आदित्य उद्धव ठाकरे,प्रितम आणि पंकजा मुंडे, नितीश राणे , राहूल गांधी, प्रणॊती शिंदे, ( बहूतेक नाव बरोबर लिहिले असावे) प्रिया दत्त, पुनम महाजन, सुप्रिया पवार सुळे , अमित किर्तिकर, अजिंक्य पाटिल ( डी वाय चा मुलगा ). वैभव पिचड, निरंजन डावखरे वगैरे सगळ्या व्यक्तींच्या मधे काय साम्य आहे? उत्तर अगदी सोपं आहे,ही सगळी कुठल्या ना कुठल्या तरी नेत्याच्या वंशावळी मधली ही मंडळी आहेत. या शिवाय पण बरेच लोकं असतील , पण सहज आठवली ती नावे वर लिहिलेली आहेत.
म्हणायला भारतात लोकशाही आहे, पण जनतेची मानसिकता मात्र अगदी सरंजामशाही च्या दिवसात होती तशी आहे. पूर्वीच्या काळी राजे लोकं असायचे, आणि त्यांची पिल्लावळ मग केवळ बाप राजा म्हणून मुलगा पण राजा व्हायची. त्या साठी स्वतःला काही करण्याची गरज नसायची. बरेच लोकं की जे अगदी राजा साठी किंवा त्यांच्या वंशावळी साठी जीव देतील असे असायचे. राजाज्ञा प्रमाण हाच एक जिवनाचा हेतू असायचा. आज ची राजनैतीक उलथा पालथ पाहिल्यावर खरंच काही बदल झाला आहे मला वाटत नाही. आज फक्त त्या राजांची जागा, नेत्यांनी आणि राज पुत्राची जागा त्यांच्या मुलांनी घेतली आहे.
प्रसंगी राजे लोकांसाठी स्वतःच्या प्राणाची आहूती पण देण्याची या लोकांची तयारी असायची.जयललीताला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेंव्हा जेल मधे पाठवले गेले, तेंव्हा तामिळनाडू मधल्या जवळपास १५ लोकांनी आत्महत्या केली. मागे कर्नाटकात तो राजकुमार नावाचा एक नट जेंव्हा मेला, तेंव्हा पण भरपूर जाळपोळ वगैरे झाली होती. या मॉब फ्रेन्झी ला खरंच काय म्हणावे हेच समजत नाही. आपल्याला लोकशाही मिळाली, पण लोकशाही म्हणजे नेमकं काय? हे समजले आहे का?
निवडणूकीच्या निकालांनी दाखवून दिले की आपण आजही त्या सरंजामशाही चे आपण गुलाम आहोत.बाळासाहेब ठाकरे कायम घराणेशाही वर टिका करत आले, पण स्वतः वर वेळ आल्यावर त्यांनाही हा मोह टाळता आला नाही. मग या मोहापायी आपली आयुष्यभराची कमाई म्हणजे निर्माण केलेल्या पक्षालाही डावावर लावायला त्यांनी कमी केले नाही.
वर दिलेल्या नावांपैकी किती नावे तुम्ही सामाजिक कार्यात मदत केल्याबद्दल पुढे आलेली ऐकली आहेत? आदित्य ठाकरे आणि राणे च्या मुलाचे मध्यंतरी कारने ओव्हरटेक करण्याबद्दल जे रस्त्यावर भांडण झाले त्या बातमी मधे नाव वाचल्याचे आठवते. या व्यतिरिक्त कुठल्याही विधायक कार्याशी यांची नावे जोडलेली नाहीत.साधारण अशीच परिस्थिती इतरही नेत्यांच्या मुलांची आहे.
भाषण देतांना या नेत्यांच्या पुत्र – कन्यांची बौद्धिक पातळी किमान जनतेच्या बरोबरीची तरी असायला हवी. पण तसे नसते, म्हणूनच हल्ली बरेच पप्पू तयार झालेले आहेत भारतीय राजकारणात, आणि अशा पप्पूंची भाषणे ऐकणे आमच्या सारख्या सामान्य जनतेच्या नशिबी येते.
जॉर्ज फर्नांडीस, मृणाल गोरे, अटलबिहारी, इंदीरा गांधीं सारख्या नेत्यांची भाषणे ऐकल्यावर ही भाषणे ऐकणॆ म्हणजे अत्याचारच! सुप्रिया ने तर या वेळेस एका भाषणात मोदींचा एकेरी उल्लेख केला आहे, आणि तो पण काहीही कारण नसतांना. असो… प्रत्येकाचे संस्कार आणि बौद्धीक पातळी वेगळी असते , आणि त्या बद्दल आपण न बोललेलेच बरे.
शेवटी एक प्रश्न पुन्हा समोर येतो, की जर आपण असे घराणेशाही ला पुढे नेत असू आणि त्यांचं घराणं लोकशाहीच्या मार्गाने राजेपदावर नेऊन ठेवत असू , तर खरंच लोकशाही साठी लायक आहोत??