कपाटातले सामान तिने बाहेर काढले होते. पॅकिंग सुरु होऊन दोन दिवस उलटले होते. गेली १६ वर्ष ह्या घरात काढली. नागपूरहून मुंबईला बदली झाली, आणि तेंव्हापासून कंपनीच्या ह्या घरात रहायला आलो तेंव्हा मोठी मुलगी सेकंड स्टॅंडर्ड आणि धाकटी नर्सरी मधे होती. दोघीही ह्याच घरात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनाही हे घर म्हणजे स्वतःचेच आहे असे वाटायचे. कधी आपल्याला हे घर सोडून जावे लागेल असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते.
इतकी वर्ष म्हणजे जवळपास १७ वर्ष आपण मुंबई रहातोय, पण इथे कधी घर घ्यावे असे का वाटले नाही आपल्याला?? पहिली गोष्ट म्हणजे जेंव्हा इथे मुंबईला रहायला आलो, तेंव्हा असे वाटायचे की आपण फार तर इथे तीन चार वर्ष राहू, नंतर मग परत नागपूरला निघून जाऊ. ही इथली गर्दी, वगैरे नको रे बाबा… इथे आहोत तो पर्यंत हे कंपनीचे घर आहेच! कधी तरी मित्र म्हणाले म्हणून म्हाडा च्या स्किम मधे अर्ज केले होते, पण नंबर मात्र लागला नव्हता. म्हणतात ना, नशिबात काय लिहिले आहे ते कधीच समजू शकत नाही.
माळ्यावरून मुलींची लहानपणची खेळणी, स्पेल बाऊंड चा गेम, जेंव्हा माळ्यावरून बाहेर निघाले, तेंव्हा मात्र किंचित ओल्या झालेल्या डोळ्य़ाच्या कडा ओलावल्या होत्या… मुली इतक्या मोठ्या झाल्या यावर विश्वासच बसत नव्हता. मोठी मुलगी इंजिनिअर झाली सुद्धा, आणि नोकरी पण करायला लागली. धाकटीची बि. टेक. ची दोन वर्ष पुर्ण झाली आणि आता शेवटचे दोन वर्ष शिल्लक आहेत, म्हणजे दोनच वर्षात तिचे पण शिक्षण संपेल, ती पण नोकरी ला लागेलच कुठे तरी . दिवस कसे कापरा सारखे उडून गेले.लक्षातही आले नाही , २०-२२ वर्षाची मुलं जी आपल्याला दिदी आणि नवऱ्याला भैय्या म्हणायची, ती कधी काकू काका म्हणायला लागली आणि आपल्या ते अंगवळणी पडले हे लक्षातही आले नाही
घरातले गेल्या सोळा वर्षात जमा झालेले सामान पाहून मात्र तिला मात्र भरून येत होते. प्रत्येक वस्तू बरोबर जोडल्या गेलेली आठवण, उगीच मन उदास होत होते. किती वेळ आपण नवऱ्याला म्हणालो, की आपलं इथे एखादे लहानसे का होईना पण स्वतःचे घर घेऊ या म्हणून? पण प्रत्येक वेळेस त्याने दुर्लक्ष करून उडवून लावले होते,म्हणायचा, आपल्याला थोडी इथेच रहायचे आहे? कधी न कधी तरी परत जायचं आहेच आपल्या मूळगावी.
भाड्याचे घर शोधणे सुरु केले आणि समजले की ज्या बिल्डींग मधे रहातोय, त्याच बिल्डींग मधे, सिंग म्हणून एका गृहस्थाला एक फ्लॅट भाड्याने द्यायचाय आहे. ताबडतोब त्याला भेटायला गेलो, माणूस बरा वाटला, म्हणाला, की हा फ्लॅट त्याला लहान पडतोय म्हणून तो मोठ्या फ्लॅट मधे भाड्याने रहाण्यासाठी जातोय. बोलणी झाली आणि, दोन दिवसात घर शिफ्ट झाले.
होता होता दोन महिने झाले आणि आणि असे वाटले की आपण आता ह्या घरात ऍडजस्ट होतोय, तर एक दिवस पुन्हा सींगचा (घरमालकाचा ) फोन आला, की नवीन घरात रहायला गेल्यावर त्याची आई वारली- आणि म्हणून त्याला असे वाटते की त्याचे ते भाड्याचे घर त्याच्यासाठी अनलकी आहे. थोडक्यात म्हणजे काय तर त्याला आम्ही घर रिकामे करून द्यावे हे सांगायला फोन केला होता. क्षणभर तर काय करावे हेच सुचत नव्हते. म्हणजे पुन्हा आत घर शोधणे, शिफ्टींग वगैरे आलेच! घर पण त्याच कॉलनीत मिळणे महत्वाचे. आता काय करावं बरं?? विचार मनात आला, की आपले स्वतःचे घर असते तर अशी वेळ आली असती का आपल्यावर? म्हणतात ना घर फिरले की वासे पण फिरतात.
सिंगच्या बायकोने, तर तुम्ही आता स्वतःचेच घर घेऊन टाका म्हणून आम्हाला सल्ला पण दिला. असे नको असलेले सल्ले बरेच लोकं देत होते, आणि त्यामुळे मनस्ताप खूप होत होता. आज पर्यंत तुम्ही घर का घेतलं नाही म्हणून वेड्यात काढणारे लोकंही होते, त्यांचा त्रास वेगळाच! पण इतके असूनही तिच्या नवऱ्याच्या मनात काही घर घेण्याचे पक्के होते नव्हते. इतका त्रास झाल्यावरही तो मात्र स्थितप्रज्ञा सारखा वागत होता. आणि त्याने पुन्हा भाड्याचे घर पहाणे सुरु केले.
तेवढ्यातच एका मराठी माणसाचे घर पण भाड्याने द्यायचे आहे असे समजले, म्हणून त्याला भेटल्यावर, पैशाचं सगळं फायनल झालं, त्याने ऍग्रीमेंट ची कॉपी मेल केली, ती वाचल्यावर मात्र खरंच आपण घर भाड्याने घेतोय की ह्या माणसाचा उर्मटपणा सहन करतोय हेच समजत नव्हते. त्याच्या ऍग्रिमेंट मधे ” माझा पत्ता तुम्ही कुठल्याही सरकारी कामा साठी म्हणजे पासपोर्ट, आधार कार्ड , बॅंक वगैरे साठी वापरायचा नाही ,अशा मूर्खासारख्या अटी घातल्या होत्या. या शिवाय काही टर्म्स तर इतक्या अपमान कारक होत्या की ,जसे तुमचे सामान बाहेर फेकुन तुम्हाला शारीरिक जबरदस्तीने घरातून काढण्याचा अधिकार त्या घरमालकाला असेल वगैरे वगैरे……, की त्या वाचून घर घेण्याची इच्छाच मेली . दुसरे घर काही दृष्टिपथात नव्हते, म्हणून त्याच्या अटी मान्य कराव्या लागणार की काय अशी परिस्थीती निर्माण झाली होती. पण अजून दोन दिवस हातात होते .
पुन्हा पुर्ण जोमाने घर पहाणे सुरु केले आणि दुसरे एक घर शेवटी भाड्याने मिळाले. घरमालक सज्जन होता. त्याने अजिबात काही त्रास न देता सर्वसाधारण असते तसे ऍग्रीमेंट केले आणि आम्ही इकडे शिफ्ट झालो. खरं तर दोनच महिन्यानंतर पॅकिंगची वेळ येईल असे वाटले नव्हते, पण आली वेळ! सगळं सामान पॅक केले, आणि नवीन घरी रहायला गेलो. सगळं सामान लावून झाले.
घर बहुतेक गेले सहा महिने रिकामेच होते, त्यामुळे घराची अवस्था काही फारशी बरी नव्हती. नाही म्हणायला घरमालकाने पेंटींग केले होते, पण बाथरूम वगैरे तर विचारायची सोय नाही. आमच्या पूर्वी इथे काही बॅचलर्स रहायचे . त्यामुळे टॉयलेट्स वगैरे खूपच घाण झालेल्या होत्या.
तिने अंगावरच्या पंजाबी ड्रेसच्या ओढणीची झाशीच्या राणी प्रमाणे गाठ मारली आणि अंगात आल्यासारखी टॉयलेट्स ची सफाई सुरु केली. टॉयलेट अगदी लखलखीत मनाप्रमाणे स्वच्छ झाल्यावर तिने साबणाने हात पाय धुतले आणि तिने ओढणीची गाठ सोडून डोळ्यांच्या कडांवर जमा झालेले पाणी टिपले. तेवढ्यात तो काही सामान घेऊन माळ्यावर टाकायला बाथरूम मधे आला, आणि त्याने तिच्या रडवेल्या चेहेऱ्याकडे लक्ष गेले. तिच्या डोळ्यात जिथे त्याचे संपूर्ण विश्व समावलेले असायचे तिथे आज मात्र दुखावल्याची भावना दिसत होती. त्याने तिला जवळ घेतले, आणि विचारले काय झाले?? ती म्हणाली, उगीच रडू आलं, “अजून किती दिवस लोकांच्या टॉयलेट्स घासायच्या आपण??” खरंय नाही का?? भाड्याच्या घरात आपण भाडे जरी भरले तरी ते घर आपलं नसतंच…..
हाच तो क्षण होता की अंतर्बाह्य हादरला होता तो…. आणि पुढल्या दोनच महिन्यात तिला
अढळपद मिळालं, ध्रुवा सारखं :)
त्याला वाटलं , की तिच्या मनातलं समजायला आपल्याला इतका वेळ का बरं लागला??