं राजेस?" असे म्हणून सारंगने डोळा मिचकावला आणि सगळी टीम खळाळून हसायला लागली. या प्रकाराने अपमान वाटून संदीपने चिडून तेथून काढता पाय घेतला आणि हिरेश सोबत जॉईन झाला.
भव्य 4K हॉलीवूड चित्रपट निर्माण करणार असलेल्या त्या हॉलीवूड टीमला आजच्या या अवार्ड फंक्शनच्या आधारे एका दगडात अनेक पक्षी मारायचे होते, त्यापैकी महत्त्वाचा पक्षी म्हणजे प्रदर्शनाआधीच त्या चित्रपटाची जबरदस्त हवा आणि पब्लिसिटी भारतात करायची!! भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात चित्रपट हिट झाला तरी निर्मात्याचे अर्धे पैसे वसूल होणार होते.
आता फक्त उत्सुकता होती त्या व्यक्तीला भेटण्याची जी राजेशला हॉलीवूड लेखनासाठी चान्स देण्याची शक्यता होती आणि जिथे अमितजी सारखा कलाकार राजेशची शिफारस करणार तिथे नाही म्हणण्याची कुणाची मजाल? या संधीसाठी राजेशने अनेक हिंदी मराठी चित्रपट निर्मात्यांची ऑफर नाकारली होती. कारण त्याला आता हॉलीवूडसाठी लेखनाचा अनुभव घेऊन बघायची उत्सुकता होती. दरम्यान त्याची फिल्मी पत्रकारिता थोड्या प्रमाणात सुरूच होती.
आजच्या कार्यक्रमातला राजेशच्या जीवनातला विशेष "अवार्ड विनिंग सीन" म्हणजे सुनंदा आणि मोहिनी अवार्डच्या ठिकाणी अगदी हसत खेळत एकमेकांशी बोलत उभ्या होत्या. एकमेकांना काय हवं नको ते विचारत होत्या. पूर्वी मोहिनीमुळे निर्माण झालेल्या गैरसमजामुळे जो गोंधळ उडाला होता ते आठवून आठवून हसत होत्या त्या दोघी!!
राजेशने स्वतःला एक चिमटा काढला आणि हे सगळे सत्य आहे याची खात्री करून घेतलीं. हॉलीवूडची टीम अजून अवार्ड नाईट मध्ये यायची बाकी होती. ते एक सरप्राइज असणार होते. ती टीम अवार्ड नाईटच्या आधी फक्त ठराविक लोकांनाच भेटली होती.
अवार्ड नाईट मध्ये अभिनेत्री रिताशा सुध्दा भूषण ग्रोवर सोबत आनंदाने बागडत असतांना दिसत होती. त्या दोघांनी लग्न केले होते...
सोनी बनकर मात्र कुठेच दिसत नव्हती. सुभाष भट सोबत तिने केलेला एकच सिनेमा बऱ्यापैकी हीट झाला होता पण नंतर भूषण ग्रोवर सोबत तिचे संबंध ताणले गेल्याने आणि नंतर त्याने तिला घटस्फोट दिल्याने ती मनातून पूर्ण कोलमडून गेली होती. नंतर तिने कोणत्याही चित्रपट किंवा टिव्ही निर्मात्याची ऑफर स्वीकारली नाही. घटस्फोटानंतर ती मुंबई शहरातून दिसेनाशी झाली. कुणाच पत्रकाराला किंवा तिच्या ओळखीच्या लोकांना माहिती नव्हतं की सोनी नेमकी गेली कुठे?
आयुष्यात बालपणी अनेक सुख दुःखाचे चढ उतार पाहिल्यानंतर, ती मुंबईत आली आणि होती आणि आईशी खोटे बोलून तिने "मॅडम अॅकॅडमी" जॉईन केली. मग साकेतच्या रूपाने तिला मित्र मिळाला पण तोही सोडून गेला. कालांतराने सेल्फी प्रकरणाचे निमित्त होऊन आईने तिच्याशी संबंध तोडले पण तिच्या शिक्षणावर तिच्या काकांनी केलेल्या खर्चाची भरपाई तिला महिन्याला पैसे गावी पाठवून करावी लागली.
पण जमेची बाजू म्हणजे तिच्या आवडीच्या क्षेत्रात चांगले काम मिळवून लग्न झाले आणि थोडा सुखी संसार सुरू झाला असतांना आणि नवऱ्याकडून प्रेम मिळू लागले असताना अचानक नवऱ्याकडून अनपेक्षितरित्या दुसऱ्या स्त्रीसाठी घटस्फोटाची नोटीस सोनीला मिळाली आणि तिने ती शेवटी स्वीकारली.
पण या सर्व प्रकारामुळे ती खूप कोलमडून पडली. आई सुद्धा पारखी झाली होती आणि वडील तर नव्हते. साकेत सारखा मित्र पण तिच्या जवळ नव्हता.
फिल्मी जगतात मिळाला तर एकदम वलयांकित झगमगाट मिळतो नाहीतर मग टोकाचे दुःख काहींच्या वाट्याला येतं. तिला हे ब्रेकअप, हे दुःख सहन झाले नाही. अनेक महिने काम न मिळाल्याने आणि जे काही मिळाले ते काम तिने दुःखाच्या भरात न स्वीकारल्याने तिला पैशांची चणचण भासू लागली होती. मग शहरात अक्षरशः ती केस विस्कलेल्या स्थितीत आणि विमनस्क अवस्थेत कुणी ओळखू नये म्हणुन अंगावरून आणि चेहऱ्यावरून शाल पांघरून इकडे तिकडे फिरू लागली.
काही दिवस अक्षरशः फूटपाथवर झोपली आणि मग जे काही थोडे पैसे होते त्याद्वारे ती तिच्या मूळ गावी गेली. तेथे तिला कुणीही ओळखले नाही. पुन्हा आई आणि गाववाले आपल्याला स्वीकारणार नाहीत हे तिला मनोमन पटले होते. आईने स्वीकारले तरी तिचे काका काहीतरी गडबड घोटाळा करणार आणि तिला सुखाने जगू देणार नाही हे तिला कळून चुकले होते.
नेहमी काहीतरी सनसनाटी बातम्या हव्या असणाऱ्या काही ठराविक न्यूज चॅनल्सनी तिच्या गायब होण्यावर अनेक कार्यक्रम बनवले. काही मराठी चॅनल्सनी सुध्दा तसे कार्यक्रम बनवले. सोनी गायब होण्यामागे तिचा घटस्फोट हेच एक प्रबळ कारण असावे असे चॅनलवाले वारंवार ओरडून सांगत होते.
रात्र झालेली होती. सोनीच्या मूळ गावात असाच एक कार्यक्रम सोनीची आई बघत होती आणि तिला सोनीची खूप आठवण आणि दया आली. ती रडू लागली. तिच्या स्वत:च्या घराच्या आसपास फिरत असताना सोनीला खिडकीतून तो टिव्ही आणि तो प्रोग्राम दिसले. आई आणि काका तो प्रोग्राम बघत होते. आईला रडताना बघून तिला वाईट वाटले. त्या गावात सोनीला कोणीही ओळखले नाही. असेल कुणी एक वेडी भिकारीण म्हणून लोकांनी दुर्लक्ष केले.
एक क्षण सोनीला वाटले की पुन्हा आईच्या कुशीत शिरावे, रडावे आणि आईसोबत राहावे..
सोनीच्या वडिलांच्या हार घातलेल्या फोटोखाली असलेल्या पलंगावर बसून टिव्ही बघता बघता डोळे पुसत सोनीची आई तिच्या काकाला म्हणाली, "पोरगी लई वाया गेली! बरं झालं तिला धडा मिळाला! सटवी कुठली! कुठे मरून गेली असेल तर निदान तिच्या जीवाले शांती भेटेन!"
"आन आपल्या बी!" डोळे मिचकावत काका म्हणाला आणि तिच्या आईला त्याने कमरेभोवती हात घालून जवळ ओढून घेतले. सोनीच्या वडलांच्या फोटोला घातलेला हार थोडासा हलल्यासारखा वाटला. जणू काही तिचे वडील तिला आपल्या दु:खाची जाणीव करून देत होते.
हे बघून आणि ऐकुन हुंदका आवरत सोनी तेथून तडक पळतच निघाली आणि गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या पुलावर चालत गेली. पुलावरून कठड्याला टेकून खालच्या नदीतल्या अंधाऱ्या पाण्याकडे तिने बघितले.
काळाकुट्ट अंधार! आणि नदीपात्रातले काळेशार भीतीदायक पाणी! त्या पाण्याकडे ती बघत राहिली आणि रडत राहिली.
अचानक त्या पाण्यात तिला उजेड जाणवला आणि त्या उजेडात तिला तिचे वडील दिसले.
या क्षणी तिला वडलांची जास्त आठवण आली. तिचे वडील तिच्या फार लहानपणीच वारले होते, पण थोडी थोडी आठवण तिच्या मनात शिल्लक होती. तिला पुसटसे आठवत होते की वडील तिला मांडीवर घेत, तिचे कौतुक करीत, तिला अंगाखांद्यावर खेळवीत. वडील घरी आले की ती पळत पळत त्यांचेकडे जाऊन त्यांना बिलगत असे...
आताही तिच्या वडिलांनी अंधाऱ्या नदीतल्या पाण्यातून तिला कडेवर घेण्यासाठी हात पुढे केले. सोनीला लहान झाल्यासारखे वाटले. ती लहान मुलीसारखी हसू लागली. पुलावर आता एकही वाहन नव्हते. गावातली पुलावराची वाहतूक रात्री जवळपास बंद व्हायची. एखाद दुसरी बाईक गेली तर गेली! गावाबाहेरच्या अंधाऱ्या जागेतील त्या अंधाऱ्या पुलावर एकटी उभी राहून ती हसत होती. वेड लागल्यासारखी ती मोठमोठ्याने हसायला लागली. बॉलीवूड मधील एक वलय एका वेगळ्याच वळणावर पोहोचलं होतं..
तिने हसणं अचानक थांबवलं. पाण्यात दिसणाऱ्या त्या वडिलांना भेटायला ती अधीर आली आणि नदीच्या प्रवाहात तिने उडी टाकली. तिचे वलय पाण्यात पडताच विझले होते आणि प्रवाहासोबत वाहत गेले...
सोनीने पाण्यात उडी टाकल्यानंतर पाणी वेगाने वर उसळले आणि इकडे रिताशाने भूषणच्या ड्रिंक्सच्या ग्लास मध्ये बर्फ टाकल्याने त्यातील दारू वर उडाली होती. ग्लास रिचवत अवार्ड नाईट मध्ये ती भूषण सोबत एन्जॉय करत होती. तिला अनेक नव्या निर्मात्यांनी पुन्हा ऑफर दिल्या कारण तिचा टिव्ही शो हीट झाल्याने ती पुन्हा फॉर्म मध्ये आली. मात्र एकीचे वलय विझून दुसरीचे विझलेले वलय पुन्हा निर्माण झाले होते.
आजच्या या अवार्ड मध्ये दिनकर सिंग, त्यांची पत्नी हे सुद्धा आलेले होते. पण ते सूरजला भेटले नाहीत आणि सूरज सुद्धा त्यांना भेटला नाही. सिंग यांचेशी नजरानजर झाल्यानंतर सूरजच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू दिसत होते. एकंदरीत रीताशा आणि सिंग यांची सिरीयल हिट झाली होती. मात्र सिंग यांना एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे रीताशा आणि भूषणचे जमलेले सूत आणि त्यासाठी सोनी बनकरला भूषण ने दिलेला घटस्फोट आणि सोनी मुंबईतून गायब होण्याबाद्दलच्या उलटसुलट अफवा! पण याबद्दल फार काही खोलात रिताशाला विचारणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे आहे हे त्याना माहित होते! म्हणून त्यांनी फार काही त्यात लक्ष घातले नाही.
अवार्ड शो सुरू झाला.
सगळीकडे डिस्को लाईटस चमचमत होते. ते फिल्मी तारे तारकांच्या अंगावरून फिरत होते. आकाशातले तारे सुध्दा त्या दिवशी या जमिनीवरच्या ताऱ्यांचा हेवा करत होते. सुपरस्टार निखिल कुमार, जोरावर खान हे सूत्र संचालन करत होते. त्यांच्या जोडीला काव्या कुमारी पण होती. एकमेकांवर आणि प्रेक्षकांत बसलेल्या बॉलीवूड मधील मंडळींवर ते विविध प्रकारचे जोक्स करत होते. महा सुपरस्टार अमित श्रीवास्तव हे त्यांची पत्नी आणि मुलगा, सून यांचेसह हजर होते.
एक हरहुन्नरी अभिनेता जो एका वर्षी एकाच चित्रपट करायचा तो मात्र नेहमीप्रमाणे अवार्ड शो मध्ये आला नव्हता कारण म्हणे त्याचा अशा अवार्ड्सवर विश्वास नव्हता.
उमंग कुमार या रबरासारखी बॉडी असलेल्या कलाकाराने स्टेजवर जबरदस्त नाच सुरु केला.
"मैं हुं सबसे प्यारा, डिस्को दिवाना...!"
प्रेक्षक टाळ्यांवर टाळ्या देत होते. मग बेस्ट स्पेशल इफेक्ट, तसेच बेस्ट गायक, बेस्ट स्टंट वगैरे असे पुरस्कार मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटासाठी क्रमाने दिले गेले.
मग धनिका दास या अभिनेत्रीने एका आयटम साँगवर डान्स चालू केला. तिच्या दिलखेचक नृत्याने प्रेक्षकांत बसलेल्या भल्या भल्या मंडळींचा काळजाचा ठोका चुकला.
स्टार्टर्स आणि काही ड्रिंक्स पोटात गेल्याने बरेच जण आता रिलॅक्स होते.
yyyy