Capture

संपादक मंडळ, दृश्यकला खंड,:–वासुदेव कामत, वसंत सरवटे, दिपक जेवणे,दिलीप करंबळेकर, सुहास बहुळकर, साधना बहुळकर, गोपाळ नेते, रंजन जोशी, दिपक घारे, सुपर्णा कुलकर्णी

आपल्याकडे कलेबद्दल इतकी अनास्था आहे, की समजा कोणाला चित्रकारांची नावे विचारली, तर राजा रवी वर्मा , हुसेन या शिवाय तिसरे नाव कोणाला आठवणार नाही.घर बांधायला खर्च केला जाईल, पण दिवाणखान्यात लावायला एखादे पेंटींग विकत घेतांना मात्र हजारदा विचार करतील.

तसा माझा कला क्षेत्राशी अजिबात काही संबंध नाही. गेल्या पाच वर्षापासून सुपर्णा ( माझी सौ.) चरित्र कोशाच्या चित्रकला खंडाची सहसंपादक म्हणून काम करीत असल्याने , बरेचदा खंडा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी जमा केलेली फोटो, चित्र आवर्जून दाखवायची . आता गाढवापुढे वाचली गीता, असा काहीसा तो प्रकार सुरुवातीला असायचा.

"निरंजनी" हळदणकरांचे पेंटींग. माझे सगळ्यात जास्त आवडते चित्र,niranjani by haldankar,

“निरंजनी” हळदणकरांचे पेंटींग. माझे सगळ्यात जास्त आवडते चित्र

पण मग नंतर तिने जेंव्हा एकदा हळदणकरांचे हातात दिवा घेतलेल्या तरूणी चे “निरंजनी” नावाचे पेंटींग ,किंवा “मंदिरपथगामिनी” हा शिल्पकार गणपतराव म्हात्रे ह्यांच्या शिल्पाचा फोटो किंवा नानासाहेब करमरकरांनी बनवलेल्या त्या बाळाच्या मूर्ती आणि त्यामधले बारकावे , आणि कलात्मक दृष्ट्या रसग्रहण करून दाखवल्यावर मात्र या सगळ्या प्रकारात एकदम खूप इंटरेस्ट निर्माण झाला. अर्थात या विषयावर लिहिण्याइतका माझा अभ्यास जरी नसला, तरी मूर्त, अमूर्त “चित्रकला एंजॉय करणे’ चित्रांचे प्रकार, माध्यम, पोत आणि शिल्पांचं रसग्रहण करण्या इतपत तरी प्रगती झालेली आहे. त्यामुळे कधी जहांगीर समोरून गेलो, तर पूर्वी त्याला बगल देऊन जे जायचो, त्या ऐवजी एक लहानशी चक्कर तरी नक्कीच मारतो हल्ली.

राजा रवी वर्मा सगळ्यांनाच माहिती आहे, पण सोलापूरच्या त्याच काळातील चंद्रवर्मा बद्दल कोणी काही ऐकलेले पण नाही.मला पण माहिती नव्हती :) असे अनेक ज्ञात अज्ञात चित्रकार, आहेत की ज्यांची माहिती या कोशात आहे. ती कशी मिळवली हे जर लिहीतो म्हंटलं तर त्यावर पण एखादा कोश निर्माण होऊ शकेल, इतकं काम केलं गेलंय या साठी.

मूर्तीकार म्हात्रे यांचे मंदीरपथगामीनी ..एक अप्रतीम शिल्प.

मूर्तीकार म्हात्रे यांचे मंदीरपथगामीनी ..एक अप्रतीम शिल्प.

आमच्या घरी पण चक्क दृष्यकलामय वातावरण निर्मिती झाली होती. ती घरी आली , की दररोज काही तरी नवीन सांगायची . दृष्य कला खंडा बरोबरच संगीत खंडाचे पण काम सुरु होतेच. त्याही क्षेत्रातील बरीच मनोरंजक माहिती कानावर पडत होती. या पूर्वी तिने ’ साहित्य खंडाचे” कार्यकारी संपादक म्हणून काम केलेले होते, त्या खंडाचे मुख्य संपादक डॉ. सुभाष भेंडे होते, खंड पूर्ण होई पर्यंत प्रत्येक लेखकाचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव आणि आडनाव अगदी तोंडपाठ झाले होते तिचे! इतक्या नोंदी (चित्रकला, संगीत, साहित्य) हाताखालून गेल्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की कुठल्याही विषयावर ती लेख लिहू शकते- हा कोश निर्मितीचा फायदा!

कोश म्हंटलं की श्रीधर व्यंकटेश केतकरांचे नाव आठवते. वयाच्या उण्यापुऱ्या ५३ वर्षात त्यांनी जे काम करून ठेवलंय त्याला तोड नाही, हे मी आज अधिकार वाणीने म्हणू शकतो, याचे कारण मी स्वतः काही “झपाटलेल्या” लोकांना एकत्र येऊन शिल्पकार चरित्र कोश निर्मितीच्या दरम्यान सहा वर्ष काम करतांना पाहिले आहे. सुहास बहुळकर, दिपक घारे यांनी तर दररोजचे ८ -१० तास या कोशा साठी खर्च केलेले आहेत.वसंत सरवटे ह्यांना प्रकृती स्वास्थ्या मुळे जरी दररोज येता येत नव्हते, तरी पण शक्य होईल तेंव्हा ते येऊन जायचे. त्यांचे योगदानही खूप महत्त्वाचे आहे. या सगळ्यांनी ५ वर्ष अक्षरशः झपाटल्यासारखे काम केलेले आहे, आणि म्हणूनच हा खंड पूर्णत्वास जाऊ शकला.

आज पर्यंत चित्रकला या विषयावर एकही कोश निर्माण झालेला नाही, त्यामुळे चित्रकारांची , मूर्तिकारांची माहिती गोळा करणे हे खूप कठीण काम होते. या पुढे चित्रकला किंवा मूर्तिकला ज्याला उपयोजित दृश्यकला म्हटले जाते त्याच्या अभ्यासासाठी हा खंड म्हणजे एक मूळ स्त्रोत ठरणार आहे. या खंडा मधे जी चित्र प्रसिद्ध करायची होती ती काही पर्सनल कलेक्शन मधली, तर काही महाराष्ट्रातील काही म्युझियम मधे होती. ही पेंटींग्ज आज पर्यंत कधीच कुठेही प्रसिद्ध झालेली नाहीत, त्यामुळे ही चित्र कुठेही उपलब्ध नाहीत.

ह्या चित्रांचे फोटो मिळवण्यासाठी अगदी गावो -गाव फिरायला जावे लागले. सोबत एक कॅमेरा, फोटोग्राफर घेऊन प्रत्येक चित्राचे किंवा मूर्तीचे चित्र काढून त्याच्या मूळ मालकाची खंडात प्रसिद्ध करण्यासाठी लागणारी परवानगी सुहास बहुळकर यांनी स्वतः गावोगाव फिरून मिळवून आणली. अर्थात हे काही सोपं काम नव्हतं, पण सुहास बहुळकर यांनी ते लीलया पूर्ण केलं. त्यांनी एकदा बोलतांना सांगितलं होतं, की बरीच दुर्लभ चित्र अगदी धूळ खात पडलेली होती, आणि त्यांच्यावरची धुळ झटकून आम्ही त्याचे फोटो काढून आणले. फोटो काढतांना जर मूळ पेंटींग फ्रेम केलेले असेल, तर मधल्या काचेचे रिफ्लेक्शन येऊ नये म्हणूनही बराच द्राविडी प्राणायाम करावा लागला.या खंडात जितके नवीन चित्रांचे फोटो टाकले आहेत, त्या प्रत्येक फोटो मिळविण्यामागे काय करावे लागले, ह्याची पण एक कहाणी आहे.

कोशहा जो काही ग्रंथ तयार होणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील चित्रकार, आणि त्यांची कला यांची माहिती सांगणारा पहिला कोश असल्याने ह्याचे फार मोठे महत्त्व आहे. आज पर्यंत गेल्या दोनशे वर्षात कुठल्याही कलाकाराचे किंवा त्याचे कलेचे डॉक्युमेंटेशन झालेले नसल्याने हा कोश या पुढे संदर्भग्रंथ म्हणून वापरला जाणार आहे.

शेजारी ते जे वाक्य लावले आहे ना , ते तिने अगदी पुरेपूर अनुभवलेले आहे.

.हे पोस्ट कशासाठी? तर ४ मे २०१३ रोजी हा कोश प्रकाशित झाला आणि ५ वर्षाच्या मेहनतीचे चीज झाल्याचे, अगदी कृत कृत्य झाल्याचे भाव चेहेऱ्यावर घेऊन जेंव्हा सुपर्णा घरी आली, तेंव्हाच ठरवले, की बायकोचे कौतुक तर करायलाच हवे – नाही का??

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel