काही दिवसांनी गोरेगांच्या राजेशच्या रुमवर -
राजेश फोनवर बोलत होता -"जितेंद्र करमरकर साहेब कुठे गेला होतात? आम्ही आपली वाट बघत होतो. आतुरतेने!"
जितेंद्र - "वा वा वा! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेच का? आपण गावाकडे गेलात आणि गायब झालात. कॉल केले होते तेव्हा काही उत्तर नाही मिळाले. इकडे काय काय संकटे आली आम्हाला, काही कानावरून हवा गेली की नाही अजून?"
राजेश - "संकटं? कसली संकटं? तुझ्यासारखा माणसावर संकटं येण्याआधीच ती स्वत:च घाबरून पळून जाणार! अन म्हणे संकटं आली!"
जितेंद्र - " आरे मित्रा! एक तर त्या तुमच्या सुप्रिया मॅडम सिरीया सोडून गेल्या आणि …."
राजेश - "काय ? काय? काय बोललास? परत बोल एकदा? सुप्रियाने सिरीयल सोडली??"
जितेंद्र - "असा अंगावर पाल पडल्यासारखा काय दचकून बोलतो आहेस? जसे काही तुला माहितीच नाही?"
राजेश - "अरे नाही मित्रा! खरंच मला माहिती नाही. ए पण एक सांग! तू माझी खेचत तर नाही आहेस ना?"
जितेंद्र - "मित्रा! आता बास झाले. आता प्रत्यक्ष भेट, तेव्हाच बोलू. अनेक नवी कामे द्यायची आहेत तुला. त्याबद्द्ल सुद्धा सविस्तर बोलता येईल!"
फोन बंद झाल्यावर क्षणभर राजेशच्या पोटात धस्स झाले. सुप्रियाने सिरीयल सोडली? अशक्य!
ती तर म्हणाली होती की --
".... हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल! आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल...."
राजेश विचार करता करता अस्वस्थ झाला. अचानक त्याला सुप्रियाबरोबरचे सोबत घालवलेले क्षण भले ते कमी काळाकरता का होईना ते आठवायला लागले.
आणि ती सोबत होती तेव्हा मात्र ....?
राजेशला तीला भेटावेसे वाटायला लागले. कुठे असेल ती? फोन करु का? होय! फोनच करतो तीला आता!
सुप्रियाला फोन करताच, "हा नंबर स्विच्ड ऑफ म्हणजेच बंद आहे." असा संदेश एक मंजूळ स्त्री आवाज राजेशला सांगू लागला.
"सुप्रियाने नंबर बदलला असावा बहुतेक!" राजेशचे हृदय त्याला सुचवू लागले.
"राजेश! अरे तू आता ब्रेकअप केले आहेस! आता तूला काय अधिकार आहे तीला कॉल करण्याचा?" राजेशची बुद्धी त्याला सांगू लागली.
"पण ती असे कसे करू शकते? मला तिला एकदा भेटायलाच हवे !" पुन्हा हृदय म्हणू लागले.
दोघांचे द्वंद्व असतांना राजेशच्या मोबाईलची रिंगटोन वाजली.
"सुनंदा कॉलिंग … " अशी अक्षरे स्क्रीन वर उमटू लागली.
"हा सुनंदा ब.. ब.. बोल!"
"तुमचा स्वर असा चिंतीत कसा वाटतो आहे? काही काळजी आहे का? मला सांगा?"
"न .. न .. नाही! सगळं ठीक आहे. व्यवस्थित आहे. पुढच्या आठवड्यात तुला आणि आईला घ्यायला येतोय मी!"
"मला किती किती आनंद झालाय म्हणून सांगू?," तिच्या स्वरातून आनंद ओसंडून वाहात होता.
जुजबी बोलून त्याने फोन ठेवला. सुप्रियाच्या बातमीमुळे त्याचे पुढचे प्लॅन तो विसरत चालला होता.
त्याचे हृदय गप्प बसले आणि बुद्धी सांगू लागली, "राजेश ! जितेंद्रला भेटायचे आहे. समीरणला भेटायचे आहे. स्क्रिप्ट लिहायच्या आहेत. तुझी महत्वाकांक्षा तुझ्याकडे मोठ्या अपेक्षेने बघते आहे की तू तिला नक्की न्याय देशील आणि तू अजूनही सुप्रियाच्या आठवणी काढतो आहेस? अरे सुनंदाला घेऊन ये, आई काही दिवस शहरात राहून गावी परत जाणार आहेच! मग आईची नेहेमीकरता यायची इच्छा असेल तर तिलाही नेहेमीकरता बोलावून घे. मग तुझी स्वप्ने पूर्ण कर! चल लाग कामाला! सोड त्या सुप्रियाची आठवण!"
काही काळ लोटला.
अधून मधून तो सारंग सोमैय्या सोबत फोन करून टच मध्ये होताच. सारंग आणि त्याची टिम सुद्धा अगदी राजेशच्या फ्रिक्वेन्सीशी जुळवून घेणारी होती. त्या टिमकडून राजेशला सामान्य नागरिकांची, फॅमिलिज्ची चित्रपटांविषयीची अनेक मतं आणि मतांतरं मिळण्यास मदत होत होती. त्याचा फायदा राजेशला चित्रपटांच्या कथा आणि परीक्षण लिहायला व्हायचा. ही टीम त्याचे पर्सनल ध्येय साध्य करायला त्याला मदत करणार होतीच पण या इंडस्ट्रीत त्या टिममधील अनेकांना त्यांच्या कुवतीप्रमाणे आणि लायकीप्रमाणे ब्रेक देऊन शक्य तेवढी परतफेड सुद्धा त्याला करायची होतीच.